पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवणीतली दिवाळी

- आठवणीतील दिवाळी -

दर वर्षी माझ्या माहेरचे आम्ही सारे वर्षातून एकदा दिवाळीच्या सुटीत मिळून कुठेतरी ट्रीपला जातो. एके वर्षी माझे भाचे - जावई श्याम यांनी त्याच्या गावी कोकणात जायचे ठरविले. सारे एका पायावर तयार झाले. अहो..ऽ...कोकणात जायचे म्हणजे एका पायावर काय....पायाच्या एका बोटावर सारे तयार. सर्व प्लॅनिंग झाले कोकण रेल्वेचे रिझर्वेशन केले लक्ष्मी पूजन करून निवांत दहा दिवस कोकणात जायचे ठरले. मुंबई-पुण्याच्या धावपळीच्या जीवनापासून साऱ्यांनाच काही दिवस निवांत शांतपणे राहायचे होते .
कोकण रेल्वेचा प्रवास एकदा तरी करावा असे लोक म्हणतात. पण ते असे का म्हणतात याचे प्रत्यंतर आले. परमेश्वराने कोकणाला भरभरून निसर्गाचं देणं दिलं आहे. ते हिरवेगार डोंगर.....डोंगर उतारावर असलेली भात शेती....विविध प्रकारची सुंदर हिरवीगार झाडे.....डोंगरातून नागिणी सारख्या वाटा.., रेल्वेही एखाद्या नागीणी सारखी नागमोडी वळण घेऊन जात होती. सर्वत्र हिरव्या रंगाची लयलूट झाली होती. हिरव्या रंगातही एवढ्या शेड्स असतात.... ते बघून चकित व्हायला होते. हे सारे त्या परमेश्वरालाच जमू शकते.....अशा हिरव्यागार डोंगरावरून झेपावणारे धबधबे.....तेच खाली आल्यानंतर वळणं घेत खळखळ आवाज करत.... नृत्य करत धावत होते. निरनिराळे पक्षी आकाशात मुक्त विहार करत होते.आकाशातही प्रत्येक वेळी विविध रंगांची बरसात होत होती. सारेच कसे विलोभनीय...बरोबर आणलेल्या फराळाचा आस्वाद घेत... त्याबरोबरच निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास कसा संपला ते कळलेच नाही.
आम्ही मुक्कामी पोहोचलो. श्यामच्या भावाने त्यांच्या घरातच आमच्या सार्‍यांची राहायची सोय केली होती.घर साधे पण मोठे होते. स्वच्छ आणि सुंदर. दारातील सुंदर रांगोळी, वर टांगलेला सुंदर आकाश कंदील आणि मंद तेवणार्‍या पणत्या... यांनी आमचे स्वागत केले.
समुद्राकाठी असलेले हे कौलारू घर.... अंगणात सुंदर तुळशीवृंदावन, घराभोवती सुंदर फुलांची बाग.... बाजूला नारळी पोफळींनी,तसेच काजू , अमसूल, फणस, केळी , सुपारी अशा अनेक झाडांनी सजलेल ते घर ..... आजूबाजूलाही अशीच सजलेली कौलारू घरं ....दोन झाडांना बांधलेला झोपाळा.मागच्या दारातून बाहेर पडलं की मनाला मोहवणारा तो...तो... समुद्र.दिवस - रात्र हाकारणारी त्याची गाज... सकाळ संध्याकाळ लाटांचं ते आवाज करत नाचणं... बघणं आणि त्या मऊ चंदेरी वाळूत अनवाणी चालणं....लाटांचं पाणी पायावर घेणे... अहाहा ! खरच स्वर्गसुख... स्वर्गसुख म्हणतात ते हेच का असा प्रश्न पडावा.
निसर्गाचे रूप पाहून तर आम्ही भारावलोच पण श्यामचे भाऊ व त्यांच्या घरातल्यां माणसांच्या अगत्याने व प्रेमाने आम्ही अधिकच भारावलो.रोज मस्त वेगवेगळा घरगुती फराळ आणि जेवायला माशांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यासोबत सोलकडी....मग काय.. सगळेजण डाएट वगैरे विसरून मस्त चापून खात होते.रोज उठले की सर्व आवरून मागच्या दाराने सर्वजण समुद्राकडे धावायचे. लहान मुलं तर समुद्र किनाऱ्यावर फेसाळलेल्या लाटा व रुपेरी वाळूत एवढे रमायचे की, जेवायला त्यांना ओढून घरात आणावे लागत होते. पाणी व वाळुमुळे दिवसभरात कितीही कपडे बदलले तरी परत वाळूने खराब होत. त्यांचेच काय मोठ्यांचीही स्थिती तीच.कपडे बादलीत टाकले की, बादली कपड्यातील वाळूने भरायची.मोरीतही वाळूच वाळू.
संध्याकाळी सूर्य मावळतीला जाताना पाहणे म्हणजे अहाहा ऽ ! क्षितीज व समुद्र यातील सीमारेषा अस्पष्ट होते.स्वच्छ व सुंदर रुपेरी वाळू वरून चालता चालता ते दृश्य पाहावे तो लाल-सोनेरी सूर्य आपले रंग आकाशात व समुद्रावर उधळत हळूहळू खाली जात असतो. चालताना मधेच एखाद्या झाडाची फांदी येते त्यातून तो सूर्य आपले सोनेरी किरण फेकत असतो. शांत समुद्रावर काही होड्या संथपणे किनार्‍याकडे येत असतात. समुद्राच्या लाटांच्या हळूवार आवाजात होडीतील कोळ्याची एखादी तान मनाला मोहून जाते. बघता बघता तो सुर्य समुद्रात बुडतो.आणि दिसेनासा होतो. पण....पण त्याच्या पाऊलखुणा.... सोनेरी लाल रंग अजूनही समुद्रावर रेंगाळलेला असतो. नंतर तोही सूर्या मागून हळूहळू लुप्त होतो.तोवर आकाशातला शशी... सूर्यदेव गेला हे पाहून हळूच डोकावत गालातल्या गालात हसत आकाशाच्या प्रांगणात उतरतो. त्या मागून त्याच्या सख्याही आपला चंदेरी घागरा सावरत येतात. आणि बघता बघता सर्वत्र चंदेरी सडा पडतो. सागर चंदेरी....मऊ वाळू चंदेरी.... सगळीकडे चंदेरी साम्राज्य पसरलेलं असतं. त्या जोडीला नीरव शांतता पसरलेली असते . आवाज असतो तो फक्त सागराच्या गाजेचा. त्या आवाजापुढे कोणा मुलालाही फटाके फोडायचे भान राहिले नाही.अशा या निरव शांततेच्या वेळी अचानक सुंदर स्वर कानी पडले. ....." रुपेरी वाळूत ... माडांच्या बनात ये ना....." नवीन लग्न झालेल्या भाच्याने... सुनिलने सूर लावला. त्याला साथ होती ती समुद्राच्या गाजेची आणि त्याच्या जीवनसाथीची....सुषमाची... एकमेकांच्या नजरेत नजर मिळवून... त्यांच्यातच ते रंगत.... गाणं म्हणत होते. त्या शांत वेळी ते मनाला खूपच भावले. नंतर त्या रुपेरी वाळूतच बसून चंद्र - चांदण्यांच्या गाण्यांची सुंदर मैफिलच रंगली.
बघता बघता सुटी संपली. परतीचा प्रवास सुरू झाला .शहराकडे येतांना छान एनर्जी तनामनात साठवून आम्ही परत आलो. शहरात राहून तोच कृत्रिम दिव्यांचा झगमगाट...छान छान कपडे अन् दागिने अंगावर घालायचे अन् ते सारं जपत हळूच, स्वतःला सावरत खुर्च्या... सोफ्यावर बसायचं.... तब्येतीला जपत फराळही मोजून मापून खायचा. फटाक्‍यांच्या कडकडाट ऐकायचा (आता फटाके उडवणे तसे कमी झाले आहे.) विजेच्या दिव्यांची कृत्रिम रोषणाई.... फटाक्यांची आतषबाजी... यात तो गरीब बिचारा चंद्र आणि चांदण्या कुठून दिसणार ? अशा परिस्थितीत 15 वर्षांपूर्वी साजरी केलेली दिवाळी आम्ही कशी विसरणार .....?

- स्मिता भलमे
- 9421058149

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू