पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रावण धारा

श्रावण धारा 


शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कलेक्टर बंगल्याच्या गेटवर " गिरिजा माधवराव परांजपे, कलेक्टर, भा.प्र.से." अशी पाटी झळकत होती आणि या भव्य बंगल्यात असलेल्या बागेतील एका झोपाळ्यावर बसून माधवीताई गिरिजाच्या येण्याची वाट बघत होत्या, अजून काही वेळ तिची वाट पाहून झाल्यानंतर " रामुकाका, तुमच्या बाईसाहेब येण्याची वेळ होत आली आहे, जरा चहापाण्याच बघा बरं त्यांच्या," असं म्हणत म्हणतच त्या बंगल्यात दाखल झाल्या आणि दिवेलागणीची वेळ होत आली म्हणून देवासमोर बसून दिवा लावायची तयारी करु लागल्या.


तशी त्यांची ही रोजचीच सवय, पण दिवा लावायला देवासमोर बसलेल्या माधवीताईंंना तीस वर्षांपूर्वीची ती संध्याकाळ आठवली आणि वातीच्या डब्यातून काढलेल्या वाती एका हातात आणि निरांजन दुसऱ्या हातात अशा अवस्थेत त्या किती तरी वेळ तशाच बसून राहिल्या. त्या भानावर आल्या तेंव्हा गिरिजा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या आईला सांगत होती, "आई मी आलेय् गं ..... !" 


त्यासरशी डोळ्यातून येऊ घातलेल्या गंगा यमुनांना थोपवून धरत माधवीताई आपल्या लेकीला म्हणाल्या, "आलीस का बाळ ? हात-पाय धूवून घे आधी, रामुकाका चहा आणतीलच एवढ्यात."


आपली आई देत असलेल्या सूचना ऐकत  गिरिजा आईला विचारु लागली, " काय मातोश्री, कुठे लागली होती समाधी ? का आजही आठवली ती महाभयानक संध्याकाळ ? " पण तिच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता त्या म्हणाल्या, " चल चहा पिवून घे आधी, गरम असेपर्यंत, हवेत गारवा वाढायला लागलाय बघ हल्ली, श्रावण लागलाय ना परवापासून. 


तीस वर्षापूर्वी ऑफिसमधून घरी परत येत असतांना आपल्या बाबांना झालेल्या त्या दुर्देवी अपघाताची बातमी अशीच दिवेलागणीच्या वेळी घरी कळाल्याची घटना आपल्या आईला आठवली असेल हे जात्याच हुशार असलेल्या गिरिजाने ताबडतोब ओळखले आणि " आई, झाला असेल तुझा दिवा लाऊन तर चहा घ्यायला बाहेर ये गं लवकर." बाबांच्या अपघाताची दु:खद आठवण टाळावी म्हणून गिरिजा म्हणाली आणि माधवीताई दिवाणखान्यात दाखल झाल्या. 


" मग, कसा काय गेला तुमचा आजचा दिवस मातोश्री ? मी तर अगदी थकून गेले बघ आज, " गिरिजाने आईशी बोलायला सुरुवात केली, आणि हो, बरं का गं आई, मी आज कामानिमित्त बोरगांवला गेले होते, तिथे आपल्या शेजारच्या सुलभाकाकु भेटल्या. तुझी चौकशी करत होत्या आणि काळजी घ्यायला पण सांगितलंय बघ त्यांनी. तशी प्रकृती बरी दिसली त्यांची पण थोड्या जास्तच थकल्यासारख्या वाटल्या मला. 


गिरिजाने सुलभाकाकुंचे नाव घेताच माधवीताईंना पुन्हा एकदा सगळ्या जुन्या घटना आठवल्या आणि विशेष करुन आठवण झाली ती त्या दिवशी काकुंनी दिलेल्या धीराची आणि त्यांनी केलेल्या सांत्वनाची. 


माधवरावांचे अपघाती निधन झाले आणि माधवीताईंवर जणू काही दु:खाचा डोंगरच कोसळला. " आता ह्या लहान लेकराला घेऊन जगावं तरी कसं आणि जावं तरी कुठे ? असा प्रश्न समोर उभा ठाकलेला असतांना याच सुलभाकाकुंनी पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला होता, समजूत काढली होती, त्याची आठवण माधवीताईंना झाली. " हे बघ माधवी, झालं ते वाईटच झालं, आपण ते टाळू शकत होतो का ? नाही ना, आणि शेवटी जे काय घडतं ना ते सगळं देवाच्या ईच्छेनुसारच घडत असतं बघ, म्हणून आता झालेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आणि स्वत:ची तब्येत खराब करुन घेण्यापेक्षा या पोरीकडे बघ, तिचं भविष्य आता तुला घडवायचं आहे, तिला तिच्या पायांवर उभं करायचं आहे, आता तूच तिची आई आणि तूच तिचे बाबा असं समजायचं आणि हे करत असतांना, " मी आता एकटी पडली आहे, मला कशा काय जमतील सगळ्या गोष्टी करायला ?" असा विचार मनात आणू नकोस, तू हिंमत दाखव, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत हे लक्षात ठेव, आणि हो, ही तुझी लेक खूप हुशार आहे गं, कलेक्टर कर तिला, बघ जरा एकदा तिच्याकडे, किती हिरमुसून गेलय गं लेकरू...! 


आणखी काही वेळ माधवीताईंची अशी समजूत घालून झाल्यावर सुलभाकाकु तिथून निघून गेल्या पण त्यांचे ते शब्द आणि त्यांचा तो आश्वासक आवाज माधवीताईंच्या कानात तसाच घुमत राहिला आणि माधवीताईंच्या वागण्यात सकारात्मक बदल घडवत राहिला. 


दरम्यान चौदा, पंधरा दिवसात करावयाचे सगळे धार्मिक विधी आटोपले, आलेली नातेवाईक मंडळी त्यांच्या त्यांच्या घराकडे परतली, पोलीसांनी अज्ञात इसमाच्या नावे अपघाताचा गुन्हा नोंदविला, माधवरावांच्या ऑफिसच्या लोकांनी घरी येऊन काही महत्वाच्या कागदपत्रांवर माधवीताईंच्या सह्या घेतल्या व लवकरात लवकर आर्थिक मदतीचे व फॅमिली पेन्शन सुरु करण्याचे आश्वासन दिले. इकडे गिरिजा आपल्या घराबाहेर पडून मैत्रिणींबरोबर खेळायला लागली, शाळेत जायला लागली  आणि हे सगळं बघून माधवीताईंना सुध्दा नियती बरोबर लढण्याची जिद्द मिळत राहिली. आपल्या आई मध्ये होत असलेले हे बदल पाहून, "आई, किती गं हिंमत मिळाली तुला या  सुलभाकाकुंकडून," असं गिरिजा एक-दोनदा बोलली सुध्दा. 


" माधवीताई, तुमची फॅमिली पेन्शन मंजूर झाली आहे आणि तुमच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव देखील सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे बरं का ...! " असा निरोप माधवरावांच्या ऑफिस मधुन मिळाला आणि माधवीताईंना अंगात बळ आल्यासारखे वाटले.


" आई, मी संपूर्ण शाळेत, सगळ्या तुकड्यांमधून पहिली आले आहे गं...! " असं गिरिजाने आईच्या पाया पडत सांगितलं आणि अंगावर मुठभर मांस चढल्याचा भास माधवीताईंना झाला. 


मनाने खूप मोठी उभारी घेतलेल्या माधवीताईंना भेटण्यासाठी असे आनंदाचे क्षण नेहमीच येऊ लागले. दहावी आणि बारावी परीक्षेत गिरिजा विशेष गुणवत्ता यादीत झळकली, पदवी परीक्षेत देखील तिला सुवर्ण पदक मिळालं. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा देत असतांनाच गिरिजा स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागली आणि तिथे सुध्दा " टाॅपर " येण्याचा मान पटकावला.


" बघ, मी तुला बोलले होते ना ? ही पोरगी तुमच्या घराण्याचे नाव काढील म्हणून...!" असं सुलभाकाकु प्रत्येक भेटीत माधवीताईंना  म्हणायच्या आणि असं बोलत असतांना त्यांच्या चेह-यावरचा आनंद नुसता ओसंडून वहात असल्याचा अनुभव माधवीताईंनी वारंवार घेतला होता. 


स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या दैदीप्यमान अशा यशानंतर पुढचे सगळे सोपस्कार देखील गिरिजाने चुटकीसरशी पार पाडले आणि एक दिवस अचानक " गिरिजा माधवराव परांजपे, तुमच्या नावाने रजिस्टर्ड पत्र आलं आहे " असा पोस्टमन काकांचा आवाज आल्यामुळे धावत धावत जाऊन गिरिजाने पोस्टमन काकांकडून ते पत्र घेतलं, घाईघाईने उघडलं, अधाशासारखं वाचलं आणि आपल्या आईच्या गळ्यात पडून सांगू लागली, " आई, मी कलेक्टर झालेय गं आणि अगदी उद्याच मला ट्रेनिंग साठी निघावं लागणार आहे बघ." 


घरात माय - लेकीची ही अशी गळाभेट चालू असतांना झालेल्या आनंदामुळे दोघींनीही डोळ्यातून येत असलेल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली आणि त्याचवेळी बाहेरही जोरदार  श्रावण धारा बरसू लागल्या ....! 



दिवाकर चौकेकर, गांधीनगर (गुजरात)

मोबाईल  :  9723717047.


 

















पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू