पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नातं असंही..

 

 

निसर्ग देवता प्रसन्न असणारे.. जोतिबा पन्हाळा याच्या पायथ्याशी वसलेले कोल्हापूर पासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असणारे केर्ली हे गांव!!.. 

पंचगंगेच्या निथळ पाण्याचा वाहता प्रवाह जणू पावित्र्याचे स्थान ..

या नदीच्या पुलावरून जाणारा रस्ता.. 

आजूबाजूला हिरव्या रंगाचा पदर ओढून काळ्या आईच्या कुशीत डोलणारी डौलदार पिके.. 

समृद्ध भागातील हेवा वाटणारा हा परिसर..डोंगराकडे चढता जाणारा रस्ता..

 मंद मंद शितल वायुलहरी जणू अंगावर रोमांच उभा करत होते. पहाटेचा समय नुकतेच पुर्व दिशेला उषा आपल्या किलकिल्या नेत्रांची उघडझाप करत होती. तर सूर्यदेवता आपल्या कुंचल्याने नानाविध रंगात आकाश सजवण्यात मग्न झाले होते. त्याचा हा अविष्कार पहात शशी मात्र दूरवर पलायन करत होता. कारण त्याच्यासह चांदण्यांची सुद्धा विश्रांतीची वेळ झाली होती. रजनी सोबत काजव्यांच्या संगतीने रात्र जागविली होती. पावसाच्या हलक्या शिडकाव्याने पाना फुलांना जाग आली होती. रामप्रहरात गवताच्या व फुलांच्या टोकावर अभिमानाने विराजमान झालेले पर्जन्यबिंदू पण त्या पर्जन्यबिंदूला स्वतःला देखील माहित नव्हते.. आपण आलो कुठून?? 

पण हे मखमली जग पहाताना फांदीवर हवेच्या झोक्याबरोबर झोका घेत असताना सभोवतालचा उत्साहाचा सृजन सोहळा उल्हासित नजरेने पहात होता. 

अल्पकाळ आयुष्य जरी या पर्जन्यबिंदूचे  तरी देखील सौंदर्याचे लेणं घेऊन आलेले हे जीवन.. अगदी सार्थकी लावतात..वसुंधरेशी मिलन होताच नवांकूर जन्माला येतात. प्रभातीचा हा मोरपिसारा फुलवताना नृत्याचा मोह कोणाला होणार नाही तर यासाठीच तर निसर्गाने पक्षांची किलबिल ही योजना करून ठेवली नसेल ना??.. 

ही किलबिल कानावर ऐकू येऊ लागली.. कडाक्याची थंडी व हवेतील गारवा.. अधिकच झोंबत होता. सभोवार पसरलेले ढग.....अगदीच पिंजारलेल्या कापसासारखे धुसर व पांढऱ्या रंगाचे वलय व मध्येच रविराजाचा सोनेरी साज!!..जसं जसं पुढं जावं तस तसे ते वलय दूर जावे.

 

पहाटेचे हे मनोहारी दृष्य साकारत असतानाच किरण आपली कार निवांत ड्राईव्ह करत केर्लीच्या दिशेने चालला होता. सोबतीला यावेळी उर्वशी होती. उर्वशी किरणची नुकतंच लग्न झालेली बायको.. 

 

वर्षातून एकदा तरी या भागात किरणचे येणे असायचे पण गेले दोन तीन वर्षे तरी या भागात येणे झाले नाही. आज मात्र या पावसाळी वातावरणात गाडीच्या वायपरच्या हालचाली बरोबर मन अगदी भूतकाळात रममाण झाले होते. 

या गावाशी किरणची नाळ अतूट होती. 

 

काॅलेजला असताना पन्हाळ्याची ट्रिप करायची म्हणून मित्र मित्र सहलीला आले होते. चारही मित्र एस टी नेच पन्हाळ्याला आले होते. ऐतिहासिक वारसा असणारा हा पन्हाळ गड. वर्षा सहल एक वेगळीच अनुभूती. किरणने तिघांनाही छत्री, रेनकोट घेण्यास मनाई केली होती व म्हणाला,

 

"अरे पक्या, वर्षा सहल काढतोय आपण..तर मस्त भिजायचे, पावसांच्या सरीमध्ये मस्त नाचू, बागडू..अगदी लहान व्हायचे रे..!"  

 

एस टी तून उतरले.. 

सज्जाकोटी अजूनही जिवंत वास्तू..इथंच संभाजी राजांना नजरकैदेत ठेवले होते.

या ऐतिहासिक पावनभूमीत थोर महान राजांच्या पदस्पर्शानी पावन झालेली माती पाहून नकळत हातात माती घेऊन कधी मस्तकी लावली हे चौघांनाही समजले नाही... माती कसली पावसाच्या थैमाणात अगदी चिखल झाला होता...

चिंब पावसात भिजताना अलगद येणारे ढग अंगाला बिलगत होते.. 

तबक उद्यानात पाऊल ठेवताच अवघा पन्हाळ्याचा नकाशा पहाता आला.. तर सर्व रस्त्याची कल्पना आली..

मग तीन दरवाजा, अंबरखाना..हे सगळं पाहिले. या गडावरील वास्तू अजूनही उर्जितावस्थेत आहेत ही आनंदाची बाब..!!

 

आता मात्र स्वारी पुसाटी बुरूजावर पोहचली. शिवाजीराजांचे सभामंडप अगदीच मोकळ्या हवेत. बुरूजावर बसल्यानंतर वेगाने येणारे वारे अगदी उसळणाऱ्या लाटेसाखी अंगावर यायची. इथून पाऊल निघत नव्हते. तो सूं सूं सोसाट्याचा वारा कानावर मंजूर गीत गात होता.. 

 

आता मात्र परतीचा प्रवास.. स्टँडवरील खमंग खुसखुशीत कांदाभजीवर ताव मारून एसटी चा परतीचा प्रवास..

दिवस पावसाळ्याचे..

गड किल्ला व डोंगरी भाग..

मुसळधार पावसाची सतत रिपरिप..

ढगांची आकाशात गर्दी होती. 

डोळ्यात बोट घालून पाहिले तरी समोरचे दिसत नव्हते. अशातच यांचा एस टी चा प्रवास.. ड्रायव्हर अगदी कसोशीने गाडी खाली उतरत होता. पावसाचा अधिकच जोर होता. 

आता मात्र ड्रायव्हरला काय आम्हाला सुद्धा बाहेरचे काहीच दिसत नव्हते...

 

अचानक..

 

अचानक ड्रायव्हरचा ताबा सुटला...

एसटी कडा तोडून खोल दरीत कोसळली...

 

हे सर्व अगदी एका क्षणात झाले..कोणालाही सावरायला वेळ नाही मिळाला... 

 

धप्प..

 

एक जोराचा आवाज आला...

गाडी दरीत न कोसळता झाडावर जाऊन आदळली..

 

विजांच्या लखलखाटात जे पाहिले... आई शप्पथ. भगवंताची देणच... गाडी अक्षरशः लोंबकळत होती. ते दृष्य आजही मनःपटलावरून हटत नाही. 

जोराच्या धक्क्याने आमचा बाकडा तिरका होऊन चौघेही जाम अडकलो.. 

किंकाळ्या पाठोपाठ किंकाळ्या येत होत्या..

 

बाहेर पडणे मुश्कील होते..

हा सर्व प्रकार पाठीमागून धड धड करत  येणाऱ्या बुलेटवरील व्यक्तीने पाहिले..

 

थांबला..

 

ही हकिगत गावात फोन करून सांगितली.

 

गावकरी घटनास्थळी लोटले.

अगदी पटपट क्रेनची व्यवस्था झाली.

अंधारात देखील अलगद गाडी वर काढली..

 

गाडीत मोजून पंचवीस माणसे होती..सोबत ड्रायव्हर व कंडक्टर..

आता मात्र त्या व्यक्तीने सर्व ताबा घेतला. सर्वांना बाहेर काढायचे कसोशीने प्रयत्न चालू झाले..

एक एक व्यक्ती बाहेर काढली..

कुणाला मुका मार तर कोणाला जखम झाली होती.. पण सुदैवाने कोणीही दगावले नव्हते...

 

माझा पाय गाडीच्या त्या बाकड्यात असा काही अडकला होता..

जोरात ओरडत होतो..

बाकीचे तिघंही सुखरूप होते.. पण माझी अवस्था पाहून त्यांनाही काही सुचत नव्हते... 

 

मला बाहेर काढण्यासाठी अगदी पत्रा कट केला, बार कट केले पण... शेवटी पायापासून चंपा दुरावला..

 

सर्वात जखमी म्हटलं तर मीच...

त्या व्यक्तीने आपल्याबरोबर मला घेतले...

 

केर्ली गावात आणले..

आपली चारचाकी काढली व कोल्हापूर गाठले..

माझ्या पायाचे तात्काळ ऑपरेशन करावे लागले..

तर त्याचा सर्व खर्च या माऊलीने उचलला..

हे होते मुरलीधर पाटील रिटायर्ड आर्मी आॅफिसर..रिटायरमेंट नंतरही ही समाजसेवा...

 

मला आपल्या घरी पुढील पंधरा दिवस ठेऊन घेतले..पाटील काकूंनी माझी या काळात खूप सेवा केली.

मी म्हटलं,

 "किती कराल हो माझ्यासाठी..?"

 

"मला लेकरं असती तर मग त्यांच्यासाठी एवढं केलंच अस्त की!!"

 

मला तेव्हा समजले की यांना मुलगा नाही. मग मात्र मी मनाशी ठरवलं मुलाबाळांची उणीव यांना जाणवू द्यायची नाही..

 

आज परत येथे येताना तो सर्व इतिहास नकळत तरळून गेला.

विचाराच्या तंद्रीत कधी पाटलांच्या वाड्या समोर गाडी पोहचली हे कळलेच नाही. 

 

आम्ही चारही मित्र वेळ मिळेल तसे इथे येतो..

 

आई वडिलांच्या नात्यापेक्षा हे नातं आता बळकट झालंय.. 

 

किरण आज सुनेला पायावर घालायला पुन्हा केर्लीत दाखल झाला.

 

ललित लेखक - श्रीकांत दीक्षित.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू