पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाहिले न मी तुला..

मला आवडलेले नि मनात रुतून बसलेले गीत. " पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले."


हिंदी आणि मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत लेखक म्हणून अत्यंत यशस्वी झालेले कवी- गीतकार, कथा-पटकथाकार, संवाद लेखक, नाटककार मधुसूदन कालेलकर यांचे पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले" हे गेली अडतीस वर्षे मराठी मनावर गारुड करून राहिलेले " चिरस्मरणीय, सुमधुर गीत.
खरेतर, या गीताच्या निमित्ताने मधुसूदन कालेलकर या विपुल नि कसदार लेखन करणाऱ्या नि आता विस्मृतीत गेलेल्या दिग्गज साहित्यिकाच्या लेखन प्रपंचाचा आपणास परिचय करून द्यावा असा माझा मानस आहे.
मधुसूदन कालेलकर यांना नाटकाविषयी अलोट प्रेम होते. ‘अखेर जमलं’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला. राजा नेने ह्यांच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. त्यानंतर ‘फिल्मिस्तान’ या संस्थेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथालेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. ‘आलिया भोगासी’, ‘पहिले प्रेम’, ‘पतिव्रता’, ‘सप्तपदी’, ‘ह्याला जीवन ऐसे नांव’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. त्यांचे काही प्रमुख हिंदी चित्रपट ‘बात एक रात की,’ ‘ब्लफ मास्टर,’ ‘झुमरू,’ ‘फरार,’ ‘दुल्हन वही जो पिया मन भाये,’ ‘अखियों के झरोखों से,’ ‘गीत गाता चल,’ इत्यादि होते.
फिल्म फेअर १९७८ चा सर्वोत्तम पटकथा लेखनाचा पुरस्कार ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आला. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ , ‘पाहू रे किती वाट’ ‘अपराध’, ‘जावई विकत घेणे आहे’ ‘अनोळखी’ ‘गुपचूप गुपचूप’ तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना एकूण नऊ वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद यांसाठीचे तसेच बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई” गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीत लेखनाचे असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. “हा माझा मार्ग एकला” या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.
चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपुल नाट्यलेखनही केले. स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले ‘उद्याचे जग’ हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. १९६३ या वर्षी आलेले ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ हे त्यांचे नाटक नाटकं खूप गाजले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, गंभीर,असे सर्व विषय त्यांनी आपल्या नाटकांमध्ये हाताळले. ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘आसावरी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘अबोल झालीस कां’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘ चांदणे शिंपित जा’, ‘या घर आपलंच आहे’, ‘नाच हा माझा’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘हे फूल चंदनाचे’, ‘अमृतवेल’, ‘शिकार’, ‘ही श्रींची इच्छा’ ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. सुगम भाषा आणि पकड घेणारे संवाद त्यामुळे त्यांची नाटके चित्ताकर्षक ठरली; रसिकांना भावली.
कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले. त्यांच्या ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ व ‘शिकार’ ह्या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचे पारितोषिक मिळाले.
आता आपण कालेलकरांच्या "पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले" या गाण्याकडे वळू. अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार, महेश कोठारे, पद्मा चव्हाण, डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिका असलेल्या "गुपचूप गुपचूप " या १९८३ च्या विनोदी चित्रपटातील "पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले" हे संगीतकार अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेले गीत, सुप्रसिद्ध गायक श्री.सुरेश वाडकर यांनी गायले आहे. पडद्यावर ते कुलदीप पवार यांनी म्हटले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नि गीत लेखन अर्थातच मधुसूदन कालेलकर यांचे होते. गीताचे शब्द असे आहेत,
पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला................‌.. । ध्रु ।
हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला .....(१)
का उगाच झाकिशी नयन तुझे साजनी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला.......(२)
मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला........(३)
सिनेमातला प्रसंग असा आहे, गायक सुरेशकुमारच्या भूमिकेत कुलदीप पवार रेडिओवर गात असतो. त्यावेळी रंजना बाथटबमध्ये‌ स्नान करीत असते. ती गायक सुरेश कुमारवर मनापासून प्रेम करीत असते. "पाहिले न मी तुला" हे गाणे सुरेशकुमार आपणाला उद्देशूनच म्हणतो आहे; अशा स्वप्नरंजनात रंजना गुंग झालेली असते. टबमधील फेस हिम वर्षावासारखा तिच्या अंगा खांद्यावर उडतो, गालावर ओघळतो. तिची ती सचैल, शुभ्र- धवल अंगकांती पाहून आकाशातल्या तारकांनाही आपण तिच्यासमोर निष्प्रभ दिसत आहोत, याची लाज वाटावी एवढी ती सुंदर दिसत असते.
दुसरे कडवे महेश कोठारे आणि त्याची प्रेयसी यांच्यावर चित्रित झाले आहे. चित्रपटात मात्र या कडव्यातील " का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी " ही एकच ओळ घेऊन लगेच तिसरे कडवे घेतले आहे. महेशच्या मिठीत ती फुलून येते; अंगांग शहारल्यामुळे लाजरी बावरी होते, आपले मुख ती आपल्या हातांच्या ओंजळीने झाकून घेते; तेव्हा तो म्हणतो," का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी? बेभान करणाऱ्या तुझ्या मिठीतला हा चंदनी स्पर्श तुझे माझ्यावर अलोट प्रेम असल्याचे गोड गुपित मला सांगतो आहे, तुझ्या स्पर्शातील असोशीने मला देहभान विसरायला लावले आहे;"
तिसऱ्या कडव्यात धमाल मजा आहे. महेश कोठारेची प्रेयसी प्रत्यक्षात त्याच्याशी प्रेमालाप करते आहे. रंजना स्नान करता करता गायक झालेल्या कुलदीप पवारला मनोमन आपल्या नजरेसमोर आणून, त्याला आपले आरसपानी,सचैल सौंदर्य अधिक खुलवून दाखवित आहे; तर तिच्या वडिलांवर म्हणजे डॉ. श्रीराम लागू यांच्यावर प्रेम करणारी प्रौढ वयाची पद्मा चव्हाण त्यांच्या प्राप्तीसाठी बिछान्यावर तळमळते आहे.
गायक सुरेशकुमार रेडिओवरील आपले गाणे बेभान होऊन गात असतो. कॅमेरा कधी बाथ टब मधल्या रंजनावर भिरभिरत असतो. तर कधी पलंगावर पहुडलेल्या नि श्रीराम लागू यांच्यावरील आपले प्रेम सफल व्हावे म्हणून तळमळणाऱ्या पद्मा चव्हाण ची तगमग प्रेक्षकांना दाखवित असतो. रेडिओवर ऐकू येणारे सुरेशकुमारच्या गाण्याचे बोल दोघीही अधीर मनाने ऐकत असतात. तो म्हणत असतो, माझ्या आठवणीने तू इतकी अस्वस्थ झाली आहेस की, पिसासारखी मृदू शैयादेखील तुला काटे टोचावेत तशी टोचू लागली आहे; आता माझ्या नजरेसमोर आरशात स्वतःला निरखणारी तू मला दिसते आहेस, तुझ्या त्या विलोभनीय दर्शनाने मी सुखावलो आहे. तर मंडळी, असे हे रसिकांना वर्षानुवर्षे भुरळ पाडणारे अवीट गोडीचे गीत आता माझ्या आवाजात ऐकवून मी या लेखाची सांगता करतो.

सर्जेराव कुइगडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू