पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवरंग

नवरात्र दिवस पहिला - रंग पिवळा. 

ऑफिसला छान पिवळी साडी नेसून जाताना सेल्फी काढणारी, परत नवर्‍याकडून छानसा फोटो काढून घेणारी आणि कौतुक करून घेणारी ती पाहून ती मनातल्या मनात चडफडली, 

‘‘हे आपल्या नशिबात कुठचं, सकाळपासून मरीमर कामच करायचं नुसतं कौतुकाचे दोन शब्दही नाहीत कुणाकडून...’’ असं तिच्या मनात आलं. 

दुपारी जेवायला बसलेल्या सवाष्णीनं तिच्या पिवळ्या धम्मक, मऊ लुसलुशीत पोळ्यांचं वारेमाप कौतुक केलं आणि तिचं मन आनंदानं भरून आलं. नसेल जमलं पिवळी साडी नेसून फोटो काढायला पण छान जेवण तरी केलं तिनं स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.  

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी


नवरात्र दिवस दुसरा - रंग हिरवा

आज मात्रं तिने लवकर आवरलं, घरातच पण हिरवीसाडी नेसली. आपसूकच तिची नजर समोरच्या खिडकीत गेली, ती पण हिरवा ड्रेस घालून छान आवरून ऑफिसला निघाली होती. दोघींची नजरानजर झाली तिने लगेचच हिच्याकडे बघून छान दिसताय अशी हातानेच खूण केली. काल आपण उगाचंच हिच्यावर चडफडलो असं तिला वाटून गेलं तिनंही लगेच तिला प्रतिसाद देत तू पण छान दिसतेस! अशी खूण केली. काल मनाला आलेली मरगळ आजच्या हिरव्या रंगाच्या प्रसन्नतेने धुऊन गेली. तिने तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीवृंदावनाला छान प्रदक्षिणा घातली. कुणाबद्दलही वाईट विचार माझ्या मनात यायला नको, सर्वांना सुखी ठेव अशी मनापासून प्रार्थना केली. 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी 


नवरात्र दिवस तिसरा - रंग राखाडी 

आज ती मनोमन खूश होती, नवरात्र सणाचा आणि त्यातील परंपरांचा आनंद मनापासून घेत होती. नवर्‍यानेही आज राखाडी रंगाचा शर्ट काढून ठेवला होता तिने ते पाहिलं तिनंही राखाडी रंगाचा ड्रेस घातला. ऑफिसला जाताना नवर्‍याने तिच्याकडे पाहिलं तिला वाटलं करडी नजर रोखली की काय? पण थोड्याच वेळात तो आपला फोन घेऊन  आला नी म्हणाला, ‘‘चल दोघांचा सुंदर सेल्फी घेऊ...’’ तिला आसमान ठेंगणं झालं.. नकळत तिचे गाल आरक्त झाले, स्मित पसरलं, ‘‘इश्श काहीतरीच काय?’’ तिने म्हटलं. अगं त्यात काय काहीतरीच... असं म्हणून पटकन सेल्फी घेतलासुद्धा. तिचं लक्ष पटकन समोरच्या खिडकीत गेलं, आज ती मात्रं गडीबडीत होती, कामाच्या घाईत होती. बिच्चारी घरातलं आवरून कामावर जायचं किती तारांबळ होत असेल? हिच्या मनात आलं. परवाच्या करड्या विचाराची जागा काळजीने घेतली होती. हे देवी सर्वांना सुखी ठेव तिने परत मनोमन प्रार्थना केली आणि परत आपल्या कामात बुडून गेली. 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी 


नवरात्र दिवस चौथा - रंग केशरी

सकाळी सकाळी ती चहा पिताना तिला सूर्याचं दर्शन झालं आणि अचानक मनात विचार आला, आजचा रंग केशरी... सुर्यानेही केशरी रंगाची उधळण केली होती रोजच्याप्रमाणेच... पण आजचा रंग खास होता. तिने मनोमन सुर्याला नमस्कार केला आणि म्हणाली, ‘‘हे देवी, ज्याप्रमाणे सूर्य गरीब श्रीमंत, लहान-मोठा असा भेदभाव न मानता सर्वांना समान प्रकाश देतो त्याप्रमाणे माझ्या मनात सुद्धा कधीही असमानता येणार नाही अशी शक्ती तू मला दे. सर्वांशी प्रेमाने वागण्याची बुद्धी मला दे...’’

आज नैवेद्याला पण सुंदर केशरी रंगाच्या भोपळ्याचे घारगेच करायचे असं तिनं ठरवलं. पौष्टिक आणि सात्विक. देवीला पण सुंदर सुंदर केशरी रंगाचा उपहार. रंग काय नुसते साड्या घालूनच मिरवायचे असं नाही काही त्या रंगाचा पदार्थ पण खायला हवा. तिने ठरवलं. समोर खिडकीकडे लक्ष गेलं तर सगळं सामसूम दिसलं, मग लक्षात आलं आज सुट्टी आहे नाही का? मग बरोबर.... तिने काहीतरी ठरवलं आणि आपल्याच विचारांवर खूश झाली. 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी 


नवरात्र दिवस पाचवा - रंग पांढरा

काल केलेले भोपळ्याचे घारगे तिने समोरच्या घरात दिले. तिची आणि समोरच्या घरातली तिची छान गट्टी झाली. आणि संध्याकाळी गरबा खेळण्यासाठी भेटही झाली. मैत्रीचा धागा तयार झाला. पांढर्‍याशुभ्र धाग्यासारखा स्वच्छ, कलंकविरहीत... 

आजचा रंग पांढरा. तिने देवीकडे प्रार्थना केली. पांढर्‍या शुभ्र कापसाच्या वातीप्रमाणे इतरांसाठी जळण्याची (कार्य करण्याची) बुद्धी दे, पण प्रसंग त्यांना आपल्यातील सामर्थ्य दाखवून ज्योतीप्रमाणे प्रकाश दाखवण्याचं सामर्थ्यही दे. 

आज त्या दोघींनी ठरलेल्या वेळेप्रमाणे आवरून सुंदर पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान करून सेल्फी काढला आणि स्टेटसला ठेवायला विसरल्या नाहीत बरं का? नव्या-जुन्याची सांगड घालून नवरात्राचा सण मोठ्या आनंदाने साजरा करायचा असं त्या दोघींनी ठरवलं. 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी 


नवरात्र दिवस सहावा - रंग लाल

लाल रंग सौभाग्याचं प्रतीक.... समृद्धीचं प्रतीक तसंच रागाचंही प्रतीक आहे बरं का! आणि एक प्रतीक आहे थांबा म्हणून सांगण्यासाठी... जीवनात कधी आणि कुठे थांबायचं हे जर आपल्याला कळलं तर आपलं जगणं सुखकरच होईल ना? असा तिच्या मनात विचार आला. तिने देवीची प्रार्थना केली. ‘‘मला अखंड सौभाग्य मिळूदे. मनातील उफाळलेल्या रागावर ताबा ठेवण्याची शक्ती मिळुदे.’’

असे नवरात्र हळूहळू पूर्णत्वाकडे चालले आहे. नऊ दिवस व्रतवैकल्यांची विविध रंगांची उधळण होत आहे. सर्वत्र सुख, समाधान नांदत होते. मन परिवर्तित होत होते. सर्वांनी सुखी असावं समाधानी असावं हे एकच मागणं तिच्या मनात परत परत येत होतं. जगावर पसरलेलं कोरोनाचं संकट दूर होवो आणि सर्व सुरळीत चालू होवो ही एकच देवीच्या चरणी प्रार्थना...

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी 


नवरात्र दिवस सातवा - रंग निळा

निळा रंग शांततेचं, सौम्यतेचं प्रतीक. आकाशाचा रंग निळा त्या आकाशाप्रमाणे सर्वांवर मायेची पाखर घालण्याची बुद्धी मला दे. अशी तिने देवीकडे मागणी केली. 

ती आणि समोरची ती यांची आता गाढ मैत्री झाली होती. निळ्या रंगाचं प्रतीक असलेल्या कृष्ण आणि सुदामाच्या गाढ मैत्रीसारखी. आज अष्टमी... दोघींनी जवळच असणार्‍या देवीच्या देवळात घागरी फुंकण्याच्या कार्यक्रमाला जायचं ठरवलं होतं. नवरात्रातल्या नऊ  दिवसांत दोघींना एकमेकींच्या कलागुणांची ओळख झाली होती. तिची पाककला उत्तम होती तर तिची ऑफिसमधली कामगिरी वाखाणण्यासारखी होती. घरातील देवाधर्म, व्रतवैकल्य ती सांभाळत होती, तर ती गरीब, अनाथ, गरजू स्त्रियांना मदतीचा हातभार लावत होती. दोघींनी एकमेकीतील चांगल्या गुणांना ओळखलं होतं आणि स्त्रियांनीच स्त्रियांचा सन्मान करावा, त्यांच्या दोषांवर बोट न ठेवता, गुणांवर लक्ष द्यावे आणि एकमेकींशी मैत्र जपावे हा मार्ग अवलंबिला होता. 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी 


नवरात्र दिवस आठवा - रंग गुलाबी 

गुलाबी रंग प्रेमाचं प्रतीक... गुलाबाप्रमाणे माझं मन सदैव टवटवीत राहुदे, गुलाबी रंगातील माया, प्रेम माझ्या ठायी वसुदे!! गुलाबी रंगाच्या जशा अनेक छटा आहेत तशा माझ्यात देखील प्रेम, वात्सल्य, ममता अशी प्रेमाची विविध रूपे वास करू देत. तिने देवीपुढे नतमस्तक होऊन प्रार्थना केली. तरारून आलेल्या रोपांकडे बघताना तिला अगदी समृद्ध झाल्यासारखं वाटत होतं. देवीचा आशीर्वाद आपल्या मस्तकावर असल्याचा आनंद तिला मिळाला होता. 

आज तिला तिच्या मैत्रिणीकडे सवाष्ण म्हणून जायचं होतं. तिनं छान गुलाबी साडी नेसली आणि नव्याने झालेल्या आपल्या मैत्रीला बहर यावा म्हणून गुलाबाच्या फुलांचा स्वत:च्या हातांनी बनवलेला गुच्छ घेतला. तिने आज हिच्यासाठी छान स्वयंपाक केला. मनापासून तिला जेवू घातले. भरभरूप गप्पा झाल्या. भेटीची देवाणघेवाण झाली आणि दोघींची मने तृप्त झाली. नवरात्रातल्या नऊ दिवसांत जराशा रागापासून सुरू झालेली ही सुरुवात गुलाबी मैत्रीपर्यंत येऊन ठेपली. असेच तुमच्या आमच्या आयुष्यातले राग, द्वेष लोप पावून मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होवोत हीच मनोकामना.

तिची ही साठाउत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू