पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हिरकणी

हिरकणी

ट्यहा.. ट्यहा.. च्या नवजात च्या रडण्याच्या आवाजाने हिरी खडबडून जागी झाली. अनाहूत पणे तिची नजर तिच्या कुशी कडे वळली. रिकामी कूस बघून तिच्या हृदयात कळ उठली, छाती कशी गच्च भरून आली होती. पदर सावरत तिनें घड्याळावर नजर टाकली, रात्रीचे दोन वाजले होतें.
   समोरच्या वार्ड मध्ये एक पिल्लू जिवाच्या आतंकाने रडत होतें.
उगी.. उगी. बाला ललु नको, दुदु हवं कां?
  बहुदा बाळाची आजी त्याला मांडीवर घेऊन शांत करण्याचा
प्रयत्न करत होती.
  हिरीने आपले कपडे नीट केलें व त्या वार्ड च्या दारा समोर येऊन उभी राहिली.  आजी बाळाला वाटी चमच्याने दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती पण बाळ काही शांत होत नव्हता.
    बराच वेळ हिरी तेथेच उभी होती, नंतर परत आपल्या बेड वर येऊन पडली. एवढ्यातच तिला कितीतरी थकवा आला होता.
5..6.दिवसा पूर्वीच तिचे सिझेरिअन ऑपरेशन झाले होतें पण
निष्ठुर काळाने तिच्या पाखरावर झडप घातली होती, तिच्या बाळाने ह्या जगात येण्याअगोदरच सर्वांचा निरोप घेतला होता
व ह्या सगळ्या मानसिक धक्याने तिची प्रकुर्ती खालावली होती.
    डॉ परेंरांच्या निष्णात देखरेखी खाली तिची ट्रीटमेंट चालू होती.
  बाळाच्या रडण्याचा आवाज आता थांबला होता, बहुदा दमून
तें बाळ झोपी गेलें असावे पण हिरीच्या डोळ्यातली झोप मात्र
उडाली होती.
  दुसरे दिवशी देखील हाच प्रकार घडला. तान्हूला रडून रडून थकून झोपी गेला. हिरीच्या डोळ्याला मात्र डोळा लागला नाहीं,
पहाटे कुठेतरी डोळा लागला असावा व म्हणूनच सकाळी काशी
मावशी लादी पुसायला आल्या तरी ती झोपूनच होती.
"कायं ताई, आज झोप झाली नाहीं वाटतं??"
, "अगं असं काही नाहीं "काहीशी ओशाळतच ती बेड वर उठून
बसली.
"ताई, बरं वाटत नाहीं कां?"आयाबाईंनी आपुलकीने चौकशी केली.
"असं नाहीं ग!"पण समोरच्या वार्ड मध्ये रात्री एक बाळ खूप
रडत होतें, त्यामुळे पुरेशी झोप झाली नाहीं हिरी ने सांगितले.
"तें बाळ व्हय?"त्यो बिचारा असाच रडतो.
कां  ग?  हिरीने काहीश्या उत्सुकतेनेच विचारणा केली.
"अवं त्याची माय करोना वार्ड मध्ये आहें ना? बाळाला आईचं
दूध मिळत नाहीं, वरचे दूध त्याला पचत नाहीं.
  म्हातारी आजी आपल्या परीने खूप प्रयत्न करते, पण माय ची सर कां कोणाला येणार??
आया बाई बोलत बोलत लादी पुसत पुढें गेली.
हिरी मात्र छातीवर हात ठेवून तेथेच कितीतरी वेळ उभी होती.
दुसरे दिवशी दिवस भर ती वेगळ्याच तंद्रीत होती, कशातच तिचे लक्ष लागत नव्हते, शेवटी तिनें मनाशी निर्धार केला व ह्या विषयी
डॉक्टरशी बोलायचेच असे ठरवले.
    दुसरे दिवशी सकाळी लवकर तयार होऊन ती डॉ परेराच्या चेंबर बाहेर बसली होती.
प्रत्यक्ष डॉ आल्यावर मात्र तिच्या छातीत धडधडू लागले.
"डॉ रागावणार तर नाहीं ना??"असा विचार देखील तिच्या मनाला शिवून गेला.
"अरे.. हिरी कशी आहेस?"
डॉ परेरानी तिला बघताच विचारले.
"मी बरी आहें मॅडम "हिरीने काहीसे घाबरतच उत्तर दिलें
"मॅडम.. मी.. मला.."हिरीने काहीसे अडखळतच बोलण्याचा प्रयत्न केला.
"कायं झालं हिरी?? काही होतंय कां तुला?? बरे वाटत नाहीं कां??"
डॉक्टरनी तिच्या जवळ येत, तिच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत
विचारणा केली.
""नाहीं.. नाहीं.. मी ठीक आहें पण.... तें कोरोनाचे बाळ आहें नां,
तें खूप रडते हों रात्री!!आईचे दूध त्याला मिळत नाहीं नां!!
माझी छाती दुधाने गच्च भरली आहें, मी बाळाला आपले दूध देऊ शकते कां??
हिरीने सर्व शक्ती एकवटून मनातले बोलून टाकले.
एवढ्या बोलण्याने देखील तिला धाप लागली होती, चेहरा लाल
बुंद झाला होता, ती भीतीने थरथर कापत होती.
डॉ परेरा तिच्या जवळ आल्या, त्यांनी तिला खुर्चीत बसवले व पाण्याचा पेला पुढें केला. ती एका क्षणात पेलाभर पाणी पिऊन गेली व पालथ्या हाताने तोंड पुसत तिनें डॉक्टर कडे बघितले.
डॉ परेराला तिच्या डोळ्यातील आसवांना ममतेची झालर लागलेली दिसली.
त्यांनी पुढें होऊन तिला धरले व तिला बेड पर्यन्त सोडून आल्या.
हिरीला ह्या सर्व प्रकाराने ग्लानी आली होती," आपण काही चूक तर बोललो नाहीं नां??"हाच विचार करता करताच तिचा डोळा लागला.
आज तिनें दुपारचे जेवण देखील घेतलें नव्हते.
बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तिची झोप उघडली व मन पुनः
कासावीस झाले पण आता तिनें मनावर ताबा ठेवला व मन घट्ट करून बेड वरच बसून राहिली
   एवढ्यात तिला पावलांचा आवाज आला, कोणीतरी तिच्या
जवळ येत असावे, तिनें हळूच डोळे उघडले, समोर डॉ परेरा सिस्टर बरोबर उभ्या होत्या.
ती गडबडीने उठून बसली. डॉ नी डोळ्यांनीच तिला धीर दिला व
सिस्टरला काहीतरी खूण केली. सिस्टरने तिला सर्व नीट समजावले व तिला घेऊन बेबी फिडींग रूम मध्ये गेली.
आया बाईच्या मदतीने, हळुवार पणे गरम पाण्याचा शेक देत
तिच्या स्तनावर हलक्या हाताने मसाज करून ब्रेस्ट पंप ने दूध
काढले.
हिरी वेदना सहन करत होती पण त्यात वेगळीच अनुभूती होती.
दूध काढून झाल्यावर सिस्टर ने "तें "दूध बाटलीत टाकले व ती दूध घेऊन कोरोना वार्ड कडे निघाली.
   थोड्याच वेळात तें बाळ चुटुचुटू अमृत प्राशन करत होतें. दूध पिताच तें बाळ न रडता झोपी गेलें.
  हिरीची दूधाची तहान ताकावर भागत होती.
पुढें हा रोजचाच उपक्रम झाला. हिरी दिवसातून तीन.. चार वेळेस दूध काढून देत असे. बाळासाठी कां होईना पण ती पौष्टिक आहार घेऊ लागली होती. तिची व बाळाची प्रकृती झपाट्याने सुधारत होती, बाळ आता बाळसे धरू लागले होतें.
कोरोना वार्ड मध्ये दर्शना (बाळाची आई )देखील कोरोना मुक्त झाली होती. अधून मधून तिचा तान्हूला आपल्या आई कडे जाऊ लागला होता.
  आज सकाळ पासूनच हिरी उदास होती, आज तिचा कान्हा तिच्या पासून दूर जाणार होता. हिरीच्या डोळ्यातील आसवांना
अंत नव्हता, सकाळ पासून तिनें काही खाल्ले देखील नव्हते, ती
अंथरुणावरच पडून होती.
  तेवढ्यात बाळाच्या आजी दर्शना बरोबर तिच्या बेड जवळ आल्या
  मुळातच सुंदर असलेली दर्शना मातृत्वाच्या तेजाने अधिकच सुंदर दिसत होती. आपल्या बाळाला उराशी घेऊन ती रुग्णालयातील सर्व स्टाफ चा निरोप घेत होती
"अगं हीच आपल्या कान्हा ची यशोदा बरं कां!!"बाळाच्या आजीने हिरीची ओळख करून दिली.
दोघींची नजरानजर होताच दर्शनाने गोड हसून हिरीच्या खांद्यावर वर हात ठेवला.
  हिरी भारवल्यापणे सर्व बघत होती. बाळाकडे एक टक बघत तिनें विचारणा केली "ताई, एकदा बाळाला जवळ घेऊ कां??"
   हों.. हों.. घे कीं!  अगं पण हा लब्बाड गाढ झोपला आहें किं बघ!!"असे म्हणत तिनें बाळाला पदरा आड घेतलें व हिरीच्या हातात पेढ्याचा पुडा व एक जाडजूड पाकीट ठेवले व ती मोठया तोऱ्यात पुढें गेली.
हिरी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत राहिली.
तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाकिटावर टप.. टप. पडत होतें!!


डॉ विद्या वेल्हाणकर
  अंधेरी मुंबई 
 
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू