पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप आमचा घेता घेता...

निरोप आमचा घेता घेता

एवढे मात्र ध्यानी ठेव 

वाईटा मध्ये नसतो बाळा 

चांगल्या मध्येच असतो देव ।।


म्हणून बाळा चांगलं वाग

चांगल्याच्याच नादी लाग 

चूकभूल विसरून जावून

ठेऊ नकोस मनात राग

चांगले मित्र ,चांगले विचार 

हिच तुझी अनमोल ठेव 

निरोप आमचा घेता घेता

एवढे मात्र ध्यानी ठेव 

दुष्कर्मामध्ये नसतो बाळा 

सत्कर्मामध्येच असतो देव ।।


विसरून जा तू सर्व जगाला

पण विसरू नको त्या माऊलीला 

उन्हातान्हात स्वतः तळपत 

तिने दिलेल्या सावलीला 

हात जोड तू कुणापुढे ही

पण मान आईला पहिला देव

निरोप आमचा घेता घेता

एवढे मात्र ध्यानी ठेव

दगडामध्ये नसतो बाळा 

माणसामध्येच असतो देव ।।


ध्यानी असू दे बाप तुझा तो

गरीबीने गांजलेला 

येईल माझा शिकूनी राजा

वाट पाहत थांबलेला 

पालटेल चित्र तुझ्या घराचे

दिवस येतील खऱ्या सुखाचे 

आकांक्षेपुढे आकाश ठेंगणे 

हा मंत्र सदा तू ध्यानी ठेव 

निरोप आमचा घेता घेता

एवढे मात्र ध्यानी ठेव 

आळसामध्ये नसतो बाळा 

कष्टामध्येच असतो देव ।।


ज्ञान इथे तुला दिले रे भारी

मार आज तू खरी भरारी 

ज्ञान घेऊनी जा माघारी 

शहाणी कर तू दुनिया सारी

किर्ती मिळव तू कितीही मोठी

पण ही ज्ञानज्योत तू तेवत ठेव

निरोप आमचा घेता घेता

एवढे मात्र ध्यानी ठेव

अज्ञानामध्ये नसतो बाळा 

ज्ञानामध्येच असतो देव ।।


( शालेय निरोप समारंभानिमित्तची कविता )


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू