पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कोरोनाच्या निमित्ताने

ओ काकी, तिला बोलवा, तिला पण पाठवा.” हे शब्द कानावर पडले तेव्हा मी आतल्या खोलीत बसले होते. हे आमंत्रण माझ्यासाठीच आहे हे मला लगेचच लक्षात आलं. कारण त्या घरात माझी मावशी, तिचे मिस्टर ज्यांना तात्या म्हणत, माझा मावस भाऊ आणि त्याची बायको व त्यांचा मुलगा सोनू हे होते. त्यामुळे ‘ती’ म्हणजे मीच हे मला कळले. पोटात गोळा, मनात धस्स आणि डोक्यात राग (खरंतर उगीच) अशी माझी अवस्था झाली होती. “काय हा आगाऊपणा, माझा काय संबंध? आणि एवढे घरोघरी जाऊन कसले बोलावणे दयावे? ज्यांना जायचे ते जाणारच ना? बरं तर बरं राहायला आलेल्या पाहुण्यांवर कसली जबरदस्ती? काय तर म्हणे तिला पण बोलवा ना.” माझी मनात पिरपिर.


मी माझ्या तृतीय वर्ष म्हणजेच टी.व्हाय.च्या परीक्षेसाठी माझ्या मावशीकडे जवळजवळ महिनाभर मुक्कामाला होते. कारण परीक्षेचे सेंटर जवळ आणि सोयीचे होते. मावशी राहायला ठाण्यातील आनंदाश्रम सोसायटीत. आनंदाश्रम म्हणजे ठाण्यातील मोठी जुनी सोसायटी. पण सोसायटी म्हणजे आत्तासारखी ब्लॉकवाली सोसायटी नाही. मोठी एल आकारात दोन मजली चाळ पद्धतीची एक इमारत आणि समोर अजून एक. चाळ म्हटले तरी सर्वांची मालकीची घरे होती. आणि सोसायटी म्हटले तरी चाळ संस्कृती जपलेली. मोठी कॉमन बाल्कनी, या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचे म्हणजे छान शतपावली होऊ शकेल अशी. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घरांची उंची. प्रत्येक घराचे छत एवढे उंच, की स्वयंपाकघरातून जिन्याने वर जाणारा पोटमाळा (खरंतर पोटखोलीच) होता. त्या खोलीत अभ्यास करायला मला फार आवडायचे.तर, चाळ संस्कृती अर्थातच इथे जोपासलेली, गप्पा-गोष्टी, एकमेकांची चौकशी, एकत्र सणवार साजरे करणे हे चालायचे. दिवाळीत एकसारखे कंदील ही इकडची परंपरा आणि कोणीही या कल्पनेला विरोध (बहुतेक) केला नसावा. लांबून सोसायटीत शिरताच एका रंगाचे कंदील दुसऱ्या, पहिल्या आणि खालच्या मजल्यांवर खूप सुंदर दिसायचे.


    पण इकडे आज मला मात्र हे उत्सवप्रेम नकोसे झाले होते. मुळात माझा स्वभाव जरा अबोलच. आणि अनोळखी किंवा फार परिचयाचे नसलेल्यांशी तर अजिबातच मी बोलायला नाही जायचे. आपणहून ओळख काढणे, विषय वाढवणे ह्या भानगडीत मी पडायचे नाही.


अगदी नेहमीच्या संपर्कात असलेल्यांशीच , मग ते नातेवाईक का असेना. त्यांच्यातच जास्त मिसळणारी. शिवाय स्वतः बिल्डिंग (इंग्रजी बिल्डिंग म्हणजे जिथे बंद फ्लॅट्स आणि कॉमन बाल्कनी नसते ती) मध्ये राहणारी. त्यामुळे तिथल्या वेगळ्या संस्कृतीत वाढलेले. चाळीतला मोकळेपणा, सर्रास एकमेकांच्या घरांमध्ये जाऊन बोलण्याची सवय, येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवणे, हाक मारणे, - हे सर्व तिथे नाहीच. आमच्याकडे (बिल्डींगमध्यये) घरात शिरले की दार आपटायचे, आणि काहींकडे तर लॉक (डबल, टिबल,अरथात सुरक्षिततेसाठी ). बिल्डिंगमध्ये कसे सगळे 'सोफिस्टिकेटेड'. सगळे आपापली 'प्रायव्हसी', 'स्पेस' जपणारे. दुसऱ्यांच्या घरात न डोकावणारे, लुडबुड न करणारे. 'आपण भले आणि आपलं काम भलं', या तत्वाचे पालन करणारे. शेजार्यांच्या उगीच चौकश्या करणं म्हणजे ईथे 'बॅड मॅनरस'! याला अपवाद नव्हतेच किंवा नसतातच असं नाही, पण सर्वसाधारण हाच साचा. त्यामुळे मला मावशीकडे आवडत असले तरी परिचय नसलेल्या तिथल्यांशी मैत्री करण्यात रस नव्हता. अभ्यास हेच माझे ध्येय होते. आता मात्र माझ्या 'पॅटर्न' ला धक्का बसला होता. “एवढ्या गर्दीत खाली जायचं”, असा विचार करत असतानाच “अगं चल ना, थोडा ब्रेक घे”, असा वहिनीचा आवाज. “हो ना, जरा बरं वाटेल. सविताचं गाणं पण आहे.” मावशीचा दुजोरा. "जा, जाऊन ये थोडा वेळ." तात्याही. एकावर एक आघात. ऋषीचा आनंद तर काय सांगावा. लहान मुलांना कसली पण मज्जा येऊ शकते ... पण पर्याय नव्हता. सगळ्यांच्या शब्दाला मान ठेऊन मी निघाले. कपडे बदलून वहिनीबरोबर खाली उतरले. खाली सगळी मंडळी जमलीच होती. "सुरु करूया का? सगळे आले आहेत." हा सोहळा काय होता असा प्रश्न पडला असेल. तर उत्सव होता मावशीच्या सोसाटीतल्या होळीचा.


आनंदाश्रमातील होळी जोरदार.बहुतेक करून लहान-मोठे सगळे सहभागी व्हायचे. होळी मोठी पेटली आणि त्याहीपेक्षा मोठ्या होळीच्या बोंबा. टिंबटिंबच्या बैलाला ढोल.... हे बिनधास्त घुमत होते. वहिनी आणि भाचा पुढेपुढे होत गेले तशी मी मागनं सटकले. हुश्श्य होणे काय ते चांगलेच अनुभवले!! वर आले आणि मनातील बोंबा सुरु झाल्या.


"हे जरा अतीच होतंय. माझा किती वेळ फुकट गेला. कितीतरी वाचून झाले असते एवढ्या वेळात. ज्यांना यायचं ते येतील. बाकीच्यांना जबरदस्ती कशाला?" धड अभ्यासातही लक्ष लागेना. तेवढ्यात शेजारच्या काकू परत आल्या आणि पुन्हा आमंत्रण घेऊन, "अगं तुझ्या वहिनीचं गाणं आहे नेक्स्ट, ये लवकर." मला आताही नाही म्हणता आले नाही. मी पुन्हा खाली गेले. आता मात्र वहिनीचे गाणे, सोनूचा डान्स, छकुलीचा गरबा, कोणाचे कोणते कार्यक्रम बघूनच जायचं असं ठरवलं. अशा रीतीने होळीचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी, रंगपंचमीला मात्र मी कटाक्षाने जायचे नाही हे ठरवून टाकले. अभ्यासाचे कारण पुढे करून जाण्याचे टाळले (रंग खेळायला पण बोलावणे आले हे सांगायला नकोच).


त्यावेळी मी आणि माझ्या मैत्रिणी चाळ म्हटले की कपाळाला हात लावायचो. “फारच लोक ढवळाढवळ करतात बाबा”, मी. “आणि कायकाय मागायला येतात, अगदी साखर, चहा, मिरची, आलं, कांदा......” मैत्रीण. “आणि पाण्यासाठीची ती भांडणं” अजून आमचे खिदळणे. “नको रे बाबा चाळ.”


 दरम्यान शिक्षण पूर्ण झाले. ठरवल्याप्रमाणे शिक्षिका झाले. त्यामुळे मुलांशी संपर्क आला. विशेष करून किशोरवयीन मुले. ती कशी वागतात-बोलतात, त्यांच्या समस्या, अडचणी हे बघत होते. बरीच मुलं सांगतात की त्यांना मित्र-मैत्रिणी नाहीत, किंवा कोणी त्यांच्याशी मैत्री करत नाही, केली तर भांडणे होतात, घरात कंटाळा येतो, ग्रुपमध्ये बोलायला भीती वाटते..... असे  काही.


थोडेफार समुपदेशनाबद्दलचे वाचन आणि सामान्य जीवनातील बदल, अडचणी,अस्थिरता, हयांचे निरीक्षणही होत होते. शिवाय संपूर्ण जगात मानसिक आरोग्याची समस्या आ वासून बसली तेही कानी, वाचनात येत होते.. किंबहुना बरेचसे शारीरिक आजार हे मानसिक ताणतणावाशी निगडित आहेत हे सिद्ध व्हायला लागले होते. ऐव्हाना चीन -अमेरिकेसारख्या देशांनी एकंदरच जगण्याचे नवीन आयाम घालून द्यायला सुरुवात केली होती. भर्दाव वेगाने पुढे गेलात तर ठीक, नाहीतर मागे राहाल, अर्थात अपयशी राहाल, हे भिनवले गेले. मग काय, मॉंटेसरीपासूनच शर्यतीला सुरुवात!! अमेरिकेमधील व्यक्तिस्वतंत्रता आणि 'अर्थ' वाद इथेही रुजला. आणि त्याचबरोबर आले ते श्रीमंती आजार - ज्यात 'डिप्रेशन' आणि त्याच्या नातेवाईकांनी शिरकाव केला. अहो, आजच्या कोरोनाच्या संसर्गापेक्षा कमी दाहक नाही हा – फक्त पटकन दिसत नाही एवढेच. त्यातच छोटी कुटुंबे, विभक्त कुटुंबपद्धती, शहरांकडे मोर्चे हे बदल झाले. कदाचित ते गरजेचे आणि स्वाभाविक होते. पण गम्मत अशी की शिक्षण, पैसा आणि शहरी जीवन, यांच्याबरोबर आपल्याला मिळाले ते 'फ्री आणि छुपे गिफ्ट' - ज्यात मानसिक ताण, अस्वस्थता हे होते. आणि या गोष्टी लक्षात येत नाही बहुतेक वेळा. लॅबमध्ये एक चाचणी केली आणि आले रिपोर्ट्स असं होत नाही. आणि कळले तरी समजून सांभाळून घेण्यासाठी जवळ माणसे नाहीत. कुटुंबाचा आकार 'हम दो हमारे दो, मग हमारे तीन, मग डबल इनकम नो किड्स, आणि हल्ली तर सिंगल' वर येत चालला आहे. या कौटुंबिक आकुंचनाचा परिणाम असेल म्हणा की एकटेपणा आणि नैराश्य हे वाढायला लागले. पूर्वी या ताणाचा निचरा करायला आणि त्याची तीव्रता कमी करायला आजूबाजूला हक्काची माणसे असत. आता तसे कठीण. याला प्रमुख कारण म्हणजे 'फ्लॅट सिस्टिम' आणि प्रायव्हसीचा अतिरेक. मग काय??? एकला चालो रे!!! 

हे काहूर  चालू होते तेवढ्यात मोबाइल वाजला. स्क्रीनवरची नावं भलतीच होती. तरीही आज मी तो उचलला. "अगं अंजु मी बोलते, रानडे काकू”. आता यांनी का फोन केला असेल, काय काम असेल? हे क्षणार्धातले प्रश्न.


"अगं मी तुझा नंबर आपल्या शेजारच्या मिनीकडून घेतला. तू इकडे राहतेस कळले आणि एवढी खुश झाले."


मला कळे ना माझ्या माझ्या ह्या घरात राहण्याने काकू का खुश झाल्या होत्या. "ते का काकू?', मी विचारलेच. "अगं तीच तर गम्मत आहे. ओळख पाहू मी कुठे असेन आत्ता." मी ओळखू शकणार नाही हे त्यांनीही ओळखले आणि म्हणाल्या, "अगं समीर तुझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायला आला आहे. मागच्या महिन्यांपूर्वी बदली झाली त्याची. बघ बघ, बरोबर तुझ्या समोर मी उभी आहे खिडकीत." मावशी उत्साहाने बोलत होत्या.


"अरे वा,  तुम्ही कधी आलात इकडे?"


"कालच आले, पण काल समीरने फोन नाही करू दिला.. आज लगेच केला."


"या ना मग भेटायला. मी तर आता लॉकडाऊनमुळे घरीचआहे."


"हो हो नक्की." काकू.


रानडे काकू माझ्या आईच्या बिल्डिंगमध्ये राहायच्या. त्या आणि काका दोघेच राहायचे. मुलगा समीर पुण्याला. रानडे काकू बडबड्या आणि माणूसवेड्या. रोज संध्याकाळी खालच्या बाकावर बसून येणार् या- जाणाऱ्यांशी बोलायच्या. "आज साडी नवीन वाटतं." "सून काय म्हणतेय?"  .... असे प्रशन. उत्तरं मिळावेत अशी अपेक्षाही नसलेले!  मला राग यायचा. बरेचदा रानडे काकू काहीतरी मागायला यायच्या. जसे की कांदा, बटाटा, मिरच्या, बेसन... 


"या तर रोज काकांबरोबर फिरायला बाजारात जातात ना? आणायला काय होते?", माझा आईला प्रश्न. आई, म्हणायची “विसरल्या असतील." माझ्या आईला शहराची लागण झाली नसल्यामुळे  ती बहुतेक समजून घ्यायची, व  रानडे काकूंची 'इमर्जन्सी सप्लायर' हूऊन गेली होती! नंतर नंतर तिच्याही लक्षात यायला लागले की जी गोष्ट रानडे काकू मागून न्यायाच्या, ती त्यांच्या घरात छानपैकी टेबलावर किंवा शेल्फ्यात असायची! मग तर मला अजूनच राग यायचा. "काय बाई आहे. एवढे पण लक्षात नाही राहत का? फुकट घ्यायची सवय असते काहींना." मी कुरबूरायचे. रानडे काकू काही वर्षांनंतर कल्याणला गेल्याचे कळले  "आता, बरं झालं, आईच्या वस्तू वाचल्या."


तर सांगितल्याप्रमाणे मानसिक ताण-तणावाची चाहूल सर्वत्र लागायला सुरुवात झाली होती. याचे प्रत्यय रोजच्या वर्तमानपत्रांमधून येत होते. टोकाचे पाऊल म्हणजे आत्महत्या आणि दुसर्याचा जीव घेणे. मी तर म्हणेन हे दोघेही त्रासलेलेच. ही धोक्याची घंटा न ऐकल्यासारखे करून चालणारे नाही. मग यासाठी ध्यान, योग, चांगले छंद , आणि साकारात्त्मक विचार असे उपाय सुचवले गेले.


अशातच कोविड-१९ चे थैमान माजले आणि लॉकडाऊन जाहीर झाला. सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले गेले. सुरुवातीला मज्जा वाटली, टाळ्या वाजवल्या, ताटल्या वाजवल्या, दिवे लावले. मोबाइल, टीव्ही, आराम झाला. पण थोड्या दिवसांनी चित्र बदलू लागले. घरांमध्ये सदस्य मोजकेच. एरवी शाळा, कॉलेज, ऑफिस, मंदिर, इथे समवयस्कांबरोबर  वेळ जायचा. आता तर लॉक्अप मध्ये .


 एकमेकांना फोन केला तरी तेच तेच प्रश्न आणि तीच  तीच उत्तरं.


घरातील म्हणजेच कुटुंबातील माणसे सगळ्यात जवळची असली तरी त्यांच्या व्यतिरिक्तही बाकीच्यांशी नात्यांची देवाण-घेवाण तितकीच गरजेची असते. लॉकडाऊनमध्ये तर हे खूप प्रकर्षाने जाणवले. सरकारने जरी “सोशल डिस्टंसिंग” चा फतवा काढला असला तरीही थोड्या गप्पागोष्टी करायला शेजारी हवे हे चांगलेच जाणवले.


लॉकडाऊनची मुदत वाढत गेली तसा कंटाळा मला आणि बाकीच्यांनाही सतावतो आहे हे दिसत होते. खास करून जिथे एकएकटे राहणारे आहेत. याच भीतीनेही अमेरिकेत लॉकडाऊन न ठेवण्याचा निर्णय घेतला जात होता. तिथे तर नैराश्य (या परिस्थितीत) घालवण्यासाठी म्हणे श्वानाची मदत घेत आहेत. माझा जो विचार होता की नैराश्याचे मुख्य कारण हे एकटेपण आहे तो या सर्व प्रकारात पक्काच झाला.


आमच्याकडे देखील सासूबाईंची घालमेल आणि मुलीची चुळबुळ यांत कोंडून राहिल्यामुळे आलेला वैताग, समवयस्कांशी होणाऱ्या संवादाचा अभाव हे स्पष्ट होते. घरातील कामांमुळे माझी परिस्थिती थोडी बरी होती. 


“काय गोंधळ घालून ठेवलाय या कोरोनाने.” “घरात बसून बसून पाय आखडले आहेत”, सासूबाईंची तक्रार.


२-३ तारखेकडे कामवाल्या मावशी पगार घ्यायला आल्या. “कश्या काय आलात तुम्ही?” मी विचारले.


“आले, जरा पोलिसांना दादा-मामा करत. पैशांची गरज आहे ना. पगार घ्यायला चालले असे सांगितले.” “ताई, निम्मा पगार दिला तरी चालेल, पण दया थोडेतरी.”


मी अर्थात पूर्णच पगार दिला. तेवढ्यात सासूबाई बाहेर आल्या. आश्चर्य म्हणजे मुलगी आणि नवराही लगबगीने येऊन बसले. एरवी मावशींकडे ढुंकूनही न बघणारे दोघे चक्क येऊन बसले श्रोते बनून!


“या, बसा, काही नाही होणार करोना बिरोना. ए चहा टाक ग मावशींना.” मला सासूबाईंची आज्ञा. मला त्यांच्या हर्षाचे कारण कळत होते. किती दिवसांनी नवीन कुणीतरी गप्पा मारायला समोर होते.


“काय हो, कंटाळा येत असेल ना तुम्हाला पण? मी तर खूपच जेरीस आली आहे .” “कसला मेला तो करोना.” सासूबाई साचलेला राग काढत होत्या. आम्ही सगळे हळूच हसत होतो आणि मनातून सहमतही होतो.


"नाही हो, माझा वेळ मस्त जातो. सकाळी भरभर कामं आटोपते, सुनेला पाणी भरू लागते, आणि मग जाऊन बसते ओट्यावर. आजुबाजुच्या पण येतात. कामं झाली की गप्पा मारत बसतो. सध्या घरीच ना सगळ्या. बरं वाटतं." मावशी सांगत्या झाल्या उत्साहाने.


"अगं पण भीती नाही वाटत? कोरोना पटकन पसरतो ना?” सासूबाई. "जायचं कशाला हात लावायला कोणाला? दुरून बोलायचं आणि आम्ही नाही हळूहळू बोलत. आमचे आवाज तर काय ते – लाऊड स्पीकर...." म्हणत मावशींनी मोठ्याने हसून प्रात्यक्षिक दाखवले! चहा पिऊन मावशी गेल्या, मात्र बरंच मोलाचं शिकवून आणि सुचवून.


चाळ-संस्कृतीला मी एकेकाळी खूप नावे ठेवयाची. तेथील लोक दुसऱ्याच्या व्यवहारात लुडबुड करतात, आगाऊपणा वगरे. पण अनुभवाने, वयाने, आणि बदलत्या जीवनाचा जो कल आहे त्याने हे जाणवून दिले की चाळीत दारेच उघडी नसतात, तर मनेही. एकमेकांना सोबत करणे, वेळी-अवेळी मदत करणे, हे तर 'बाय डीफॉल्ट' असतेच. कुठे एकट्याना सोडून कामावर जाणाऱ्या आईला छोट्यांची चिंता नसते, तर कुठे वयोवृद्ध आई बाबा असतील तर त्यांचीही तितकी काळजी नसते.  माझा हट्ट चाळीत राहण्याचा नक्कीच नाही. ते बरेच जणांना रुचणार नाही. वास्तुकला कशीही असोत, 'शेजारनातं' हे मौल्यवान आहे. शेजाऱ्यांशी चांगले नाते हे आजच नाही तर पुढच्या काळात फार गरजेचे ठरणार आहे. ज्या 'प्रायव्हसी’ चा आज अभिमान वाटतो आहे ती घात करणार एवढे निश्चित. अगदी सहज शब्दात मला म्हणायचं आहे की जेव्हा आजूबाजूच्या घरामध्ये जाग असते तेव्हा पोराटोरांवर नजर राहते, चोऱ्यामाऱ्या कमी होतात, सोबत-मदत होतेच, एकाकीपण मोडले जाते,आणि डिप्रेशनचा वायरस जरा आटोकेयात येइल. हा विचार करत असता आठवण झाली ती वीस एक वर्षांपूर्वीच्या आनंदाश्रमातील होळीची. काय गरज होती मला आग्रहाने सामील करून घ्यायची? ना मी वर्गणी दिली होती, ना मी कोणी मोठी व्यक्ती होते. होती ती नैसर्गिक सामावून घेण्याची मानसिकता. त्या होळीचे मोल मला आत्ता समजतेय, कोरोनाच्या निमित्ताने!!!


तेवढ्यात दाराची बेल वाजली. दार उघडले तर समोर रानडे काकू.


"काकू तुम्ही?"


"हो गं, जरा भेटावे म्हटले तुला. कालच येणार होते. पण उशीर झाला."


"बोला ना काकू", मी.


"अगं अंजु समीरला ना आज कढी खिचडी खायची आहे. पण कढीपत्ता संपला आहे. जरा देशील का?"


मी हसले. "काकू, आत या. कढीपत्त्याचं राहू द्या.. बसा, मनसोक्त गप्पा मारू, एवढ्या वर्षांच्या , साठवलेल्या."


"हो ना, माझ्या मनातले ओळखलेस. कित्ती आठवणी आहेत. तुला आठवतंय का गं?...” मावशी तासभर बोलत राहिल्या.


समोर समीरच्या खिडकीत मस्त डवरलेलं कढीपत्याचं रोप दिसत होतं मला!!! 


मनमोकळे शेजारी हे हवेच... सांगते...


कोरोनाच्या निमित्ताने!!!


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू