पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नान्हीं नान्हीं बुंदन

ले.©सौ. पूनम राजेंद्र.


संध्याकाळी पावणेसात / सातच्या सुमारास वाशीहून घरी यायला निघालेले. नुकताच पाऊस रिमझिमून गेलेला.  पण वातावरणात त्याचा आभास मात्र तसाच होता. छोटी छोटी तुषारी बुंदी मधूनच स्पर्शून त्याचं अस्तित्व जाणवून देत होती. तजेला आणत होती.


"नान्ही नान्ही बुंदन मेघा बरसे

सीतल पवन सुहावन की"

अशा नाजूक रिमझिमीने ओलेती झालेली झाडं टवटवीत दिसत होती. तरिही मात्र थोडी हिरमुसल्यासारखीही भासत होती.

लहान मुलांना आणखी खेळायचं असतं.  आईने बोलावल्यामुळे नाईलाजाने घरी जातात. पण खेळण्याचं समाधान तर झालेलं नसतं. त्यामुळे बाल्कनीतून खालचा मित्रांचा खेळ बघण्यावर समाधान मानून घेतात.

तसंच वाटत होतं त्यांच्याकडे पाहून.

रिमझिमीमुळे हिरवाई तरतरीत तर झालेली. पण चिंब भिजण्यासाठी जणू काही ऊत्सुक होती. त्यांच्यासारख्याच झिरमि र ओलेत्या झालेल्या वाऱ्यातर्फे त्या दूर आभाळीच्या मेघाना साद देत होती. तोच एकमेव दुवा होता त्यांची साद लगोलग मेघापर्यंत पोचवण्याचा.


साहजिकच वर आभाळाकडे नजर गेली तर बरसण्याइतकी काही घन सावळाई नव्हती. पण...,

त्या सावळ्याच्या किती सुंदर रंगछटा पहायला मिळाल्या. आहाहा Ss...

हे रंगमिश्रण तो कसं जमवून आणतो ! त्यावर त्याने फिरवलेला प्रकाशरंगी कुंचला कसा जादुई परिणाम साधतो!  त्याचं तोच जाणो.

काही गोष्टींच्या कारणाबिरणात पडू नये. मुक्त मोकळ्या मनाने आस्वाद घ्यावा हेच खरं!


निळाईच्या अंगावरची ती मुलायम हलकी सावळाईची दुलई. आणि त्यावर हळव्या गोड गुलबट केसारियाची झालर. वाह! संध्याकाळच्या सौम्य प्रकाशरंगाने रंगलेलं किती गोड, किती मृदुल दृश्य!!


खरंच आहे का तो सावळा अदृश्य?

छे, तो कुठला अदृश्य असायला?! इतका मृदुमुलायम होऊन आहे तो आपल्यासह. वाऱ्याच्या हळुवार हाताने तुषारी बुंदीतून गुलाली प्रेमरंग बरसवतो आहे.

आपण फक्त इतकंच करायचंय. मनाला त्याच्या नेहमीच्या विचारांतून, सवयीच्या चाकोरीतून मोकळं करायचंय आणि त्या प्रेमळ बरसातीत न्हाऊ द्यायचंय. त्या बरसातीचं होऊन राहायचं आणि मनमुराद मंगल आनंद लुटायचा.


मनाला त्याच्या चाकोरीतून मुक्त केल्यावर मन जणू नाहीच. आणि मग जाणवणाऱ्या त्या जल'बुंदन' चा स्पर्श 'मीरा' किती सुंदर व्यक्त करते आहे. जगातल्या कुठल्याही लेनदेन व्यवहाराशी न चिकटलेला हा आनंद. मनातून नव्हे, तर हृदयातून उमटलेला हृदयस्थ गिरीधारीचा पावन तरंग. उत्फुल्ल आनंद.


"नान्ही नान्ही बुंदन मेघा बरसे

सीतल पवन सुहावन की

मीरा के प्रभु गिरीधर नागर

आनंद मंगल गावन की...

????️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू