पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

करा मानवाची सेवा

काव्यप्रकार - छोटा अभंग


करा मानवाची सेवा


हात जोडूनिया देवा ।

करा मानवाची सेवा ॥१॥


करा दातृत्व जागर ।

द्यावी भुकेल्या भाकर ॥२॥


ठेवा आशय संवाद ।

टाळा विषय विवाद ॥३॥


नको मोह काम क्रोध ।

घ्यावा अंतरीचा शोध ॥४॥


अविर्भाव पंडितांचा ।

वारा पोकळ शब्दांचा ॥५॥


काही बोलकेच कोंब ।

कर्तव्याची बोंबाबोंब ॥६॥


कास धरावी सत्याची ।

पाठ फोडावी खोट्याची ॥७॥


खोट्यावर घाला घाव ।

गाडा जाती-भेदभाव ॥८॥


जाणुनिया मतितार्थ ।

दाखवावा पुरुषार्थ ॥९॥


जना सांगे गजानन ।

ठेवा शुद्ध काया मन ॥१०॥


©️ गजानन तुपे

     फोर्ट, मुंबई

९६९९२ ४६३५८

मंगळवार २० जुलै २०२१

देवशयनी आषाढी एकादशी


    संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत नामदेव, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्‍वर, संत निळोबाराय, संत सेना महाराज..... अशा प्रकारे महाराष्ट्राची संत परंपरा खूप मोठी आहे. आपले सर्व संत त्याकाळातील विचारवंत होते, समाज सुधारक होते, अभंग रचनांच्या माध्यमातून प्रबोधन करणारे श्रेष्ठ साहित्यिक होते.

समाजातील विषमतेवर, जातियतेवर आणि खोट्या, फसव्या दांभिकतेवर त्यांनी कठोर प्रहार केले. आपल्या भजन आणि नाम-संकीर्तनातून त्यावेळच्या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे फार मोठे कार्य या संतांनी केले. 

      खोट्या आणि फसव्या बुवाबाजीला ढोंगीपणाला बळी न पडता आपले कर्तव्यकर्म करीत रहा. मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आपले सामाजिक वर्तन अत्यंत जबाबदारीचे असले पाहिजे. खोट्या आणि बडबोल्या मंडळीं पासून सावध राहिले पाहिजे. काम, क्रोध, मद, मोह, मत्सरादि  षडरिपूंवर विजय मिळवून एकमेकांशी सौहार्दपूर्ण संवाद साधला पाहिजे. कोणत्याही ठिकाणी अनावश्यक विवाद टाळून सुसंवादी भूमिका घेता आली पाहिजे. सन्मार्गावर चालण्यासाठी आपले आचरण शुद्ध असले पाहिजे. अशा प्रकारे अत्यंत प्रामाणिक आणि समतावादी विचारांचा पुरस्कार संतांनी नेहमीच केला. आपण सर्व आपल्या संतांच्या विचार पथावर चालणारे साहित्य पंढरीचे सहकारी वारकरी आहोत. त्यांच्या विचारांचे मर्म जाणून कर्म करत राहूया...


???? राम कृष्ण हरी ????


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू