पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वीरगति

*वीरगति*              

                                   

 सरकारी इतमामात ती अंत्ययात्रा पुढे पुढे चालली होती. सर्वात पुढे लष्कराचा गणवेश परिधान केलेले शस्त्रधारी जवान होते. मध्यभागी देशासाठी लढताना वीरगति प्राप्त झालेल्या शहिद जवानाची तिरंगा पांघरलेली शवपेटीका  होती. फंटूशने वाकून त्या शुर सैनिकाच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो चेहरा त्याचाच होता अर्थातच तो मृतदेह देखील त्याचाच होता.

    आणि फंटूश झोपेतून खाड्कन जागा झाला. घड्याळात सकाळचे साडेसहा वाजले होते. "हे कसे शक्य आहे?" पुन्हा एकदा तो स्वतःशीच उद्गारला. लागोपाठ चार दिवस सतत त्याला हेच स्वप्न पडत होते आणि फंटूशच्या बाबतीत ते खरे होण्याची सुतराम शक्यता नव्हती, निदान या जन्मी तरी त्याला मरणोत्तर राष्ट्र ध्वजात लपेटले जाण्याचा बहुमान मिळणे शक्यच नव्हते. 

   त्याचे स्वप्न वेगळे होते. त्याची स्वप्नभूमी वेगळी होती. त्याच्या दुनियेत देशप्रेम, राष्ट्राभिमान, देशासाठी बलिदान इ. गोष्टींना स्थान नव्हते. त्याला या क्षणी फक्त एकच गोष्ट करायची होती. पावसाळा

 जवळ आला होता, काहीही करून त्याला आज त्याच्या स्वप्नभूमीच्या दिशेने प्रयाण करायलाच हवे होते. पुढच्याच क्षणी त्याने अंगावरचे पांघरूण दुर भिरकावले आणि तो त्याच्या स्वप्नभूमीकडे प्रयाण करण्याच्या तयारीला 

लागला.

   ' हाॅटेल आलिशान, रेस्टॉरंट अॅन्ड बार' चकाकणाऱ्या पाटीकडे फंटूशने एक नजर टाकली आणि तो प्रसन्न हसला. आता त्याची स्वप्नभूमी फारशी दूर राहिली नव्हती.

   हाॅटेल पासून थोड्या लांब अंतरावर उभ्या असलेल्या मर्सिडीजच्या आरशात त्याने स्वतःची छबी न्याहाळली.

......... उन्हाने रापलेला काळासावळा पण क्लीन शेव्हड तुकतुकीत चेहरा, डोळ्यावर रूबाबदार गाॅगल, काळेकुरळे केस..... 'हँडसम'.... तो स्वतःवरच खुश झाला. त्याचा सुट तर अप्रतिमच होता. फंटूशने बाबू इस्त्रीवाल्याकडून ताशी 100 रूपये भाड्याने  तो आणला होता. फक्त पायातल्या शुजना अजून थोडे पाॅलिश करायला हवे होते असे त्याला वाटले.

  त्या मर्सिडीजच्या मागून तो अशा रूबाबात चालत आला की गेटवरच्या वाॅचमनला वाटले की, फालतू हाॅटेलमध्ये पार्किंग करण्यापेक्षा तो कार लांब पार्क करून चालत तिथपर्यंत आला आहे.

      वाॅचमनने केलेल्या लाचार सॅल्युटसाठी त्याने 100रू. ची नोट भिरकावली. 'स्वप्नपूर्तीसाठी तेवढी गुंतवणूक काही फार नाही' . त्याने स्वतःला समजावले.

   बेधडक तो त्या हाॅटेलच्या बारमध्ये शिरला. दरवाजातले दोन धटिंगण आपल्या जून्या शूजकडे तीव्र कटाक्ष टाकतायत असे त्याला उगीचच वाटले. 

   वेटरने मेन्यू कार्ड आणून ठेवले, आणि तो अदबीने आॅर्डरची वाट पाहू लागला. 

 "राॅयल स्टॅग लार्ज, साॅल्टेड काजू ...."  त्याने सराईतासारखी आॅर्डर दिली.

त्यानंतरचे दोन तास त्याचे फक्त खाण्यापिण्या व्यतिरिक्त इतर कशाकडेही लक्ष नव्हते. 

   दोन तासात त्याने रॉयल स्टॅगचे दोन खंबे, साधारणतः अर्धा किलो खारे काजू, बारा अंडी, दोन रोस्टेड तंदुरी, चार पापलेट फ्राय आणि दोन फुल बिर्याणी हजम केल्या होत्या. कितीही झालं तरी तो एकेकाळचा बाॅडी बिल्डर होता. सरतेशेवटी त्याने आईसक्रीमची आॅर्डर दिली आणि वेटरचा जीव भांड्यात पडला. 

  फंटूश पक्का खुश होता. स्वप्नभूमीसाठी आवश्यक ती उर्जा त्याच्याकडे साठली होती. 

     " साब और कुछ?" वेटरने अतिशय नम्रतेने विचारले. आज आपल्याला चांगलीच टीप मिळणार या कल्पनेनेच तो विलक्षण खुश झाला होता. 

    " अभी कुछ नहीं। बिल भी मत लाव।" फंटूश मोठ्याने हसला. स्वप्नभूमीत प्रवेश करताना त्याला स्वतःचा मूड प्रसन्न ठेवायचा होता. 

   वेटरने देखील त्याच्या विनोद बुद्धिला दिलखुलास हसून दाद दिली आणि त्याच्या 

समोर बील ठेवले.

   "ओन्ली सिक्स थाउजंड नाइन हंड्रेड?"

फंटूशने आश्चर्याने विचारले. त्याने रुबाबात पाकिट उघडले आणि पाकिट पुन्हा खिशात ठेवत सांगितले, " आय डोन्ट हॅव मनी.... माझ्याकडे पैसे नाहीत".

   वेटरने अतिशय नम्रतेने सांगितले, " सर आम्ही कार्ड स्विकारतो, गुगल पे देखील आहे".

  फंटूश हिस्टरीकल हसला." माझ्याकडे पैसे नाहीत, कार्ड नाही, गुगल पे नाही काहिही नाही", "काय करशील? पोलिसांना बोलावशील? जा, पळ.... लवकर बोलव. माझ्याकडे जास्त वेळ नाही".

     मॅनेजर धावत आला. काहीतरी गडबड झाल्याचा त्याला संशय आला होता." सर काय झालं? "" प्लीज पे द मनी ".

  फंटूश आक्रमक झाला होता. त्याच्या पोटातील व्हिस्की आता बोलू लागली होती." ए भेजा नही क्या तेरे को? मी सांगितल ना एकदा माझ्याकडे पैसे नाहीत. कळत नाही का तुला? गो कॉल द पुलिस ". फंटूश गरजला.

   मॅनेजरने आजूबाजूला पाहिले. सगळ्या टेबल्सवरचे उच्चभ्रू कस्टमर्स फंटूशच्या टेबलकडे विस्मयाने पहात होते. त्यांना त्यांच्या आनंदात कोणताही व्यत्यय नको होता. नक्कीच 'हॉटेल आलिशान' ची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

 " एवढ्याशा कामाला पोलीस कशाला?"

. मॅनेजर फंटूशला म्हणाला. त्याने दरवाजा जवळ उभ्या असलेल्या धटिंगण सिक्युरिटी गार्ड्सना खुणावले. त्या सिक्युरिटी गार्डसनी फंटूशला हातापायाला धरून अलगद उचलले आणि गेटमधून रस्त्यावर भिरकावून दिले. फंटूश कपड़े झटकत उठला. आपला पार्श्वभाग चांगलाच बधिर झाल्याचे त्याला जाणवले.

   तो विषण्ण मनाने रस्त्यावरच्या बाकड्यावर बसुन राहिला. दुपारचे दोन वाजले होते. त्याची स्वप्नभूमी त्याला शेकडो मैल दूर असल्याचा आभास झाला.

  त्याला वाटले स्वप्नभूमीचा नाद सोडावा, पण दुसर्‍याच क्षणी त्याला वास्तवाची जाणीव झाली..... मे महिना संपत आला होता. जून च्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होऊ शकतो.

  पाऊस सुरू झाल्यावर त्याच्या झोपडपट्टीत होणारी दलदल, डास, घुशी

त्याला आठवल्या...   कोणत्याही परिस्थितीत तो पावसाळ्यात झोपडपट्टीत राहूच शकला नसता. शिवाय पावसाळ्यात धंदा देखील कमी असतो. हातात छत्री घेऊन भीक घालणे लोकांना फारस आवडत नाही. "ते काही नाही स्वप्नभूमीत जाण्याचा नवीन मार्ग शोधलाच पाहिजे." 

     पुढच्याच चौकात कपड्यांचे एक पॉश दुकान होते. दुकानाच्या  बाहेर एक पोलिस उभा होता. फंटूशने पोलिसाला उगीचच सॅल्युट केला आणि तो दुकानात शिरला. 

     गबाळे कपड़े घातलेला, काहीसा वेंधळा दिसणारा एक माणूस काऊंटर वरील सेल्समनशी बोलत उभा होता. त्याचा अतिशय भारीतला मोबाईल त्याने काउन्टर वर ठेवला होता.

   फंटूशने इकडे तिकडे बघितले आणि त्या माणसाचे लक्ष जाईल अशा बेताने तो मोबाईल उचलला.

  " एस्क्युज मी...... तो मोबाईल माझा आहे".  तो माणूस पुटपुटला.

   " तुझा आहे? काय सांगतोस? मी म्हणतो हा मोबाइल माझा आहे. तो तू चोरला होतास, काय करशील? पोलिसांना बोलवशील? बोलवच.... तो बघ.. तो हवालदार दुकानाच्या बाहेर उभा आहे. त्याला तू बोलावतोस की मी बोलावू?"

फंटूश  आक्रमक झाला होता.

  फंटूशच्या पावित्र्याने तो सदगृहस्थ चांगलाच गांगरला." काय म्हणताय? हा मोबाइल तुमचा आहे? असेल, असेल. आज सकाळी मेडिकल स्टोअर्स मध्ये मला तो मिळाला. माझा देखील मोबाईल असाच आहे, म्हणुन मला वाटले तो माझाच आहे. उगीचच पोलिसांना कशाला बोलवायचे?"  तो माणूस मागे सरकत, चाचरत बडबडला अणि दार उघडून पटकन निघून गेला. 

     फंटूशने कपाळावर हात मारून घेतला. त्याच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग खडतर होत चालला होता. 

दुकानाच्या बाहेर येऊन त्याने एक सिगारेट शिलगावली. . छातीत थोडा धूर भरून घेतल्यावर त्याला जरा बरे वाटले. 

      पुढच्या सर्कलजवळ टेलिव्हिजनची भव्य शोरूम होती. अखंड काचांच्या पारदर्शक दरवाजातून आतील टेलिव्हिजन्सची  आकर्षक मांडणी दिसत होती. ट्रॅफिक फारशी नसल्यामुळे तेथे ड्युटीसाठी उभे असलेले दोन पोलीस  निवांत गप्पा मारत उभे होते.बऱ्याच दिवसांनी त्यांना थोडासा मोकळा वेळ मिळाला होता. 

     फंटूशच्या डोक्यात झटकन एक विचार चमकला, त्याने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि शोरूम च्या दिशेने भिरकावला. 'खळ्- खटक' आवाज होउन शोरूम समोर काचेच्या तुकड्यांचा सडा पडला. त्या आवाजाने ते    पोलीस दचकले अणि शोरूम कडे धावले.

     शांतपणे फंटूश पुढे आला. त्याने एका पोलिसाशी हस्तांदोलन केले आणि अतिशय गांभीर्याने त्याने पोलिसाला विचारले, " तुम्हाला जाणून घ्यायचय का ते कुणी केलय ते?"

  गोंधळलेल्या पोलिसाने होकारार्थी मान डोलवली.

  फंटूश त्याच्या कानात कुजबुजला " मी मान्य करतो की ती काच मीच फोडली.चला मला जेलमध्ये घेऊन चला."

  आता पोलिसाच्या लक्षात सारे काही आले. आपली गाठ एका वेड्या माणसाशी पडली असल्याचे त्याने जाणले.

 ' अंगात उंची सुट घातलेला, हातात महागडा मोबाईल असलेला माणूस काच कशी काय फोडेल? आणि असे कृत्य करणारा माणूस स्वतःहून कशाला सांगायला येईल? तरुण वयात डोके फिरलेल्या त्या तरुण माणसाबद्दल त्याला वाईट वाटले. त्याने सहानुभूतीपूर्वक फंटूशचे खांदे थोपटले आणि तो पुढील चौकशी करण्यासाठी दुकानात चालता झाला.

     फंटूशने पुन्हा एकदा कपाळ बडवून  घेतले. स्वप्नभूमीत जाण्याचा त्याचा तिसरा प्रयत्न वाया गेला होता. 

  काही अंतर चालून गेल्यावर त्याला अतिशय उग्र चेहर्‍याचे दोन पोलीस समोरून येताना दिसले. त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. त्याने खिशातील व्हिस्कीची बॉटल काढून थोडीशी व्हिस्की अंगाला चोपडली. त्यांच्यासमोरच व्हिस्की चा एक घोट मारला. त्यांना शिव्या दिल्या. जोरजोरात किंकाळ्या फोडल्या. उलट्या सुलट्या उड्या मारल्या. भसाड्या आवाजात गाणी म्हटली. 

  "काय आचरट कार्ट आहे संपतराव... कुठच्यातरी बड्या धेंडाच असणार बहुतेक.... अस वाटतय स्टेशनला नेऊन याला आत टाकून बदडून काढाव." एक पोलिस दुसर्‍याला म्हणाला.

  "काही उपयोग नाही त्याचा, याला स्टेशनला न्यायच्या आत याचा बाप वकिलाला घेऊन याला सोडवायला तिथे हजर असेल, फुकट डोक्याला ताप होईल, त्यापेक्षा आज जरा लवकर सुटलो आहोत तर घरी जाऊन थोडा आराम करूया.गेले तिन दिवस बंदोबस्तासाठी उभे राहून पायाचे  तुकडे पडायची वेळ आली आहे. "

आणि  ते दोन्ही पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेले .

  आपल्या प्रयत्नात पुन्हा एकदा अयशस्वी झालेला फंटूश थकून भागून एका बाकड्यावर बसला आणि नकळत तेथेच झोपी गेला.

     कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली. त्याच्या समोरून लष्करी बॅंडवर संचलन करत एक मिरवणूक येत होती. अग्रभागी बिगुलधारी जवान कसलीतरी अतिशय गंभीर पण वातावरण भारून टाकणारी धून वाजवत होते. मध्यभागी एका ट्रक मध्ये तिरंगा लपेटलेली शवपेटीका होती. शवपेटीकेत नक्षलवाद्यांशी झुंज घेताना वीरमरण आलेल्या शहीद कॅप्टन जयंतराव निंबाळकरांचा मृतदेह होता. ट्रकच्या सभोवताली आणि पाठीमागे डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटलेल्या हजारो नागरिकांनी  गर्दी केली होती. "कॅप्टन जयंत निंबाळकर अमर रहे" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भारत मातेच्या आणखी एका सुपुत्राने आपल्या देशासाठी हसत हसत मरण कवटाळले होते. वातावरणात अद्भुत भारलेपणा होता.

त्या विलक्षण वातावरणाने भारावून  गेलेला फंटूश अंर्तःबाह्य अक्षरशः गलबलून गेला.

देशासाठी लढताना वीरमरण पत्करलेल्या त्या जवानाला फंटूशने खाड्कन सॅल्युट केला. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा सुरू झाल्या होत्या.

   एकेकाळी त्याचे जीवन देखील असेच  राष्ट्रप्रेमाने भारावलेले होते. यु. पी. एस्. सी. ची परिक्षा देऊन आय. ए. एस्. होऊन त्याला भारतमातेची सेवा करायची होती. पण वडीलांच्या अकाली मृत्यूने त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. शिक्षण अर्धवट सोडून त्याला कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. नोकरीसाठी दोन वर्षे वणवण फिरून देखील त्याला नोकरी मिळाली नाहीच. 

  एक दिवस एका सद्गृहस्थाने त्याला एक पार्सल मुंबईहून पुण्याला घेऊन जाण्याचे काम सोपवले. तेवढ्याशा  कामाचे त्याला दोन हजार रुपये मिळाले. आणि मग पैशांच्या लालसेने फंटूश पुन्हा पुन्हा पार्सल पोहोचविण्याचे काम करु लागला, करतच गेला. आणि सहा महिन्यांनी पोलिसांना पार्सल सकट सापडला. त्या पार्सल मध्ये ब्राऊन शुगर होती. एक वर्षभर तुरुंगात सडताना त्याच्या आशा आकांक्षा करपून गेल्या .  तो तुरुंगात गेला या धक्क्याने त्याच्या आईने हाय खाऊन आपले जीवन संपवले. बहिणीने आपला जोडीदार निवडताना गुन्हेगार भावाशी असलेले नाते संबंध तोडून टाकले. 

    आता फंटूशच्या आयुष्याला काहिही उद्देशच उरला नाही. वाट्टेल ते काम करून फक्त जिवंत रहायचे एवढेच त्याला माहीत होते. शेवटी त्याने सगळ्यात सुरक्षित पर्याय निवडला. 'भीक मागणे'. दिवसभर चांगला पाय घाणेरड्या कपड्यात गुंडाळून, मुडपून ठेवून तो अपंग असल्याचा अभिनय करून भीक मागुन पैसे कमवू लागला. झोपडपट्टीत राहू लागला. पावसाळ्यात झोपडपट्टीत घाण असते म्हणुन त्याला पावसाळ्यापुरत तुरुंगात चार भिंतींच्या आत सुरक्षित वातावरणात राहायच होत. तेच त्याच स्वप्न होत. *जेल हिच त्याची स्वप्नभूमी होती*. 

    पण *शहीद जवानाच्या त्या अंत्ययात्रेने कुठेतरी फंटूशच्या अंतर्मनाची तार छेडली गेली*. त्याला स्वतःची किळस वाटू लागली. 

"अरे अरे किती घसरलो आपण. आपल्यासाठी आपल्या देशाचे शूर सैनिक स्वतःच्या प्राणाची आहुती देतात?.... किती वाईट वाटत असेल त्यांच्या आत्म्याला... नाही, नाही.. त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये.. *मी देशासाठी बलिदान केलेल्या या सैनिकाच्या पवित्र आत्म्याची शप्पथ  घेतो*, *आज पासून मी चोरी करणार नाही, भीक मागणार नाही. आजपासून मी एक सच्चा माणूस बनेन*."

    त्या शहिद जवानाची अंत्ययात्रा गेलेल्या रस्त्यावरील मातीचा तिलक  त्याने कपाळाला लावून शप्पथ घेतली. त्याच्या दृष्टीने तो *अति पवित्र मंगल तिलक होता*. 

   " कॅप्टन जयंत निंबाळकर यांनी मृत्यूनंतर देखील आपले राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य निभावले होते. *खरा सैनिक बलिदानानंतर देखील आपले कर्तव्य निभावत असतो*."

   ही कहाणी इथेच संपत नाही. खरच त्या दिवसापासून फंटूशचे जीवन अमुलाग्र बदलले. त्याने त्याचे सगळे वाईट धंदे सोडले. तो उत्तम ड्रायव्हर होता तसेच त्याची शरीरसंपदा उत्तम होती. तो ड्रायव्हर कम सुरक्षा रक्षक अशी नोकरी शोधू लागला. अर्थातच त्याच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीमुळे त्याला चटकन नोकरी मिळणे मुश्किलच होते, जवळ जवळ दोन अडीच महिने तो एकीकडे नोकरी शोधत अक्षरशः मिळेल ते काम करत होता. त्या काळात त्याने लोकांच्या गाड्या धुतल्या, हमाली केली, पेपर टाकले, दूध पिशव्या पोहोचवल्या... तो घाम गाळून रोजची भाकरी मिळवत होता.... पण त्याने चोरी केली नाही.. भीक मागितली नाही. रोज रात्री झोपताना तो *परमेश्वराचे आणि त्या शहिद सैनिकाचे स्मरण* करून स्वतःला सच्चाईच्या रस्त्यावरुन ढळून न देण्याची प्रार्थना करत असे.

   आणि तो दिवस उजाडला. फंटूशच्या मेहनतीला यश आले. तो ज्या फर्म मध्ये ड्रायव्हरच्या नोकरीसाठी अर्ज घेऊन गेला होता त्या फर्म च्या मालकाला शेखरला त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा जाणवला आणि त्याने त्याला दुसर्‍या दिवसापासूनच म्हणजे 15 ऑगस्ट पासूनच कामावर जॉईन व्हायला सांगितले.

    दरवर्षी 15 ऑगस्टला शेखर आणि त्याचे कुटुंबीय देशासाठी लढताना वीरगति प्राप्त झालेल्या काही सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेत असत. या वर्षी ते नक्षलवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या शहिद कॅप्टन जयंत निंबाळकर यांच्या कुटुंबीयांना भेटणार होते.

   " म्हणजे फंटूशच्या नवीन जीवनाची सुरुवात *स्वातंत्र्यदिनी आणि त्याच्या तिर्थक्षेत्राला* भेट देऊन होणार होती" 

   फंटूश प्रचंड खुश होता. त्या रात्री त्याला आनंदातिशयाने झोपच लागली नाही.                सकाळी लवकरच तो उठला. त्याला ऑफिसमध्ये सकाळी 9 वाजता हजर व्हायचे होते. सकाळी साडेसात वाजता त्याच्या जुन्या शाळेत झेंडावंदन करून मगच कामावर जायचे असे त्याने ठरवले. 

    दहा मिनिटे अगोदरच तो शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा होता. पण त्याला पुढच्या गेट मधून आत जाण्याची लाज वाटली. त्याच्या कपाळावर गुन्हेगाराचा शिक्का होता. "निदान एक वर्ष तरी प्रामाणिकपणाने काम करीन आणि पुढच्या 15 आॅगस्टला या दाराने आत जाऊन झेंडा वंदन करीन"... तो स्वतःशीच म्हणाला. 

    शाळेचे विस्तीर्ण मैदान शाळेच्या एका बाजूला सलगपणे लांबलचक पसरले होते. तो मैदानाच्या मागच्या कंपाऊंडच्या बाहेर एका झाडाखाली उभा राहिला. तिथून त्याला मैदानाच्या पुढील भागातील राष्ट्रध्वज आणि झेंडावंदनासाठी उभे राहिलेले विद्यार्थी विद्यार्थीनी पाठमोरे दिसत होते. 

     राष्ट्रगीत सुरू झाले, आणि त्याला त्या कंपाऊंडच्या पलीकडील भागातून दोन व्यक्ती शाळेच्या मैदानात घुसलेल्या दिसल्या. गुन्हेगारी विश्वात मुरलेल्या फंटूशच्या सराईत नजरेला धोक्याची जाणीव झाली. तो थोडासा आडोशाला उभा असल्यामुळे त्या व्यक्तींना तो दिसला नाही. मांजरांच्या पावलाने त्या व्यक्ती आत शिरल्या, त्यांच्या हातात कसल्यातरी बॅग्ज होत्या. त्यांनी त्या बॅग्ज पाठमोर्‍या उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या रांगेमागे  दोन फूट अंतर राखून ठेवल्या. आणि ते आले तसेच निघून गेले. फंटूश व्यतिरिक्त कोणालाही काहीही कळले नाही. 

   राष्ट्रगीत संपून देशभक्तीपर गाणी सुरू झाली होती. फंटूश त्या शाळेचा जुना विद्यार्थी होता. आता अर्धा तास तरी कोणीही जागेवरून हलणार नाही याची त्याला जाणीव होती. 

    काहीतरी गडबड होती खास. विचार करण्यात जास्त वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. पुढच्याच क्षणी तो चित्त्याच्या चपळाईने त्या तारांच्या कंपाऊंड मधुन आत घुसला. काही क्षणातच तो त्या पिशव्यांपर्यंत पोहोचला. देशभक्तीपर गाण्यांचा आवाज टीपेला पोहोचला होता. 

त्याने पिशव्या उचलल्या. आतमधून टिक टिक आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. पिशव्यांमध्ये प्राणघातक बाँम्ब असल्याचे त्याच्या लक्षात आले. 

    दुसर्‍याच क्षणी तो खच्चून ओरडला "कोणीही जागेवरून हलू नका, पिशवीत बॉम्ब आहे" आणि कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आतच तो जिवाच्या आकांताने त्या पिशव्या घेऊन मागे धावला. आता काहीही करून त्याला शाळेच्या पाठीमागे असलेला मैदानापलिकडचा तलाव गाठायचा होता, ते बाँब पाण्यात फुटणे गरजेचे होते. 

   हरणापेक्षाही जास्त वेगाने तो पळाला आणि तळे दिसल्यावर त्याने त्या पिशव्या तळ्याच्या दिशेने भिरकावल्या ........ 

  ...... पण..... दोन सेकंदाचा उशिर झाला होता. स्फोट त्याच्या हातात झाला नसला तरी हवेत झाला. त्याच्या शरीराच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या नसल्या तरी  त्याचा जीव घ्यायला तो दणका पुरेसा होता. 

   भाजल्यामुळे काळ्याठीक्कर पडलेल्या त्याच्या चेहर्‍यावर मात्र अतीव समाधानाचे एक हास्य विलसत होते. 

  " *फंटूशला त्याच्या स्वप्नाचे रहस्य उलगडले होते*". 

...... *शाळेतल्या सहाशे पासष्ट चिमुरड्यांचा जीव वाचवण्यासाठी फंटूशने स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले होते*. 

     शहरातील सर्व नागरिक फंटूशच्या अंत्ययात्रेसाठी जमले होते. सर्वांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. सरकारी इतमामात फंटूशची अंत्ययात्रा काढावी अशी त्यांची मागणी होती. स्वतः कलेक्टर साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना फोन फिरवला होता. "हुतात्मा फंटूश अमर रहे।" "भारत माता की जय" या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. 

    मृत्यूपश्चात फंटूशला तिरंग्यात लपेटण्याचा बहुमान मिळाला की नाही? ते माहित नाही. शासनाच्या नियमात जे बसले असेल ते झाले असेल. 

    पण कदाचित ज्याच्या नशिबात आज *किडामुंगीसारखे मरण आले असते त्याला आज लाखोंच्या ह्दयाला चटका लावणारे वीरमरण आले होते हे परिवर्तन कोणामुळे घडले?* 

    अर्थातच याचे उत्तर आहे कॅप्टन निंबाळकर यांच्यासारखे शुर सैनिक, जे *आपल्या मृत्यूपश्चात देखील आपले सैनिकांचे कर्तव्य बजावत रहाताना, फंटूशसारख्या हजारो लाखो तरूणांच्या भरकटलेल्या आयुष्याला एक दिशा देत रहातात*. 

.....*( खरच देशासाठी वीरगति पत्करलेल्या सैनिकांच्या बाबतीत.... अमर रहे..... ही फक्त घोषणा नव्हे तर वस्तुस्थिती असते)* . 

    देशासाठी लढणाऱ्या माझ्या समस्त सैनिक बांधवास आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कुंटूबियांस माझे कोटी कोटी प्रणाम. 

   *माझ्या समस्त सैनिक मित्रांच्या चरणी आजचे शब्दपुष्प अर्पण करतो*. 

  ( काल्पनिक) 

          *© नितीन मनोहर प्रधान* 

                रोहा रायगड 

             9850424531 

            15 आॅगस्ट 2021

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू