पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बॅंक चालू आहे का?

महाप्रलय आणि विश्वाचा नाश होईपर्यंत सर्व बँका चालू राहतील.

कृपया कॉल करून विचारू नका

बँक चालु आहे का

मध्यंतरी हा फॉरवर्ड मेसेज वाचला!

खरंतर ज्याने हे लिहिले आहे त्याने विनोद म्हणूनच लिहिले आहे. पण ही वस्तुस्थिती लिहिण्यामागची मनस्थिती लक्षात घेतली तर विषयाचे गांभीर्य लक्षात येते.

बँक, सरकारी कर्मचारी विरुद्ध खाजगी आस्थापना कर्मचारी यांना मिळणाऱ्या सोयी, सुविधा, सुट्ट्या, सवलती यावरून कधी छुपे कधी खुले शाब्दिक द्वंद, शेरेबाजी सुरूच असते.

या दोन्ही संस्थांमध्ये पगारापेक्षाही जास्त चर्चिल्या जातात त्या ' सुट्ट्या ' !

"बरं बाबा या बँक वाल्यांना, सुट्ट्या मिळतात ज्यात त्यात" असा नाराजीचा, इर्षेचा सुर सगळीकडेच बघायला मिळतो. मानवी स्वभावानुसार ते साहजिकच आहे....पण प्रत्येक कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या सोयी सुविधा या त्यातील रिस्क फॅक्टर बरोबर थेट संबंधित आहे असे माझे मत आहे.

जेव्हा बँका संगणकीकृत नव्हत्या.... तेव्हा पासबुक हाताने लिहिले जायचे.
त्यासाठी पासबुक रायटर नावाची पोस्ट असायची. चार तास काम आणि बँकेच्या पे रोल वर तात्पुरता जॉब. कालावधी पूर्ण झाला की बँकेचे अनुभव प्रमाणपत्र मिळायचे. कॉलेजच्या विद्यार्थांना कॉलेज करून करता यायचा तो जॉब. तेव्हा ठाण्यातल्या एका नामवंत सहकारी बँकेत बरेच महिने हे काम केले. तेव्हाचा बँकेच्या कामाचा अनुभव बरच काही शिकवून गेला की जो पुढे कॉर्पोरेट मध्येही उपयोगी पडला. तेव्हा हे जवळून अनुभवता आले की डोक्यावर बर्फ ठेवून, डोळ्यात तेल घालून, स्वतःची मनस्थिती, तब्येत कशीही असली तरी डोके ताळ्यावर ठेवून बारा चौदा तास फक्त ग्राहकांच्या स्वअर्जित पै पैशांचे व्यवहार हाताळणे हे सोपे नक्कीच नाही.

शनिवार, सोमवार, सुट्टीचा आधीचा नंतरचा दिवस, यादिवशी बँकेत असणारी तुडुंब गर्दी...त्या गर्दीत असणारे असंख्य चिडलेले, रागावलेले, त्रासलेले, घायकुतीला आलेले, व्याकूळ झालेले चेहरे ...! या गर्दीने कसाही अनुभव दिला तरी ' day end ' ला cash आणि बाकी व्यवहार ' tally ' झालेच पाहिजे....त्यावर परिणाम झाला नाही पाहिजे ही बँकेत काम करणाऱ्या प्रत्येका समोरची अट.

तर या परिस्थितीतही मागच्या वर्षभरापासून कोरोना काळात या बँकिंग सेक्टरने न डगमगता अव्याहतपणे जी सेवा दिली आहे आणि देत आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. एरवी बँकेत होणारी स्टाफ ची बदली हा प्रकार एम्प्लॉयी साठी तापदायक असला तरी कोरोना सुरू झाल्यापासून बऱ्याच बँक व्यवस्थापनाने नियम शिथिल करून आपल्या
स्टाफला जी जवळची ब्रांच आहे तिथे काम करण्याची सवलत देऊन...ग्राहकांना आणि स्टाफला दोघानाही सोयीचे पडेल असे टायमिंग ठेवून कुठेही कुचराई न करता ग्राहकांसाठी सेवा सुरू ठेवली आहे.
एफ डी रिन्यूअल असो वा इतर काही कामे, ती फोन मेसेज वर ही करण्याची मुभा देण्यात आली.
जीवाची भीती प्रत्येकालाच आहे, प्रत्येकालाच स्वतःची काळजी घ्यायची आहे. कान्याकोपऱ्यातून येणाऱ्या ग्राहकांमध्ये कोरोना‌ कोणाचाही हात धरून गर्दीत शिरकाव करू शकतो ही भीती बँकेतही आहे...पण फक्त कर्तव्य किंवा जॉब म्हणून नव्हे तर आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा म्हणून आज प्रत्येक बँक कर्मचारी ' आम्हाला नाही बाबा वर्क फ्रॉम होम ' असे न म्हणता ज्या धिटाई ने आणि धीराने बँकेचे शटर उघडुन हसतमुखाने ग्राहक सेवा देत आहे ते वाखाणले पाहिजेच.

आणि म्हणूनच ' महाप्रलय आणि विश्वाचा नाश होईपर्यंत सर्व बँका चालू राहतील,*कृपया कॉल करून विचारू नका',
या विनोदामागची अगतिकतेची झालर अस्वस्थ करते.

बँकेचा माणूस सर्वात सुखी दिसत असला तरी त्याने घातलेला सुखी माणसाचा सदरा ही बरीच किंमत मोजून आणि सध्या जीवावर उदार होऊन घातला आहे हे आता तरी मान्य करूयाच!

प्रज्ञा पंडित
ठाणे
9320441116

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू