पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पारितोषक

पारितोषक

 

 

 

आज सनदी अधिकारी रोहित तुपे यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त "राज्यपाल पारितोषिक" पुरस्कार सोहळा…

विशेष सामाजिक कार्याच्या आधारावर हे पारितोषिक जाहिर झाले होते. 

 

आज राज्यपालांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारताना छाती भरून आली होती. समोरचा प्रचंड जनसमुदायावर नजर भरून पहात होता. त्याच समुदायाच्या प्रथम रांगेत आपल्या आईवडिलांना पाहून पुरस्कार स्वीकारताना त्याचे डोळे भरून आले होते. 

 

आज सर्व जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला. मातंग समाजात जन्माला आलेला हा पोर.. लहानपणी आई वडिलांचे उपजीविकेचे साधन म्हणजे दोर, कासरा बनविने. शाळा शिकत असताना वडिलांना मदत करणे. शेताकडील फड तोडणे, पाण्यात भिजवत ठेवणे, तर तो आपटून वाक तयार करणे. घरी वडिलांना दोर वळण्यासाठी आई मदत करायची. ते फिरवून हात भरून यायचे तर बाबाच्या पायाच्या अंगठ्यांना चट्टे पडले होते. कधी कधी याचाही हातभार असायचा. 

 

त्या माऊलीचा राकट हात केसावरून फिरल्यानंतर जो मायेचा मुलामा मिळायचा..आज त्याच राकट हाताचा आशिर्वाद फळाला आला होता. तर वडिलांच्या व्याकुळ नजरेचा भाव तो टिपत होता. 

 

आई वडिलांचे कष्ट पाहून मनी करूणा दाटून यायची. याचा त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम झाला. असलं आयुष्य आपण झेलायचे नाही. अभ्यासावर खूप लक्ष घातले. लहानपणीच स्वप्न रचले होते. मग त्याचा पाठलाग चालू केला. 

 

आता नुकतेच दहावीचे वर्ष संपले. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.

 

"बाबा, मी पुढचे शिक्षण तालुक्याला जाऊन घेतो. मला पुढे खूप शिकायचे आहे." 

 

"अरे लेका, आपली ऐपत हाय का? तु चार बुक शिकलास हेच लई झालं..!" 

वडिल जरा नाराजीच्या सुरात बोलले.

 

"आवं, असं काय करताय पोरगं शिकायचं म्हणतंया तर शिकू द्या की."

आई त्याला पाठबळ देते.

 

"अगं, ते समदं ठीक हाय पण आपणास्नी खर्च झेपलं का??.." वडिल अगदीच उद्विग्न होऊन ते बोलत होते. 

 

"बाबा, खर्चाची काही काळजी करू नका. मला स्कॉलरशीप मिळेल त्यात मी सर्व भागवेन." रोहितने उत्तर दिले. 

 

नाही होय करतं ठरलं. आता तालुक्याला आला. काॅलेजला अॅडमिशन घेतले. मिळणारी स्कॉलरशीप अगदीच तोटकी होती. खर्चाचा मेळ घालण्यासाठी शेवटी पडेल ते काम करावे लागत होते. 

 

अभ्यास ग्रंथालयात करायचा. पण झोपायला मात्र मंदिरात ..पण तेथे देखील पुजाऱ्याने हटकले. रहायचं कसं हा प्रश्नच होता. पण शिकण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. 

 

अन् समाज हा आपल्यासाठी कणव दाखवणार नाही. माझा रस्ता मला स्वतःलाच आखायचा आहे. मनाशी ठाम निश्चय..!! सरळ धोकटी काखोटीला मारून स्मशान गाठले. प्रशस्त जागा. लाईटची सोय हे सगळं पाहून त्याने तिथंच रहायचे ठरवले. 

 

स्मशान शांततेचा लाभ पुरेपूर घेता आला. अभ्यासाच्या पुढे भिती नावाचा प्रकार राहिला नव्हता. कधी कधी मग मयताला येणारी लोकं चार पैसे द्यायचे..वेळेला अगदी कावळ्याला ठेवलेला नैवेद्य पण खाल्ला होता.

 

एक दिवस स्टँडवर हमाली काम करताना पायात खडा रूतला. हो तो वेदनादायक दिवस तो कधीही विसरू शकणार नाही. पैशाअभावी डाॅक्टरकडे जाणे टाळले. पण त्याचा दुष्परिणाम पायाला सेफ्टीक झाले. अतोनात त्रास झाला. 

 

वडिलांना हे समजताच ते तालुक्याला आले. पायाचे सेफ्टीक एवढं वाढले होते की डाॅक्टरला दाखवता पाय नडगी पासून काढण्याशिवाय पर्याय नव्हता. वडिल अगदीच भयभीत झाले. पैसा उभा करणे शक्यच नव्हते. पण शासन योजनेतून डाॅक्टरनी ते यशस्वी पणे केले. त्यांचे आभार किती मानावे तेव्हढे कमीच..!! 

या जी न प्रवासात अनेक प्रसंग अनेक व्यक्ती सहाय्याला धावले होते. त्यापैकीच रोटरी क्लब ज्या संस्थेने मला पायाचे प्रत्यारोपण करण्यासाठी शंभर टक्के अर्थिक सहाय्य केले. जयपूरला जाऊन मला कृत्रिम पाय बसवण्यात आला. 

 

या सर्व घडामोडीत अभ्यासावर दुर्लक्ष होऊ दिले नाही. एम पी एस सी ची तयारी चालू होती. 

 

एम पी एस सी च्या पहिल्याच प्रयत्नात एक उत्तुंग भरारी…

 

महाराष्ट्र शासन दरबारी सनदी अधिकारी म्हणून कामावर रूजू..

 

समाजातील गोड कडू अनुभव घेताना सर्व काही फार जवळून पाहिले होते. ज्या समाजाने आज आपल्या पायावर उभा करण्यास मदत केली त्या समाजासाठी काही देणं लागत आहे हे विसरून चालणार नाही..

आणि यातूनच एक प्रेरणा घेत.."ऐक्यवर्धन सामाजिक संस्था" स्थापन केली.

 

समाजातील अनेक युवकांसाठी वसतीगृह उभा केले. आता कोणालाही स्मशानात जाऊन रहायची वेळ यायला नको. अनेक संस्थानी निढळ हातानी मदत केली. आणि याच सामाजिक कार्याचा शासन दरबारी दखल घेतली गेली. 

आणि हो.. हे करत असतानाच स्मशानभूमीला पण विसरला नाही त्याचे पुर्ण नूतनीकरण स्वतःच्या कमाईच्या पैशातून केले होते.

 

आज हे सर्व आठवल्यानंतर डोळ्यांच्या कडा पाणावल्या…

 

पदक घेऊन आज पहिली मिठी आपल्या बाबांना मारली तर आईचे चरण स्पर्श केले. 

 

 

श्रीकांत दीक्षित.

पुणे.

 

●●●●●●●●●●●●

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू