पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जन्म बाईचा

*जन्म बाईचा बाईचा... खूप घाईचा...*

 *एक ताईचा,ताईचा.. एक आईचा..* 

 

आज *ती* ऋतुमती झाली होती. निसर्गानेच बहाल केलेला सृजन सोहळा साजरा करण्यासाठी वाड्याच्या पडवीतील झोपाळा सजवला होता. ओटी,पडवी, अंगण छान रांगोळीनं नटलं होतं. शिकेकाईने स्वच्छ धुतलेल्या लांबसडक केसांना आईने सुगंधी धुरी देऊन केस छान सुकवून लांब शेपटा बांधून दिला आणि त्यावर अंगणातला मोगरा गजरा करून माळला.


 हिरवेगार रेशमी परकर-पोलके घालून रमा तयार झाली. थोड्याच वेळात शेजारच्या बायका सोहळा साजरा करायला यायच्या होत्या. आई, ताई, काकू, एवढंच काय ओटीवर बसणारी आलवणातली आजीसुद्धा आपापल्या परीने लगबग करत होत्या.

 

 आज तर ताईने तिचे लाडके चांदण्यांचे डूल असलेले सोन्याचे कानातले न मागता रमाला घालायला दिले. आईने पेटीतल्या छोट्या छोट्या दागिन्यांसोबत भरपूर मुके घुंगरू असलेले जडशीळ पैंजण रमाला घालायला दिले आणि समजावलं.... "तुझ्या घरभर स्वच्छंदी नाचण्यावर मला बंधन नाही ग घालायचं!! फक्त इतरांच्या कानांना तुझे नाचणारे पाय जाणवू नये म्हणून हे *मुके घुंगरू असलेले पैंजण*... बाकी तुझ्या स्वच्छंदी बागडण्यावर बंधन घालणारी मी कोण??"

 

 " स्त्री ही सोशिक, कामसू, गुणी, सहनशील तर हवीच ...पण उत्साही, स्वच्छंदी, आणि आनंदी असेल तरच घराचं घरपण जपून ठेवते."

 

 सगळे तिला फुलासारखे जपत होते. अगदी तीचे लाडके बाबा सुद्धा काल संध्याकाळी होणारी पोटदुखी आणि कंबरदुखी विसरून रमा आज मात्र खूपच आनंदात होती.... कारण तिच्या आवडीचे चार गोडधोड पदार्थ आणि सुंदर सजावट करुन नटवून-थटवून खास तिच्या कौतूकासाठी योजिलेला समारंभ तिला बाईपणाचा सोशिकपणा शिकवण्या सोबत स्त्री जन्माचा अर्थ समजवायला पुरेसा होता.....

  ...©सौ.मंजिरी भातखंडे

  पूणे३/८/२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू