पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आपलं कार्यक्षेत्र आपलं प्रभावक्षेत्र झालं पाहिजे......!

जिंकण्यासाठी लेखांक ३

आपलं कार्यक्षेत्र आपलं प्रभावक्षेत्र झालं पाहिजे......!

                डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर 

 

        जगातील कोणतेही कार्यक्षेत्र श्रेष्ठ अश्रेष्ठ अशी विभागणी करणे चूक आहे. तर आपण आपला प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण केले पाहिजे. आपले कार्यक्षेत्र आपले प्रभावक्षेत्र व्हावे, यासाठी ध्यानी ठेवाव्या अशा काही गोष्टी ......

 

1.         कार्यक्षेत्र कोणतेही वाईट नाही. त्या कार्यात आपण कुशल नसणे मात्र वाईट आहे. कौशल्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याने खरा आनंद मिळतो; त्याची गोडीही अवीट आहे. 

अनेकदा लोकांना असे वाटते की, ते ज्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत, तेथे अशी काही तरी कमतरता आहे, ज्या मुळे त्यांना यश मिळविता येत नाही. परंतु अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी अशी परिस्थिती नसते. तर आपण अजून आपले कौशल्य, जे त्या क्षेत्रात आवश्यक आहे, ते विकसित केलेले नसते. त्यामुळे अनेकदा अपमान सहन करावा लागतो. म्हणून कितीही वर्षे त्या क्षेत्रात कार्य केले, तरी कौशल्य विकासाला जागा शिल्लक असते. म्हणून कौशल्य विकसनासाठी निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. यातून आनंदाची निर्मिती होते. मन आनंदी असले की, कार्यक्षमता वाढते. मग कार्य अधिक यशस्वी होते. मग सन्मान केला जातो. आणि त्यातून पुनश्च आनंद लाभतो. असे एक सुखचक्र निर्माण होते.

 

2.         जा कोठेही खुशाल, पण सर्वाग्रणी होण्याचे लक्ष्य प्राप्त कर. जगातील प्रत्येक जण सहकारी आहे; बघ, तुला ते सहकार्य कितपत घेता येईल.

जगातील प्रत्येक माणूस हा आपल्याला सहकार्य करीत असतो. प्रश्न असतो, ते सहकार्य आपल्याला घेता येते का, हा. जर आपले लक्ष हे कोणत्याही क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे असेल, तर आपल्याला सहकाऱ्यांची नितांत गरज असते. हे सहकार्य प्राप्त करताना आपण समवेतच्या व्यक्तींना कशी वागणूक देतो, त्यांच्याकडे कसे लक्ष देतो, त्यांच्या सुखदु:खात कसे सामिल होतो, या वर बरेच काही अवलंबून असते. तुमच्या स्टाफला जेव्हा तुम्ही केवळ बॉस न वाटता, एक चांगले मित्र, मार्गदर्शक वाटता, तेव्हा तुमच्या यशाची काळजी तुमच्या इतकीच त्यांनाही वाटत असते.

 

3.         भेटतील तुमच्यावर जळणारे, पण लक्षात असू द्या- त्यांना प्रतिक्रिया द्याल तर त्यांचे उद्दिष्ट तुम्हीच सफल करीत आहात.

यशासोबत तुम्हाला तुमच्यावर जळणारी माणसं भेटतील. विरोधक भेटतील. तुम्हाला त्रास देण्यात येईल. ज्या झाडाला फळे अधिक, त्याच्यावर दगडं मारतात लोक. पण तुम्ही मात्र नेहमी त्यांना प्रतिक्रिया देण्यात तुमची उर्जा खर्च करू नकात. यामुळे तुमची प्रगती थांबेल. आणि त्यांचे जे उद्दिष्ट, ते तुम्हीच तडीस नेल्यासारखे होईल. जेथून जेथून तुम्हाला नकारात्मक उर्जा मिळते, असे वाटते, त्या त्या केंद्रांना UNFOLLOW करा. आणि तुम्ही तुमची वाट चालत रहा.

 

4.         सतत, दीर्घ काळ, न थकता गुणवत्ताप्रधान कार्य करणे हे जगातील सर्वश्रेष्ठ व्रत आहे. हे व्रत शत्रुदमनार्थ वज्रासारखे उपयोगी आहे.

तुम्ही यशाची शिखरे सर करताना कधी कधी विरोध एवढा वाढतो की, लोक तुमच्यावर जळतात, तुमचे विरोधक होतात, शत्रुत्व देखील करू लागतात. या वेळी थकू नका. नियमितपणे कार्य करीत रहा. आपल्या कार्याची गुणवत्ता कशी वाढेल, या कडे लक्ष द्या. यामुळे तुमच्या विरोधकांची तोंडे बंद होतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जेथे वितुष्ट मोठ्या प्रमाणात आले आहे, तेथे खूप संघर्ष करून राहण्यापेक्षा नवीन वाट शोधा आणि यशस्वी व्हा.

 

5.         इतिहास घडविण्यासाठी इतिहास समजून घेऊन भूगोल बदलावा लागतो. पराक्रमाचा इतिहास याची साक्ष देण्यास पुरेसा आहे.

तुम्हाला नवीन इतिहास घडवायचाय? मग सर्वप्रथम इतिहासात रंजन करणे सोडा. इतिहास समजून घ्या. इतिहासात तुमच्या साठी चूक काय, बरोबर काय हे सांगण्याचे सामर्थ्य असू शकते. तुम्हाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असू शकते. म्हणून इतिहास समजून घ्या, त्या पासून प्रेरणा घ्या. आणि भूगोल म्हणजे तुमची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. आज आपण ज्यांचा ज्यांचा इतिहास प्रेरणादायी म्हणून वाचतो, त्या सर्वांनी प्राप्त परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न जितका यशस्वी तितका मोठा पराक्रम म्हणून इतिहास त्याची नोंद घेत असतो.

6.         मातृत्व, पितृत्व या शब्दाप्रमाणेच मित्रत्व या शब्दाला पर्याय नसतो. एक मित्र देखील अनेक संकटांतून तारून नेतो; मग अनेक मित्र असतील, तर किती छान!

सामान्यतः आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आई, वडील यांचे स्थान अद्वितीय असे असते. असेच स्थान मित्रांचेही असते. श्रीकृष्णासारखा एक मित्र अर्जुनाला, सुदामाला कशा प्रकारे संकटातून वाचवितो, परिस्थिती अनुकूल करतो, हे आपण वाचतो.

आपण ज्याच्यासमोर अगदी सहज व्यक्त होऊ शकतो, असा किमान एक तरी मित्र आयुष्यात जोडणे आवश्यक आहे, ज्याला तुमच्या यशात आनंद होईल आणि अपयशात दु:ख होईल. एक समानानुभूतीचे नाते दोघांमध्ये असेल.

असा एकही मित्र तुम्हाला अनेक संकटातून वाचवू शकतो. जर असे एकापेक्षा अधिक मित्र असतील, तर किती छान!

******

(क्रमश:)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू