पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळी आणि आठवणी

दिवाळी आणि आठवणी 

~~~~~~~~~~~~~

 

मी पाचव्या इयत्तेत शिकत होतो तेंव्हाची गोष्ट. माझे वडील तेंव्हा जाफराबाद ( जिल्हा : औरंगाबाद ) येथे मुख्याध्यापक होते. त्या काळात शाळा शक्यतो जून महिन्याच्या १२ किंवा १५ तारखेला सुरु होत असत. शाळेची सगळी खरेदी औरंगाबाद येथे करुन आम्ही शाळा सुरु होण्याच्या दोन-तीन दिवस आधी जाफराबाद येथे पोहोचलो. ठराविक दिवशी आमची शाळा सुरु झाली. नवे गाव, नवीन शाळा, नवे मित्र, नवे दफ्तर, नवीन युनिफॉर्म, नविन बुट आणि नवीन पेन अशा सगळ्या " नवीन नवीनच्या " तो-यात आम्ही शाळेत जाऊ लागलो. 

 

मोठ्या शहरातून आलेले, नाही म्हंटलं तरी थोडेसे का होईना पण "अप-टु-डेट" राहणारे आणि मुख्य म्हणजे हेडमास्तर सरांचे " चिरंजीव " म्हणून सगळेच आमच्याशी ओळख करुन घेण्याचा प्रयत्न करत होते व आम्ही पण तितकेच आपुलकीने त्यांच्याशी वागत होतो. एकंदरीत हा  " परस्पर परिचय " कार्यक्रम आम्हाला खूप सुखावून गेला. 

 

ही "ओळख परेड" अशीच चालू असतांना माझ्या वर्गातील एका मित्राचे लक्ष माझ्या नव्या को-या पेनवर गेले व त्याने माझा पेन बघायला मागितला. तो पेन उघडून, आतून, बाहेरुन, चालवून बघत असतांनाच मधली सुटी संपल्याची घंटा झाली, त्याने मला माझा पेन परत केला, मी घाईघाईत पेन दप्तरात ठेवून दिला व ही घटना विसरुन गेलो. 

 

दुस-या दिवशी सकाळी दप्तर काढून वेळापत्रकाप्रमाणे वह्या-पुस्तके लावून घेतली आणि शाळेत गेलो. शाळेत पोहोचल्यावर लक्षात आले की," पेन हरवला आहे," म्हणून त्या मित्राला विचारले तर, " मी तर पेन परत केला होता, तू शांतपणे शोध " असे तो मला म्हणाला, पण मला ते पटले नाही व माझा पेन त्यानेच ढापला आहे असा गैरसमज मी करुन घेतला. 

 

असेच चार पाच महिने गेले. दिवाळीची सुटी लागली म्हणून वह्या पुस्तकाचे कपाट आवरायला घेतले तर तो हरवलेला पेन मला सगळ्यात खाली पडलेला असल्याचे दिसून आले. पेन सापडल्याचा आनंद तर झालाच पण आपण त्या मित्रावर विनाकारण आळ घेतला, बोलणं बंद केलं याचं वाईट वाटलं. मी खजील झालो व एक अपराधीपणाची भावना माझ्या मनात निर्माण झाली, म्हणून मी त्याच दिवशी जवळच राहणा-या दुस-या एका मित्राला बरोबर घेऊन त्या मित्राच्या घरी गेलो,  पेन घरीच सापडल्याचे सांगितले व त्याची माफी मागून शांतपणे घरी परतलो. 

 

एक प्रचंड मोठे ओझे मनावरुन उतरले असल्याचा अनुभव मी त्या क्षणी घेत होतो. 

 

 

दिवाकर चौकेकर,  

गांधीनगर (गुजरात)

मोबाईल : 9723717047.

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू