पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सक्सेसफुल पर्सनॅलिटी

पुस्तक आढावा

पुस्तकाचे नाव-सक्सेसफुल पर्सनॅलिटी

लेखक- डॉअनिलराज जगदाळे (MSc; Ph.D)

प्रकाशक- रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर, अजब डिस्ट्रीब्युटर्स

          चार वर्षांपूर्वी लातूर येथे सेल मधून केवळ साठ रुपये ला हे पुस्तक मी विकत घेतलं होतं.त्यावेळी एवढी कल्पनाही नव्हती की हे पुस्तक माझं व्यक्तिमत्त्व बदलण्यासाठी उपयोगी पडेल. मला नेहमीच व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित वेगवेगळी पुस्तके वाचनाचा छंद आहे.

               नावाप्रमाणेच हे पुस्तक तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी निश्चितच उपयोगी पडणारे आहे.आज-काल आपण बऱ्याच पदव्या घेऊन इकडे तिकडे फिरतो तेंव्हा आपल्या असे लक्षात येते की, अजून आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व फुलवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कठोर परिश्रमाची तयारी कशी करायची? होकारात्मक मानसिक दृष्टिकोन कसा बाळगायचा? आणि ध्येयाची निश्चिती कशी करायची?या सर्वांची उत्तरे लेखकाने आपल्या चांगल्या शैलीने मांडली आहेत, जेणेकरून वाचकाला त्याचा फायदा आजीवन होणारच आहे.

               प्रत्येक व्यक्ती  'एकमेवाद्वितीयच' असते म्हणजे आपल्यासारखे फक्त आपणच, दुसरे कुणी नाही, असा मानसिक विचार अंगी बाळगावा असे लेखक सांगतात.स्वतःच्या व्यक्तीमत्वातील दोष स्वतःच पहावेत आणि इतरांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण अंगीकारावेत. आपल्या सुप्त व्यक्तिमत्वाचा नेहमी विकास करावा.

            'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे लेखक वागण्यास सांगतात. मोठी इच्छा तर परिश्रम हे मोठेच. आपली प्रत्येक कृती सद्सद्विवेक बुद्धीने तपासून पाहण्याचा सल्लाही लेखक देतात.ध्येय प्राप्तीसाठी सातत्य हे गरजेचे आहे हे पटवून सांगण्यासाठी लेखकाने थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाचे ( ज्याने विजेचा बल्ब शोधला) उदाहरण दिले आहे.

            आपल्या मनावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे, जेणे करून त्यातून चांगले विचार, चांगले वर्तन घडेल.आपली स्मरणशक्ती कशी वाढवायची हे लेखकाने वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून स्पष्ट केली आहे.'निमोनीक्स'(Pneumonics)चा वापर कसा करायचा हे लेखकाने सोदाहरण लिहिले आहे. उदा. अनिता (अमला मध्ये निळा लिटमस तांबडा होतो)

        Sixth Sense (सहावी जाणीव किंवा आतला आवाज) काय असतो? तो कसा ओळखावा? हे लेखकाने सोदाहरण स्पष्ट केले आहे.

              'स्वयंसूचना' हे एक प्रभावी अस्त्र आहे, याचा वापर कसा करावा? हे लेखकाने खूप चांगल्या प्रकारे विशद केले आहे.

       Intuition (अंतःप्रेरणा) काय असते? तिचा वापर कसा करावा? हे लेखकाने सोदाहरण स्पष्ट केले आहे.

              भावनिक आणि लैंगिक विकास कसा साधावा? जर एखादी लैंगिक विकृती असेल तर त्यातून कसे बाहेर पडावे? हे अतिशय मार्मिकपणे लेखकाने विशद केले आहे.

              सत्य आणि भास यामधील आंतर काय? आपण आत्मपरिचय कसा करून घ्यायचा? हे सुंदरपणे लेखकाने स्पष्ट केले आहे.

             जीवनामध्ये नियोजन फार गरजेचे आहे. एखादी गोष्ट आपल्याला वेळेवर करायची असल्यास नियोजनाशिवाय ती घडत नाही. मग ते आपण शिकत शिकत असतानाच करणे गरजेचं ठरतं पण तसं घडलं जात नाही त्यामुळेच नंतर ध्येयाच्या  वाटेमध्ये असंख्य अडसर येऊ लागतात.समजा खूप वेळ देऊनही ते गाठणे शक्य नसल्यास आपल्याकडे प्लॅन बी(Plan B) देखील तयार पाहिजे असे लेखक सांगतात.

               वेळेचे व्यवस्थापन (Time Log) करणे खूप गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे वागणे हे अति गरजेचे आहे.प्रत्येक गोष्टीच्या नोंदी वेळेवर करणे गरजेचे आहे तेंव्हा कुठे आपण ध्येयाच्या वाटेवर जाऊन ध्येयपूर्ती करू शकतो असे लेखक म्हणतात.

               आपला आत्मविश्वास आपणच सांभाळून ठेवला पाहिजे त्यामध्ये धरसोड वृत्ती अजिबात नको नाहीतर त्यामुळे आपलेच नुकसान होते आणि ध्येयाची वाट अजून थोडी अवघड व विलंबमय होते.

                आपणच आपल्या वाईट गोष्टींचं किंवा सवयींचं आत्मपरीक्षण करा असे लेखक म्हणतात.त्या सवयींचे पृथक्करण आणि विश्लेषण करून मग हळूहळू ती सोडण्यासाठी प्रयत्न करा असे लेखक सुचवतात.

             'स्वयं व्यवस्थापन आणि स्वयं अनुशासन हे देखील यश प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहेत असे लेखक सांगतात.

           लेखकाचे व्यक्तिमत्व एक उच्चविद्याविभूषित असून स्वतः ते M.Sc;Ph.D आहेत.ज्या वाचकाला आपले व्यक्तिमत्व निश्चितच बदलायचे आहे आणि ते आकर्षक, प्रभावी व यशस्वी बनवायचे आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं आणि त्याप्रमाणे जीवनात बदल करावा.

                 कितीतरी विदेशी लेखकांची भाषांतरित पुस्तके विनाकारण वाचकांच्या माथ्यावर मारली जातात, पण एक मराठी लेखकाने एका चांगल्या विषयावर लिहिलेलं हे पुस्तक तेवढं प्रसिद्ध होऊ शकलं नाही, ही खंत मला वाटते. आता तरी ते बरेच वाचक हे पुस्तक वाचतील अशी आशा मी बाळगतो.

©®- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती (कवी, लेखक अणदूर)

मो.9326807480🙏

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू