पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चौकट

कलानगर हे एक बर्‍यापैकी लोकसंख्या असलेले निमशहर...इथल्या बसस्थानकासमोरील अगदीच छोट्याशा जागेत दयानंद काकांचे रचना फ्रेम मेकर नावाचे एक फोटोफ्रेमचे छोटेखानी दुकान होते...काकांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच...त्यांची वृद्ध आई...पत्नी...विवाहित मुलगा...सून व एक अविवाहित मुलगी...असे हे त्यांचे षटकोनी कुटुंब...त्यांच्या कुटुंबातील माणसांचा उदरनिर्वाह त्यांच्या याच लहानशा दुकानावर अवलंबून होता...घरात काका एकटेच कमावते...आणि खाणारी तोंडे सहा...

माधव हा काकांचा मोठा मुलगा...तसा बेरोजगार आणि वागण्यात बेशिस्त...बेफिकीर...एका खाजगी वर्कशॉपमध्ये काम करायचा पण मनाला वाटेल तेव्हा कामावर जायचे...कधीही घरी यायचे...त्याच्या या बेशिस्त वागण्याने मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते...शिवाय त्याला दारूचे व्यसन ही होते...त्यामुळेच या व्यसनापासून त्याची सुटका व्हावी व दुकानात त्यांना त्याची मदत व्हावी या हेतूने ते माधवला दररोजच दुकानात घेऊन जायचे...

काका तसे फोटो फ्रेमच्या व्यवसायातील खूप वर्षांपासूनचे एक अतिशय उत्तम वाकबगार कलाकार होते...ते फोटोची फ्रेम अर्थातच चौकट खूपच कल्पकतेने बनवायचे...म्हणूनच कलानगर व आसपासच्या गावातील कित्येक लोक दयानंद काकांच्या याच दुकानात त्यांच्या कुटुंबातील कित्येक लहानग्यांच्या बारशाच्या...लग्नाच्या व वेगवेगळ्या आठवणींच्या फोटोंना चौकट करून घ्यायला यायचे...तरीसुद्धा कुटुंबातील सर्वांच्याच गरजांचा विचार करता धंद्यातील मिळकत म्हणावी तशी होत नव्हती...शिवाय दुकानची जागा सुद्धा खूपच लहान असल्याने खूप काही तसबिरी...भेटवस्तू त्यात ठेवताही येत नव्हत्या...शिवाय भांडवलाचा प्रश्न होता...तो वेगळाच...परंतु काका पहिल्यापासूनच प्रामाणिक व समाधानी वृत्तीचे होते...त्यामुळेच आहे त्या प्राप्त परिस्थितीत काका आनंदाने दुकान चालवत होते...

कौटुंबिक हलाखीची परिस्थिती असल्यामुळेच कोणतेही काम न करता मजेत राहणाऱ्या माधवने त्यांना निदान त्यांच्या या व्यवसायात तरी आता मदत करावी असे ते त्याला सारखे म्हणायचे...दारूचे व्यसन असल्याने व आपले वडिल कमावतात...त्यावर आपला संसार बरा चाललाय अशा त्याच्या स्वभावानेच त्याची दुकानात थांबायची इच्छाच नसायची...पण इच्छा नसतानाही वडिलांच्या आग्रहाखातर तो नाईलाजानेच दुकानात यायचा...

माधवचा स्वभाव तसा रागीट सुद्धा होता...तो गिर्‍हाईकांशी कित्येकदा तुसडेपणाने वागायचा...त्याचे हे वागणे काकांना बिलकुल पटत नव्हते...कारण खूप कष्टाने व मेहनतीने ग्राहकांना सेवा देऊन...त्यांच्याशी आपुलकीने वागून...त्यांनी खूप वर्षांपासून आजपर्यंत याच दुकानाच्या जोरावर संसारगाडा मोठ्या हिमतीने कसाबसा चालवला होता...

दारूचे व्यसन सोडण्यासाठी...स्वभावात गोडवा आणण्यासाठी...गिर्‍हाईकाशी आदबीने वागण्यासाठी व स्वभाव शांत करण्यासाठी काका माधवला कित्येकदा सांगायचे...पण माधव मात्र त्यांचे अजिबातच ऐकायचा नाही...पुढे माधवला जर नोकरी मिळालीच नाही तर त्याच्या भविष्यातील हक्काचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून काका त्याला या व्यवसायाचे चांगले ज्ञान देत होते...पण माधव त्याच्या तुसड्या स्वभावाने कित्येकदा गिर्‍हाईकाशी वाद घालायचाच...त्याच्या याच स्वभावाने कित्येकदा गिर्‍हाईक सुद्धा नाराज होऊन दुकानात यायचे बंद व्हायचे...परंतु तरी सुद्धा कित्येक गिर्‍हाईक हे फक्त काकांच्या चांगल्या स्वभावानेच दुकानात यायचे...माधव मात्र दररोजच कुणाशी ना कुणाशी तरी उद्धटपणे बोलायचा...त्याच्या याच विचित्र स्वभावाने काकांना त्याची व दुकानची नेहमीच काळजी वाटायची...माधवला दुकानात न आणावे तर त्याच्या भविष्याचे काय ? हा प्रश्न काकांना सतत पडायचा...

दिवसामागून दिवस चालले होते...पण माधवच्या स्वभावात काहीच बदल होत नव्हता...

एक दिवस दुपारच्या वेळी काकांच्या दुकानापुढे एक नवी कोरी चारचाकी येऊन थांबली...त्या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरून काकांच्या दुकानात आली...ती व्यक्ती होती शेजारच्या गावातील रावजी सावकार नावाची...रावजी सावकार त्या भागातील एक मोठी आसामी...पण मोठा भलताच घमेंडखोर माणूस होता तो...खूप वर्षांपासूनचे सोने...नाणे...जडजवाहीर घालून त्याच्या जीवनातील...वेगवेगळया पोजमध्ये काढलेल्या व काही दिवस तसेच त्याच्या घरी पडून असलेल्या फोटोंना फ्रेम करण्यासाठी तो काकांच्या दुकानात आला होता...त्याने काकांना त्याचे ते श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे फोटो दाखवून त्या फोटोंना महागड्या फ्रेम करून द्यायला सांगितले...काकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या फोटो फ्रेमसाठीच्या लाकडी पट्ट्या सावकाराला दाखवल्या...पण त्यातली एकही पट्टी सावकाराला पसंत पडली नाही...शेवटी मूळच्या स्वभावाप्रमाणे सावकाराने आपला जहागिरी थाट दाखवून...व मिजासीच्या तोऱ्यात त्याच्या पसंतीची पट्टी दाखवण्यासाठी काकांना पुन्हा सांगितले...परंतु काकांनी सर्व फोटोंसाठी इतक्या महागड्या फ्रेम बनवण्यासाठी लागणाऱ्या पट्ट्या सध्या माझ्याकडे नसल्याचे सांगितले...शिवाय गिर्‍हाईक खूप महागड्या फ्रेम शक्यतो मागत नसल्याने तशा पट्ट्या दुकानात ठेवणे मला परवडत नसल्याचे सांगून जर तुम्हाला खूपच किमती फ्रेम बनवायच्याच असतील तर मग तशा पट्ट्या आणण्यासाठी मला मोठ्या शहरात जावे लागेल आणि शहरात जाऊन तुम्हाला पाहिजे तशा पट्ट्या आणायच्या असतील तर मग मला काही पैश्यांची गरज सुद्धा लागेल असे म्हणून काकांनी सावकाराकडे आगाऊ पैशांची मागणी केली...परंतु काकांनी कामाआधीच पैसे मागितल्याने रावजी सावकाराला भलताच राग आला...रागातच त्याने काकांना नको नको ते घाण घाण...अर्वाच्य शब्द बोलायला सुरूवात केली...काका मात्र महागड्या फ्रेमसाठी लागणारी पट्टी आणण्यासाठी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून  सावकाराला कळकळीने हात जोडून थोडेफार तरी आगाऊ पैसे द्या म्हणून ते विनवणी करू लागले...पण आता मात्र काकांच्या त्या पैशाच्या मागणीने सावकाराला त्याचा अपमान झाल्यासारखे वाटू लागले...मी काय कोठे पळून जातोय का ? मला तुम्ही ओळखले नाही का ? असे म्हणत शेवटी त्याने त्याच्या नेहमीप्रमाणेच्या सवयीतून आणि जहागिरीच्या मस्तीतून...रागारागातच काकांना आजपर्यंत कुणी इतके वाईट शब्द वापरले नसतील असे वाईट शब्द वापरणे चालूच ठेवले...

आपल्या वडिलांना हा कोण... कुठला सावकार...पैश्यांच्या जोरावर नको इतके बोलतोय हे पाहून मग माधवने सावकाराला मोठ्या आवाजात...तुम्ही खूप पैसेवाले असाल तर कुठूनही तुम्ही तुम्हाला आवडणार्‍या फ्रेम घेऊ शकता...तुमच्या ऐपतीच्या फ्रेम आमच्या दुकानात नाहीत...असे म्हटल्याबरोबर तू माझी औकात काढतोयस का ? असे म्हणून मग माधवलाही त्याने अर्वाच्य शब्दात बोलायला सुरूवात केली...शेवटी प्रकरण हातघाईवर येऊ नये म्हणून काका माधवला शांत बसायला सांगत असतानाच सावकाराने काकांचाच हात जोरात पिरगाळून त्यांच्याच मुस्काटात खाडकन लगावून दिली व काकांनी त्यांना दाखवायला ठेवलेल्या फ्रेमच्या पट्ट्याच सावकाराने काऊंटरवर आपटून त्या मोडून टाकल्या...या अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगाने माधव देखील मग चवताळून सावकाराला बोलायला लागला...

काका त्याला समजावून सांगत होते पण शेवटी माधवचा राग अनावर झाल्याने मग रागाच्या भरातच त्याने आपल्या वडिलांना मारणाऱ्या सावकारावर हात उगारला...

शेवटी हा सर्व गोंधळ ऐकून बघता बघता शेजारच्या दुकानातील लोक काकांच्या दुकानापुढे गोळा झाले व त्यांनी काका व माधवलाच दोष द्यायला सुरुवात केली...तुम्हाला मोठी माणसे ओळखता येत नसतील व तुम्ही त्यांना हवी तशी सेवा देऊ शकत नसाल तर कशाला हे दुकान चालवता ?...असे म्हणून सर्वजण सावकाराच्याच बाजूने बोलू लागले...कारण तो सावकार तिथल्या बर्‍याच लोकांच्या ओळखीचा होता...कित्येकांनी त्याच्याकडून उसनवारी पैसेही घेतले होते...त्यामुळेच काही लोक त्याच्या बाजूने बोलू लागले...पण काकांना पहिल्यापासून ओळखणारे व सावकाराचा वाईट स्वभाव माहित असणारे जे काही चांगले लोक होते त्यांनी मात्र काकांचीच बाजू उचलून धरली...

बर्‍याच वेळाच्या वादानंतर शेवटी सावकार मिशीवर ताव मारून...तुम्हाला चांगलेच बघून घेईन असे म्हणून तावातावाने निघून गेला...या साऱ्या गडबडीत त्याचे ते फोटो काकांच्या दुकानातच राहून गेले...

सावकार गेल्याबरोबर माधव काऊंटरवरचे सावकाराचे ते फोटो हातात घेऊन फाडून टाकणार तोच काकांनी त्याच्या हातातून ते फोटो कसेबसे काढून घेऊन एका कोपर्‍यात व्यवस्थित ठेवून दिले...त्यामुळे माधवने वडिलांनाच रागारागाने बोलायला सुरुवात केली...

सावकाराने तुमच्या मुस्काटात मारूनही मुकाटपणे गप्प बसून तुम्ही मात्र हा अन्याय सहन केला...आणि पुन्हा त्याचेच फोटो तुम्ही जपून ठेवून दिलेत...पण मी असला अन्याय उभ्या आयुष्यात कधीच सहन करणार नाही...तो सावकार जरूर असेल पण त्याच्या घरच्यांसाठी...आणि ज्यांनी त्याच्याकडून पैसे घेतलेत त्यांच्यासाठी...आपण त्याच्या फुटक्या कवडीलाही मिंधे नाही...मग आपण का गप्प बसायचे ?...असे माधव त्यांना म्हणत होता...

माधवच्या या बोलण्यावर काका मात्र सावकाराने पिरगाळलेला त्यांचा दुखणारा हात अधांतरीच धरत माधवला समजावून सांगू लागले...

अरे माधव...जीवनात प्रत्येकालाच कधी ना कधी संधी ही मिळतेच...प्रत्येकाची योग्य वेळ कधी ना कधी येतेच आणि ती आल्यावर प्रत्येकाचा हिशोब हा चुकता होतोच आणि तो ही इथेच...आणि हो...आणखी एक महत्वाची गोष्ट कायम तुझ्या ध्यानी ठेव...योग्य वेळ आल्यावर इथला प्रत्येकजणच चौकटीत अडकून...बंदिस्त होणार आहे कायमचाच...म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण फक्त नेहमी संयमाने...वागायचे...फक्त शांत राहायचे...

काकांच्या या बोलण्यावर कसली चौकट...आणि कसली वेळ...तुमच्या या तत्वज्ञानाने तुम्हाला जगाकडून कधी न्याय मिळेल अशी स्वप्नातही कधी अपेक्षा ठेवू नका...आज तो उद्दाम सावकार पैशाच्या जोरावर तुमची काहीही चूक नसताना मुद्दामच तुमचा हात पिरगाळून तुमच्याशी असे वाईट वागला...त्याचे काय ? असे तावातावात माधव त्यांना बोलत होता...

काका मात्र शांतपणे...अरे माधव...माणसाने जीवनात नेहमीच नम्र असावे...कारण माणसाला माणसाची गरज कधी ना कधी लागतेच...जीवन जगताना प्रत्येकानेच आपल्या वागण्याला मर्यादेची चौकट घालावी...

त्यांचे हे वाक्य संपतेय ना संपतेय तोच...बाबा चौकटीच्या...नम्रतेच्या कसल्या कल्पनेत रमलात तुम्ही...

आताच्या या जगात आपण इतके ही नम्र नसावे की आपली काडीचीही चूक नसताना इतरांनी आपल्यावर हल्ला करावा...त्याचे हे बोलणे ऐकून काकांनी माधवला पुन्हा पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न केला...

पण बाबा...त्याने तुम्हालाही मारले...तुमचा हात सुद्धा खूपच जोरात पिरगाळला...आता या हाताने तुम्हाला काही दिवस काम सुद्धा करता येणार नाही...बघा ना...तुमच्या हाताला थोडीशी सूज सुद्धा आलेली दिसतेय...शिवाय त्याने फोटोफ्रेमच्या आपल्या कामाच्या या चांगल्या पट्ट्याही मोडल्या...आपली चूक नसताना त्याने आपले किती नुकसान केले...त्याचे काय ? असे माधव त्यांना म्हणत होता...

यावर त्या पट्ट्या कुठल्या तरी फ्रेमच्या कामाला नक्की उपयोगात येतील असे म्हणत काकांनी त्या पट्ट्या काऊंटरखालच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवून दिल्या...

त्यानंतर ते माधवला प्रत्येकावर वेळ येते तसेच प्रत्येकाची योग्य वेळ सुद्धा येते आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळी होतेच होते हा माझा आजवरचा अनुभव आहे...यासाठी आपण फक्त संयम बाळगला पाहिजे असे पुन्हा पुन्हा सांगत त्याला शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते...पण माधव ऐकायचे नाव घेत नव्हता. तरीसुद्धा काका मात्र त्याला माधव...अरे ऐक माझे...असे रागराग करून कसे चालेल...मी कित्येक वर्षांपासून ही दुकानदारी करतोय...आपल्या याच दुकानदारीवर आपले कुटुंब चालते...तुझा संसार...तुझ्या ताईचे शिक्षण...तुझ्या आजीचे आजारपण...आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे सारे याच दुकानाच्या जोरावर आजपर्यंत मी सांभाळत आलोय...आपल्याला गुंठाभर जमीन  सुद्धा नाही...शिवाय या दुकानची जागा भाडेतत्त्वावर आहे...आपण राहतो ते घर सुद्धा भाडोत्री आहे...उद्या कदाचित तुला नोकरी मिळालीच नाही आणि मी ही थकल्यावर आपले कुटुंब तुला याच दुकानावर चालवायचे आहे...असे सांगत होते...

माधवच्या दृष्टीने काकांचे हे असले वागणे बोलणे नेभळटपणाचे व अयोग्य वाटत होते...पण काकांना मात्र ते योग्यच वाटत होते...

काकांचे हे बोलणे ऐकून तुमच्या या अशा सर्व वागण्या बोलण्याने तुमच्या वाट्याला आजपर्यंत काय मिळाले ? तुम्ही असे नेभळटपणाने का वागता ? असे एकावर एक प्रश्न माधव काकांना विचारत होता...

त्याच्या या प्रश्नांचे उत्तर देताना काका त्याला पुन्हा पुन्हा सांगत होते की...माधव तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ आल्यावर तुला आपोआपच मिळतील...

माधव...ही दुकानदारी सांभाळताना आजपर्यंत मी दुकानात ग्राहक म्हणून येणारी कोणतीही व्यक्ती माझ्याशी कशीही वागली तरी मी मात्र सर्वांशी नेहमी शांत...संयमाने...प्रेमाने व प्रामाणिकपणानेच वागलो...हे जे काही मी निमूटपणे सहन केले ना ते सर्व आपल्या कुटुंबाच्या हितासाठीच...हे जितके खरे तितकेच...या दुकानात फोटो फ्रेमची कामे करताना मी नेहमी विचार करायचो की या जगात आलेला प्रत्येक जीव हा या पृथ्वीवर फक्त काही दिवसांचाच पाहुणा असतो...इथे कुणीही कायमचा राहायला आलेला नसतो...इथे कुणालाच अमरत्वाचा पट्टा मिळालेला नाही...

आजपर्यंत आपल्या दुकानात गरीब...श्रीमंत...जहागिरदार...तालेवार...मालदार...धनिक...रगेल...रंगेल...शांत...रागीट...संयमी...समजूतदार...भांडखोर...उन्मत्त...गर्विष्ठ...मिजासखोर...अशी एक ना अनेक चांगली...वाईट...हरतऱ्हेची माणसे मी पाहिली आहेत...पण योग्य वेळ आल्यावर त्यांचे शेवटी काय झाले हे मी स्वतः पाहिले आहे...आपल्या वडिलांच्या बर्‍याच वेळच्या सांगण्याने माधवचा राग तेवढ्यापुरता का होईना पण थोडाफार कमी झाला होता...

माधव आता नेहमीप्रमाणे दररोजच नित्यनेमाने त्याच्या वडिलांसोबत दुकानात यायचा...कारण त्याच्या डोक्यात त्या सावकाराबद्दलचा राग होता आणि म्हणूनच त्या सावकाराचे फोटो फाडून टाकण्यासाठीच तो नित्यनेमाने दुकानात यायचा...दुकानात आल्याबरोबर दुकानच्या कोपर्‍यातील सावकाराचे फोटो तो पाहायचा...सावकाराचे फोटो त्याने पाहिले की ते फोटो पायाखाली चिरडून टाकून पूर्णपणे फाडून टाकावेत असे त्याला नेहमी वाटायचे...पण त्याचे वडिल त्याच्यासोबत दुकानात असायचे त्यामुळेच त्याच्या मनातील इच्छा त्याला पूर्ण करता येत नव्हती...

शेवटी आज उद्या कधीतरी सावकाराचे फोटो पायाखाली तुडवून फाडून टाकायचेच असा विचार करता करता आठवडा निघून गेला...

आठ दिवसांनी एक दिवस सकाळच्या वेळेत त्यांच्या दुकानापुढे एक नवीकोरी चारचाकी येऊन थांबते...ती गाडी त्यांच्या ओळखीची वाटते...खूप बारकाईने पाहिल्यावर ती गाडी त्याच सावकाराची असते हे त्यांच्या लक्षात येते...त्या गाडीतून एक तरणाबांड देखणा युवक उतरून त्यांच्या दुकानाकडे चालत येतो...दुकानात आल्याबरोबर आठ दिवसांपूर्वी माझ्या वडिलांनी फ्रेम करायला दिलेले त्यांचे फोटो न्यायला आलो आहे...असे काकांना सांगितले...त्यावर काकांनी खात्रीसाठी कोणते फोटो असे त्याला विचारले...त्यानंतर त्याने फोटोंचे वर्णन केले...तेव्हा काकांनी लगेचच कोपर्‍यातील फोटो उचलून काऊंटरवर ठेवले...काकांच्या शेजारीच उभा असलेला माधव त्या दोघांमधील संभाषण ऐकत सर्व काही पाहात होता...

काऊंटरवर ठेवलेले फोटो पाहून यांना फ्रेम का केली नाही असे तो काकांना विचारत होता...तेव्हा तुमच्या वडिलांना आवडणारी फ्रेम पट्टी आमच्याकडे नाही...तेव्हा तो मुलगा तुमच्याकडे बर्‍यापैकी चांगली असेल त्या पट्टीची फ्रेम करून द्या असे म्हणू लागला...तेव्हा काकांनी काऊंटरखालील कप्प्यातील मोडक्या पट्ट्या काढून त्याच्यापुढे ठेवल्या...तेव्हा तो मुलगा या पट्ट्यांचीच व्यवस्थित फ्रेम करून द्या म्हणाला...तेव्हा तुमच्या वडिलांना या पट्ट्या आम्ही दाखवल्या होत्या परंतु त्यांना त्या पसंत पडल्या नाहीत असे सांगितले...त्यांची कसली आवडनिवड...त्यांच्या आवडीनिवडीचा विचार न करता तुम्ही मला फ्रेम बनवून द्या असे म्हणून शेवटी सावकाराच्या मुलाने काकांना त्याच पट्ट्यांची फ्रेम करून द्यायला सांगितले...पण तुमच्या वडिलांना या पट्ट्या आवडतील का ? असे काका पुन्हा त्याला म्हणाले...असू द्या याच पट्ट्या...बनवा याचीच फ्रेम आणि यातील फक्त एकाच फोटोला चांगली फ्रेम करून द्या व बाकीचे फोटो एका पिशवीत घालून द्या...या फोटोला फ्रेम करायचे किती रूपये होतील ते सांगा असे तो सावकाराचा मुलगा काकांना म्हणाला...शेवटी काकांनी फ्रेमचे पैसे सांगितल्यावर त्याने लगेचच खिशातून पैसे काढून काकांना दिले...काकांचा एक हात अजूनही दुखत असल्याने त्यांनी मग माधवलाच फ्रेम बनवायला सांगितले...माधव त्या फोटोकडे रागानेच पाहात होता...काका त्याला मी तुला एका हाताने जमेल तशी मदत करतो असे म्हणाले...माधव नाईलाजानेच फ्रेम बनवायला तयार झाला...ज्या पट्ट्या रागाच्या भरात सावकाराने मोडल्या होत्या त्याच पट्ट्यांची आज काका व माधव फ्रेम बनवत होते...त्यांचे फोटोची फ्रेम बनवण्याचे काम चालू असतानाच सावकाराच्या मुलाने कागदाने काहीतरी मजकूर लिहिल्याची एक कागदी पट्टी त्यांच्यापुढे ठेवून ही कागदी पट्टी तेवढी फ्रेमच्या आत फोटोखाली टाका असे तो काकांना म्हणाला...

फोटोची फ्रेम अर्थातच चौकट तयार करत करतच काका व माधवने ती कागदी पट्टी हातात घेऊन त्यावरील कै. रावजी आबाजी ढोमे ( सावकार ) व त्याखाली लिहिलेला मृत्यू दिनांकाचा मजकूर पाहिला व  ते दोघे अचंबितच झाले...

काकांनी सावकाराच्या मुलाला हे कधी घडले असे विचारले...तेव्हा आठवड्यापूर्वी ते इथे काही कामानिमित्त आले होते...संध्याकाळी ते रोजच्या प्रमाणे खूपच दारू पिऊन घरी आले होते...घरी आल्यावर नेहमीप्रमाणेच सर्वांशी वाद घालून काहीही न खाताच ते फक्त सर्वांचा रागराग करत होते...शेवटी अचानकच त्यांची तब्येत बिघडली...आम्ही गडबडीतच त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तर डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले...

त्यानंतर काही विधी पार पडले...परंतु उर्वरित पुढील विधीसाठी त्यांच्या फोटोची खूपच गरज आहे...हे जेव्हा आमच्या लक्षात आले तेव्हा फोटोविषयी घरात चर्चा झाल्यावर त्यांचे सर्व फोटो घेऊन ते फ्रेम करण्यासाठी येथे आले होते...हे घरात फक्त आईलाच माहित होते...त्यांचा आता दुसरा कोणताच फोटो आमच्या घरात नसल्याने फोटोसाठी सगळीकडे चौकशी केल्यावर इथल्या तुमच्या दुकानची माहिती घेतली व म्हणूनच तर तुमच्या दुकानापर्यंत पोहोचता आले...परवा त्यांचा काही विधी आहे...आणि त्यासाठीच त्यांचा एक तरी फोटो हवा आहे...एवढे बोलून मला अजून काही साहित्य खरेदी करायचे आहे असे म्हणून तो मुलगा गडबडीत निघून गेला...

तो निघून गेल्यावर माणसाने जीवनात का नम्र असावे ते काका माधवला सांगत होते...आता मात्र त्यांचे सर्व बोलणे माधव शांतपणे ऐकत होता...

माधव...हा व्यवसाय करताना आजपर्यंत मी कित्येक प्रकारची माणसे पाहिलीत...त्यातील कित्येक प्रकारच्या माणसांचे वागणे मी स्वतः जवळून पाहिले आहे...

जे जीवंतपणी वाईट वागले ना त्यातील कित्येकांच्या मृत्यूनंतर त्यांना आपल्याच दुकानातील फोटो फ्रेमच्या चौकटीत माझ्या याच हाताने बंदिस्त होताना मी स्वतः पाहात आलोय...त्यामुळेच हे काम करतानाच मला जीवनाचा अर्थ कळाला होता...माणसाने जरी जीवंतपणी आपल्या उन्मत्त स्वभावाला...आपल्या आचार विचारांना मर्यादेची चौकट कधीच आखली नाही तरी शेवटी नियती त्याला या चौकटीत बंद करत असतेच...ते ही कायमचेच...

फोटो फ्रेम बनवताना माधवला मदत करत...व माधवशी बोलत बोलत काकांनी हातात घेतलेल्या फ्रेमच्या पट्ट्या त्याला दाखवत...काका त्याला सांगत होते की मी तुला म्हणालो होता ना...की वेळ प्रत्येकावर येते...प्रत्येकाची योग्य वेळ येते  आणि प्रत्येकालाच जीवनात कधी ना कधी संधी मिळतेच...तशीच आज या सावकारानेच रागाच्या भरात मोडलेल्या पट्ट्यांनी त्याच सावकाराला आपल्याच चौकटीत कायमचे बंद करायची वेळ आणि संधी या पट्ट्यांना मिळाली आहे...

माधवलाही त्या उद्दाम सावकाराला त्याच्याच हाताने आज चौकटीत बंद करण्याची संधी मिळाल्याने तो ही मनातून शांत झाला होता...

कोणताही माणूस कितीही मोठा गडगंज श्रीमंत असला तरी व कोणताही माणूस रंक असला तरी शेवटी प्रत्येक जणच एक दिवस या अशा चौकटीत कायमचेच बंदिस्त होणार आहे हे काकांचे सांगणे सावकाराच्या फोटोची चौकट बनवताना माधवच्या मनात पक्के रूजले...तेवढ्यात सावकाराचा मुलगा दुकानात परत आला व बनवलेली फ्रेम व सर्व फोटो घेऊन निघाला...त्याची पाठमोरी आकृती पाहात व वडिलांनी सांगितलेली जीवनाविषयीची शिकवण स्वतःच्या मनात पक्की रूजवत आता मात्र त्याने स्वतःच्या स्वभावात खूपच बदल करण्याचे ठरविले...

माधवने आता दारूचे व्यसन पूर्णतः सोडले आहे...आता माधव कोणत्याही ग्राहकावर कधीच रागावत नाही...ग्राहकांना तो आता खूपच चांगली सेवा देऊन आपले दुकान मोठे करून आपली प्रगती कशी साधता येईल या दृष्टीने तो सतत दुकानात जास्तीत जास्त लक्ष देतो...

माधवने स्वतःच त्याचा स्वभाव बदलून आज कित्येक महिने झाले...वडिलांबरोबर नाईलाजानेच दुकानात येणारा माधव आता दररोजच आनंदाने व समाधानाने दुकानात येतो...

रोजच्या प्रमाणेच तो आज दुकानात आला होता...पण आज त्याच्यासोबत काका नव्हते...दुकान उघडल्याबरोबर तो दोन फोटोची चौकट चांगल्या पट्ट्या घेऊन अगदी मन लावून बनवत होता...कारण त्या चौकटी होत्या ज्याने त्याच्या डोळ्यादेखत कित्येकांना या लाकडी पट्ट्याच्या चौकटीत कायमचे बंद केले होते त्या त्याच्याच स्वर्गीय वडिलांच्याच....कारण मागच्याच आठवड्यात त्याच्या वडिलांचे अकस्मात दुःखद निधन झाले होते...त्यामुळेच घरी व दुकानात लावण्यासाठी वडिलांच्या दोन फोटोंना फ्रेम बनवताना आज तो पूर्णतः त्या चौकटीतच स्वतःत हरवून गेला होता...फोटोंच्या दोन्ही चौकटी व्यवस्थित झाल्या की नाही हे पाहण्यासाठी तो एकावर एक अशा दोन्ही चौकटी धरून त्या एकसमान झाल्या की नाही हे पाहत असतानाच त्याची नजर भिंतीवरील आरशावर गेली...भिंतीवरील आरशात स्वतःला पाहून त्याने त्यातली एक चौकट त्याच्या चेहर्‍यापुढे धरली व एक दिवस आपणही या चौकटीत कुणाच्या ना कुणाच्या तरी हातून कायमचेच बंद होणार या एका विचारातच तो हरवून गेला...काही वेळाने तो दचकून सावध झाल्यावर त्याने काही झाले तरी आपण जीवनभर...अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कधीच आपल्या मनाला घातलेली चांगल्या आचारविचारांच्या...सुसंस्कारांच्या...वागण्या...बोलण्याच्या चौकटीची मर्यादा आयुष्यात कधीच मोडायची नाही...असे ठरवून त्याने आता मृत्यूनंतरच्या बंदिस्त चौकटीत अडकून पडण्याअगोदरच आपल्या चांगल्या कर्माच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त केले होते...आणि याच मर्यादेच्या चौकटीत आपण कायम राहायचे...अगदी शेवटच्या श्वासापर्यंत...ते ही अगदी मनापासून...असे त्याने मनोमन ठरवले होते...

आता त्याचे छोटेसेच दुकान पण ते त्याने खूपच छान ठेवले आहे...येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तो शांत राहण्याचा सल्ला आवर्जून देतो...दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दिसेल अशी एका चौकटीत लिहिलेली एक छान पाटी त्याने दुकानात लावली आहे...ती पाटी आता येता जाता सर्वांचेच लक्ष वेधून घेते...

ती पाटी अशी होती...

आपण कुणीही असा...कितीही मोठे असा...परंतु जीवंतपणीच आपल्या वागण्या...बोलण्याला मर्यादेची चौकट घाला...जगताना मृत्यूचे भान ठेवा...नाहीतर शेवटी काळाच्या चौकटीत एक ना एक दिवस आपण सर्वजणच बंदिस्त होणार आहोत...ते ही कायमचेच...पुन्हा कधीही चौकटीबाहेर न येण्यासाठी...


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू