पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रोज इथे.......

बलात्कार अन् खून दरोडे 

क्षणाक्षणाला प्रेत पडे

स्वातंत्र्याच्या गादीवरती 

लोकशाहीची झोप उडे

रोज इथे हे काय घडे ॥

 

अन्यायाच्या ताकदीपुढे 

न्याय बिचारा रोज रडे 

अमाणुसकीच्या तलवारीने 

माणुसकीचे शीर उडे 

रोज इथे हे काय घडे ॥

 

तरूणाईचे पळती घोडे 

संस्काराला बसती जोडे 

व्यभिचाराच्या जाळामध्ये

संस्कृतीची राख उडे 

रोज इथे हे काय घडे ॥

 

आज इथे तर उद्या तिथे

रोज कुठेही अपघात घडे 

माय कुणाची लेकरासाठी 

टाहो फोडून रोज रडे

रोज इथे हे काय घडे ॥

 

बेधुंद होती प्रेमवेडे 

लग्नाआधी गर्भ पडे 

वासनेच्या तिरडीवरती

तरूणाईचे सडती मढे 

रोज इथे हे काय घडे ॥

 

धर्ममार्तंड काही वेडे 

धर्माधर्माची दंगल घडे 

अधर्माच्या हास्यापुढे 

धर्म बिचारा रोज रडे 

रोज इथे हे काय घडे ॥

 

भारतीय आपण सारे

एकात्मतेला का जाती तडे 

हुकूमशाहीच्या तलवारीने 

लोकशाहीचा खून पडे 

रोज इथे हे काय घडे ॥

 

जातीपातीचे रोज राडे 

रक्ताचे ही पडती सडे 

स्वातंत्र्याचे मोल कळण्या 

बलिदानाचे वाचा धडे 

रोज इथे हे काय घडे ॥

 

स्वातंत्र्य हे देऊन आम्हा

सांगून गेले ध्येयवेडे 

एकजुटीने रहा नाहीतर 

पारतंत्र्यही आहे पुढे 

रोज इथे हे काय घडे ॥

 

श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू