पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रावणधारा लेख मामाच्या गावाहून येताना

"झुक-झुक-झुक-झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी", मामाच्या गावाला जाताना हे गाणे मनात नाही आले तर नवलंच. मामाच्या गावाला गेल्यावर कधीतरी तर आपल्या गावी परत यावेच लागते हे ही 

खरेच !!!!!!

 

मामा-मामीं चा निरोप घेऊन परत निघाल्यानंतर, माझ्या घरी मुंबईला येतानाचा हा श्रावणातला किस्सा आठवला की सात वर्षांचा मी व त्या दिवसाच्या आठवणी लगेच आजही माझ्या डोळ्यांसमोर येतात.

 

ते वर्ष होते १९८७ चे. मी शिशुवर्गात शिकत होतो. गरमीच्या सुट्टयांनंतर, राखीसाठी मला पुन्हा एकदा मामाकडे नाशिक ला जायला मिळाले होते. मामाला तेव्हा नुकतीच एक गोंडस कन्या रत्नाची प्राप्ती झाली होती त्यामुळे माझ्या छोट्याश्या लहान बहिणी सोबतची माझी पहिलीच राखी होती. मुंबईहून मामा मला त्याच्यासोबत नाशिकला घेऊन गेला, राखी झाली तीन-चार दिवस शाळेला मस्त गुट्टी मारता आली.

 

"मामाची बायको सुगरणं रोज रोज पोळी शिकरणं" या कवितेत शोभावी अशी माझी मामी, सुगरणी सारखी स्वयंपाक करत असे ( अजूनही तितकाच सुरेख स्वयंपाक करते ). श्रावणात पाऊस जास्त असल्याने मामा ने मला घरी मुंबईला पाठवण्यास थोडा विलंब केला होता. तो मला स्वतःच परत मुंबईला सोडणार होता, पण काही कामामुळे त्याला ते शक्य होत नव्हते. शेवटी त्याने माझ्या बाबांना फोन केला व मला घ्यायला येण्यास सांगितले.  

 

कुटुंबासाठी आपल्या मेहनतीने रक्ताचे पाणी करणाऱ्या बाबांच्या कथा आपण खूप ऐकल्या आहेत. माझे बाबा देखील तसेच होते.  कुटुंबासाठी कष्ट करण्यात ते इतके गुंतलेले असायचे की बरेचदा माझे सकाळी डोळे उघडायच्या आधीच ते ऑफिसला मार्गस्थ झालेले असायचे आणि रात्री माझे डोळे पेंगुळल्यावर ते घरी यायचे. पंधरा दिवस-महिनाभर कसा निघे हे कळतही नसे त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेटच जणू होत नसे.

 

वडिलांचा सहवास, त्यांची भेट, मला जणू वाढदिवसाच्या गिफ्ट सारखी वाटे. असा दुर्मिळ वाटणारा सहवास मला चार-सहा तासांसाठी एकसंध मिळणार या कल्पनेनेच मला किती आनंद होत होता, हे मी सांगू नाही शकत.

 

बाबा मला घ्यायला येणार आहे, हे कळल्यानंतर एक सारखं "मामा बाबा कधी येणार ? मामा बाबा कधी येणार ? " असा प्रश्न मी मामाला विचारत होतो. शेवटी एका शनिवारी सकाळी माझ्या आजीने " आज एका मुलाचे बाबा येणार आहेत " असे म्हणत मला उठवले. पटापट सर्व उरकून मी तयार होऊन खिडकीपाशी त्यांची वाट बघत बसलो. 

 

एखाद्याची वाट पाहणे किती त्रासदायक असते हे त्या दिवशी मला जाणवत होते, कारण कोणत्याही दिशेने येणारी रिक्षा मध्ये मला माझे बाबाच आले आहेत असे वाटत होते. अखेरीस दुपारी भर पावसात एक रिक्षा मामाच्या बिल्डिंगच्या खाली थांबली आणि "आजी, बाबा आले " असे अगदी उत्साहाने मी म्हटले. 

 

बाबा घरी आले आणि मी त्यांना पाहून जणू अगदी दहा वर्षांनी भेटल्यासारखा बिलगलो. बाबां बरोबर प्रवास करायला मिळणार या कल्पनेनेच मी इतका खुश होतो की जणू मला आकाश ठेंगणे वाटत होते. त्या रात्री बाबांना अगदी मी घट्ट चिकटून झोपलो होतो. तो क्षण आठवला की आजही माझे डोळे पाणावतात.

 

लहानपणापासून असं फार कमी वेळा मला अनुभवायला मिळालं होतं.  

 

झोपताना, " बेटा, उद्या आपल्याला सकाळी निघायचे आहे " असं बाबांनी सांगितलं आणि मी होकारार्थी मान डोलावून आनंदाने झोपलो

 

रविवारी सकाळच्या पंचवटी एक्स्प्रेस ट्रेनचं बाबांनी तिकीट काढलं होतं, परंतु रविवारी इतका जोरदार पाऊस होता की ट्रेन मिळते की नाही असा यक्षप्रश्न समोर होता. नाशिक रोड स्टेशन हुन बाबां बरोबर ट्रेनचा प्रवास सुरू केला तसा प्रवासात ट्रेन मध्ये येणार्या गोळ्या, चॉकलेटं बाबांकडून मला मिळू लागल्या. इगतपुरी ते कसारा या घाटाच्या रस्त्यामध्ये इगतपुरीहून आलेल्या काही विक्रेत्यांनी भजी विकली आणि त्या कुरकुरीत भजी व कसारा घाटाचा पावसात आनंद घेत प्रवास सुरू राहीला. घाटात पडणारे धबधबे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. लहान असताना या छोट्या-मोठ्या गोष्टी आयुष्यात किती आनंद देत होत्या हे आज मागे वळून पाहिल्यावर कळते

 

बाबांसोबत ट्रेनमध्ये घडणारा हा पावसातला प्रवास म्हणजे माझ्यासाठी जणु स्वप्नपूर्तीसारखा होता. कसारा घाट गेला, टिटवाळा गेलं परंतु पाऊस काही कमी होईना. कल्याण गेल्यावर, गाडी पावसामुळे खूप हळू-हळू चालत होती. अखेरीस ठाणे गेले आणि गाडी जणू जैसथ्थे उभी राहिली.

 

ट्रॅकवर पुढे पाणी असल्याने गाडी पुढे जाणार नाही असे सहप्रवास्यांकडून कळाले. 

 

बाबांनी माझ्याकडे पाहिले आणि मी त्यांच्याकडे कुतुहलाने !!!! 

 

बाबांनी मला रेनकोट घातला, पायात गंमबूट होतेच आणि म्हणाले बेटा चला !!!

 

मदारी ने त्याच्या सोबतच्या माकडाला जमुरे असं म्हटल्यावर माकड जसं करतं तसं क्षणार्धात बाबांनी "बेटा चला" असं म्हटल्यावर मी केलं

 

टुण्णकन उडी मारली आणि सीट वरून खाली उतरलो. बाबा स्वतः ट्रेनमधून पायरीने खाली उतरले व मलादेखील कडेवर घेऊन उतरवले. 

 

 मेघातून अगदी धो-धो पाऊस पडत होता. बाबा म्हणाले "बेटा, आता जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तुम्हाला माझ्यासोबत चालावे लागणार, कारण ट्रेन पुढे नाही जाणार".  बाबांचे बोट धरून अजून काही वेळ त्यांच्या सोबत चालायला मिळणं, म्हणजे माझ्यासाठी सोन्याहून पिवळं भासणारा अनुभव होता.

 

ठाणे ते मुलुंड आम्ही दोघे व इतर सहप्रवासी देखील गाडीच्या ट्रॅक वरून चालू लागलो. गम बुटात पाणी शिरले (ते बाहेर बाबांनी काढले), परंतु तरीही चालत राहिलो. त्यांच्याबरोबर मला हा प्रवास, एक प्रवास न वाटता एक सहलच वाटत होती. 

 

तेव्हा मोबाईल नव्हता त्यामुळे " अहो कुठे आहात ? " अशी काळजीने विचारपूस करणारा आईचा फोन येणार नव्हता. त्यामुळे अशा स्थितीत कोणालाही फोन न करता आम्ही फक्‍त चालत राहिलो. भांडुप आले व बाबा मला म्हणाले, " बेटा, दोन स्टेशन चाललात. तुम्ही नक्कीच दमला असाल. आपण माझ्या मित्राच्या घरी भांडुप येथे जाऊया". बाबा मला भांडुपला त्यांच्या मित्राकडे घेऊन गेले. तिथे थोडा वेळ आराम करून, पायांना आराम देऊन, बाबांनी रिक्षा करून मला आमच्या कांदिवली (पूर्व) येथील तत्कालिन निवासस्थानी आणले आणि आमचा हा अविस्मरणीय प्रवास पूर्ण झाला.

 

श्रावणधारा बरसू लागल्या, की आजही मला माझ्या बाबां बरोबर केलेला हा अनोखा प्रवास आठवतो.

 

माझ्या बाबांचा त्या प्रवासात मिळालेला सहवास, इगतपुरी ते कसारा दरम्यान घेतलेल्या कुरकुरीत भज्यांचा आस्वाद,श्रावणातल्या सरींमुळे मुंबईत साचलेल्या पाण्यात ट्रॅकवर चालताना घेतलेला अनुभव, अजूनही माझ्या अंतर्मनात आहे.

 

हाच अंतर्मनात साठवलेला अनुभव "त्या " अनोख्या प्रवासातल्या आठवणींना व आता देवाघरी असणार्या माझ्या बाबांना चटकन डोळ्यासमोर घेऊन येतो.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू