पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी होतो मी नव्हतो

"मी होतो मी नव्हतो"

 -लेखक .श्री विश्वनाथ शिरढोणकर

 -मराठी कादंबरी बऱ्याच वर्षानंतर वाचन करण्याचा योग घडला. सहा-सात वर्षापूर्वी देवासच्या डॉ. प्रफुल्लताताई जाधव ह्यांनी सुरू केलेल्या मराठी वाचनालयमधे वि.स.खांडेकर ह्यांनी लिखित काही कादंबऱ्या वाचलेल्या आठवत आहे.

 -हिंदी साहित्यमधे जरी स्नातकोत्तर डिग्री मिळवली असली तरी मराठी कादंबरी विषयी आपले अभिप्राय व्यक्त करणे कठीण आहे. माझ्या क्षुल्लक बुद्धिचा वापर करून ह्या कृतीबद्दल जे काही विशेष लीहिण्यासारखे आहे ते लिखाण करून प्रस्तुत करत आहे.

 

-सशक्त संवाद 

 -कुठली ही साहित्यिक कृती वाचकांचे लक्ष तेव्हांच वेधून घेते जेव्हां त्यातले संवाद सशक्त असतात .तसे तर सर्वच पात्रांचे संवाद लेखकाच्या कल्पना शक्ती वर आधारित असतात. ह्यातसुद्धा ग्वाल्हेरच्या सखारामपंतांची नात आणि रामचंद्ररावांची मुलगी कुसुमचे जन्माला येणारे अपत्य विश्वनाथचे संवाद काल्पनिक असून फारच कमालीचे आहे. डोळ्यासमोरच घटना घडते ,इतके सजीव वर्णन लेखकांनी केले आहे .यथा- "सोनुभैया म्हणजे होणारे आजोबा कापरे होत रजाई पांघरून विडी ओढत बसले होते. "

-भाषा 

 -कादंबरी असो की गोष्ट,ललित असो किंवा नाटक कुठलेही साहित्य वाचक तेव्हांच पुढे वाचतो जेंव्हा त्याची सुरुवात त्याचा मनाला त्यात बांधून ठेवते.

मी होतो मी नब्व्ह्तो या कादंबरीची भाषा साधी-सोपी असून वाचकाला बांधून ठेवते. त्याला पुढे काय झाले किंवा होणार आहे अशी सतत उत्सुकता असून ती त्याला पुढे वाचण्यास प्रेरित करते. जागोजागी समुचीत ठिकाणी प्रचलित म्हणी लेखकाने वापरल्या आहे. यथा , "जिभेला थोडा आराम दे ." ,किंवा 

"आम्ही नुसते गुराढोरांसारखे राबायचे ." (पान 173 ) , "माणूस हा परिस्थितीचा दास असतो.म्हणजे ज्याप्रमाणे परिस्थिती असेल त्याप्रमाणे राहावं लागतं. राहायलाच हवं.काही पर्याय नसतो . अग ह्यालाच म्हणतात आलिया भोगासी असावे सादर."

-सुरेख वाक्य रचना कृतीचा दृढ पाया असतो.बघा एक उदाहरण (पान 194)

" गणिताच्या मास्तरासाठी आयुष्याचं गणित त्याच्याच रामरायाने इतके कठीण करावे की त्यांना ते सोडवताच येवू नये ."

(पान 213) , "आई-वडील निवडणे आपल्या हातात नसतं .कारण आपण जिच्या पोटी जन्म घेतो तीच आपली आई असते. "

-जगात कुठल्याही जागी पोर जन्माला आले की बघणाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया असते की तो कुणावर गेला आहे .मग नाक डोळा आई सारखा की बापा सारखा.त्याकाळी सुद्धा अशीच पद्धत असावी. बालनायकाचा जन्म झाल्यावर प्रतिक्रिया बघा.राधाबाई माईना म्हणाल्या, "अगदी पंढरी सारखा दिसतोय." लगेच माईंची प्रतिक्रिया, " नाही हो ,नाक अगदी आमच्या अक्कासारखे आहे."

-उपदेश/संदेश 

कादंबरीत जागोजागी इतर पात्रांच्या माध्यमाने उपदेश दिले आहेत.

रमाकाकी बाळला( पान 89) म्हणतात , "वाईट सवयींचे आकर्षण आणि त्यांचा ओढा चांगल्या सवयीपेक्षा नेहमीच जास्त असतो . " किंवा , "सवयी वाईट असतात ,माणूस वाईट नसतो ." हे वाचताच गांधीजीचे उपदेश आठवतात , 

"अपराध से घृणा करो,अपराधी से नहीं"

एक आणखीन उदाहरण ,"पुण्य संचय करण्याची आणि आपल्या कर्तृत्वाने त्याला वाढवण्याची पद्धत आपल्याला माहीत असायला हवी."

-अलंकारिक भाषा

काही प्रसंग म्हणजे , प्रातःविधी उरकण्यासाठी शौचालय नसताना बाळला संकोच होत होता.पण गावात पर्याय नव्हता. तेव्हांचे संवाद बघा ,"शेवटी मी ही सतपुड्या्चा उद्धार करायला पुढे वाढलो.” (त्या वेळी बच्चन किंवा मोदी असते तर बाळची नक्कीच फजिती झाली असती)

-जीवनामधे अनिश्चितते विषयी रुपकांचा किती सुरेख उपयोग करून वास्तविकता व्यक्त केली आहे लेखकाने रमाकाकीच्या माध्यमांनी.

रमाकाकी आजोबांना म्हणाल्या , " असे खचून जाऊ नका.जुगार न खेळताही तुम्ही सर्वस्व गमावून बसला आहात ही मनःस्थिती चुकीची आहे. खरंतर आयुष्य हेच जुगार असत.आता मलाच बघा मी का जुगार खेळते? आवडेला आणि अक्काला गमावून बसले की नाही......... खरं तर सगळे अनिश्चिततेचे खेळ.डावही मांडणारा रामराया आणि डाव पालटणार देखील रामराया.तुम्ही पैशांशी खेळा ,माणसांशी खेळा ,भावनांशी खेळा किंवा वेळेशी खेळा आणि फार झाले तर पत्यांशी खेळा , अनिश्चितता माणसाचा पिच्छा सोडत नाही "(पान 163) . आणखीन एक उदाहरण आणि बघा , "अनेक प्रश्नांची उत्तरं नसतात,म्हणजे उत्तर असतात पण ते आपल्याला ठाऊक नसतात,ह्यालाच आपले नशीब म्हणतात." (पान 213). “ परिस्थितीचा दास माणूस असतो सदैव. त्याच्या स्वभावावर परिस्थितीचा प्रभाव असतोच. बघा एक आणखीन उदाहरण , " सखारामपंतांकडून त्यांची सतत उपेक्षा,प्रताडणा,खालावलेली आर्थिक परिस्थिती,बायको पोरांसकट सखारामपंतांवर निर्भरता ,त्यांच्या विषयी सर्व निर्णय सखारामपंतच घ्यायचे.ह्या परिस्थितीने आजोबांना नैराश्य दिले आणि त्याने त्यांचा स्वभाव चिडचिडा तापट झाला."( पान 73).

-रिती-परम्परा आणि तत्कालीन वातावरण 

-कुठली ही साहित्य कृती ,कुठल्या काळाची आहे ,वाचताना त्याची जाणीव वाचकाला झाली तर लेखक खरा यशस्वी ठरतो. हे एका उदाहरणाने स्पष्ट होऊ शकेल.महाभारत काळाची रचना वाचताना जर त्यात "अर्जुन" बाईकवर श्रीकृष्णांना भेटायला जातो असा प्रसंग वाचला किंवा असला प्रसंग वाचला की 

सरदार भगतसिंग संसदमध्ये बॉम्बस्फोट करून अटलबिहारी वाजपेयी किंवा केजरीवाल ह्यांना भेटायला निघाले , तर हे वाचकाला किती अप्रसंगिक किंवा खोटे वाटले असते.सांगायचे तात्पर्य इतकेच की ह्या कादंबरीत कुठेही असली अप्रासंगिकता नजरेस किवा वाचण्यात आली नाही. 

-त्या काळी तंत्र मंत्र जास्त प्रचलित होते. ( पान 15) " माईनां मुल झाले नाही,कुणी मांत्रिकाने त्यांना नवस आणि अघोरी तंत्र-मंत्र सांगितले. त्यासाठी लहान निष्पाप मुलाच्या पाठीवर डाग दिल्याने मुल होईल असे देखिल सांगितले . माईना हा नवस फेडण्यासाठी त्यांचा सावत्र मुलगा घरातच मिळाला होता.ते डाग आजोबांचा पाठीवर माईच्या क्रूरतेचा इतिहास आजही सांगतात." ह्या प्रसंगात अघोरीपणा,तंत्र-मंत्र ,आणि सावत्र अपत्याविषयी क्रूर भावना तिन्ही अंधविश्वास सापडतात.

-सासू सूनांचे टोमणे, विहिणींचे परस्परिक संबंध,मुलीच्या माहेरच्यांना टोमणे,त्यांना नाव ठेवणे ,सर्व जणू त्याकाळा पासूनच चालत आहे.आजही असले प्रकार दिसतात पण प्रमाण कमी झाले आहे.

बाळंतपणासाठी मुलींना माहेरी पाठविण्याची रितीचा सुद्धा उल्लेख सापडतो.

खेड्या-पाड्यात आज ही लोकं आपली जन्मतारीख ठामपणे सांगू शकत नाही 

अमावस्या किंवा पौर्णिमा होती.खूब पाऊस होता, किंवा कुठलातरी सण होता,त्या अंदाजाने त्यांच्या मुलांच शाळेत दाखला होत असे.

-त्याकाळातले कच्चे , शेणानी सारवलेले घर,रात्री उजेडासाठी प्रयुक्त चिमण्या किंवा कंदील,झोपण्यासाठी फाटक्या सतरंज्या, गोदड्या, खाटा ,मग त्यात ढेकणांचा त्रास ,जेवणात किंवा नाश्त्यात लोणचे पोळी, हे सर्व त्याकाळातले चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात. जाण्या-येण्यासाठी सुद्धा घोडागाडी किंवा तांगा आहे.

कादंबरीत पात्रांचे राहण्याचे गाव /स्थान उज्जैन,भोपाळ,ग्वाल्हेर,बऱ्हाणपूर,अशोक सिनेमा, फ्रिगंज,महांकाळ,सर्व जागा आपल्या परिचित असल्याने वाचण्याचा वेगळाच आनंद अनुभवतो.

-एक प्रसंग आणखीन आपण अनुभवलेला संगण्या सारखा वाटतो

( पान 72) " चक्रवर्तीचे गणित त्यांना ( आजोबांना) तोंडपाठ होते" ह्यात विशेष उल्लेख करण्यासारखे एवढेच की आम्हीसुद्धा आमच्या वेळेस शाळेत चक्रवर्ती गणिताचा अभ्यास केलेला आहे.

-दत्तजयंती सणाला त्यावेळेस ही मान होता. तसेपण बहुतांश मराठी कुटुंब दत्त जयंती साजरी करतात. घरातील प्रमुखांचे सख्त अनुशासित वातावरण, धाक,आम्हाला ही आठवतो . संध्याकाळ झाली की हातपाय धुवून शुभम करोति,परोचा,श्लोक,मोठ्यांना नमस्कार करून जेवण होत असे .

-प्रेमविवाहाचा तेव्हां विरोध होत असे .मोठ्यांना आपली अब्रू जाण्याची भीती वाटायची . पण "Love at first sight " सुशीला आणि पंढरीचे निश्चल प्रेम आणि सुशिलाच्या मनात सावत्र मुलांविषयी( बाळ-सुरेश)मायेची भावना प्रमाणित करते की तेंव्हाही माणूस पहिले प्रेम विसरू शकत नव्हता.(आज ह्याची मान्यता कितपत आहे सांगायची गरज नाही)

-कादंबरीच्या मुखृष्ठावरील एक लहान मुलाचे रेखाचित्र आणि त्याच्या अवती भवती असंख्य प्रश्नचिन्ह .कादंबरी वाचताच त्याची सार्थकता कळून येते . ते चित्र बालनायकाचे आणि दुसरे स्त्री रेखाचित्र रमाकाकिंचे आहे लगेच वाचकांच्या लक्षात येतं.

-शेवटी लिहिणे म्हणजे कादंबरी आपल्याच अवती-भोवती घडणाऱ्या घटनेंविषयी असल्या कारणाने पूर्ण वाचाविशी वाटली.आपण नेहमी सुखांत घटनेची कल्पना करत असतो .सिनेमा किंवा नाटकात काही तरी चमत्कार शेवटच्या घटकेत बघण्याची सवय असते. येथे ही वाटले की कुसुमचा जीव कसेही करून वाचेल,पण तसे झाले नाही.ह्याचाच अर्थ असा की जीवनात सर्वच आपल्या मनाप्रमाणे आणि सुखद घटत नसत. माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे कादंबरी विषयी आपले स्वतःचे मत मांडले आहे.सर्व सहमत असतीलच अशी मुळीच अपेक्षा नाही.काही चुकल्यास क्षमा करावी. सर्वांना हीच विनंती की श्री विश्वनाथ शिरढोणकर ह्यांनी लिखित कादंबरी "मी होतो मी नव्हतो" नक्कीच वाचावी 

 

-दीपक कर्पे , देवास. 10/10/2018

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू