पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हट्ट.......

मानवी स्वभावाचे अनेकानेक कंगोरे...गुणदोष आपल्याला नेहमीच पहायला मिळतात आणि प्रत्यक्षात अनुभवायला सुद्धा मिळतात...या अनेकविध स्वभावातील गुणदोषांपैकी एक म्हणजे हट्ट...हट्ट म्हणजेच हेका...दुराग्रह...हट्ट हा एक स्वभावदोष माणसांच्या वागण्यातून कित्येकदा आपल्याला दिसून येतो. मी म्हणेल तसेच...आणि मी म्हणेल तेच खरे...हे हट्टीपणाचे प्रमुख लक्षण आहे...

 या हट्टीपणापायी माणसांनी कित्येकदा कित्येकांना वेठीस धरले. आजकालची लहान मुले ही खूपच हट्टी आहेत...अशी तक्रार मोठी माणसे सातत्याने  करत असतात...परंतु लहानांचे हट्ट हे बालपणातील अज्ञानातून निर्माण झालेले असतात...त्यांना परिस्थितीची फारशी जाणीव नसते...त्यांचे हट्टीपणाचे वागणे हे तात्पुरते असते...काही वेळ निघून गेला की मग त्यांची एखाद्या गोष्टीबद्दलच्या मागणीची...हट्टाची तीव्रता आपोआपच कमी होते...तर कधी कितीही वेळ गेला तरी लहानग्यांचा हट्ट मात्र कमी होत नाही...हे सर्व घडते ते लहानग्यांच्या अज्ञानातून...अजाणतेपणातूनच...

परंतु मोठी माणसे ही सज्ञान असूनही त्यांच्या अंगी समजूतदारपणा नसेल तर मग ती ही...लहान मुलांसारखी बालिशपणाने वागून हट्टाला पेटतात आणि मग तिथंच खरं खूप काही विपरित घडण्याची प्रक्रिया चालू होते...

लहानांच्या हट्टीपणाविषयी जेव्हा सर्वजण बोलतात तेव्हा मोठी माणसे सुद्धा किती हट्टी असतात याचाही विचार होणे गरजेचे आहे...

कैकयीच्या हट्टापायी श्रीरामांना विजनवास अर्थातच वनवास भोगावा लागला...हे जरी खरे असले तरी...'मज आणून द्या... तो हिरण अयोध्यानाथा'...अशा हट्टामुळेच सीतामाईचे झालेले हरण व खरेतर तिथूनच पुढे घडलेले रामायण सर्वश्रुत आहेच...

बालहट्ट...राजहट्ट...स्त्रीहट्ट...या हट्टांच्या प्रकारातूनच इतिहासात खूप काही घडले...आणि बिघडले सुद्धा...

इतिहासातील घटनांचा बोध न घेता...हट्टाच्या परिणामांचा विचार न करता...आजही कित्येक माणसे अविचाराने...हट्टीपणाने वागतात...ही खरी मानवजातीची शोकांतिका आहे...

इतिहासातील घटनांतील मोठ्या जाणत्या माणसांची तीच हट्टी वृत्ती...आजही कितीतरी घरांमध्ये आपल्याला सुद्धा पहायला मिळते...आणि मग या मोठ्यांच्या हट्टापायीच कित्येक एकत्र कुटुंबे बघता बघता विभक्त झाल्याचे आपल्याला पहायला मिळते...

 लहानांचे हट्ट एकवेळ आपण समजून घेऊ शकतो...परंतु कळत्या माणसांकडून सुद्धा असे हट्ट करणे योग्य आहे का ?...

आज समाजात वयाने मोठी असलेली.. शहाणी...शिकली सवरलेली माणसे सुद्धा...वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहीजे...या हट्टापायी सोनोग्राफी करून कित्येक उमलत्या कळ्यांना गर्भातच मारून टाकतात...हा हट्ट माणसांच्या निर्लज्जपणाचा कळस तर आहेच पण अशी हट्टी माणसे ही मानवतेला लागलेला कलंक सुद्धा आहेत...

आयुष्यभर तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीचे लग्न ठरविल्यानंतर लग्नमंडपातच अंगठीसाठी... गाडीसाठी...हुंड्यासाठी...किंवा एखाद्या क्षुल्लक मानपानासाठी रुसुन...हट्ट धरून बसणारी महामूर्ख मंडळी आजही समाजात आपल्याला पहायला मिळतात...चांगली सुशिक्षित म्हणवून घेणारी...स्वतःला प्रतिष्ठित समजणारी माणसे सुद्धा हुंड्याच्या हट्टापायी...क्षुल्लक मानपानाच्या हट्टापायी...आपली चांगली जोडलेली आयुष्यभराची नाती सुद्धा मातीमोल करतात तेव्हा हा हट्ट किती वाईट आहे याची प्रचिती येते...नको त्या गोष्टीचा नको इतका हट्ट धरणे...ही मानवी जीवनातील माणुसकीच्या बाबतीतील शरमेची बाब आहे...

 अशी माणसे जेव्हा त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी इतके निगरगट्ट बनतात ना...तेव्हा समाजानेच अशा माणसांना अद्दल घडवण्यासाठी हट्टी बनले तर निदान हुंडाबळी सारखे प्रकार तरी समाजात घडणार नाहीत...

लहानपणी मुलांना नकार न ऐकण्याची सवय झाली की...मग ती मुले हट्टी बनत जातात...आणि याच त्यांच्या हट्टी स्वभावाने पुढे मग ते कोणाचेच ऐकत नाहीत...मग आपले लाड पुरवून घेण्यासाठी...आपले ईप्सित साध्य करण्यासाठी...मग ही हट्टी मुले पुढे टोकाची पावले उचलतात...आणि कुटुंबासह समाजालाही वेठीस धरतात...

कित्येकदा आपल्या अवतीभवती आपण काही अल्पवयीन मुलांच्या... दुचाकीच्या अपघातांच्या घटना पाहतो...ती मुले अल्पवयीन असून सुद्धा त्यांच्या हट्टापायीच पालक त्यांच्या हाती दुचाकी देतात...ती मुले गाडी खूप वेगात चालवतात...आणि मग त्यांच्या हट्टापायीच तारूण्यातील पदार्पणाचा जोश त्यांना मृत्यूच्या दारात घेऊन जातो...फक्त दुचाकीच्या हट्टापायीच ते स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात आणतात...समाजात अशा कित्येक घटना घडल्या तरी पालक यातून काही बोध घेत नाहीत...हे अल्पवयीन मुलांइतकेच इतर सर्वांसाठी सुद्धा खूपच घातक आहे...

समाजात आज मोबाईलच्या हट्टापायी...दुचाकीच्या हट्टापायी...कित्येक अल्पवयीन मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे सुंदर जीवन संपवून...जन्मदात्या आईवडीलांनाच त्यांनी कायमचे दुःखात ढकलून दिले...ज्या आईवडिलांच्या वाट्याला असे दुर्दैवी क्षण आले त्यांनी आता कोणाकडे पाहून जगायचे ?...हा विचार काळजाला चिरून जातो...

मोठ्या माणसांनी वेळीच अल्पवयीन मुलांचे अनाठायी लाड पुरवणे बंद करून त्यांचे समुपदेशन केले तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही...

खरेतर लहानांच्या हट्टाविषयी मोठी माणसे नेहमीच बोलतात परंतु कित्येक मोठ्या व्यक्तींनी सुद्धा  स्वतःच्या हट्टापायी कित्येकदा समाजाला वेठीस धरल्याची उदाहरणे सुद्धा आपणाला पहायला मिळतात...

या जगावर फक्त आमचीच सत्ता...आम्ही म्हणेल तेच खरे...या विचित्र मानवी हट्टापायी माणसांनी तर कित्येकदा माणुसकीच सोडल्याची उदाहरणे आपण पाहात असतो..पण त्याचे परिणाम आता जास्त करून माणसांनाच भोगावे लागत आहेत...स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर सगळीकडे फक्त स्वतःचेच साम्राज्य निर्माण करण्याच्या हट्टापायी माणसांनी जंगले बकाल केली...पक्षी आणि प्राण्यांचा संहार चालू केला...आज त्याच माणसांची गावे...शहरे बकाल होत चालली आहेत...कशासाठी इतका आततायीपणा आणि कशापायी एवढा अट्टाहास ?... याचा विचार केला नाही तर मग दुर्दैव सुद्धा हट्टी बनून आपला पिच्छा सोडणार नाही याचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहीजे...

लहानांचे हट्ट हे बालिशपणातून असतात पण मोठ्या माणसांनी सुद्धा बालिशपणाने हट्टाने वागणे मानवजातीला परवडणारे नाही...

स्त्रिया कित्येकदा नव्या साडीसाठी आपल्या पतीकडे हट्ट धरतात...आपल्या पतीकडे काही मागायचे हा स्रियांचा हट्ट ठराविक मर्यादेत नात्यातील गोडवा वाढवतो परंतु आपल्या पतीची आर्थिक कुवत न पाहता उगीचच शेजारणीला दाखवण्यासाठी जर सातत्याने ती हट्टाने पेटून उठली...तर मग संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही...त्यासाठी महिलांनी सर्वंकष विचार करून आपल्या नवर्‍याकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरायचा की हक्क दाखवायचा हे आधी ठरवले तर संसार नक्कीच सुखाचा होईल...

आईवडील आपल्या पोटच्या गोळ्याला जीवाचे रान करून लहानाचे मोठे करतात...त्याचे शिक्षण पूर्ण करतात...मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न करतात...चांगली नोकरी लागली की त्याचे लग्न लावून देतात...परंतु लग्न झाल्यावर मात्र घरात नवीन आलेली सून जेव्हा आपल्या पतीकडे वेगळे राहण्याचा हट्ट धरून बसते...तेव्हा मात्र म्हातारपणात कित्येक आईवडिलांना एकाकी जीवन जगावे लागते...ही खूप मोठी शोकांतिका आज बहुतांशी घरात पहायला मिळते...घरात एका नवीन आलेल्या मुलीच्या चुकीच्या हट्टामुळे कित्येकदा कुटुंबे विस्कळीत होतात...जसे आपले आईवडील तसेच आपल्या पतीचे आईवडील याचा विचार आजच्या मुलींनी करून स्वतंत्र राहण्याचा हट्ट सोडला तर बहुतांशी घरांच्या वाटण्या न होता...त्या कुटुंबात माणसांबरोबरच सुख...समाधान सुद्धा आनंदाने नांदेल...असे म्हणणे वावगे ठरणार नाही...

जगाचा विचार करता आज कित्येक देशांच्या... राज्यकर्त्यांच्या...नको त्या हट्टापायीच कित्येक देशात अराजकता माजली आहे...आधुनिक जगाच्या हट्टापायीच माणसांनी नको ते शोध लावले...त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण जगावर होत आहे...

माणसांनी जर आपल्या अंतरी मानवता...माणुसकी...प्रेम...लळा...जिव्हाळा जोपासून...सुखी...समाधानी...आणि समृद्ध जीवन जगण्याचा हट्ट धरला तर...संपूर्ण मानवजातच नाही तर संपूर्ण सृष्टीच आनंददायी होईल यावर कुणाचे दुमत असू शकणार नाही...


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू