पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

यशस्वी होण्यासाठी ह्या चार गोष्टी ध्यानी ठेवा. - डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

लेखांक २.

यशस्वी होण्यासाठी ह्या चार गोष्टी ध्यानी ठेवा.

- डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर
 

        आपल्यापैकी प्रत्येकालाच यशस्वी व्हायला आवडतं. यशस्वी होण्यासाठी वयाचे बंधन नसते. यशाची संकल्पना मात्र स्थळ, काळ, स्थिती,वय या नुसार बदलू शकते.

        काही लोक जगण्यासाठी जिंकत असतात. काही लोक जिंकण्यासाठी जगत असतात. तर काही लोकांसाठी जगणं हेच जिंकणं असतं. कधी कधी एकाच व्यक्तीच्या आयुष्यात देखील या सर्व स्थिती अनुभवाला आलेल्या असू शकतात.

        यशस्वी होण्यासाठी ह्या चार गोष्टी ध्यानी ठेवा:

1.         नदी सागराला मिळते याचे खरे कारण हेच की, ती आपले उगमस्थान सोडीत नाही.

        उगमस्थान म्हणजे मूळ स्थान. नदी प्रवाही असते. तिचे पाणी उगमस्थानापासून वाहते. वाटेत अनेक उपनद्या इत्यादींना सामावून घेत ते पाणी वाहत वाहत सागरापर्यंत पोचते. सागरापर्यंत पोचणे हे नदीचे ध्येय असते. पण म्हणून नदीने जर आपले उगमस्थान सोडले, तर काय होईल?  तिचे रूपांतरण डबक्यात होईल. पुढचे पाणी पुढे जाते कारण मागचे पाणी पुढच्या पाण्याला पुढे ढकलत असते. आणि ते पुढच्या पाण्याची जागा घेत असते. नेमकी हीच प्रक्रिया थांबली तर प्रवाह थांबेल.

        आपल्या व्यक्तिमत्वाचेही असेच असते. आपल्याकडे काही क्षमता या उपजत असतात. या क्षमतांचे गुणोत्तर प्रत्येकाचे वेगळे असू शकते. पण या उपजत क्षमंतांचा संच हा आपल्या विकासाचे मूलस्थान असतो. त्या क्षमतांसह इतर क्षमतांच्या मध्यामातून आपण आपला विकास साधू शकतो.

        दुसरे असे की, आपण जे जे काही शिकत जातो, त्यातील सूत्रे, कौशल्ये लक्षात ठेऊन, त्यांचे उपयोजन करून पुढील वाटचाल करणे आपल्याला सोपे जाते.

 

2.         कंटाळा करणारास युवक म्हणता येणार नाही कारण युवक ही संज्ञा केवळ शारीरिक नसून मानसिक देखील आहे. कंटाळा आणि थकवा हे दोन शब्द समानार्थी नाहीत. थकवा हा शारीरिक असतो. पण कंटाळा हा मानसिक असतो. युवक ही संकल्पना केवळ शारीरिक वयाशी संबंधित नसते. तर मानसिक वय देखील महत्वाचे असते. “८० वर्षांच्या आजी सूर्य नमस्कार घालतात...” अशा बातम्या आपण वाचतो. ऐकतो. या वरून लक्षात येते की, कंटाळा आणि आळस नसेल, तर माणसाची कार्यक्षमता वाढते. “रिकामा अर्धघडी राहू नको,” हे सूत्र मनात पक्के ठसले पाहिजे.

 

3.         जसे विद्यार्थी शिक्षकांचा शोध घेत असतो तसेच शिक्षक देखील विद्यार्थ्यास शोधत असतो. आपले संशोध्य आपल्याला मिळावे, या सारखे दुसरे सुख अजून अस्तित्वात यावयाचे आहे.

जगातील अनेक मोठी कार्ये ही शिक्षक आणि विद्यार्थी यांनी संयुक्त प्रयत्नातून पूर्ण केली आहेत. शिक्षक हा ज्येष्ठ विद्यार्थी असतो. त्याला त्याच्या कनिष्ठ विद्यार्थ्याकडून चांगली साथ मिळाली, तर एखादे अनेकांसाठी महत्वाचे आणि उपयुक्त असे कार्य उभे राहू शकते. अशी अनेक उदाहरणे आपणास दिसतील. आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपली wavelength जुळेल, अशा व्यक्तींचे सहकार्य आपल्याला मिळाले, तर कार्यसिद्धी लवकर होते. म्हणून आपण नेहमी चांगल्या मार्गदर्शकाच्या शोधात तर रहावेच, त्याच बरोबर प्रत्येक कार्य आपण स्वत:च करतो म्हटले, तर कार्याच्या गतीला मर्यादा येतात. म्हणून सहकारी स्टाफ सुद्धा चांगला मिळेल, या साठी शोध घेतला पाहिजे. आजचा ज्युनिअर हा उद्याचा सिनिअर असतो. त्यामुळे त्यात फार अभिनिवेश बाळगण्याचे कारण नसते.  

 

4.         देवाचे अस्तित्व नाकारताना किंवा स्वीकारताना एक विचार अवश्य करा- माझे अस्तित्व मी परिपूर्णपणे जाणले आहे काय?

यशाकडे वाटचाल करताना अनेकांच्या मनात एक द्वंद्व असते, ते म्हणजे खरेच देव आहे का? आणि मग तेथून देवाच्या अस्तित्वावर सकारात्मक किंवा नकारात्मक शिक्कामोर्तब करण्यासाठी विचारशक्ती खर्च केली जाते. या प्रसंगी सर्वप्रथम हा विचार केला पाहिजे की, माझे अस्तित्व मी पूर्णपणे जाणले आहे काय? माझे दोष, माझ्या चुका, माझ्या त्रुटी तसेच माझी बलस्थाने, माझ्या संधी आणि माझ्या समोर असलेली आव्हाने, धोके यांचा मी विचार करायला हवा.

*******

(क्रमश:)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू