पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रीकृष्ण

*श्रीकृष्ण*

भगवान श्रीकृष्णाचे सविस्तर चरित्र वेद व्यास रचित श्रीमद्भागवत या ग्रंथात आले आहे. महाभारत ग्रंथातही श्रीकृष्णाचे चरित्र आहे. भागवत पुराण, हरिवंश, विष्णुपुराण इत्यादी ग्रंथांमध्ये श्रीकृष्णाचे चरित्र विस्ताराने सांगितले आहे.
अतिप्राचीन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अवतारी पुरुष म्हणजे श्रीकृष्ण. प्रत्यक्ष परमेश्वर. त्यांनी भागवत धर्म सांगितला.
श्रीकृष्ण सर्वांचा सखा, म्हणूनच श्रीकृष्णाला एकेरी नावाने हाक मारण्यास भक्तांना प्रत्यवाय वाटत नाही. नृत्य व बासरी वादन कलेत निपुण असलेला श्रीकृष्ण, गोप-गोपींसह रासक्रीडेतही रममान झाला. तो गो-पालनात निपुण होता. जलक्रीडा, मल्लविद्या इत्यादी शारीरिक शक्तीचा कस दाखविणाऱ्या खेळात तो पारंगत होता. शस्त्रास्त्रविद्या, वेद विद्या, नीतिशास्त्र या विद्या सांदिपनी ऋषींच्या आश्रमात राहून केवळ ६४ दिवसांच्या अध्ययनाने त्याने हस्तगत केल्या. सर्वांना हवा हवासा वाटणारा श्रीकृष्ण आपल्या शालीन वागण्याने व शारीरिक सामर्थ्याच्या प्रदर्शनाने सुसंस्कृत जीवनपद्धतीचा आदर्श ठरला. कंस, नरकासूर, बाण, शिशुपाल इत्यादी दुष्टांचे निर्दालन करून विजयी वीर म्हणून शूरवीरांना स्फूर्ती देणारा ठरला. पांडवांचा मुत्सद्दी सल्लागार आणि भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचा उद्गाता व महान द्रष्टा म्हणून श्रीकृष्णाचे भारतीय संस्कृतीतील स्थान अढळ राहणार आहे. वेदकालापासून ते आजच्या युगापर्यंत अवत्तीर्ण झालेल्या विभूतींमध्ये, धर्मसंस्थापकांमध्ये इतके वैविध्यपूर्ण, इतके वैचित्र्यपूर्ण, सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि समृद्ध चरित्र आढळणार नाही.
यदुवंशाच्या वृष्णिकुलात श्रीकृष्णाचा जन्म झाला. वृष्णि हा यदुवंशातील भीमसात्वत याच्या चार पुत्रांपैकी एक पुत्र. भजमान, देवावृध, अंधक व वृष्णि या चार भावांमध्ये यादवांचे राज्य विभागले गेले. अंधकाकडे मथुरा व आसपासचा प्रदेश होता. अंधकाचा पुत्र कुक्कर,त्याच्या वंशातील आहुकाचे देवक, उग्रसेन हे पुत्र. देवकाला चार पुत्र व चार मुली होत्या. त्यापैकी देवकी एक. ती कृष्णाची माता.
उग्रसेनाला नऊ पुत्र व पाच मुली. त्याचा ज्येष्ठ पुत्र कंस. जरासंध या सामर्थ्यशाली सासऱ्याच्या मदतीने त्याने स्वतःच्या पित्याला बंदीवान बनवून मथुरेचे राज्य बळकावले. वसुदेवाचा वृष्णी, अनमित्र, देवमिढुष, शूर, वसुदेव असा वंश सांगितला आहे. वसुदेव उग्रसेनाचा मंत्री होता.
वसुदेवाची सख्खी बहीण पृथा. पृथा म्हणजे पांडवांची माता कुंती. पृथा ही कुंतीभोज राजाला दत्तक गेली होती; नंतर त्याने तिचे नाव बदलून कुंती असे ठेवले. देवकाची कन्या देवकी हिचा विवाह वसुदेवाशी झाला. वसुदेव देवकीचा आठवा पुत्र कृष्ण. वसुदेवाला देवकी, रोहिणी अशा सात भार्या होत्या. बलराम हा रोहिणीचा पुत्र.
वसुदेव देवकी यांच्या विवाहानंतर वरात निघाली. देवकी ही कंसाची चुलत बहीण. कंसाची तिच्यावर खूप माया होती. वरातीच्या रथाचे सारथ्य स्वतः कंस करीत होता. वरातीचा जल्लोष चालला असताना आकाशवाणी झाली. "कंसा तुझा वध करणारा तुझा शत्रु, देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे."
कंस हा अत्यंत जुलमी होता. स्वतःच्या पित्याला पदभ्रष्ट करून त्याने सत्ता बळकावली होती; त्यामुळे गणराज्य पद्धतीची शिस्त त्याने मोडली होती. सारी प्रजा त्याच्या जुलमी कारभाराने त्रस्त झाली होती. प्रजेच्या मनात असंतोष खदखदत होता. त्या काळात अनेक यादव कुळे शेती, दुग्ध व्यवसाय करीत असत. नंद गोप हा वज्रभूमीचा प्रमुख गोप होता. तो वसुदेवाचा मित्र असल्याने वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी हिला तिच्या सुरक्षिततेसाठी नंदाच्या घरी ठेवले होते.
आकाशवाणी ऐकल्यावर कंसाची मती पालटली. प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली. तो देवकीचाच वध करायला निघाला. वसुदेव मध्ये पडला, स्त्री वधाचे पातक माथी घेऊ नकोस; असे सांगून त्याने कंसाची कशीबशी समजूत काढली. कंसाने त्या दोघांना नजर कैदेत ठेवले. त्यांच्यावर पहारा बसविला.
देवकी प्रसूत झाली की, तो त्या नवजात बालकाचा वध करी. अशी सहा बालके कंसाने मारून टाकली. सातवा गर्भ देवकीच्या उदरात आला, तेव्हा योगनिद्रादेवीने तो देवकीच्या उदरातून काढून रोहिणीच्या उदरात स्थापित केला. यथावकाश रोहिणी प्रसूत झाली. तो कृष्णाचा मोठा भाऊ बलराम. त्याचे जन्म नाव संकर्षण. एकीकडून काढून दुसरीकडे नेला; म्हणून त्याचे नाव संकर्षण.
देवकीचा आठवा गर्भ म्हणजे साक्षात भगवान विष्णुंनी मानवरूप धारण केलेला कृष्णावतार. हा जन्मतःच चतुर्भुज विष्णूच्या रूपात देवकीच्या समोर प्रकटला; पण देवकीने त्याला नवजात बालकाचे रूप धारण करण्याची प्रार्थना केली. श्रावण कृष्ण अष्टमीस रोहिणी नक्षत्रावर तो जन्मला. वसुदेव, देवकीच्या पायात त्यावेळी कंसाने लोखंडी बेड्या अडकविल्या होत्या. कृष्ण जन्माच्या वेळी पावसाळा सुरू होता. यमुनेला पूर चढला होता. कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाच्या पायातील बेड्या खळकन तुटून पडल्या. बंदीगृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. पहाऱ्यावरील पहारेकरी गाढ निद्रेच्या आधीन झाले.
वसुदेवाने कृष्णाला एका टोपलीत ठेवले आणि तो बंदीगृहातून बाहेर पडला. बाहेर पाऊस कोसळत होता. शेष नागाने आपल्या पाचही फणा अर्धगोलाकार उभारून त्यांचे छत्र बालकृष्णाच्या मस्तकावर धरले. वसुदेव यमुनेच्या तीरी आला. यमुना दुथडी भरून वाहत होती. वसुदेवाने प्रवाहात पाऊल टाकले. जलप्रपात जणू उभ्याचा आडवा झाला होता; वाटेत येणाऱ्याला तो आपल्याबरोबर खेचून नेत होता.
वसुदेवाने शरणागती पत्करली नाही. गळ्याशी पाणी आले तरीही प्रचंड ओढ असलेल्या यमुनेच्या पात्रातून तो पाय रोवून चालत होता. चिमुकल्या बालकृष्णाच्या चरणांना जल भिडले. आपण केवढे तरी दुःसाहस केले याची जाणीव बहुधा यमुनेला झाली असावी; यमुना जागच्याजागी थबकली. तिच्या निश्चल झालेल्या प्रवाहा पुढून वाट काढीत वसुदेव पैलतीरी गेला. त्याने नंदाचे घर गाठले. नंदाचे सगळे घर गाढ झोपेत होते. यशोदा नुकतीच प्रसूत झाली होती; तिला मुलगी झाली होती. वसुदेवाने यशोदेच्या कुशीतील मुलीला अलगद उचलून टोपलीत ठेवले. बाळकृष्णाला यशोदेच्या कुशीत निजवून यशोदेच्या मुलीला घेऊन तो तडक कारागृहात परतला. वसुदेव बंदीगृहात येताच बंदी गृहाचे उघडे दरवाजे आपोआप बंद झाले. जणू
काही, आश्चर्यजनक वाटावे असे त्या रात्री काही घडलेच नव्हते.
देवकी प्रसूत झाल्याची बातमी सकाळी सकाळी कंसाला समजली. आपल्या मागचे शुक्लकाष्ट आता संपणार! या आनंदात तो कारागृहाकडे धावला. यशोदेच्या पुढ्यातील अर्भकाला त्याने खसकन ओढून घेतले. शिळेवर आपटण्यासाठी त्याने हात वर केला. अर्भक हातातून निसटले, विजेचा लोळ आकाशात जावा तसे काहीसे झाले. त्या अर्भकाने शारदा देवीचे संपूर्ण रूप प्रकट केले. तिच्या वाणीतून शब्द निनादले, "मूर्खा, कंसा! तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे." विष्णूच्या वरदानाने हीच देवी पुढे विंध्यावासिनी कामप्रदायनी देवी म्हणून भाविकांना अत्यंत प्रिय झाली.
कृष्णाला मारण्यासाठी कंसाने पूतना मावशीला पाठविले. कृष्णाला खेळविण्याचा बहाणा करून गोपीच्या वेशात ती नंदाच्या घरात शिरली. यशोदा कामात व्यग्र होती. तिने पूतनेची फारशी चौकशी केली नाही. पूतनेने कृष्णाला घराबाहेर नेले. स्तनपानातून कृष्णाला विष द्यायचा तिचा इरादा होता; नंतर तिच्या आरोळ्यांनी आसमंत दणाणून उठला. कृष्णाने चावा घेऊन तिला यमसदनाला पाठविले होते.
कृष्ण अतिशय खोडकर होता. नाना प्रकारच्या खोड्या करून गोपींना तो त्रास देई. त्यांचे दूध, दही लोणी फस्त करी. मग सगळ्यांजणी तक्रार घेऊन यशोदेकडे येत. रोजच्या तक्रारींना वैतागलेल्या यशोदेने एक दिवस शिक्षा म्हणून त्याला उखळीला बांधले. उखळीला बांधलेल्या अवस्थेत कृष्ण रांगत रांगत घराबाहेर आला. अंगणात दोन महाकाय वृक्ष एकमेकांना खेटून उभे होते. कृष्ण उखळीसह त्यांच्यामधून जाऊ लागला. उखळ झाडांमध्ये अडकले. कृष्णाला पुढे जाता येईना; त्याने जोर लावताच ते प्रचंड वृक्ष उन्मळून पडले. सगळेजण स्तिमित झाले. यशोदेने कृष्णाला पोटाशी धरले.
कृष्ण बलराम अंगापिंडाने मजबूत होते. ते मल्लविद्येत पारंगत झाले. कृष्ण आपल्या सवंगड्यांसह गायी-वासरांना रानात चरायला घेऊन जाई. तिथे तो आपल्या सुस्वर बासरीवादनाने सर्वांना मुग्ध करी.
यशोदेचा कान्हा म्हणून कृष्ण प्रथम गोकुळात व नंतर वृंदावनात वाढू लागला. वृंदावनातील यमुनेच्या डोहात कालिया नावाचा नाग गरुडाच्या भीतीने लपून बसला होता. त्याच्या विषाने डोहातील पाणी विषारी झाले होते. प्राणदायिनी यमुना विषारी झाल्याने जनजीवन धोक्यात आले होते. कृष्णाने डोहात उडी घेतली. कालियाला ललकारून त्याचे मर्दन केले. कालिया शरण आला. त्याने सर्व परिवारासह डोह सोडून जाण्याचे मान्य केल्यावर कृष्णाने त्याला जीवदान दिले. या प्रसंगाने कृष्ण सर्वांचे दैवत बनला.
वृंदावनात इंद्र पूजा करण्याचा वार्षिक रिवाज होता. कृष्णाने इंद्र पूजा बंद पाडली. त्याऐवजी गोवर्धन पूजा त्याने सुरू केली. चिडलेल्या इंद्राने वरुणाकरवी अतिवृष्टी करविली. गो वत्सांचे, वृंदावन वासियांचे जीवित धोक्यात आले. कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरून त्या खाली वृंदावन वासियांचे व त्यांच्या गोधनाचे रक्षण केले. इंद्राची नाराजी दूर झाली. तो प्रसन्न झाला व त्याने स्वतःच्या इंद्रपदावर कृष्णाला अभिषेक केला.
एकदा रात्रीच्या वेळी गोप गोपिकांसह कृष्ण रासक्रीडा करीत असताना तेथे काळ्या रंगाचा एक धष्टपुष्ट बैल आला व माती उकरीत आणि वाटेत येणारे वृक्ष उखडून टाकत, तो धुमाकूळ घालू लागला. त्याचे लाल बुंद डोळे तप्त निखाऱ्यासारखे भासत होते. जमाव सैरावैरा धावू लागला. कृष्ण पुढे झाला. त्याने त्या बैलाची शिंगे दोन्ही हातांनी धरून त्याला मागे रेटले. त्याची मान पिरगाळली. एका झटक्यात त्याचे एक शिंग उपटून कृष्णाने त्या बैलाच्या पोटात खुपसले आणि बैलाला ठार केले. या व यापूर्वीच्या सर्व पराक्रमांमुळे कृष्ण सर्वांना रक्षणकर्ता वाटू लागला.
कृष्ण जसजसा मोठा होत होता; तसतसे त्याचे माहात्म्य वाढत चालले होते. त्याने केलेले पराक्रम कंसाच्या कानावर जात होते. कृष्णाला मारण्याचे त्याचे तोपर्यंतचे सगळे प्रयत्न वाया गेले होते. अखेर कृष्णासह सर्व गोकुळाचा नाश युक्ती प्रयुक्तीने करण्याचा त्याने चंग बांधला. नंद आणि कृष्ण व बलराम यांच्या ध्यानात या सर्व गोष्टी येत होत्या. सावधगिरी बाळगून येणार्‍या प्रसंगांना तोंड देण्याचा त्यांनी निर्धार केला. (क्रमशः)
कंसाने मथुरेत धनुर्मह म्हणजे धनुष्योत्सवाचे आयोजन केले होते. केवळ ताकदीच्या जोरावर वाकविता येतील असे अनेक धनुष्य तेथे शक्ती प्रदर्शनासाठी ठेवले होते. अनेक नामांकित मल्लांना कुस्त्या खेळण्यासाठी तिथे बोलाविले होते. कंसाने मोठ्या चातुर्याने त्याकाळी यादवात सर्वमान्य व सुप्रतिष्ठित असलेल्या अक्रूराकरवी कृष्ण, बलराम यांना या उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित केले. कृष्ण, बलराम यांच्या साहस कथा मथुरावासियांच्या कानावर अगोदरच गेल्या होत्या. त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी मथुरावासियांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. कृष्ण बलराम यांचे मथुरेत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.
एके ठिकाणी शस्त्र-प्रदर्शन ठेवले होते. तिथले एक भले मोठे धनुष्य कृष्णाने सहजपणे उचलून वाकवले व तोडून टाकले. खेळांच्या विविध स्पर्धा साठी सजविलेल्या क्रीडांगणाच्या प्रवेशद्वाराजवळ कुवलयापीड नावाचा एक महाकाय हत्ती झुलत होता. कृष्णाला पाहताच त्याचा संताप अनावर झाला. तो कृष्णाच्या अंगावर धावून गेला. चवताळलेल्या त्या हत्तीची सोंड पकडून कृष्ण त्याच्यावर स्वार झाला. त्याचा एक सुळा उपटून त्याचाच शस्त्रासारखा वापर करीत, कृष्णाने सर्व मथुरावासियांसमोर कुवलयापीड हत्तीला ठार केले. हा थरार बघून अचंबित झालेल्या मथुरावासियांनी कृष्ण आणि बलराम यांचा जयजयकार केला.
कंसाने चाणूर नावाच्या मल्लाला कृष्णाचा समाचार घ्यायला पाठवले. कुस्ती खेळण्याऐवजी प्राणघातक हल्ला करण्याचा त्याचा पवित्रा ध्यानात येताच कृष्णाने प्रतिहल्ला करून त्यालाही ठार केले. बलरामाने मुष्टिक या मल्लाला चारीमुंड्या चीत केले. कृष्ण आणि बलराम यांना धनुर्मह उत्सवासाठी आमंत्रित करण्यामागचा कंसाचा कुटील डाव प्रजाजनांच्या लक्षात यायला लागला होता. ते या दोघांना उत्तेजन देत होते. कृष्णाने हीच संधी साधली. कंसाच्या सिंहासनावर झेप घेऊन कृष्णाने त्याचा शिरच्छेद केला. कंसाचा पिता उग्रसेन यांची कैदेतून मुक्तता करून त्यांना सन्मानाने राजसिंहासनावर बसविण्यात आले. कंसाची जुलमी राजवट संपुष्टात आल्याने प्रजाजनांनी आनंदोत्सव साजरा केला.
कृष्ण व बलराम यांनी वृंदावनास परत न जाता विद्यार्जनासाठी सांदीपनी मुनींच्या आश्रमाकडे प्रस्थान केले. केवळ चौसष्ट दिवसात वेद विद्या, शस्त्रास्त्र विद्या, धनुर्वेद विद्या यांचे अध्ययन दोघांनी पूर्ण केले. तिथे कृष्णाला सुदामा हा प्रिय सखा भेटला. गुरु सांदीपनी यांना श्रीकृष्णाने गुरुदक्षिणा काय देऊ? असे विचारले असता, "आपण प्रभास क्षेत्री तीर्थयात्रेसाठी गेलो असता महामत्स्य आपल्या पुत्रास समुद्रात ओढून घेऊन गेला; त्याला परत मिळवून दे, अशी सांदीपनींनी कृष्णाला विनवणी केली. कृष्ण समुद्रात शिरला. पांचजन्य नामक दैत्याने सांदीपनी पुत्रास गिळले असल्याचे समुद्राने कृष्णास सांगितले. पांचजन्याचा वध करून कृष्णाने सांदीपनी यांच्या पुत्रास परत मिळवले. त्याला जिवंत करून सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. कृष्णास तिथे पांचजन्य शंख मिळाला. कृष्ण, बलराम आपले जनक माता- पिता वसुदेव, देवकी यांच्याकडे परत आले.
मगध नृपती जरासंध हा बलशाली होता. त्याच्या दोन कन्या कंसाला दिलेल्या होत्या. जावयाला ठार केल्याचा राग मनात धरून तो मथुरेवर चाल करून आला. तुंबळ युद्ध झाले. जरासंधाला बलरामाने जेरीस आणले. तो शरण आला म्हणून त्याला बलरामाने सोडून दिले. बलराम वृंदावनास गेला. जुन्या आठवणींना उजाळा देत नंद,यशोदा माता यांना भेटून मथुरेस परत आला.
सततच्या परचक्रांचा धोका लक्षात घेऊन सकल वृष्णीकुलाने द्वारकेत स्थलांतर करावे, अशी आपली मनोधारणा झाली असल्याचे कृष्णाने मथुरा नरेशांना सांगितले. जरासंधाने संधी साधून कालयवनास मथुरेवर पाठविले. समोरासमोरच्या युद्धात कालयवनाला पराभूत करणे सोपे नव्हते. युक्ती प्रयुक्तीने त्याचा काटा काढावयाचा असे ठरवून कृष्ण तिथून निसटला. कालयवन त्याचा पाठलाग करू लागला. कृष्ण एका अंधाऱ्या गुहेत शिरला. देवदानवांच्या युद्धात देवांच्या बाजूने महापराक्रम करून थकलेला मांद्यात्याचा पुत्र मुचुकुंद त्या गुहेत शांत झोपला होता. कृष्णाने आपला शेला हळुवारपणे त्याच्या अंगावर पांघरला व स्वतः बाजूला लपून बसला. सततच्या युद्धाने त्रासलेल्या मुचुकुंदाला शांत, निवांत, अनावरुद्ध झोप हवी होती; म्हणून त्याने आपल्याला जो गाढ झोप घेऊ देणार नाही, त्याला जाळून टाकण्याची शक्ती देणारा वर प्राप्त करून घेतला होता. कालयवन कृष्णाचा पाठलाग करीत गुहेत शिरला. अंधुक प्रकाशात कृष्णाची शाल त्याला दिसली. झोपलेल्या मुचुकुंदाला कृष्ण समजून कालयवनाने लाथ घातली व त्याला झोपेतून जागे केले. झोपमोड झालेल्या मुचुकुंदाच्या नेत्रातून निघालेल्या क्रोधाग्नीत कालयवन जळून भस्म झाला. कृष्णाने एका बलाढ्य आणि सहजसहजी आटोक्यात न येणाऱ्या शत्रूचा आपल्या बुद्धी कौशल्याने परस्पर विनाश केला.
कृष्णाने द्वारका व आसपासच्या प्रदेशात बलरामाच्या मदतीने यादवांचे गणराज्य निर्माण केले. विदर्भ राजा भीष्मक याची कन्या रुक्मिणी हिच्याशी तिच्या मात्यापित्यांच्या संमतीशिवाय कृष्णाने विवाह केला. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याचा या विवाहाला विरोध होता. त्याने जरासंध व इतर अनेक राजांच्या मदतीने कृष्णावर हल्ला केला. घनघोर युद्धात बलरामाने महापराक्रम करून रुक्मीचा वध केला. कृष्ण, बलराम रुक्मिणीसह मथुरेला परत आले. कृष्णाने रुक्मिणीचे पाणिग्रहण करून तिच्याशी विधिवत विवाह केला.
प्राग्ज्योतिष राज्याचा अधिपती नरकासूर अतिशय प्रबळ झाला होता. त्याने देवांना आव्हान दिले होते. अनेक स्त्रियांचे हरण करून त्याने त्या सर्व स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. कृष्णाने नरकासुराचा वध करून सोळा हजार स्त्रियांना बंदीवासातून सोडविले. पळवून नेलेल्या स्त्रियांशी कोण लग्न करणार? कृष्णाने त्या सर्व स्त्रियांशी स्वतः विवाह करून त्यांना समाजात मानाचे व आदराचे स्थान आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. सर्वांनी दिवाळी साजरी केली.
श्रीकृष्णाने सत्यभामा,जांबुवंती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या,भद्रा व लक्ष्मणा या इतर सात राज्यकन्यांशी विवाह केले. रुक्मिणीसह त्या कृष्णाच्या अष्टनायिका होत.
विश्वसुंदरी सत्यभामेसह गरुडावर बसून कृष्णाने स्वर्गारोहण केले. इंद्राने नंदनवनात त्याचा सत्कार केला. सत्यभामेच्या इच्छेखातर त्याने पारिजातक वृक्ष पृथ्वीवर आणला.
शंबरासूर नावाच्या दैत्याने कामदेवासमान अतिसुंदर असलेल्या कृष्ण पुत्र प्रद्युम्न यास पळवून नेले होते. कृष्णाने शंबरासुराचा वध करून प्रद्युम्नाची सुटका केली.
बाणासूर नावाचा दानव कृष्णावर चालून आला. तो शिवभक्त होता. त्याच्या मदतीला शिवशंकर धावले. कृष्णाने दोघांचाही पराभव केला. बाणासुराची कन्या उषा हिचा श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याच्याशी विवाह झाला
कुंती ही वसुदेवाची सख्खी बहीण. म्हणजे कृष्णाची आत्या. तर सुभद्रा कृष्णाची बहीण तिचा विवाह अर्जुनाशी झाला. त्यामुळे कृष्ण अर्जुन यांचे सख्य वाढीस लागले. जरासंध हा कृष्णाचा शत्रू. कृष्णाने भीमाकरवी जरासंधाचा युक्तीने वध करविला.
युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला, तेव्हा भीष्मांच्या सांगण्यावरून श्रीकृष्णास अग्रपूजेचा मान दिला. चेदी राजा शिशुपाल याला राग आला; त्या रागातून तो श्रीकृष्णाची निंदानालस्ती करू लागला; त्यापूर्वीही शिशुपालाने श्रीकृष्णाचे असंख्य अपराध केले होते. अपराधांची शंभरी भरली तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्र सोडून शिशुपालाचा वध केला.
कौरवांनी भरसभेत द्रौपदीची विटंबना केली. श्रीकृष्णाने वस्त्रे पुरवून तिची लाज राखली.
पांडवांनी द्यूतात आपले राज्य गमाविले होते. ते परत मिळवायचे, तर बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास पांडवांनी पूर्ण केला पाहिजे अशी अट कौरवांनी घातली होती. पांडवांनी विनातक्रार ही अट पूर्ण केली व कौरवांकडे आपले राज्य परत मागितले. पांडव गुप्त रीतीने अज्ञातवास पूर्ण करू शकले नाहीत, असे कारण सांगत पांडवांची न्याय मागणी कौरवांनी फेटाळली. श्रीकृष्णाने शांतिदूत बनून शिष्टाई केली; सत्तेची नशा चढलेल्या कौरवांनी राज्यच काय, सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना परत द्यायला नकार दिला. श्रीकृष्णाची शिष्टाई कामाला आली नाही. पांडवांपुढे युद्ध करून राज्य परत मिळविणे एवढा एकच पर्याय उरला
युद्धात मदत करावी यासाठी दुर्योधन व अर्जुन कृष्णाकडे गेले. दुर्योधनाने कृष्णाची सेना मागून घेतली; अर्जुनाने निःशस्त्र कृष्ण स्वीकारला. कृष्ण अर्जुनाचा सारथी झाला. युद्धासाठी समोर आपलेच गणगोत सज्ज झालेले पाहून अर्जुनाला विषाद वाटला. यापेक्षा गळ्यात झोळी अडकवून भीक मागितलेली काय वाईट?असे वाटून त्याने शस्त्रे फेकून दिली.
कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. निष्काम कर्म करीत राहणे हेच परम कर्तव्य असल्याचे नीती व तत्त्वांचा आधार घेत अर्जुनाला पटवून देऊन कृष्णाने त्याला युद्ध करण्यास प्रवृत्त केले. कृष्णाने वेळोवेळी आपल्या मुत्सद्दीपणाचा प्रत्यय आणून देत पांडवाना धर्म युद्धात विजय मिळवून दिला. कृष्णाने अर्जुनास केलेला उपदेश भगवद्गीता या धर्मग्रंथाच्या स्वरूपात मान्यता पावला. कृष्णाने अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भातील परीक्षिताचे रक्षण केले.
श्रीकृष्णाच्या अखेरच्या पर्वात यादव कुलात आपापसात खूप झगडे झाले. त्यात यादव कुलाचा संहार झाला. कृष्ण पुत्र सांब याने नारद व इतर ऋषीमुनींची थट्टा केली होती; त्याची ही परिणती होती. बलराम व श्रीकृष्णाला जीवनाचा वीट आला. बलरामाने श्वास निरोध करून देहत्याग केला. प्रभास क्षेत्री श्रीकृष्ण समाधी अवस्थेत असताना एका व्याधाचा बाण पायाच्या अंगठ्यात लागून श्रीकृष्ण विद्ध झाला. श्रीकृष्णांनी देहत्याग केला. एका अवताराची समाप्ती झाली. एका युगाचा अंत झाला.

*सर्जेराव कुइगडे*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू