पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई...तू होतीस तेव्हाच...

आई खरेच तुझ्यात खूपच मातृत्व होते...

तू होतीस तेव्हाच...तुझ्या फक्त स्पर्शानेच

दारातील जाईजुई लेकुरवाळी व्हायची...

अन गच्च फुलांनी फुलायची...

परसबाग लहान बाळासारखी झुलायची...

रातराणी दरवळायची अन 

बाग कशी हिरवळायची...


आई खरंच तुझ्यात खूपच दातृत्व होते...

तू होतीस तेव्हाच...

दारात चिमणी पाखरे यायची...

पोटभर दाणे खायची...

अन उन्हातान्हात सुद्धा समाधानी राहायची...

मांजरीची पिले पायात घुटमळायची...

अन कपिला तुझ्या स्पर्शानेच पान्हवायची...


आई...खरेच तुझ्यात खूपच पावित्र्य होते...

तू होतीस तेव्हाच...

आंबा मोहरायचा...अन पारिजातक बहरायचा...

तुळशीत यायचे औषधी गुण...

अन तुझ्या स्पर्शानेच 

लेकरे बरी व्हायची आजारातून...


आई...खरेच तुझ्यात खूपच कर्तृत्व होते...

बाबांना सुद्धा तुझा खूप आधार होता...

त्यांच्यापेक्षा जास्त तुझ्याच डोक्यावर...

घरादाराचा भार होता...

लेकरे दिवसभर खेळायची...हसायची...

अन तिन्हीसांजेला...

तुझ्यासोबत देवापुढे बसायची...

सारे घर कसे मंदिर व्हायचे...

प्रत्येकाचेच विचार कसे सुंदर व्हायचे...


पण....आई तू सोडून गेल्यापासून...

जाईजुईने फुलणे सोडले...

परसबागेने झुलणे सोडले...

आंबा आता मोहरत नाही...

अन पारिजातक सुद्धा बहरत नाही...

सारी लेकरे तुझ्या फोटोकडे बघतात...

निर्जीव मनाने जीवन जगतात...

सारी नाती आता धुरकटली आहेत...

मांजरीच्या पिलांचेच काय...

घरातली लेकरे सुद्धा आता भरकटली आहेत...

आता हिरवळ सारी सुकून गेली...

अन कपिला बिचारी थकून गेली...

आई...तू आमच्या बरोबरच 

या घराला सुद्धा मोठे केलेस...

पण...आई तुझ्या अशा अचानक जाण्याने...

एक घर...सारा परिवार...

तुला पोरका झाला आहे...

तुझ्याशिवाय जन्म आमचा

नरकासारखा झाला आहे...

आई...क्षणोक्षणी खूप वाटतं...

तू आमच्यात पुन्हा यावेस...

पण...मला माहित आहे...

चांगली माणसेच नेहमी देवाजवळ असतात...

अन आमच्यासारखी दुर्दैवी पृथ्वीवर...

तडफडत जगतो...तुझ्या आठवणीत आयुष्यभर...


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू