पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवघेणी स्पर्धा...कथा नि व्यथा...भाग १

कुटुंब ही एक खूप वर्षांपासून चालत आलेली जिव्हाळ्याची आणि अत्यंत गरजेची संस्था...पूर्वी या कुटुंब संस्थेत आजी...आजोबा... आई...वडील...बहीण...भाऊ...काका...काकू असे अनेक जीवलग सदस्य गुण्यागोविंदाने आनंदाने नांदत होते...काळ बदलला आणि काळाच्या ओघात या कुटुंब संस्था सुद्धा बदलल्या...

पूर्वीची एकत्रित कुटुंब संस्था आपुलकीच्या माणसांनी सदैव भरलेली...प्रेमाने भारलेली आणि मायेनी सतत बहरलेली होती...पण आज मात्र या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात ही कुटुंब संस्था पार मोडकळीस आली आहे... 

पूर्वीची आपुलकीची...मायेची माणसे आज एकेक करून बहुतेक प्रत्येक कुटुंबातून कळत नकळत वजा होत गेली...

आज बहुतांशी कुटुंब संस्थेतील माणसांची विभागणी होऊन खूप छोट्या कुटुंबात नव्हे तर अगदी छोट्या छोट्या गटात त्याचे रूपांतर झाले...सध्याच्या काळात तर या कुटुंबात फक्त तीन ते चारच सदस्यच असूनही कुणाचा कुणाला ताळमेळच राहिला नाही...पूर्वीची कुटुंब संस्था ही एकत्र कुटुंब पद्धतीची होती...तिथे माणसांची संख्या जास्त होतीच पण त्याहून जास्त महान होते ते त्यावेळच्या माणसांचे आचारविचार ...परंतु कालपरत्वे कुटुंबाच्या आकाराबरोबरच माणसांचे आचारविचार ही संकुचित होत गेले आणि बघता बघता एकत्र कुटुंब पद्धती इतिहास जमा होत गेली...ज्या जुन्या पिढीचे आचारविचार पूर्वी माणसांच्या जीवनाला आकार देत होते... तेच आचारविचार या नव्या पिढीला आता विकार वाटू लागले आहेत...जुन्या जाणत्या माणसांनी अथक परिश्रम करून कुटुंब संस्था टिकवली पण नव्या पिढीला हे शिवधनुष्य बिलकुल पेलवले नाही...या बदलत्या काळाबरोबरच कुटुंबाच्या सुखाच्या व्याख्या सुद्धा बदलत गेल्या...या बदलत्या व्याख्येतूनच शेवटी लहान कुटुंबाचा जन्म झाला...

आज या लहान कुटुंबात फक्त पतीपत्नी आणि बहुतांशी एक किंवा दोनच मुले आहेत...आजीआजोबा...चुलते चुलती...या नात्यांशिवाय बहुतांशी फक्त त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबे आज समाजात आस्तित्वात आली आहेत...

मोठ्या कुटुंब संस्थेची मान्यता काढून बदलत्या काळाचे नाव पुढे करून अलिकडची पिढी अशा छोट्या कुटुंबात धन्यता मानू लागली...पण या अशा छोट्या कुटुंब संस्थेच्या हव्यासापोटी आताच्या पिढीच्या पोटी जन्मलेली कित्येक मुले खूप चांगल्या गोष्टीला हमखास मुकली आहेत असा विचार करायला सध्या कोणाकडेच वेळ नाही...

छोटे कुटुंब...सुखी कुटुंब या संकल्पनेचा खरा अर्थ अपत्यांच्या संख्येला मर्यादा घालणे असा आहे परंतु हल्लीच्या पिढीने मात्र नात्यालाच मर्यादेचं कुंपण घालून स्वतःपुरतेच जगणे अशा संकुचित अर्थाचे जीवन जगणेच पसंत केले...याचा मुख्यत्वे परिणाम झाला तो आताच्या लहानग्यांच्या जीवनावर...

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा बहुतेक घरात...कुटुंबात हमखास दहा पंधरा किंवा त्याहून जास्त सदस्य असायचेच...

परंतु सध्या घरात इन मीन तीन डोकी असून देखील कित्येक कुटुंबात दररोजचा कलह आहे...कित्येक कुटुंब सदस्य घटस्फोट...शारिरीक अस्वास्थ्य...मानसिक नैराश्याने ग्रासलेले आहेत...माणसांनीच बदललेल्या जीवनशैलीने आता माणसांचाच बदला घेण्यास सुरूवात केली आहे...

खरंच आजची पिढी वडीलधाऱ्या माणसांपासून विभक्त होऊन स्वस्थ आणि मस्त जीवन जगतेय का ? हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे म्हणूनच आज याचा प्रत्येकानेच उहापोह करणे गरजेचे आहे...आजची संकुचित विचारांची कुटुंब संस्था...त्यातच नको त्या गोष्टींची नको ती स्पर्धा ही आजच्या पिढीची कथा नि व्यथा याचे उत्तम उदाहरण आहे...

त्यातच सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे असे वाक्य हल्लीच्या काळात बहुतांशी घरात...घरातील सदस्यांत...शेजारी...परिसरात...नातेवाईकांत...समाजात हमखास कित्येकाच्या मुखातून अगदी अलगद...सहजपणे...बाहेर पडते आणि नंतर ते कित्येकांच्या कानावर आदळते आणि मग याच स्पर्धेच्या युगाच्या विषयाचा आरंभ घराघरात...आपल्या आसपास...परिसरात  आणि विशेषतः बहुतांशी आजच्या मुलांच्या आईवडिलांच्यात खूपच चर्चिला जातो...मग पुढे या स्पर्धेच्या युगाचा विषय सगळेजण आवडीने चघळतात...आणि मग खरी सुरूवात होते आपणच तयार केलेल्या या नाहक स्पर्धेची...सुरूवातीला सौम्य...शांत...साधी...सोपी वाटणारी हीच स्पर्धा पुढे कित्येकांच्या बाबतीत जीवघेणी ठरते...

सध्या बहुतांशी पालक हे आपल्या पाल्यांना चांगल्या शाळा...महागडे कोचिंग क्लासेस...विविध आकर्षक जाहिरातींच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेताना दिसून येतात.  आपला पाल्य खूप चांगले शिकला पाहिजे आणि या स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे...असे प्रत्येक पालकाला वाटणे सहज स्वाभाविक आहे परंतु हे स्पर्धेचे युग म्हणजे नक्की काय ? हे अजून बहुतांशी पालकांना कळालेच नाही...

आपल्या प्रगतीसाठी स्पर्धा नक्कीच असली पाहीजे याविषयी कोणाचे दुमत असूच शकत नाही परंतु स्पर्धा ही निखळ आनंद देऊन प्रगतीकडे नेणारी असावी...परंतु हल्ली स्पर्धेच्या गोंडस नावाखाली सगळीकडे फक्त इर्षाच वाढल्याचे दिसून येते...या स्पर्धेच्या इर्षेने आज बहुतांशी घरात...परिवार...कुटुंबात मोठमोठे संघर्ष होताना आपल्याला पहायला मिळतात...त्यामुळेच आजच्या काळातील विविध कुटुंबसंस्था...नातलग...समाज यांच्यात एक प्रकारचा दुरावा तर निर्माण होतोयच पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे या स्पर्धेपायी कित्येक जण आज नैराश्याच्या खोल गर्तेत गुरफटून गेले आहेत...खरे जीवन जगायचे विसरून काहीजण तर स्पर्धेच्या चक्रव्यूहात कायमचेच अडकून पडले आहेत...

आज आपल्या परिवारात...घरात...दारात...शेजारी...परिसरात अमक्याच्या मुलाने नीटच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले...तमक्याच्या मुलाने जेईई परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवले...शेजारच्या मुलाने स्पर्धा परिक्षेत अव्वल स्थान पटकावले...गावातल्या कोणत्यातरी मुलाने व्यवसायात गरूडभरारी घेतलीय...याच्या मुलाने नोकरीतून बक्कळ पैसा कमावलाय...त्याच्या मुलाने नवीन गाडी बंगला घेतलाय...यांचा मुलगा डाॅक्टर झालाय...त्यांचा मुलगा परदेशात गेलाय...सगळे जग पुढे चाललेय...मग तुला काय होतेय असे काही करायला ?...तुला कधी ते जमणारच नाही ?...तू फक्त खायच्याच कामाचा आहेस...तू आमच्या डोक्याला ताप आहेस...तुला जन्माला घालून आमचेच चुकले...तू आयुष्यात कधीच सुधारणार नाहीस...अशी एक ना अनेक ठेवणीतली वाक्ये आपल्या आसपासच्या घराघरातून...परिवारातून सातत्याने कानावर येत असतात. या स्पर्धेच्या तत्त्वज्ञानाच्या उपदेशाचे डोस सर्वजण आजच्या मुलांना येता जाता वारंवार पाजत असतात...स्पर्धेच्या गोंडस नावाखाली समाजात हे सर्व घडत आहे त्याचे एकमेव कारण असते ते म्हणजे दुसर्‍याचे यश बोचत असते आणि दुसर्‍याचे सुख आपल्याला टोचत असते...आणि म्हणूनच मग प्रत्येक जण आपापल्या मुलांकडून मुलांच्या कुवतीपेक्षा जास्त यशाची अपेक्षा करून मुलांना पेलावणारे नसताना सुद्धा फक्त स्वतःच्या आभासी आकांक्षेपोटी आपल्याच मुलांना नको इतके वेठीस धरतात...आणि मग पुढे सुरू होतो जीवनाचा आणि स्वप्नांचा...खेळखंडोबा...

प्रत्येक पालकाला वाटते की त्याच्या मुलाने त्यांची स्वप्ने पूर्ण केली पाहिजेत...पण आपल्या मुलाचे काय स्वप्न आहे हे सहसा कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. कित्येक पालक आपले निर्णय...आपली स्वप्ने आपल्या मुलांवर लादतात...त्यामुळेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात हमखास यश मिळवण्याची खात्री असणारी मुले सुद्धा मग पालकांच्या अट्टाहासापायी अपयशी होतात...आपल्या मुलाने आपल्याला हवे तेच व्हावे...हे आपले वाटणे त्याच्या स्वाभाविक जीवनावर आघात करणारे असते तरीसुद्धा स्पर्धेच्या गोंडस नावाखाली समाजात आज फक्त इर्षाच चाललेली दिसतेय...

प्रत्येक मूल हे दुसऱ्यापेक्षा वेगळे असते...त्याचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे असते...आपल्याच हाताची पाची बोटे सारखी नसतात...एकाच आईच्या पोटी जन्मलेली सर्व मुले व त्यांची बुद्धिमत्ता कधीच एकसारखी नसते...एखाद्या आईला दोन मुले असतील तर त्यातील एक उच्चपदस्थ अधिकारी असेल तर दुसरा कदाचित शेतमजूर ही असेल...मग दोन सख्खे भाऊ जर एकसारखे नसतील...त्यांची बुद्धिमत्ता एकसारखी नसेल तर मग असे असताना वेगवेगळ्या घरात जन्मलेली मुले एकसारखी कशी असतील याकडे मात्र कुणीच लक्ष देत नाही...

याचे एक उत्तम उदाहरण म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगतो...

एका बागेत गुलाबाचे व सदाफुलीचे रोपटे अगदी शेजारी शेजारीच वाढत होते...सदाफुली नेहमीप्रमाणेच दररोजच फुलत होती पण काही दिवसांनी गुलाबाला सुद्धा थोडासा बहर आला तेव्हा गुलाबाच्या रंगामुळे व सुगंधामुळे बागेत येणारा प्रत्येक जण पहिल्यांदा गुलाबाकडेच आकर्षित व्हायचा. सदाफुलीचे रोप हे नित्यनेमाने नावाप्रमाणेच सतत फुलतच रहायचे...पण बागेत येणाऱ्या माणसांचे लक्ष मात्र गुलाबाकडेच जायचे. खरेतर सदाफुलीही दररोजच फुलून खूपच आनंदात असायची. पण येणारी सर्व माणसे गुलाबाकडेच जास्त आकर्षित झालेली पाहून सदाफुली मात्र हळूहळू नाराज होऊ लागली...

सदाफुलीला गुलाबाचा हेवा वाटू लागला. आपल्यालाही गुलाबासारखा रंग व सुगंध असता तर सर्व माणसे माझ्याकडेच आकर्षित झाली असती या विचाराने सदाफुली दिवसेंदिवस चिंतेत पडू लागली. दररोजच मनसोक्त पणे फुलणारी सदाफुली आता आपणही गुलाबासारखेच बहरावे...आपला रंग व सुगंध ही गुलाबासारखाच व्हावा म्हणून देवाकडे विनवणी करू लागली पण देव काही प्रसन्न होत नव्हते. सदाफुलीने मात्र दररोजच देवाचा धावा करायला सुरूवात केली. तिच्या रोजच्या धाव्यामुळे देव एकदाचे तिच्यासमोर प्रगट झाले व वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा गुलाबाच्या फुलासारखी माझीही फुले छान टपोरी ताजी टवटवीत व सुगंधित व्हावीत म्हणून ती देवाला विनवणी करू लागली...परंतु आम्ही सारे देव सुद्धा अजिबातच एकमेकांसारखे नाही...आमच्यात सुद्धा फरक आहेच...त्यामुळेच मी तुला गुलाबासारखे वरदान नाही देऊ शकत...शेवटी निसर्गाच्या विविधतेत आणि कामात आम्ही अजिबातच हस्तक्षेप करणार नाही असे म्हणून देवाने तिची ही मागणी साफ दुर्लक्षित केली. पण सदाफुली काही केल्या हार मानायला तयार नव्हती...

देवाने तिची मागणी दुर्लक्षित केल्यामुळे ती गुलाबाकडे पाहून दिवसेंदिवस झुरत राहिली. तिच्या या झुरण्याने तिची फुले कोमेजून जाऊ लागली...शेवटी तिच्या अशा झुरण्याने व वागण्याने एक दिवस तिला फुले सुद्धा यायची बंद झाली. चुकून एखादे फूल आलेच तर तिच्या गुलाबासोबतच्या स्पर्धेच्या इर्षेने ते सुकून जायचे. शेवटी सदाफुलीचे संपूर्ण रोपटे काळजीने पूर्णतः सुकून गेले. पण तिला गुलाबासारखे होता आले नाही. गुलाब मात्र दररोजच बहरत राहिला... 

सदाफुलीचे रोपटे पूर्णतः सुकल्यावर सदाफुलीच्या ध्यानात आले की गुलाबाबरोबर स्पर्धा करण्याच्या नादात आपण पूर्णपणे संपत चाललोय...शेवटी गुलाब तो गुलाबच...त्याचे गुणधर्म वेगळे व माझे वेगळेच. मी त्याच्याशी नको ती स्पर्धा केली नसती तर माझी ही नको ती दयनीय अवस्था आज झाली नसती...मी माझ्या कुवतीचा व गुणधर्माचा विचार करून योग्य अपेक्षेनुसार...इर्षा न करता माझ्यातील क्षमतेचा मनापासून विचार करून जर मी वागली असते तर मी ही आज नेहमी सारखी फुलत राहिली असते...शेवटी सदाफुलीला तिची चूक उमगली व तिने आता स्वतःच्या फुलण्याकडे पूर्णतः लक्ष दिले...काही दिवसांनंतर आता ती हळूहळू फुलत चालली...आज ती फुलांनी पूर्णतः फुलली आहे...फुललेल्या सदाफुलीने तिच्या शेजारच्या गुलाबाच्या रोपट्याकडे पाहिले तर गुलाबाला एकही फूल आलेले तिला दिसले नाही...आता बागेत येणारी माणसे तिच्या फुलांकडेच आकर्षित होऊ लागली...सदाफुलीकडे पाहता पाहता...बघा सदाफुली दररोजच किती छान फुलत असते...गुलाबाला मात्र या सदाफुलीसारखे दररोजच फुलता येत नाही...गुलाबाला कधीतरीच फुले येतात...ती ही थोडीफार...पण सदाफुली मात्र दररोजच फुलत असते...असे माणसे आपसात बोलू लागली...तेव्हा सदाफुलीच्या लक्षात आले की गुलाब कधीतरीच बहरतोय आणि मी मात्र दररोजच फुलतेय...कधीतरी बहरणे आणि दररोजच फुलणे यात शेवटी फरक हा असतोच...आणि तोच फरक माझ्यात आणि गुलाबात आहे...हे सदाफुलीच्या जेव्हा लक्षात आले त्या दिवशी पासून सदाफुलीने आपले फुलणे सोडले नाही...

खरेतर प्रत्येकात फरक हा असतोच...ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या देवांत सुद्धा फरक आहे...तिथे मग तुमच्या आमच्यात फरक हा असणारच...हा साधा विचार न करता आजच्या माणसांनी स्पर्धेच्या नावाखाली उगीचच आपल्या निरागस मुलांच्या जीवनाशी चालवलेला इर्षेचा खेळ हा आजच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने जीवघेणी स्पर्धाच आहे असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही...


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू