पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुंदरी



काहीही म्हणा हो लोकहो, मी आहेच सुंदर! माझ्या मम्माने मी तिच्यासारखी  रंगरूपाने होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. पण..पण...नशीब हो माझं मी काही बदलले नाही. वाईट वाटायचंच ना, सगळे गोरे गोमटे, तांबूस नि देखणे! आम्हीच काय पाप केलं? पण आता आहे ते आहे. स्वीकारण्यापालीकडे काय करू शकतो ना?

लहान असताना गोठ्यातच असायचे. आता कुठे हल्ली बाहेर पडायला लागले. रंग रूप नाही तरी निरोगी तरी राहूया म्हणून फिरायला जायचं ठरवलं. आज एवढा बोलायचा खटाटोप म्हणजे...ही ही! आज मला माणसांच्या भाषेत म्हणतात ना तसं "अटेंशन"मिळालं हो! या साठीच ना सगळे धडपड करत असतात. चांगलं दिसायचा प्रयत्न करतात, चांगलं राहायचा प्रयत्न करतात.तर मुद्दा असा की मी आपली गेले होते स्विमिंग ला माझ्या फॅमिली सोबत बरं का! माझ्या मम्माने आणि तिच्या ग्रुप ने ठरवलेला स्पॉट अगदी देखणा होता. बरोबर....बरोबर अगदी माझ्यासारखाच! त्या हिरव्या गार मऊशार गवतात बसायची मजा तुम्हा माणसांना काय कळणार?


मी निघतानाच विचारलेलं ," आपल्या लंच च काय आहे मम्मा?"


"लंच बिंच काही नाही, संध्याकाळी आल्यावर आंबोण मिळेल. तेच खायचं.आता सकाळचं खाऊन झालंय ना?बास तेवढं"


घ्या.. मम्मा माझी एकदम डायट काँशिअस हा. तुमच्याकडे कसं डायट का काय ते असतं तसं आमच्याकडे पण असतं हो. दोनच वेळेस खायचं. बास! यावर चर्चा नको. आंबोणात अतिशय चांगले घटक असतात असं मम्मा म्हणते. माझी काय बिशाद नाही म्हणायची?


" चालेलं, आता तू म्हणशील तसं. निदान सॅलड तरी मम्मा?"


"हम्म! हिरवं गवत खाऊ थोडं. सध्या पावसाळ्यामुळे खूप आहे"


"चालतंय की हो!"


आमचा असा फायद्याचा संवाद झाला. एवढ्यातच मालक आले. त्यांच्या एकूण कृतीचा अंदाज घेत आम्ही आपली तटस्थ भूमिका घेतली. मनात तर हिरवं गार गवत, भरपूर स्वच्छ पाणी सगळं डोळ्यासमोर उभं राहिलेलं. पण लगेच कसं निघणार म्हणून मग थोडा ड्रामा करू म्हटलं. अजिबात इकडची तिकडे झाले नाही.


मम्मा तयार झाली लगेच जायला. झाली तर झाली वर मला खाणा खुणा करे,"चल गो चल गो", मनात म्हटलं काही नाही खाऊ जरा भाव, मग भारी वाटेल ना राव!


झालं! माझी मस्ती उतरवली लगेच मालकांनी. आणली ना काठी काढून. मग काय शिस्तीत निघाले. चला, आज बरेच दिवसांनी उंडारायला मिळालं. मी आपली दौडत दौडत निघाले सुसाट. थंडगार वारा माझे चिमुकले डोळे बंद करायला लावत होता. माझी एकुलती एक छोटुशी शेपूट हवेतच झोके खात होती. मी आणि माझी मम्मा एकदम खुश होतो. मालकांची कटकट नाही, कोणाचा वचक नाही! मी आले ssssss निघाले....!! मी आणि मम्मा मस्तपैकी फुलपाखरं बघत , मज्जा करत फिरत होतो.  बराच वेळ झाला. वेळ कसा गेला कळलंही नाही.


आता हिरवीगार माळरानं बघायला मिळत होती. मम्मा कडे नुसतं पाहिलं मी, ती म्हणाली," हं...पडा आता तुटून. मनसोक्त खा"


मम्मा तशी पक्की एकदम, सॅलड कोणाला आवडतं जास्त?कोण तुटून पडतं त्यावर? पण... हे ही नसे थोडके. आज एवढ्या दिवसांनी मला बाहेर यायला मिळालंय हेच खूप आहे. आता मम्मा आणि मी भोजन ग्रहण करण्यास सुरुवात केली. माणूस असते ना मी लगेच स्टेटस अपलोड केला असता. एक तोंड वाकडं केलेला फोटो विथ कॅप्शन गुड फूड गुड मुड!!


तुम्हाला सांगते, आमची प्राण्यांची "आणि काय हवं ?" सिरीज आली असतं ना, तर मलाच लीड रोल मिळाला असता. अहो पावसाळी वातावरण, हिरवागार चारा बास आणि काय हवं? आता नुसती तोंडाची लढाई. ये बात! हिरवा चारा, गार वारा... आ हा हा हा! घ्या......! एवढ्यातच मम्माला तिच्या मैत्रीणी भेटल्या. सॅड! आता काय? एकटा जीव सदाशिव! माझी आपली खाद्यभ्रमंती सुरूच होती. मम्मा एव्हाना मैत्रिणींसोबत गप्पांमध्ये गुंग झालेली. लोटपोट हसता हसता कधी फतकल मारून बसल्या सगळ्या कळलंही नाही. झालं ...माझा हिरवा चारा खायचा आवका च कमी झाला ना एकदम. हे मैत्रिमंडळ असंच माझ्या मम्माचं. गॉसिप सुरू असणार आपापल्या मालकांचं. माझं आपलं एकतर्फी खाण्याचं काम सुरू होतं.


अचानक मम्मा आणि ग्रुप उठुन उभा राहिला. मम्माने आवाज दिला आणि निघाले मी पण त्यांच्याबरोबर. किती वेळ आपली चालतेय. कुठे निघालो होतो काही कळायला मार्ग नाही. साधारण चर्चेवरून लक्षात आलं काही तरी युनिक आणि भन्नाट असं डेस्टिनेशन बघायला आपण जात आहोत. हॅश टॅग उत्सुकता! अखेर काय ते ठिकाण आलं. ओ माय गॉड! व्हॉट अ सरप्राईज! एवढं सुंदर पाण्याचं ठिकाण! तेही स्वच्छ? माणूस दृष्टीलाही पडत नाहीये इथे. किंवा आमची यायची वेळ बरोबर असावी. व्वा! चला मम्मा अँड ग्रुप पाण्यात उतरला. मी पण उतरले. आयुष्य फार सुंदर आहे, असं माझ्या मनाला वाटून गेलं. किती तरी वेळ आम्ही सगळे नुसते बसून होतो पाण्यात. डुंबत होतो. चेहरा पाण्यावर तरंगत ठेऊन आजूबाजूचं सौंदर्य अनुभवत होतो.


सगळं चांगलं सुरू होतं आणि? अचानक किती तरी माणसांचा ग्रुप दाखल झाला. असंख्य खाद्यपदार्थ, निरनिराळी पेय, बसायला चटया घेऊन आली होती मंडळी. झालं, सुरू.....! चटया अंथरून खानपान चा कार्यक्रम सुरू झाला. काही लहान मुलं मात्र उंडारत होती अगदी माझ्यसारखी. पण दिसायला मात्र माझ्यसारखी नव्हती हा. एकदम देखणी अणि निरागस होती. माझं आपलं डुंबणं सुरू होतं. मी डोळे मिटून पाण्यात मेडिटेशन करत होते.

इतक्यात खिचिक असा आवाज आला. अरेच्चा ! म्हणून मी डोळे उघडले. समोर काही मुलं आणि त्यांचा सोबत एक मोठा दिसावा असा माणूस होता. त्यांची काही तरी चर्चा सुरू होती. तो माणूस त्या यंत्रामध्ये काही तरी दाखवत होता. माझ्या मते त्याने आमचे फोटो काढले असावे.


पण तुम्हाला सांगते काही मुलं सारखं म्हणत होती," ते बघ ना ते, रेडकू कसलं क्युट आहे!"


"हो ना..सो प्रिटी!",


"सेम आपल्या इंग्लिश च्या टेक्स्ट बुक मध्ये आहे तसंच. त्यापेक्षा पण एकदम गोंडस आहे",


"आपण का नाहीये याच्यासारखं गोंडस आणि निरागस?"


म्हटलेलं ना आणि काय हवं आलं आमच्या प्राण्यांत तर मला च लीड रोल मिळणार? व्हॉट अ सीन! मी किती दोष देत होते स्वतःला? एवढं प्रेम, एवढी माया या अनोळखी मुलांकडून पाहिली...आणि काय हवं? आज मी जगातली प्राणी  सुंदरी  असल्याचा फील येत होता. हॅश टॅग परमसुंदरी.


इतक्यात मम्माने हाक मारली. तिच्या डोळ्यात दिसत होतं इट्स टाइम टू लिव! मी मम्मा आणि ग्रुप सोबत निघाले. मम्मा मला त्यांच्या ग्रुप च गॉसिप सांगत होती जाता जाता पण मी मात्र त्या मुलांचे संवाद आठवत होते. हॅश टॅग मी मज हरपून बसले होते.



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू