पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चित्रपट आढावा :- अशी ही बनवा बनवी

आढावा किती सुंदर शब्द आहे नाही !!!!!

 

या तीन शब्दात जणू एखाद्या गोष्टीचा सारांश ठरवला जातो. गोष्ट जेव्हा चित्रपटाच्या आढाव्याची असेल तर माझ्या लहानपणीचा एक बहुरंगी-बहुढंगी असणाऱ्या

" अशी ही बनवा बनवी " हा चित्रपट कसा विसरता येईल.

 

१९८८ मध्ये जेव्हा मी अवघा साडेपाच वर्षांचा होतो त्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी दूरदर्शनच असल्याने चित्रपट टीव्हीवर येईपर्यंत बराच वेळ वाट बघावी लागे, म्हणून माझ्या बाबांनी रविवारच्या शो चे तिकीट काढले होते. दिवसभर दादर चौपाटीवर घालवल्यानंतर सायंकाळी दादर येथील प्लाझा सिनेमा या थिएटरमध्ये माझ्या आई बाबांसोबत मी हा चित्रपट पाहिला होता.

 

मराठी सिने सृष्टीतील दिग्गज लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुशांत रे, सुधीर जोशी, निवेदिता जोशी, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर, अश्विनी भावे असे बहुरंगी नट- नट्यांनी ह्या चित्रपटाला आपले योगदान दिले होते. स्वतः सचिन पिळगावकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षकांना फार हवाहवासा वाटतो. तीन मित्र एकमेकांना जीव लावणारे, लोकांना मदत करणारे, कसे वेगवेगळ्या रूपांमध्ये एकमेकांना वेळप्रसंगी मदत करून चित्रपटातून एक वेगळेच उदाहरण प्रस्थापित करतात हे पाहायला मिळाले.

 

चित्रपटाचा आढावा घ्यायचा तर पर्षा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुध्या म्हणजे सचिन पिळगावकर हे कोल्हापुरात राहत असतात. प्रचंड कलाप्रतिभा अंगी असून देखील स्ट्रगलर असतात. लक्ष्मीकांत बेर्डे हे एका तालमी मास्तरांकडे काम करत असतात परंतु तालमी पेक्षा खाजगी नोकरा सारखीच त्यांना वागणूक मिळत असे. ही जणू त्यांच्यासाठी त्रासदायक वाटणारी गोष्ट असे. त्यांची तिथेच तालमी मास्तरांची मुलगी कमळा (म्हणजेच प्रिया अरुण) यांच्याशी ओळख होते व त्याचे रुपांतर प्रेमात होते.

 

अखेरीस एकदा तालीम मास्तर जेव्हा कमळा आणि प्रशाला एकत्र पाहतात तेव्हा पर्षाला नोकरीवरून पगार देऊन अक्षरशः हाकलून देतात. त्याच वेळी सुध्याला देखील त्याचे काका घरातून हाकलून देतात. दोघेही मित्र नव्या जिवनाची स्वप्न घेऊन कोल्हापूरहून पुण्यात येतात आणि इथूनच या चित्रपटाला एक वेगळी मजा सुरू होते.

 

पुण्यात त्यांचा जिवलग मित्र धनंजय माने (म्हणजेच अशोक सराफ) हे विश्वास सरपोतदार (म्हणजेच सुधीर जोशी) यांच्याकडे भाड्याने राहत असतात. यामध्ये धनंजयचा भाऊ शंतनु माने (म्हणजेच सुशांत रे ) डॉक्टरीच्या अभ्यासासाठी धनंजय सोबत राहत असतो. हे कसं-बसं सुरू असताना या कोल्हापुरी दोन मित्रांची भर त्यात पडते आणि घर मालकाला कसेतरी मूर्ख बनवत हे चौघे जण दोन जणांच्या भाड्यात त्या खोलीत राहतात.

 

शेवटी सुध्या एका संगीत शाळेत नोकरीवर लागतो आणि त्याची पार्टी करून घरी येताना दारूच्या नशेत हे तिघेही घरमालकाच्या घरी धिंगाणा घालतात, ज्याच्यामुळे चिडून जाऊन शेवटी विश्वासराव सरपोतदार या चौघांना घर सोडण्याच्या आदेश देतात. धनंजय माने इथेच राहतात का ? हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अजरामर डायलॉग आजदेखील सर्व प्रेक्षकांना लक्षात आहे. धनंजय ज्या ठिकाणी कामाला असतात तेथील त्यांच्या लेडी बॉस (अश्विनी भावे) फार शिस्तप्रिय असल्याने बरेचदा त्यांच्यावर राग काढत असत पण मनोमन त्या धनंजय माने यांना प्रेम देखील करत.

 

हा सर्व खेळ खंडोबा सांभाळताना धनंजयची घराची शोधाशोध सुरू राहते. अखेरीस शंतनू आणि धनंजय एका घरी जातात. तेथील घर मालकीण "मी फक्त जोडप्यांनाच घर देईन" असे म्हणते आणि नैराश्येत माने बंधू परत निघतात. त्याच वेळेस परशा आणि सुध्या देखील पुण्यात घर शोधत असतात व त्यांना देखील निराशाच हाती लागते. असे करत-करत चालता चालता पुण्यातील बालगंधर्व रंगायतन जवळ हे चौघे जण एकमेकांना अकस्मित पणें भेटतात आणि चौघेही बालगंधर्व रंगायतन येथे जातात. बालगंधर्व रंगायतनात गेल्यानंतर बालगंधर्वांची स्त्री पात्राच्या रूपात एक प्रतिमा सर्वांच्या नजरेस पडते आणि धनंजय माने यांना एक विलक्षण कल्पना सुचते.

 

थोड्याच वेळात हे सर्व एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला बसतात आणि धनंजय हे परशा आणि सुध्याला बालगंधर्वां सारखे स्त्री पात्राच्या रूपात येण्यास सांगतात कारण त्या शिवाय त्यांना घर मिळणे शक्य नसते. बराच होकार नकार नंतर परशा ही धनंजय माने यांची पत्नी पार्वती बनते आणि सुध्या हा सुधा या रूपात शंतनूची पत्नी बनते.असे करून शेवटी हे सर्व त्या घरमालकीणकडे तिच्या घरात राहायला जातात.

 

सुधा, शंतनू व धनंजय हे तिघे अनुक्रमे गायन शाळा, लायब्ररी आणि ऑफीस येथे जाऊ लागतात.

परंतु परश्या उर्फ पार्वती मात्र घरीच राहते. बाईच्या रूपात परश्या उर्फ पार्वती ही भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी  आणि सचिन पिळगावकर यांनी सुधा ची भूमिका इतकी सुंदर केली रंगवली आहे की त्याला काही तोड नाही.

 

या चित्रपटात खोटं बोलता बोलता एकदा तर पार्वती चे डोहाळे जेवण देखील केले जाते. " कुणीतरी येणार येणार ग" हे अजरामर गाणं कोणत्याही डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात आज देखील वाजल्या शिवाय राहत नाही.

 

घर मालकीण यांची नातेवाईक असलेली सुप्रिया पिळगावकर व तिची मैत्रीण निवेदिता सराफ जेव्हा घरी येतात तेव्हा आपला प्रियकर शांतनु माने याला लग्न झालेला बघून निवेदिता थक्कच राहते. सुप्रिया ह्या सचिन च्या प्रेमात पडतात तर निवेदिता प्रेमभंगाने नाराज होते. अखेरीस सुधाला कॅन्सर आहे म्हणून मी तिच्याशी लग्न केलं असे समजूत काढत शंतनु निवेदिताला कसे तरी समजावतो.

 

चित्रपटाच्या शेवटी घरमालकिणीचा पुतण्या ( विजू खोटे ) घरमालकिणीवर हल्ला करतो व त्याला उत्तर देत ह्या भाडोत्री व पुतण्या मध्ये घमासान होते व त्यामध्ये पर्षा व सुध्या चा खरा चेहरा समोर येतो. सर्व शांत झाल्यावर "आम्हाला तुम्हाला फसवायचे नव्हते पण आमच्या समोर पर्याय नसल्याने आम्ही हे केले " असे सांगून सर्वजण घर मालकिणीची माफी मागतात. हे सर्व झाल्यावर अखेरीस अशोक सराफ-अश्विनी भावे यांचे होतात, सचिन हे सुप्रियांचे होतात, शंतनू निवेदिता यांचे होतात व लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया अरुण चे होतात आणि चित्रपटाची गोड सांगता होते.

 

आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांना हसवून जे काम या कलाकारांनी केले ते शब्दातीत आहे. साधारण ३४ वर्षे जुन्या चित्रपटाला आढावा या शीर्षकाखाली आज मला शब्दात व आठवणी रूपात सांगता आले याचा मला प्रचंड आनंद आहे.

 

आदरणीय श्री लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत, आशा करतो की ह्या सिनेमाची आठवण आपल्या मनात पुन्हा एकदा ताजीतवानी झाली असेल.

 

आपलाच

अमेय पद्माकर कस्तुरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू