पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राजर्षि छत्रपति शाहू महाराज

राजर्षी शाहू छत्रपती* *महाराज.

कालो वा कारणं राज्ञो, राजा वा काल कारणम्।
इति ते संशयो मा भूद् राजा कालस्य कारणम् ।।
( महाभारत शांति.६९:७९).


कोणत्याही समाजाच्या विकासनाला अथवा अधःपतनाला राज्यसंस्था उत्तरदायी असते; हा महाभारतातला सिद्धांत ज्यांनी सर्वार्थाने समजून घेतला आणि राज्यकारभार करताना प्रजेचे कल्याण व प्रजेचे हित प्राधान्याने जपले; त्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा आज १४७ वा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा हा अल्पपरिचय.


राजर्षी शाहू महाराज शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. त्यांचे स्वतःचे प्रारंभिक शिक्षण कोल्हापूरात झाले. त्यानंतर राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' हे राजर्षी जाणून होते म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या प्रजेची प्रगती त्यांना साधायची होती. प्रजाजनांना पायाभूत शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये १९१७ साली प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. ते म्हणतात, "During all this time, it has been my earnest and constant endeavour to do everything in my power to educate masses to inspire them with a higher standard of life, for their up liftment.


थोडा इतिहासः-
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा आणि कोल्हापूर या‌ दोन गाद्या कशा? असा अनेकांना प्रश्न पडतो त्यांच्यासाठी छत्रपतींच्या गादीविषयीचा थोडक्यात इतिहास सांगणे जरूरीचे वाटते.


छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून, राज्याभिषेक करून घेऊन आणि स्वतःच्या नावे शक सुरू करून, मराठी माणसांमध्ये स्वातंत्र्य प्रेम आणि क्षात्रतेज निर्माण केले. मराठे स्वतःची पातशाही निर्माण करू शकतात, शासनकर्ते होऊ शकतात, स्वतःच्या राज्याचा विस्तार करू शकतात ही अस्मिता हिंदुस्थानात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी जागविली नि रुजविली.


शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुगल सम्राट औरंगजेब, गोव्याचे पोर्तुगीज आणि इतर शत्रू यांच्याशी हिंमतीने लढा दिला. पण एका बेसावध क्षणी संभाजी महाराज पकडले गेले. औरंगजेबाने हालहाल करून त्यांचा वध केला. त्यांची पत्नी येसुबाई व पुत्र शाहू यांना औरंगजेबाने नजर कैदेत ठेवले. औरंगजेब मराठ्यांचा निःपात करण्यासाठी स्वतः दक्षिणेत दाखल झाला पण शिवाजी महाराजांचे द्वितीय सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या अधिपत्याखाली मराठा सैन्याने औरंगजेबाशी संघर्ष चालू ठेवला. दुर्दैवाने सन१७०० साली छत्रपती राजाराम महाराजांचे अकाली निधन झाले. स्वराज्याच्या संरक्षणाची व राज्यकारभाराची जबाबदारी केवळ पंचवीस वर्षे वय असलेल्या त्यांच्या राणीसाहेब, महाराणी ताराबाई यांच्यावर येऊन पडली. ऐन तारुण्यातील वैधव्याचे दुःख बाजूला ठेवून आशिया खंडातील सर्वात बलशाली असलेल्या औरंगजेबाशी ताराराणींनी सतत सात वर्षे संघर्ष केला आणि औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच गाडले. महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाची महाराष्ट्राने जेवढी दखल घ्यायला हवी होती तेवढी घेतली गेली नाही हे दुर्दैवच समजले पाहिजे. औरंगजेबाचा पुत्र आजम शहा याने मराठ्यांत दुही निर्माण व्हावी म्हणून शाहू व येसूबाई यांना कैदेतून मुक्त केले. शाहू महाराष्ट्रात परतल्यावर भाऊबंदकीचा वाद सुरू झाला याची परिणती म्हणजे हिंदवी स्वराज्याची दोन राज्ये झाली. सातारचे राज्य छत्रपती शाहू यांच्याकडे तर कोल्हापूरचे राज्य महाराणी ताराबाई यांच्याकडे, अशी स्वराज्याची वाटणी झाली.

पुढे छत्रपती शाहूंनी राज्यकारभाराची सूत्रे पेशव्यांकडे दिली. पेशव्यांनी आपले महत्त्व वाढवत मराठ्यांचे राज्य वाढवले. कालांतराने शिंदे, होळकर या सरदारांनी आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. सातारच्या केंद्रीय सत्तेचा दरारा निष्प्रभ होत गेला. शेवटच्या बाजीरावाच्या नादान कारभारामुळे १८१८ साली पेशवाई बुडाली. इंग्रज मुत्सद्दी होते. त्यावेळी जी पोकळी निर्माण झाली त्यामुळे मराठी राज्यात उद्रेक होईल, अराजक निर्माण होईल,अशी त्यांना भीती वाटली म्हणून त्यांनी सातारचे राजे प्रतापसिंह महाराज यांचे राज्य पुनर्जीवित केले पण पुढे काहीतरी खुसपट काढून इंग्रजांनी सातारचे राज्य खालसा केले. कोल्हापूरच्या राज्यावर अशा प्रकारचे संकट आले नाही पण मांडलिकत्वामुळे गादीवरील राजांच्या हाती निरंकुश अशी सत्ता राहिली नाही.


महाराणी ताराराणी यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूरच्या गादीवर राजर्षी शाहू छत्रपती यांचा वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक झाला आणि आणि खऱ्या अर्थाने राज्याचा उत्कर्ष सुरू झाला.


राजर्षी शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. त्यांना माणसांची चांगली पारख होती. राज्याच्या कल्याणासाठी आणि तळागाळातील रयतेला वर आणण्यासाठी त्यांनी देशात सर्वप्रथम नोकरीतील आरक्षण पद्धती लागू केली. राज्यातील सर्व जाती-धर्माच्या प्रजाजनांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली, हे वर आलेच आहे पण एवढ्यावर न थांबता त्यांनी ब्राह्मण, जैन, मराठा, नाभिक, वैश्य, ढोर-चांभार, ख्रिश्चन, मुस्लिम अशा सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली. गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु केली. सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून त्यांनी अनिष्ट रूढी मोडीत काढणारे कायदे केले.


विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, अस्पृश्यता निवारण कायदा, वेठ बिगारी निर्मूलन कायदा असे कायदे त्यांनी आपल्या राज्यात अमलात आणले. भटक्या विमुक्तांच्या कपाळावरचा गुन्हेगार जमाती असा शिक्का पुसून त्यांचा उद्धार केला. जातीभेद निर्मूलन चळवळ त्यांनी सुरू केली. स्त्री वर्गाच्या संरक्षणासाठीचे कायदे अमलात आणले. कामगार चळवळीला प्रेरणा दिली. रयतेची आर्थिक उन्नती व्हावी, व्यवसाय, व्यापार उदीम वाढावेत म्हणून श्री शाहू छत्रपती मिल्स ही कापड गिरणी सुरू केली. उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. मध संकलन, काष्ठार्क उद्योगाला चालना दिली. अनेक कृषी औद्योगिक प्रदर्शने त्यांनी भरविली. सहकार चळवळीला चालना द्यावी म्हणून १९१३ साली सहकार कायदा केला. दूध संकलन करणाऱ्या सहकारी दूध संस्था उभ्या केल्या. शेतकऱ्यांना बचतीची सवय लावणाऱ्या आणि प्रसंगी अडचणीत कर्ज देणार्‍या ग्रामीण पुरवठा संस्था, सहकारी तत्त्वावरील पतसंस्था स्थापन करण्यास उत्तेजन दिले. गुळाच्या व्यापारासाठी शाहुपुरी व्यापारपेठ त्यांनी सुरू केली. शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थांची निर्मिती केली. राजर्षी शाहू महाराजांचे चिरंतन स्मारक म्हणता येईल अशा, कोल्हापूर संस्थानातील शेतकऱ्यांना वरदायिनी ठरलेल्या राधानगरी धरणाच्या बांधकामास अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी प्रारंभ केला आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा पाया रचला. राधानगरी धरण हे देशातील पहिले वहिले धरण होय.


राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, संगीत, नाट्य इत्यादी कलांना प्रोत्साहन दिले. कुस्तीसाठी रोमच्या धर्तीवर ३०-४० हजार प्रेक्षक बसू शकतील असे भव्य कुस्त्यांचे मैदान कोल्हापुरात निर्माण केले. कुस्तीगीरांना राजाश्रय दिला.


त्यांना शिकारीची आवड होती पण वने आणि वन्यप्राणी यांचे संरक्षण व्हावे यासाठी ते अतिशय दक्ष असत. दाजीपूरचे अभयारण्य आणि अनेक संरक्षित वने त्यांनीआपल्या राज्यात निर्माण केली. केवळ हिंस्र आणि माणसांच्या रक्तास चटावलेल्या पशूंची शिकार करण्यावर त्यांचा कटाक्ष असे.
संगीताचे गौरीशंकर असलेले गानमहर्षी अल्लादियाखाँ यांची त्यांनी राजगायक म्हणून नेमणूक केली. अल्लादियाखाँ यांच्यामुळे जयपूर घराण्याचे अनेक गायक कलाकार कोल्हापुरात निर्माण झाले. कोल्हापुरात शाहू महाराजांमुळे त्याकाळात संगीत विद्यापीठ तयार झाले होते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.


शाहू नगरवासी, किर्लोस्कर या नाट्य कंपन्यांना शाहू महाराजांनी सर्व प्रकारची मदत केली. बालगंधर्व, केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे, महाराष्ट्र कोकीळ शंकरराव सरनाईक या नाट्य कलावंतांवर शाहू महाराजांचा वरदहस्त होता. नाट्य चळवळीस उत्तेजना मिळावी म्हणून त्यांनी कोल्हापुरात पॅलेस थिएटरची निर्मिती केली. सिने उद्योग निर्माण व्हावा यासाठी बाबूराव पेंटर यांच्यासारख्या कलाकाराला शाहू महाराजांनी सर्व प्रकारची आर्थिक मदत केली.


असामान्य प्रतिभेचा अवलिया चित्रकार आबालाल रेहमान यांची शाहू महाराजांनी दरबारी चित्रकार म्हणून नेमणूक केली. आनंदराव व बाबुराव पेंटर, माधवराव परांडेकर, रावबहादुर धुरंधर असे अनेक चित्रकार शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे ख्यातकीर्त झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या मुळे कोल्हापूर हे कलापूर म्हणून उदयास आले.


राज्यकर्ते म्हणून काही मर्यादा असल्या तरी राजर्षी शाहू महाराज स्वातंत्र्य चळवळीच्या बाजूने होते. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी हस्ते परहस्ते मदत केली होती. वैचारिक मतभेद असले तरी लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज यांचे संबंधअत्यंत जिव्हाळ्याचे असे होते.


"The object of the government in peace and war is not the glory of the ruler or races but the happiness of the common man." हे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आपल्या जीवनाचे सूत्र मानले आणि राजवैभव व विलासी जीवन यात रममाण न होता प्रजेच्या उद्धाराचेआणि सामाजिक क्रांतीचे कार्य त्यांनी व्रतस्थासारखे आयुष्यभर निभावले.


राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा.

*सर्जेराव कुइगडे*

दि.२६/०६/२०२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू