पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लिंबलोण उतरू कशी

लिंबलोण उतरू कशी...

 

आजवर ज्या नावाचीही ओळख नसावी असं कुणीतरी एका क्षणात प्रत्येक भारतीयाला ‘आपलं’ वाटू लागतं, कारण एकाच मातृभूशी जोडली गेलेली नाळ! जीव तोडून केलेल्या त्या व्यक्तीच्या अफाट मेहनतीचं कौतुक वाटू लागतं, त्याच्या अपार कष्टांची जाणीव मनभर जागते, त्याच्या मनोनिग्रहाचा, जिद्दीचा अभिमान उरात दाटून येऊ लागतो... स्वगुणांच्या बळावरच असामान्य कर्तृत्वानं त्याच्या गळ्यात रुळू लागलेली यशोमाला पाहाताना डोळ्यांपुढचं सगळं धूसर होत जातं!... आपल्याच गळ्यात ती यशोमाला पडल्यासारखा आभाळाएवढा आनंद कसा व्यक्त करावा हेच उमजत नाही. वाहात्या डोळ्यांनी फक्त काळजापासूनच्या शुभेच्छा त्याला दिल्या जातात!... दुसऱ्या व्यक्तीच्या प्रचंड यशानं मनात तसूभरही असूया उमटल्याचं एकाही देशबांधवाला जाणवत नाही कारण आप-पर भावच तिथं उरलेलाच नसतो.

ही विलक्षण ऐक्यभावना उरात शिल्लक असल्याची अत्युच्च पातळीवरची जाणीव आज नीरज चोप्रानं प्रत्येक भारतीयाला करून दिली. आर्मी ऑफिसर नीरज चोप्रा, प्रत्येक भारतीयाचा आपणांस एक कडक सॅल्यूट!  

 

हीच ऐक्यभावना मीराबाई चानू, पीव्ही सिंधू, लोवलीना बोर्गोहे, रवी दाहिया, बजरंग पुनिया आणि भारतीय हॉकी चमूनंही गेल्या काही दिवसांत आपल्याला अनुभवायला दिली. त्या प्रत्येक क्षणाचाही प्रत्येक भारतीय ऋणाईत आहेच!

ही अशी भावना आपली कायमची सोबती झाली तर!? कोतेपणाचा वसा घेऊन आपापसांत खडाजंगी करत बसण्याऐवजी प्रत्येकजणच एखाद्या विलक्षण ध्येयाला वाहून घेत परिश्रमांमधे गुंतून राहिला तर?! हे शक्य नसेल त्यांनी अशांना मदतीचा, आधाराचा हात दिला तर?! तेही शक्य नसेल त्यांनी किमान मनोभावे प्रार्थना केली तर, मनभर फक्त शुभेच्छा बाळगल्या तर!?... तर... का नाही आपल्या मातृभूच्या मुखी प्रसन्न हसू विलसणार!?  

 

आजच्या तरुणाईपुढं प्रलोभनांत वाहून जाण्याच्या पर्यायासोबत दैदिप्यमान कामगिरी करत मनामनांमधे अभिमानाची ज्योत उजळवण्याचा, उदात्त भावना जागवण्याचा, स्वत:सोबत इतरांचीही झोळी अपार आनंदानं भरण्याचा, मिळालेल्या श्वासांचं सार्थक करण्याचाही पर्याय खुला आहेच की! मग क्षेत्र कोणतंही असू शकेल, पण आनंद तर सारखाच! फक्त पर्यायाची निवड डोळसपणे, सजगपणे व्हायला हवी! सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारख्या ज्या क्षणानं नीरज चोप्रानं आपल्या सर्वांची ओंजळ भरली तो क्षण येत्या पिढ्यांना सजग करण्यातही प्रेरणादायी ठरेल अशी आशा करूया!

 

नीरज, प्रत्येक भारतीय मन आज द्वैत विसरून आईच्या भूमिकेत शिरून भरल्या डोळ्यांनी तुला म्हणतंय...

लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू

इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू

(गदिमा)

 

- आसावरी केळकर-वाईकर, ७/८/२०२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू