पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पावसातील पार्टी


पावसातील पार्टी


मोबाईलची रिंग वाजली..

"हॅलो..किरण बोलतोय.."


"अरे किरण बोल.. आज अचानक!"


"पक्या.. म्हेत्रे, पन्ना आणि खेबड्याला घेऊन ये रत्नागिरीला.."


"अरे पण रत्नागिरी?.. काय खास?"


"माझी पोस्टिंग इथं झालंय ACP म्हणून.." किरण बोलला.


"Wow...! अब पार्टी तो बनता है." 


"म्हणूनच बोलावतोय.. मौसम भी मस्त है.. रत्नागिरीचा पाऊस बघा रे..मस्त ऐश करूया.. या सारेजण."


"विचारतो सर्वांना.."


"काय विचारत बसू नकोस..सरळ मेंढरे भरल्यासारखी गाडीत टाक अन ये घेऊन." हसत हसत किरण म्हटला.


किरण, प्रकाश, नरेंद्र म्हेत्रे तर खेबूडकर चारही जीवलग दोस्त. कॅलेज जीवनात भरपूर मजा मस्ती केली होती. खरं तर आम्ही चौघेजण रूम पार्टनर. रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक बळकट  असं हे मैत्रीचे नाते. कधीही एकमेकांना सरळ नावाने बोलणे हा प्रकार नव्हताच.. किरण्या, पक्या, म्हेत्र्या तर खेबूडकरला खेबड्या. मेसला जेवायला जात असलो तरी चहा पोहे मात्र रूमवर. शिरा, पोहे बनवण्यात आपला हातखंडा तर म्हेत्र्याचा चहा म्हणजे एकदमच फक्कड..!! मग किरण्याची मजल मात्र कांदा मिरच्या चिरण्यापर्यंतच.. राहता राहिला खेबड्या..खाऊन पिऊन भांडी घासण्याचे काम त्याचे.. सर्वजण त्याची टर उडवायचे. असं हे मैत्रीचे आंगण..

शिक्षण झाले इंजिनियरची डिग्री घेऊन बाहेर पडले ते सोबत आठवणींची शिदोरी घेऊनच. किरण्या तसा सर्वात हुशार..MPSC च्या परिक्षा देत राहिला. माझी परिस्थिती पाहता नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जी मिळेल ती नोकरी धरली. खेबड्याला कधी नोकरीत रस नव्हताच.. नावालाच डिग्री घेतली होती. घरी असणारे सायबर कॅफे चालवणे पसंत केले. नरेंद्र म्हेत्रे Civil Engineer त्याने construction ग्रूप जाॅईन केला. एकंदरीत सर्वच उद्योगाला लागले होते. 

किरण्याने मात्र आपला ध्यास सोडला नाही अगदी विश्वास नांगरे पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या करियर साठी खडतर प्रयत्न करत होता. शेवटी एकदाचे यश त्याच्या मागे धावत आले. MPSC क्रॅक केली. मेरीट वर अगदी पहिल्या पंक्तीत बसण्याचा मान त्याला मिळाला होता. आज त्याच आनंदात पहिला फोन मलाच केला होता. 

आता किरण्याचे सेलेब्रेशन मग जायला तर हवं. लगेच खेबड्याला फोन लावला. खेबड्या कोल्हापूरात तर म्हेत्रे व मी पुण्यात. 


"अरे, पक्या.. तुम्ही दोघे पुण्यातून येताय तर मी इकडून डायरेक्ट रत्नागिरीला येतो." खेबूडकर म्हटला.


"नको, तू सरळ कराडला ये..येताना पन्न्याला पण घेऊन ये.. मग आपण चौघेही एकत्रच जाऊ..मज्जा येईल रे!.." मी सुचवले.

पन्ना म्हणजे एक जाॅली पर्सन..!! सिव्हिल इंजिनियर पण स्वभावाने तर खूपच छान. मैत्रीतत्वाला जपणारा, अडीअडचणीला धाऊन येणारा. इदला शिरखुर्मा खायला आवर्जून बोलावणार तर दिवाळीला हक्काने घरी येणारा. 

दोघेही होय नाही करत तयार झाले. म्हेत्र्याला पटवायची जबाबदारी आपली, पण गडी एकदम चिकट..! दोन दिवस सुट्टी म्हटलं तरी शंभर कारण सांगणार. असा अविर्भाव की मोदीजी नंतर तोच तेवढा बिझी. पण त्याला किरण्या म्हणतो तसंच गाडीत बांधून टाकायचे..अगदी तसंच ठरवून गाडी बाहेर काढली. सोबत ड्रायव्हर घेतला. ड्रायव्हिंगची चिंता रहात नाही. सकाळीच म्हेत्र्याला कळवलं होते..मी येतोय म्हणून..आणि रत्नागिरीला जायचं आहे. सायंकाळचा प्रवास मुद्दामच ठरवला. 

आम्ही दोघेही निघालो. खेबड्याला व पन्न्याला डायरेक्ट शिवराज धाब्यावर बोलवून घेतले होते. अख्या मसुरवर ताव मारत रात्रीचे जेवण आटपले. सोबत मटक्यातील दही व रोस्टेड पापड अगदीच चवदार जेवण भरपेट खाल्ले.  आता गाडीने वेग घेतला चिपळूणच्या दिशेने रत्नागिरीला.. दह्याने आलेली सुस्ती व दिवसभराची ड्युटी..गप्पा मारता मारता कधी डोळा लागला ते समजलेच नाही. सकाळी पाच वाजता चहाच्या टपरी समोर ड्रायव्हरने गाडी उभा केली. व म्हटला,

"साहेब, उठा सगळे जरा कडक चहा मारू येथे. फ्रेश व्हायचे असेल तर व्हा."


मग काय सर्वजण खडबडून जागे झाले. ब्रश करून सर्वांनी चहा घेतला. बाहेर पावसाची चाहूल लागली होती. मवारलेला वारा अंगाला झोंबत होता. पण गरम चहाचे घोट पोटाला चटका देत होते. बरं वाटलं..आर्ध्या तासाच्या अंतरावर रत्नागिरी होते. 

सकाळी सकाळी किरण्याच्या क्वार्टर समोर गाडी हजर झाली. आम्हाला पाहून त्याला काय आनंद झाला सांगू??.. पळत येत सर्वांना मिठ्या मारल्या. 

आमच्यासाठी दोन दिवस सुट्टीच टाकली होती. मग गणपतीपुळे, पावस फिरून आलो. रात्री सेलीब्रेशनची जंगी पार्टी झाली. ACP किरण परदेशी आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट होती. पावसाळ्याचे दिवस कोकणातील पावसाचा प्रसाद एक पर्वणीच होती. चौघेही खूप भिजलो. छत्री, रेनकोट याला आम्ही विश्रांती दिली होती. सरीवर सरी आम्हाला वारंवार अलिंगण देत होत्या व त्या प्रेम वर्षावात आम्ही न्हाऊन निघत होतो. 

दोन दिवसाच्या वास्तव्यानंतर आता मात्र कोकणची लाल माती सोडावी लागणार होती. किरण्याला तर आम्हाला सोडून वाटत नव्हते. तेच काॅलेज जीवन, त्या गप्पा.. सकाळी तर गंमतच झाली. किरण्याने हट्ट धरला... चहा पोहे घरीच करायचे. तसं आम्ही चौघेजण अजूनही बॅचलरच होतो. मग काय पोहे मी चहा म्हेत्र्याचा.. अगदी जुन्या आठवणींना उजाळा देताना भांडी मात्र खेबड्याला घासायला लावली. त्यानेही हसत हसत केलं. सर्वांनी खूप एंजॉय केला. 

आम्ही चौघेही परतीच्या तयारीला लागलो. किरण रहाण्याचा आग्रह करत असताना देखील आम्ही थांबू शकत नव्हतो. गाडी चालू झाली किरणचा निरोप घेतला ते परत भेटण्याच्या बोलीनेच..

गाडी परत चिपळूणच्या मार्गाला लागली. पावसाने तर अखंड थैमान घातले होते. चिपळून सोडले साधारण रात्रीचे नऊ वाजले होते. गाडी घाटातून चालली होती अन् अचानक गाडीचे मागचे चाक पंक्चर झाले. ड्रायव्हरने गाडी साईडला घेतली. स्टेपनी काढली पण चाक बदलण्यासाठी गाडीत टाॅमी नव्हती. बाहेर हलका पाऊस होता पण काळोख मात्र वाढला होता. आम्ही चौघेही गाडी बाहेर आलो. टाॅमी नाही तर काय करायचे ये विचारात होतो. तेव्हढ्यात बाजूच्या झाडातून सळसळ ऐकायला आली. आमचे तर धाबे दणाणले होते. जंगली श्वापद तर नाही ना!. उभ्या पावसात देखील घामाच्या धारा वाहू लागल्या. सर्वचजण भयभीत झाले. आता काय ह्वायचे ते होऊ दे..असा विचार करत असतानाच ते जनावर समोरून निघून गेले. ते जनावर दुसरे तिसरे कोणी नव्हते तर गळ्यात लोढणा अडकवलेली म्हैस होती. आम्ही चौघेही जोरात हसलो.. त्याबरोबर मेंटल प्रेशर रिलीज झाले. आता एकादी गाडी थांबवावी अन् टाॅमी घ्यावी. पण रस्त्यावर वहातूक तुरळक झाली होती. एकादी गाडी आली  व थांबण्यासाठी हात केल तरी थांबत नव्हती. शेवटी बाहेर दोघेच थांबलो. देवाचा धावा चालूच होता तेव्हढ्यात एक जीप आली व थांबली. त्याने मदत केली. चाक बदलले. जीवात जीव आला. मग घाट उतरत खाली यायला निघालो.

पण आज देवाने परिक्षा घ्यायचे ठरवले होते. स्टेपनीचा टायर खराब होता व पुन्हा चाक पंक्चर झाले. तशीच गाडी थोडी पुढे आणली. रात्रीचे आकरा वाजत आले होते. घाट उतरताच एक पंक्चरचे दुकान होते. आम्ही सर्वच जण जरा सुखावलो. त्याला पंक्चर काढायला दोन्ही चाके दिली. त्याने चेक केली.

"साहेब, पंक्चर नंतर तुम्ही तशीच गाडी चालवली आहे आणि टायर खूपच खराब झालेत चालणार नाही हे." पंक्चरवाला म्हटला.

"अरे, मग नवीन टायर टाक. बदल मग." मी म्हटले.

"साहेब नवीन टायर मी ठेवत नाही. एकादा जुना चांगला बघावे म्हटले तर या साईजचा टायर नाही." 


"अरे पक्या, आता काय करायचे..? आपल्याला आता इथेच मुक्काम करावा लागेल." पन्ना म्हटला.

"साहेब म, इथं भरपूर जागा आहे.. झोपा आजची रात्र येथे." तो पंक्चरवाला म्हटला. 

रहायला काही नाही पण तेथे मच्छर फार होते. झोप लागणे कठीण होते. यावर खेबड्याने एक शक्कल लढवली. समोरच टपरी आहे तेथे जेवण करू व डासांचा त्रास होईल तर एक एक क्वाटरची बंदोबस्त होतोय का बघूया. 

खरंच आता गत्यंतर नव्हते. पोटात कावळे ओरडत होते. समोरच्या टपरीवर गेलो. एक नोट वेटरच्या हातात कोंबली व काय सोय होईल का विचारले तर तो लगेच तयार झाला. सायकलला पॅडल मारत जवळच्या गावात गेला. तोपर्यंत टपरीवर आॅर्डर दिली. मच्छी फ्राय व चिकन तंदुरी तयार करायला सांगितले. तो वेटर भर पावसात धापा टाकत आला चार क्वार्टर आणल्या.  मग जेवण केले व त्या दुकानातच लवंडलो. एक रात्र पावसाची अशी बाहेरच काढली.

ही ट्रीप मात्र कधीच न विसरण्यासारखी..



श्रीकांत दीक्षित. 






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू