पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बाहुली

                 बाहुली


          मुरलीधर देवर्डेकर



  १२ जानेवारी


           मी ऑफिसात प्रवेश केला खुर्चीत बसून काही क्षण शांत बसलो. माझी ही नेहमीची पद्धत. आल्याबरोबर काही क्षण निर्विकार अवस्थेत बसायचे.बरेच लोक याला ध्यान म्हणतात. मी कधी अध्यात्माच्या फंदात कधी पडलो नाही, पण ही अवस्था खूप चांगली वाटते. मन फ्रेश होत.ताजतवानं होतं.  धार्मिकते बद्दल बोलावं तर कधीतरी बायकोबरोबर मंदिरात गेलो असेल एवढंच! बाकी धर्माबद्दल मी जास्त अपेक्षा ठेवत नाही किंवा त्याचा अवडंबर माजवत नाही. अंधश्रद्धा, चमत्कार या गोष्टींना थारा देत नाही. एवढेच नव्हे तर याचा विरोध आहे. माझा स्वतःवर  विश्वास आहे, माझ्या मनगटावर विश्वास आहे.

      दोन महिन्यापूर्वी माझी या  पोलीस स्टेशनला पोलीस उप निरीक्षक या पदावर बदली झाली.

 थोडेफार बदल करावेत या दृष्टिकोनातून काम चालू केलं. असं हे गाव बर वाटलं.नगरपालिकेच ठिकाण. लोकांचा धार्मिकतेकडे कल होताच.पण एक आहे, धार्मिक मार्गावर रुळलेली माणसं लोकाना त्रास देत नाहीत.  लोक सरळ मार्गी असतात. खून, दरोडे भांडणं, सोडाच पण कोणाविषयी अपशब्दही  न वापरणारी अशी माणसं धार्मिकतेचा अवडंबर माजवत असतात. आणि एक चांगलं काय तर हेच लोक आमच्या कामाचा ताण हलका करतात. एकंदरीत निवांतपणा होता. शांत व सज्जनांचं गाव होतं.कुणाच्याही अध्यातमध्यात नसणारे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते.


        हवालदार गायकवाड आंत आला.

      " साहेब, रावसाहेब तेलवेकर आले आहेत. तुम्हाला भेटायचं होतं म्हणतायेत."

      " मला भेटायचय? का बरं?"

       " ते म्हणतात कसलीतरी तक्रार आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विरोधात आहे."

       " पाठवून दे."

       रावसाहेब तेलवेकर एक बडं प्रस्थ. मोठे समाजसेवक. सर्व सामाजिक कामात हिरीरीने भाग घ्यायचे. नगरपालिके पासून मंत्रालयापर्यंत सर्वांच्या  ओळखी होत्या आणि त्यांना आदर पण होता. महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधात काम करायचे. त्यामुळे मलाही त्यांच्याविषयी आदर होता. चमत्कार, बुवाबाजी,अंधश्रद्धा यांच्यावर कडवा विरोध होता. कदाचित त्यामुळे त्यांच्यावर बराच लोकांचा रोष होता.

      " नमस्कार शिंदेसाहेब."

       रावसाहेबांचं हसतमुख व्यक्तिमत्त्व माझ्यासमोर उभा राहिलं.

      " या .. या. साहेब बसा."

       ते निवांत बसले.

      "काय काम काढले?"

      " एक तक्रार होती."

      " बोला की साहेब.."

      " ह्या गावामध्ये बलदेव बाबा नावाच्या एका भोंदू बाबानं प्रचंड गोंधळ माजवलाय.सगळीकडे अंधश्रद्धा फोफावत चाललीय.हा बाबा लोकांचे दु:ख बरे करतो, त्रास कमी करतो म्हणे. जिथे जाऊ तिथे प्रत्येकाच्या तोंडात बलदेव बाबा.लोक रांगा लावून पाया पडायला. लोकं किती मुर्ख आहेत! कुणाला नमस्कार करावे हे त्यांना समजतच नाही. आम्ही ह्या विरोधात आहे. बुवाबाजी आम्हाला मान्य नाही. मी माझ्या घरातले सगळे देव नदीत विसर्जन केले आहेत. काहीही झालं नाही मला. देव देव अशी संकल्पना आम्हाला मान्य नाही. अंधश्रद्धेचा भाग वाटतो."

       " मी पण ऐकलय थोडसं त्यांच्याविषयी.पण  त्यानी तुम्हाला काही त्रास दिला का?"

       " त्रास? त्रास दिला असता तर या गावातून त्याला कधीच हाकलून दिला असता!"

       " मग हा बुवा करतो तर काय?"

       " मार्गदर्शनाखाली लोकांना काहीतरी सांगतो.जे शास्त्राच्या विरोधात आहे ते. लोकांना मंत्रशक्तीची किमया सांगतो,अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मंत्र देतो.लोकपण विश्वास ठेवतात.अंधश्रद्धा वाढते. अहो सायन्स नावाचा काही प्रकार आहे की नाही?सायन्सनं   खूप सुप्तशक्ती प्रकट केलेल्या आहेत  आणि त्या प्रकट होण्यासाठी काही नियम पण आहेत.न्यूटन, आर्किमिडीज,  एडिसन यांनी सिद्ध करून दाखवले आहेत. म्हणे आपल्यात ही सुप्त शक्ती आहे आणि ती प्रेरणा देते.सगळी फालतूगिरी. लोक फार भटकलेत आणि मार्ग सोडून दुसरीकडे चाललेत. नाही, आता खूप झालं, ही बुवाबाजी चालू देणार नाही. त्याला अटक करा. त्याला जेलमध्ये सडू द्या.बघूया त्याची शक्ती काम करते कां? त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत आणि बुवाबाजी पण बंद होईल."

        " हो,खरंआहे. पण हा पैसे मागतो का? अन्याय केला का?कुणाला त्रास दिला कां? काही वाईट घडलं का?"

       " अहो, असे लोक वाईट चालीचेच असतात. ही माझी एक तक्रार.एफ आय आर  करा आणि त्याला उचला नी टाका जेलमध्ये."

        काही क्षण मला पण वाईट वाटलं. कारण हे बाबा कधी कुणाला त्रास देत नाहीत. त्यांच्याविषयी चांगलंच ऐकलं होतं. अंधश्रद्धा असतील. नाही असं नाही पण ज्याला हे आपण अंधश्रद्धा म्हणतो त्यात काही तथ्य असेल तर! पण त्यांच्यामुळे कुणाला जर काही उपयोग असेल कुणाची कामे होत असतील तर! लोक ज्यावेळी संकटाने ग्रासतात,सगळे शक्यतेचे प्रवाह थकलेले असतात तेंव्हा त्यांना देव आठवतो. एक अपेक्षा असते की परमेश्वर ह्या संकटातून बाहेर काढू शकतो.अशा लोकांना बाबांचा आधार वाटत असेल तर त्यांच्यावर गुन्हा का दाखल करायचा?काही लोक पैशासाठी बुवाबाजी करत असतीलही. म्हणून सगळे संत तसे नसतात. 

        " तेलवेकरसाहेब, माझा एक अनुभव आहे. अध्यात्मिक मार्गात पडलेले  लोक कधी कुणाला त्रास देत नाहीत. कोणाकडून पैसे मागत नाहीत आणि अविचारी तर मुळीच नसतात."

       " म्हणून काय झालं? हे बघा साहेब, आपण अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं नाही. आम्ही कशासाठी आहोत? अध्यात्माच्या नावावर जो काही प्रचार सुरू केला आहे त्यामुळे लोक भटकतात.आणि मार्ग सुचत नाही तेव्हा त्या बाबांला सगळं अर्पण करतात. लुटले जातात. त्यांची मानसिकता बदलते. अनामिक भीतीच्या छायेखाली वावरतात. हातात माळ घेऊन जप करत बसतात. तोच वेळ चांगल्या कामाला लावला तर!"

       " खरं आहे सगळे पण अध्यात्म.."

       " अध्यात्म वगैरे थोतांड आहे.आता भुत भुत नावाचा जो प्रकार आहे तो प्रत्यक्षात दाखवावा. मी सगळं सोडून देतो. मग,आपण काय करणार आहात? नाहीतरी आम्ही त्या बाबांच्या केंद्रावर  मोर्चा घेऊन जाणार आहोत. आणि तुम्ही दखल  नाही घेतली तर पोलीस स्टेशनवर सुद्धा मोर्चा आणू. तेव्हा काय ते ठरवा.आपण काहीतरी कार्यवाही कराल अशी अपेक्षा करतो."

        तेलवेकर निघून गेले.

        विचार करू लागलो. तेलवेकर एक सामाजिक कार्यकर्ते.ते ही अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणारे. देवदेवता, संत साधू यांच्या विषयी यांच्या मनात प्रचंड तिरस्कार आहे. अध्यात्माची भयंकर चिड. अदृश्य शक्ती, पुनर्जन्म, देव-देवता यांच्याविषयी प्रचंड चीड. प्रत्यक्ष देवता येऊन उभ्या राहिल्या तर ते म्हणणार हे असं नाहीच.भास आहेत.

       एकेकाची मानसिकता वेगळी असते. अध्यात्माला खोटे पाडण्याची मानसिकता असते. कांहीतरी वेगळं करतोय हा अहंकार असतो. पण हे अध्यात्म मार्गाला लागलेले लोक कोणाला त्रास देत नाहीत. सर्वांना मदत करत असतात. दारू, मांसभक्षण करत नाहीत. अहिंसक असतात. कुठल्याही स्त्रीकडे  मात्रभावनेने बघत असतात. कारण त्यांना जीवनाची सगळी तत्वं समजलेली असतात. प्रत्येक माणसात देव शोधत असतात. तेलवेकर सारखी माणसं हीन असतात असं नाही. त्यांचं कार्य पण चांगलच असतं.ते पण कोणाला उपद्रव देत नाहीत. समाजासाठी प्रामाणिकपणे झटतांत. अंधश्रद्धा, बुवाबाजी हा त्याचा ज्वलंत प्रश्न. आणि मग असे लोक कुठल्या पातळीवर असतात माहित नाही, पण काहीतरी समाजसुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून चांगले काम करत असतात. अध्यात्म म्हणजे  थोतांड वाटते. वेद, पुराणे यांना मान्य नाहीत, अध्यात्मिक नियम यांना मान्य नाहीत.एक चिड आहे.

       तेलवेकरानी  एक लेखी पत्र दिले. हे पत्र म्हणजे एक तक्रार होती. आणि बाबांच्या विरोधात होती.  आता अशात त्यांना जे वाटतंय ते किती खरे आणि किती खोटं हे माहीत नाही, पण मला तो अर्ज घेणं भाग पडलं. वरिष्ठाशी  चर्चा करून त्यावर विचार करू असा विचार करून वरिष्ठांच्या ऑफिसात गेलो आणि त्याना ते पत्र दाखवले.

         " खरं सांगू का शिंदे, आपल्याकडे कमीत कमी तक्रारी याव्यात असं वाटतं पण हे लोक विनाकारण तक्रारी करतात. तेलवेकर सामाजिक स्तरावर चांगली काम करतात त्याबद्दल दुमत नाही. पण ज्यांच्याविषयी तक्रार आहे ते संत पुरुष आहेत. अध्यात्मिक पातळीवर खूप वरच्या दर्जाचे आहेत. सामाजिक स्तरावर पण चांगले काम करतात. कारण त्यांच्याकडे आलेल्या पैसा हा दुर्लक्षित सामाजिक व्यवस्थेसाठी वापरतात. त्यांचा स्वतःचाच काहीही खर्च नाही.एकदम साधे कपडे वापरतात. तेलवेकर पण चांगला माणूस. कधी कुणाशी वैरी न करणारा. पण मला हे समजत नाही की त्यांनी का तक्रार केली? आणि आम्ही नाही कारवाई केली तर मोर्चा.आता ह्या गोष्टीमध्ये तेलवेकरांना कसला आनंद वाटतो, कसली खुषी वाटते तेच आम्हाला समजत नाही."

       " पण साहेब, तेलवेकर एक सामाजिक व प्रतिष्ठित कार्यकर्ते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. ते नेहमी चांगले काम करतात. समाज सुधारणा घडवून आणतात.त्यांची ही तक्रार सुद्धा रास्त असली पाहिजे. त्या बुवामध्ये काहीतरी गौड बंगाल असलं पाहिजे."

       " बरोबर आहे. पण आपण कचाट्यात पडतो ना! एखाद्या चांगल्या माणसावर गुन्हा दाखल करणे योग्य नाही"

      " योग्य अयोग्य याचा विचार आपण करू शकत नाही.आपण पोलिस आहोत. एखाद्यानं तक्रार दिली की आपण त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. सत्य की असत्य नंतर पडताळून पाहतो. तेलवेकरसाहेब अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतात. एक दृष्टीने त्यांचही बरोबर आहे.नाहीतर भोंदूगिरी मुळे समाज बिघडू शकतो"

      " ही केस साधी वाटत नाही शिंदे, आपण याचा खूप विचार करायला हवा.नाही तर आपल्या सीनियर ना विचारून बघू."

      " हो ना सर, तुम्ही ही गोष्ट सरांच्या कानावर घाला.  कारण यात अनेक अडचणी येणार आहेत. त्याला आवरणं खूप कठीण आहे."

     " खूपच. काय करायचं काय समजत नाही. तुम्हाला काय वाटते शिंदे काय करायला पाहिजे?"

     " तुम्ही सांगा सर."

     " आपण एकदा तेलवेकरांना विश्वासात घेऊन बोलू.ते जर तक्रार मागे घेत असतिल तर वेल अँड गुड.जे शांतपणे चाललंय त्यात ढवळाढवळ नको. नाहीतर मग शेवटचा पर्याय म्हणून शेवटी  त्या बाबाला अटक कलीच पाहिजे. आपली नोकरी आहे.आपल्या मनात नसतानाही अशी कामे करावी लागतात त्याला काय करणार?"

     " पण गुन्हा काय दाखवायचा?"

     "लोकांची फसवणूक करणे, लोकांना लुबाडणे."

     "पण असं होत नाही सर. कुणाला त्यांनी फसवलं नाही, कुणाची लुबाडणूक केली नाही. समाजात आदर आहे."

      "काहीतरी करून अटक करावीच लागेल."

       " खूप मोठा गोंधळ होणार आहे."

       " होणारच! आणि आपल्याला पण खूप कठीण जाणार आहे."

       'दोन दिवस थांबा आपण यावर विचार करू."

       "जी सर"


          माझी मनस्थिती खूपच अवघड होती. विचार करून संपत नव्हते. संध्याकाळी घरी गेलो. पत्नीला व मुलीला घेऊन फिरायला आलो. तेवढाच एक विरंगुळा.

        शिलाला आणि चिंगीला खायला दिलं. तिघे एन्जॉय करत होतो. नंतर चिंगीला खेळण्याचं दुकान दिसले आणि ती हट्ट करू लागली. मग आम्ही खेळण्याच्या दुकानात प्रवेश केला.

        खूपच सुंदर नवीन आणि वेगवेगळी अशी खेळणी बघून ती खुश झाली. हे घेऊ का ते घेऊ ह्या विचारात पडली. मुलांना काय सगळी खेळणी हवी असतात. पण आपण पण त्याच्या किमती पहिल्या पाहिजेत. पण मुलांच्या आनंदापुढे किमतीचं काही वाटत नाही. ती खेळणी  बघण्यात गुंग होती. एखादी कार असेल तर ते चालू बघायची. बस असेल तर चालवून बघायची. रणगाडा ,यांत्रिक वस्तू ,बाहुल्या. आणि तिचे लक्ष एका सुंदर बाहुलीकडे गेले.ती बाहुलीकडे बघतच राहिली.तिला आवडली असावी.

        खूपच सुंदर लाकडी बाहुली होती. मी दुकानदाराला विचारलं,

        " केवढ्याला बाहुली?"

         "नऊशे रुपये."

         " नऊशे रुपये? बापरे! खूपच महाग आहे."

         " साहेब, हे अप्रतिम दुर्मिळ लाकूड ब्रह्मदेशांमध्ये मिळते. तिथल्या जंगलातल्या मीळणार्या दुर्मिळ लाकडापासून बाहुली तयार केली जाते."

       " असं काय आहे त्यात?"

       "कळत नाही साहेब,पण तो एक दुर्मिळ व्रक्ष आहे. ते झाड तोडताना दोन कामगार गतप्राण झाले. तीन कामगार जायबंदी झाले. आणि एवढ्या कष्टातून त्यांनी लाकूड आणले. त्यामुळे त्या लाकडाची किंमत आणि दुर्मिळ असल्यामुळे बाहुलीची किंमत वाढली. घ्या साहेब,कुठे मिळणार नाही. खूपच चांगली आहे."

      "ठीक आहे, ती बाहुली द्या.खूष ना चिंगे?"

      चिंगीनं मान डोलावली. चिंगी खुश झाली व बाहुलीसोबत खेळू लागली.


१४ जानेवारी


        मी जरी अध्यात्माच्या आणि अंधश्रद्धेच्या विरोधात असलो तरी ही गोष्ट मला खूप खटकत होती. आम्ही पोलीस असलो म्हणून काय झालं?आम्हाला पण मन आहे. आम्हाला कधी नाही वाटत कुणाला त्रास व्हावा. असं कधीच वाटत नाही फक्त मोठ्या लोकांची कामे करावी. सर्वाना सारखा न्याय मिळावा.आम्ही नेहमीच लोकांच्या भल्यासाठी  झटत असतो. 'सदरक्षणाय ..खलनिग्रहणाय' हे आमचं ब्रिदवाक्य आहे. नेहमी सत्याची बाजू घेतो. हं, आता अधिकाराचा गैरवापर करून काही भ्रष्ट मंडळी आपला फायदा करून घेतात. मग काही गरीब लोक यामध्ये भरडले जातात. सत्य दडपले जाते.त्यांच्यावर अन्याय होतो. असे काहीच लोक. सगळेच नाही. खरं सांगायचं झालं तर लाच कोणीतरीच घेतात पण सगळे  पोलीस बदनाम असतात. पण असं काही नाही. देणारी ही माणसं असतात ना! कधी प्रेमाने देतात, कधी धमकीनं देतात, कधी घ्यायला भाग पडतात. आम्ही सगळे पोलिस ह्या  गोष्टी  टाळतो. सरकार आम्हाला पगार देते त्यावर व्यवस्थित चालतं आमचं.हप्ते घेऊन, खोट्याचा आधार घेऊन पैसा कां मिळवायचा?

         आज सकाळी बाबांच्या विषयी कल्पना साहेबांनी दिली.वाँरंट  घेतले व पोलिस घेऊन बाहेर पडलो. बाबांच्या सत्संग केंद्राजवळ गाडी थांबवली. आम्ही सर्वजण आंत शिरलो तेव्हा सगळ्या लोकांच्या नजरा आमच्याकडे लागल्या.वातावरण प्रसन्न होते. शांत स्वरात पं. भिमसेन जोशी यांची भजनं लागली होती.धुपाचा सुगंध आसमंतात दरवळत होता. आत फारसे लोक नव्हते. पोलीस फोर्स येत आहे म्हणजे काहीतरी घडणार आहे याची कल्पना लोकांना लागून गेली.

        " काय साहेब, बाबांना भेटायचं कां?"

       " हो, त्यांना न्यायला आलोय."

        " म्हणजे?"

        " त्यांना अटक करतोय."

       तो घाबरला.त्याने आवंढा गिळला तो बोलला,

       " साहेब,पण हे काय आहे? त्यांनी काय गुन्हा केलाय?"

       " समजेल, सगळे समजेल."

       "मग सांग ना!"

       "तुमचे बाबा कोण आहेत?एक भोंदूबाबा.ते लोकांना फसवतात. अंधश्रद्धा पसरवतात.आणि तुम्ही लोक त्यांना मदत करता.त्यांच्या विषयी लोकांच्या तक्रारी आहेत."

       " साफ खोट आहे. त्यांनी असं काहीही केलं नाही.एक संत म्हणून आम्ही त्यांच्याकडे पहातो.तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल!" 

        तोवर सत्संगमधले बरेच कार्यकर्ते जमा झाले. माझ्यावर पण थोडासा दबाव आला.मी पण धाबरलो.  माझा धीर सुटू लागला.

       "तक्रार कोणी केली?"

       "तेलवेकरसाहेब. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक धडाकेबाज कार्यकर्ते."

       " खोट आहे साहेब, साफ खोटं आहे. असं काहीही नाही. तेलवेकरसाहेब सामाजिक कार्यकर्ते असतील, नाही आहेतच. त्याबद्दल दुमत नाही. पण त्यांचा निर्णय चुकीचा आहे. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना भेटून या गोष्टीवर चर्चा केली. पण त्यांना ह्या गोष्टी काय पटतच नाहीत. आम्ही सगळे चांगल्या मार्गाने जातो.कोणाला त्रास देत नाही.काही जादूटोणा करत नाही.बाबांच्यामुळे कित्येक लोकांच कल्याण झालंय आणि ते छातीठोकपणे सांगतात. तेलवेकरांना ह्या गोष्टीचे देणेघेणे नाही. त्यांचं फक्त एकच, आमचा बाबा भोंदू बाबा आहे.साहेब, त्यांच्याविषयी अपशब्द काढणं सुद्धा पाप आहे. हा त्यांचा निर्णय चुकीचा आहे. आम्ही गप्प बसणार नाही. बाबांनी कधी कुणाला त्रास दिला नाही, कधी फसवलं नाही. लोकांना मदत केली. लोकांना मार्गदर्शन केले .लोकांचे  उद्ध्वस्त होणारे संसार वाचवले आहेत.पैशाची कसली अपेक्षा केली नाही. त्यांना अपेक्षा तरी कशाची?नेहमी साधेच राहतात.अंगावरचे कपडे साधेच.दोन वेळचं जेवण आणि गाईचं दूध याव्यतिरिक्त त्याचं खाणं काहीही नाही. कशाला हवा  पैसा?इतक्या लोकांना मार्गदर्शन करतात कधी थकत नाहीत. थकले असले तर सांगत नाहीत. आणि का तुम्ही लोक त्यांच्या पाठी लागता?तेलवेकरसाहेब नेहमी आमच्या पाठी लागलेत.लोकांच चांगले झालेलं त्यांना आवडत नाही असंच आम्हाला वाटतंय.  पण साहेब हे टाळता येते का बघा. असं करू नका."

        " हे बघा तेलवेकर सांगतात म्हणजे सत्य असलं पाहिजे. आम्हाला त्यांच्या तक्रारी प्रमाणे गेलं पाहिजे. तुम्ही कृपया कोणीही आडवे येऊ नका."

       " साहेब,क्रपा करा. आम्ही तेलवेकरांना समजावतो.  कदाचित मानतील!  पण तुम्ही असं काही करू नका."

           चिडलेले काही कार्यकर्ते जमा झाले आणि रागवून बोलू लागले,

         " अहो इन्स्पेक्टर, इथे तुम्हाला असं काही करु देणार नाही. लै महागात पडल. आल्यासारखं प्रसाद घ्या आणि मागे फिरा. "

         " हो. आम्ही बाबांना हातही लावू देणार नाही."

        " आम्ही आडवं येऊ, आंदोलन करू, आत्मदहन करू."

        "ओ  इन्स्पेक्टर, जावा घरला. सगळे कार्यकर्ते जमले तर तो तुम्हाला जाता पण येणार नाही."

       एका कार्यकर्त्याने सर्वांची समजूत घातली.

      " गप्प बसा रे,मी बोलतो ना त्यांच्याशी. साहेब बघा,विचार करा. बाबांच्या मुळे असे चमत्कार झाले की भामटे लोक सत्संगाला लागले. गुन्हेगार मार्गावर आले.  सगळी वाईट कर्म सोडून लोक सत्कार्याला लागलेत. सगळीकडे शांतताच शांतता आहे. पण आपण मात्र  ढवळाढवळ करत आहात. हे बघा, हे लोक चिडले आहेत.तुमचा निर्णय बदला.बाबाजी संत आहेत. त्यांना ह्या गोष्टीची खंत नाही. त्यांना काहीही होणार नाही. पण तुम्ही मात्र अडचणीत याल."

        तेवढ्यात एक आवाज आला. मुख्य कार्यकर्त्याला संबोधून बाबाजीनी हाक मारली.

          " मल्हारी, काय गोंधळ चाललाय?"

          " बाबा, हे पोलीस इन्स्पेक्टर शिंदे आले आहेत."

         " येऊ दे त्याना,ते आपली सेवा बजावत आहेत. त्यांना आम्हाला अटक करायची आहे. पाठवून द्या त्यांना आत मध्ये."

       बाबांच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलली नाही. ते शांतपणे बोलले होते.एकदम साधा पेहराव. पांढरा मळकट शर्ट आणि पांढरी विजार.चेहऱ्यावर वाढलेले दाढीचे खुंट,विस्कटलेले केस, कुठलाही अहंकार नाही.

     " या इन्स्पेक्टर या, आत या. तुमचं काम तुम्ही करा.अटक करा मला.बेड्या  ठोकणार की तुमच्या बरोबर आहे तसं आले तर चालेल? पण मी पळून जाणार नाही.तुम्ही मला सांगा कुठे जायचं तिथपर्यंत मी येईन.तुमची बंधनं मला अडकवू शकत नाहीत.पण मला बेड्या घातल्या तर असंतोष निर्माण होईल. विनाकारण वादंग होतील."

       " बाबाजी, माझा नाईलाज आहे. मला वाईट वाटते पण माझी नोकरी अशी, यासाठी मला नाईलाजाने कर्तव्य म्हणून करावं लागते."

       "बसा, चहा घेणार कां?"

       " बाबाजी, तुम्ही असं नेमकं काय करताय? अंधश्रद्धा पसरवताय, लोकांना भटकवताय कां?"

      " हे माझ्यापेक्षा इथला कार्यकर्ता तुम्हाला सांगेल.चांगलं उत्तर देऊ शकेल."

      " पण तुमच्या विषयी तक्रार आली आहे."

      " हरकत नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल! सायन्समध्ये प्रत्येक सुप्तशक्तिचे नियम आहेत. जसे गुरुत्वाकर्षण, विद्यूत निर्मितीसाठी नियम.अध्यात्मात असे नियम नाहीत. असले ते सर्वाना लागू पडतील असे नाही.मी तुम्हाला सांगतो, मी  एक जन्मजात देणगीवर आणि गुरुजींच्या आशीर्वादावर  लोकांना मार्गदर्शन करतो. सत्संग लावतो. अनेक वाह्यात गेलेले लोक इथं येउन परमेश्वराचे नामस्मरण करतात. आपले  पुर्वकर्म विसरलेत. एकदा अडचणीत असला तर आम्ही तोडगे सांगतो. कदाचित आपण याला अंधश्रद्धा म्हणत असाल! काही वस्तू मध्ये नकारात्मकता असते. ही वस्तू घरामध्ये आली तर नकारात्मक ऊर्जा पसरवते आणि मग  अडचणी येतात. माणसं आजारी पडतात. आम्ही ध्यानातून जाणू शकतो.पण आम्हाला ज्या जाणीवा होतात त्या सर्वांना होत नाहीत. काही मंत्र व तोडगे यामुळे नकारात्मकता कमी होऊ लागते, सकारात्मकता येते आणि मग त्यांच्या अडचणी दूर होऊ लागतात. आता मी सांगतो याला कुठल्याही  शास्त्राधार नाही.  याचे प्रयोग दृश्य स्वरुपात दाखवू शकत नाही.पण परिणाम चांगले येतात. याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा. परदेशात अशी साधने निर्माण केली की ज्याद्वारे माणसांचा औरा पण एका यंत्राद्वारे पाहू शकतो.याद्वारे माणसांच्या नकारात्मकतेचा आणि आजारपणाचा छडा लागू शकतो. पण मला या भौतिक साधनांची गरज लागत नाही. एखाद्या व्यक्तीला पाहून मी सांगू शकतो. मग या लोकांच्या अडचणी दूर झाल्या आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो. हो, मागणी करतो. पण जबरदस्ती नाही. ही मागणी म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण आणि चिंतन करणे.ज्या द्वारे शुभ आणि सात्विक उर्जा निर्माण होईल आणि निर्माण होणाऱ्या शुभ स्पंदनामुळे बर्याच समस्या कमी होतील. मग आम्ही सांगितलेली आराधना काही लोक करतात, काहीलोक करत नाहीत. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असते. त्यांनं चांगलं वागावं की वाईट वागावं. पण इथली माणसं चांगलं वागतात. इतरांना त्रास देत नाहीत.त्यांच्या पुण्यकर्मात वाढ होते. आता पुण्य आणि पाप हे तुम्हाला पटणार नाही. पण  हे आहे. तसं नसतं तर सगळीच माणसं वाईट वागली असती! पशु बनली असती. स्वैराचार वाढला असता."

      मी शांत बसलो. बाबाजी सांगत होती ते परम सत्य होते. मी बाबांची परीक्षा घेण्याकरता बोललो,

       " माझ्याविषयी काही सांगू शकाल?"

       "हो."

        ते काही क्षण शांत बसले. मग ध्यानात गेले. काही क्षणात डोळे उघडले आणि  बोलू लागले,

        " आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात, पण कुठल्याही दबावाखाली न येता लोकांची कामे करता. खूप धाडसी आहात.पण मी काही होणाऱ्या घटना तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आज तुम्ही एका भोंदू बाबाला पकडणार आहात,त्यांना अटक करणार आहात.म्हणजे तुमच्या  दृष्टिकोनातून भोंदूबाबा.नंतर दुसऱ्या दिवशी ते बाबा जामिनावर सुटणार आहेत. तक्रारदाराकडून आपल्यावर दबाव निर्माण होणार आहे. आणि आपण यां दबावाखाली जगणार आहात. दुसरी गोष्ट महत्वाची, एका अनामिक शक्तीनं तुमच्या घरात प्रवेश केलेला आहे.एका वस्तूद्वारे ही अनामिक शक्ती तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करत आहे. त्या वस्तूला बाहेर काढल्याशिवाय आपल्याला स्वस्थता लागणार नाही. अन्यथा सहा महिन्याच्या आत आपल्या घरामध्ये मृत्यू घडणार आहे.पण तत्पूर्वी आपण जर मदत मागितली तर ती दुर्घटना टळेल. असा तोडगा निघू शकतो. पण आपण इथपर्यंत येणं गरजेचं आहे.आणी पुढची गोष्ट, ज्यावेळी ही वाईट घटना घडून जाईल आणि मग 

  ती वस्तू विनाश पावेल. काळीठिक्कर पडेल."

       मी हसलो. मला खात्री पटली की हा बाबा खोटं सांगत आहे. असंच काहीतरी सांगत लोकांना चुकीच्या मार्गावर ढकलत आहे. तसेच समोरच्याला चक्रावून टाकत आहे.

      अशा माणसाचा सामान्य माणसावर फरक पडतो.आता जे बोलले ते थोतांड होते.  आणि सहा महिन्यात मृत्यू काय?आमच्यासारख्या लोकांना अशा भुलथापा मिळतात तर सामान्य लोकांचं काय?काय मनाची अवस्था होत असेल?आता मात्र मनातले मळभ  दूर झाले. आता अटक करायचीच. हे तेलवेकर सांगतात ते  खरं आहे. अशा लोकांच्या वर कारवाई करायलाच  पाहिजे.बुवाबाजी बंद व्हायला हवी.  मी बोललो,

         " निघायचं कां?"

         " चला, मी तयार आहे?"

          मग तो भोंदुबाबा माझ्याबरोबर चालू लागला.  बाहेर कार्यकर्त्यानी कडी केली.

       " बाबा, आम्ही जाऊ देणार नाही. आमचा जीव गेला तरी बेहत्तर!"

       "शांत व्हा!शांत व्हा! मी आज जरी गेलो तरी उद्या येतोय. काळजी करू नका. आजचा दिवस आणि आजची रात्र ही माझी पोलिस कस्टडीत जाणार आहे.आपल्या वकीलांना पाठवा आणि जामिनावर सोडायचा प्रयत्न करा.दंगा धोपा करू नका.आपण सत्याच्या मार्गाने जायचं.शांत रहा. हे पोलीस आहेत. यांचा आपल्याशी काहीही वैर नाही.ते आपली ड्युटी करतात त्यामुळे त्यांना अडवू नका."

        सगळेजण पांगले. काही लोक जोरात रडू लागले. ओरडू लागले. मी त्या भोंदूबाबांना सन्मानानं गाडीत बसवले आणि गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने चालू लागली.


१५ जानेवारी

      सकाळपासूनच आँफिसात कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. मंत्र्यांचे फोन येत होते.माझ्या बरोबर येणारे पोलीस नाराजीनेच माझ्या बरोबर आले होते. अर्थात माझ्याविषयी त्यांच्या मनात चीड होतीच.

       सर्व प्रक्रिया पार पाडल्या. बाबांना मुक्त करण्यात आले.बाहेर भक्तांनी जल्लोष केला. बाबां जाता जाता माझ्याकडे आले.शांतपणे बोलले,

     " इन्स्पेक्टर,तुम्ही खरंच चांगलं काम केलं. धाडसाने कोणाचाही दबाव न घेता एका भोंदू बाबाला अटक केली. अर्थात तुमच्या दृष्टिकोनातून मी भोंदू आहेच.पण मी नाही तसा,मीच नाही सगळी जनता सांगेल. असो,आम्ही हे समजतो की पोलीस फक्त गुन्हेगारांना अटक करतात.त्यांना मारून मुकटून त्यांच्या मनाप्रमाणे खोटं वदवून घेतात. दुसरी गोष्ट, मला आमचा गुन्हा काय होता हेच मला समजलं नाही.पण आपण शहानिशा केली असती तरी बरं झालं असतं!ही तर बेबंदशाही झाली. माझे भक्त सन्मार्गाला  लागलेले आहेत. त्यांच्या  मनात परत हिंसेची बिजं  भिजू लागली आहेत. आता मला त्यांना परत या स्थितीची जाणीव करून द्यायला वेळ लागणार आहे. पण तुम्ही असं करत जाऊ नका. कुठल्याही गोष्टीची शहानिशा करून घ्या.शांत पाण्यात खडा टाकण्याचं काम केलं तुम्ही. काही हरकत नाही, बस तुमचं आमच्यावरचं किल्मिष दूर झालं यात आनंद आहे. कदाचित आपणास सुद्धा भविष्यात काही गरज वाटली तर निश्चितच आपले स्वागत आहे. तुम्ही अडचणीत याल त्यावेळी मी निश्चितच तुम्हाला मदत करेन."

      मी नाराज झालो. आपल्या हातून काहीतरी वाईट घडलय  याची खात्री पटली. सर्व लोक शांतपणे निघून गेले. कुणीही काहीही आरडाओरडा केला नाही. खरोखर, एखादा राजकारणी असता तर खूप गोंधळ घातला असता. आमच्या नावाने शिव्या घातल्या असत्या. अरेरावी केली असती. बघून घेऊ ची भाषा केली असती. आणि मग निघून गेले असते. पण असं काहीच घडलं नाही. असं वाटतं की काहीही घडले नाही.

       एवढ्यात एका तरुणांनं प्रवेश केला.

      " साहेब ,खूप मोठं काम केलं तुम्ही. पण, आपला समाज काही  सुधारण्यातला नाहीये. तेच ते आपलं नेहमीच वेद, पुराण, शास्त्रं.समाजाला बिघडवण्यातले   काही दाखले.कधी आमच्या समाजात बदल व

व्हायचा समजत नाही."

     "बदल म्हणजे काय?जर अध्यात्मामुळे एखादी व्यक्ती आपली हिंसात्मक कृती सोडून अहिंसक होतोय, व्यसन सोडून निर्व्यसनी होतोय, एक निरुपद्रवी व्यक्ती होतेय. हे जर बदल घडत असतील तर असतील तर!"

      " साहेब, चुकताय तुम्ही माणसांची वृत्ती कधी बदलत नाही."

      " बदलतात. पुरावे आहेत. आणि एखाद्या व्यक्तीला पकडून समाजात असंतोष वाढला तर तो नकोय आम्हाला. ठीक आहे? आपण नंतर बोलू. मला एक अर्जंट काम आहे."

      भूक लागली होती. नेहमी जेवायला घरी जात होतो. घरी माझी आई, माझी पत्नी शिला आणि माझी मुलगी चिंगी. चिंगीच्या सहवासात  तर खूप बरं वाटायचं म्हणून जेवायला शक्यतो घरी जायचा. पण आज मूड आला नाही. आज मी जायचे टाळले. बाहेरच काही तरी नाश्ता करून यायचं म्हणून उठलो तर मोबाइल वाजला. आईचा फोन होता.

       " अनुप,अरे लवकर ये बाळा."

       "काय झालं आई?"

      "चिंगी खूपच आजारी पडली,अचानकच."

      "  अचानक?"

      " बाहेरून आली ते ताप घेऊनच आली. खूपच ताप चढलाय."

       "  येतो.लवकर येतो."

     चिंगीला खूपच ताप चढला होता. तिला दवाखान्यात दाखवलं.डॉक्टरनी तपासलं.डॉक्टरनी इंजेक्शन आणि काही औषध दिली. तिला घेऊन मी घरी आलो. पण मला हा प्रश्न पडला असं झालंच कसं? चिंगी कधी आजारी पडत नसायची.कधी पडली नाही. अचानक असं काय झाला असेल?

       

१६ जानेवारी

        सकाळी पाहिलं चिंगीचा ताप कमी झाला होता. ती नॉर्मल झाली होती. आनंदाने खेळत होती. त्या बाहूलीसोबत. माझी चिंता दूर पळाली. मला पण जरा बर वाटलं. पण मला आता बाबांच्या सांगण्यावरचा विश्वास उडाला होता.

         समोरच्या व्यक्तीला खूश करण्याकरता हे बाबा लोक काहीही सांगत असतात.तोंडाला येईल ते बरळत असतात. अंदाजाने बोलत असतात. आपल्याकडून बोलताना चूक होते, त्याचा आधार घेऊन ते बोलत असतात.

          चिंगी बाहूलीबरोबर खेळत होती.बाहूली म्हणजे तिचं विश्वच झालं होत. तिला ती खूपच आवडली होती. त्यामुळे झोपत असताना सुद्धा ती बाहूलीसोबत  झोपायची.बाहुलीला कुणालाही हात लावू द्यायची नाही. एवढी बाहुली प्रिय होती.

   

१२ फेब्रुवारी


         शिलाचा अचानक फोन आला.मीऑफिस मध्ये बसलेलो होतो. काम खूप होतं. मी वैतागानं फोन हातात घेतला,

      " का फोन केला होतास?

      "अहो, सासुबाईना खूपच त्रास होतोय. सकाळपासून उलट्या होत आहेत.अशक्तपणा वाढलाय. दवाखान्यात जायला पाहिजे."

      "अगं,आज मला इथे खूप काम आहे तू जाऊन येतेस कां?"

      " ठीक आहे, जाऊन येते. तुम्हाला सांगावं म्हणून फोन केला."

        संध्याकाळी लवकरच घरी गेलो आईच्या अंगात उठायची पण शक्ती नव्हती. खूप थकलेली होती. डॉक्टरांनी औषधे दिली. 

      " आई, काय गं? असा अचानक आजारी पडायला काय झाले."   

      " काय समजत नाही बाबा, सगळं ठीक होतं आणि अचानक ऊलट्या सुरु झाल्या.डाँक्टरानी औषधे दिली.सलाईन लावलं.आता ठीक आहे."

       मला मात्र काळजीने घेरलं.


 २२ मार्च


        आज सुट्टी होती. सकाळपर्यंत निवांतपणे झोपलो.आळोखेपिळोखे देत उठून बसलो. आणि मग बातम्या बघायला टीव्ही चालू केला. काही क्षणात स्पार्किंग चालू झालं आणि टीव्ही बंद पडला. टीव्ही बरोबर म्युझिक सिस्टिम बंद पडली.

       आता टीव्ही म्हणजे सुट्टीचा सगळ्यात मोठा आधार.तोच आजारी पडला. मग मी टीव्ही मेकॅनिकल बोलावलं त्यांना तपासलं आणि सांगितले,

      " टीव्ही आणि म्युझिक सिस्टीम पूर्णतः बंद पडली आहे. रिपेअर होण्याच्या पलीकडे आहे.त्यापेक्षा तुम्ही नवीनच घ्या."

      " पण असं काय झालं टीव्ही बंद पडायला?"

      "काहीतरी हाय व्होल्टेज आलं असावं. त्यामुळे बंद पडले."

     मी शेजारी चौकशी केली कुणाची इक्विपमेंट्स हाय व्होल्टेजमुळे जळाली काय. पण कुणाच्याही इक्विपमेंट्सला धोका पोहोचला नव्हता.


२ एप्रिल


        आज शिला तापानं फणफणू लागली. खूपच ताप चढला. तिला दवाखान्यात दाखवून आणलं.

आजारपणाची कारणं कुणीही सांगू शकत नव्हते.

सगळे रिपोर्ट नॉर्मल होते आजारपणाचं कारण कुणाला समजू शकले नाही.

        महिन्याभरापासून घरातलं कोणी ना कोणी आजारी पडत होतं. प्रत्येक आठवड्याला प्रत्येकाची पाळी.कधी आई,कधी शीला,कधी चिंगी.मीही सुटलो नाही. एक छोटासा अपघात झाला. चार दिवस झोपून होतो. मी  वैतागून गेलो होतो. हे असं का होतं हे समजत नव्हतं.काहीतरी अकल्पित, काहीतरी गुढ.कुठल्याही गुन्हेगाराला न घाबरणारा मी पुरता कोलमडून गेलो होतो.

        या व्यतिरिक्त नुकसान सुद्धा होत होतं. कधी पाकीट गहाळ होणे,कधी दागिना हरवणे,कधी मोबाईल बंद पडणे, कधी गाडी बंद पडणे आणि त्याला खर्च पण खूप येणे. हे नेहमी असं घडत होतं. कारण मला काही समजत नव्हते.

        कदाचित त्या बाबांनी बोललेले सत्य होत नसेल ना अशीच माझीमला शंका यायला लागली. मी असं ऐकलं होतं की काही  काही साधू हे पंचमहाभूतावर विजय प्राप्त करतात. पंचमहाभूते पण त्यांच्या ताब्यात असतात.पण मला हे पटत नव्हतं.आपले  भोळीभाबडे लोक कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी बडबडत असतात.सगळंच अर्थहीन.

       पण आता मात्र मी पुरता घायाळ झालो होतो. काहीतरी करायला होतं.मनात विचार येत होता की जाऊ तिच्या बाबांच्याकडे. पण तिकडे जाणं भ्याडपणाचं ठरणार होतं. मी शेवटी सीनियरशी विनिमय केला. सरांनी सांगितलं," दहा दिवस तु गावी जाऊन रहा.आराम कर. इकडचे विसरून जा. बघू काय फरक पडतो. मलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि लागलीच रजा टाकली.


 २३ एप्रिल


      गावाकडे येऊन दहा दिवस झाले. रजा संपली. दिवस छान गेले.कसली चिंता नाही, काळजी नाही. मित्रमंडळींमध्ये रमायचं. शेतातल्या वातावरणात फ्रेश व्हायचं. असा चालला परिपाठ चालला होता.

      फक्त माझ्या वहिनीला किरकोळ आजार होता. मधुमेह व ब्लड प्रेशर. त्यामुळे ती वरचेवर आजारी असायची. पण त्यांच्या आजारी असण्याला कारण होतं. 

       मी दादांचा, वहिनीचा निरोप घेऊन आईसकट कामाच्या ठिकाणी आलो.पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. आणि काही वाईट प्रसंग येऊ नये अशी मनोमन इच्छा केली.

      आल्याबरोबर चिंगी रडू लागली. कारण तिची बाहुली आणि दोन पुस्तक एका बॅगेत घालून ठेवली होती ती बँग गावीच राहिली होती. मी तिला सांगितलं उद्या आपण नवीन बाहुली आणू आणि मग ती शांत झाली.


११ जून

   

       खूप छान चाललं होतं.कसली काळजी नव्हती. सगळे भयानक प्रकार बंद झाले होते.

     अचानक दादाचा फोन आला.वहिनीचं आजारपण वाढलं होतं.तिला चांगल्या दवाखान्यात ऍडमिट करायला हवं होतं.

      मी परत रजा टाकली आणि सगळ्यांना  घेऊन गावाकडे गेलो. वहिनींची तब्येत खूप खालावली होती.  तिला दोन दिवसात आडमिट करूया असा मी दादाला शब्द दिला.

       चिंगीला तिची बॅग मिळाली.चिंगी पण खुश झाली आणि ती बाहुलीबरोबर  खेळू लागली.

       मनात एक विचार केला. धाडसी विचार. उद्या कामाच्या ठिकाणी जायचं. बाबांना भेटायचं आणि त्यांना ह्या अकल्पित घटनेविषयी विचारायच.

       माझी कल्पना मी कुणालाच सांगितली नाही पण उद्या बाबांच्याकडून या गोष्टीचा निकाल लावायचा असं ठरवलं. काही हरकत नाही. त्यांनी एकदाच तोडगा दिला तर करायला काही हरकत नाही. वापरून बघायचं नाहीतर सोडायचं.

   

  १२ जून


        जाऊन बाबांना भेटायचं असं विचार करून मी लवकर उठलो. तेवढ्यात दादा  आला,

       " काय झाल दादा?"

       " अरे उठ अनुप, हिची काय हालचाल दिसत नाही. काय झालंय बघ,चल."

       मी घाबरलो. वहिनींच्या जवळ गेलो. त्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. नाडी तपासली. काही जाणवलं नाही. एवढ्या डॉक्टर पण आले आणि त्यांनी वहिनी गेल्याचे सांगितले.

       मी आज बाबांना शरण जायचं  ठरवलं होत. पण ते शक्य झालं नाही.जे घडायचे ते घडले होते. नक्कीच कुठल्यातरी वाईट शक्तीचा प्रवेश होता.बाबांच्या मार्गदर्शनानं कदाचित टळलं असतं

      आणि माझं लक्ष गेलं. चिंगी त्या बाहुलीची खेळत होती आणि बाहुली काळी ठिक्कर होऊन पडली होती.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू