पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भेटी लागी जिवा

" भेटी लागी जीवा ....!"

 

 

सगळ्या जगाची माऊली असलेल्या विठूमाऊलीच्या भेटीची आस मनात बाळगून ऊन-वारा, पाऊस-पाणी यांची काही एक तमा न बाळगता टाळ - मृदुंगाच्या गजरात "ज्ञानोबा माऊली तुकाराम" असा घोष करीत पंढरीच्या दिशेने कूच करणा-या हजारो वारक-यांच्या शेकडो दिंड्या आपण सगळेच दरवर्षी  " याची देही - याची डोळा" पाहत असतो. दिंडीच्या संदर्भातील बातम्या, वृत्तांत, रिंगण सोहळ्याचा भक्तीभावपूर्ण कार्यक्रम दूरचित्रवाणीवर पाहत असतो तसेच अशा कार्यक्रमाबद्दलची माहीती वृत्तपत्रांमधून वाचत देखील असतो आणि अशी दिंडी मग नजरेआड झाली की, आपल्या नशीबाला दोष देत आपल्या कामाला लागत असतो आणि " जाऊ द्या, आपल्याला हे शक्य नाही " अशी मनाची समजूत काढून त्याला गप्प बसवत असतो. पण २००५ साली माझी बदली बढतीवर अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील जवळा या छोट्याशा गावात झाली आणि त्यानंतर आलेला अनुभव आपणांस सांगण्यासाठी म्हणून केलेला हा लेखन प्रपंच.

 

नवीन गावात ओळखी करून घेत  असतांनाच एके दिवशी मला आमच्या बँकेचे वकील श्री.काळे यांचा निरोप आला की, आज रात्री आमच्या जामखेड येथील घरी श्री. अमळनेरकर महाराज यांच्या पाद्यपुजेचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण दर्शनाला यावे. मिळालेल्या निरोपा प्रमाणे आंम्ही उभयता सायंकाळीच श्री.काळे वकील यांच्या घरी गेलो. दरम्यान त्याचवेळी जामखेड पासून जवळच असलेल्या अरणगाव या गावात दिंडीच्या मुक्कामाची व्यवस्था करून महाराज जामखेडला येण्यासाठी निघाले असल्याचा निरोप आला व आम्ही सर्व जण महाराजांची वाट बघत तिथेच थांबलो.

 

थोड्या वेळा नंतर महाराज  शेजारीच असलेल्या राम मंदिरात आले व रामाच्या दर्शनानंतर वकील साहेब यांच्या घरी दाखल झाले. पाद्यपुजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रसादाचा व फराळाचा कार्यक्रम होता. प्रसाद वाटत असतांनाच " परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारी दिंडीचे दुपारचे जेवण जवळ्याला काळे परिवाराकडेच आहे, तुम्ही सुध्दा प्रसादाला या " असे शब्द प्रत्यक्ष श्री.प्रसाद महाराजांच्या तोंडून ऐकल्या वर तर आकाश ठेंगणे झाल्यासारखेच वाटू लागले आणि तेव्हापासून परवाचाच विचार मनात घोळू लागला.

 

मग परवा म्हणजे बुधवारी सकाळी लवकर आटोपून आंम्ही उभयता जीपने जवळ्याकडे जाण्यासाठी निघालो आणि आमची जीप जवळा गावाच्या अलिकडे सुमारे पाच एक किलो मीटर अंतरावर असतांनाच श्री. प्रसाद महाराज अमळनेरकर हे त्यांच्या बरोबरच्या निवडक अशा २० - २५ वारक-यांबरेबर जात असल्याचे आम्हाला दिसले.

 

क्षणांचाही विलंब न करता जीपवाल्याला त्याचे पैसे देऊन आम्ही जीप सोडून दिली, दरम्यान " उतरू नका, पुढे जा " असे महाराज इशारा करुन सांगत असतांनाच आम्ही त्यांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार केला व त्यांच्याबरोबर पायी पायी चालू लागलो.

 

ध्यानी, मनी व स्वप्नी सुध्दा नसतांना दिंडी सोबत पंढरीच्या वाटेवर चालण्याची आमची ईच्छा ही अशा रीतीने पूर्ण झाली म्हणून मनात आनंद तर होत होताच पण पंढरपूरला जाण्याची मनोमन इच्छा असूनही आणि अनेक वेळा ठरवूनही दर्शनाला जाणे आजपर्यंत जमले नाही असे सौ.करूणाने महाराजांना सांगितल्यावर महाराज म्हणाले की  " माऊलीच्या दर्शनासाठी एव्हढा आटापिटा करण्याची काही एक गरज नाही, आपल नित्यकर्म प्रामाणिकपणे करत रहा तीच माऊलींची पूजा आणि वेळ आल्यानंतर पांडूरंग तुम्हाला आपोआप भेटेल. "

 

आता दर्शनासाठी पंढरपूरला न गेल्याचे तितकेसे वाईट वाटत नव्हते. आपण आपले काम चोखपणे करीत रहावे, माऊलींची इच्छा होईल, माऊली बोलावेल तेंव्हा दर्शनाला जाता येईल असे खुद्द महाराजांनीच समजावून सांगितल्यामुळे त्या दिवशीच्या सर्व कार्यक्रमात सहभाग घेऊन, पूजा विधी नंतर दिंडीच्या दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यावर दिंडी बरोबर गावाच्या वेशीपर्यंत जाऊन दिंडीला तृप्त मनाने निरोप दिला.

 

आणि स्वत:ला नित्यकर्मात गुंतवून ठेवल्या नंतर श्री.प्रसाद महाराजांचे शब्द अक्षरश: खरे ठरल्याचा अनुभव आला कारण नंतरच्या वर्षभरात माझे तीन वेळा पंढरपूरला जाणे झाले आणि तीनही वेळी माऊलींची मनोहारी अशी भेट झाली. मुर्तीच्या झिजलेल्या पायांवर डोके ठेवल्या नंतर एका आत्मीय शांतीचा अनुभव आला, मुर्ती कडे पाहत असतांना झालेल्या अतीव अशा आनंदामुळे डोळ्यात पाणी तरळले व माऊली पाठोपाठ रखुमाईंचे दर्शन घेऊन जड अंत:करणाने मंदिराबाहेर पडलो.

 

त्यानंतरही अनेक वेळा दर्शनाला जाण्याचे योग येत राहिले आणि आता पुन्हा माऊलींच्या बोलावण्याची वाट पहात आहे कारण भक्तांसाठी स्वत:ची पाऊले झिजवून घेणारा देव निदान मी तरी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही.

 

दि                               दिवाकर चौकेकर,

                                  गांधीनगर ( गुजरात )

                               मोबाईल : ९७२३७१७०४७.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू