पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हसू डोळ्यातून सांडलं

नवीन घर... प्रत्येकाचे स्वप्न! नव्या भिंती.. पांढऱ्या शुभ्र.. मग त्यात त्यात "रंगों की दुनिया सजाओ" फीलिंग वाल्या नॅरोलेक पेंट्सचा वास.. कुणाला आवडणारा... कुणाला नावडणारा.. मला मात्र आवडतो.

नवीन घरात नवे फर्निचर.. नव्याने सारी सुरवात... नवीन स्वप्न... नवीन हुरूप... 

सारं कसं एक्सायटिंग!! 

तर अशेच काहीसे स्वप्न.. काही इच्छा आकांक्षा मनात साठवून...एका नवीन जोमाने मी माझ्या कुटुंबासह नवीन घरात पाऊल ठेवले.. 

सर्व मनासारखे झाले होते.. हळूहळू एकेक खोली सजली.. स्वयंपाक घरात खमंग वास दरवळू लागले.. नव्या कोऱ्या भिंतींवर आवडते चित्र सज्ज झाले... नवीन पडदे, नव्या चादरी.... सारे सारे आगदी "परफेक्ट"... पण काही तरी असे होते जे नव्हते..! 

कसली तरी कमतरता भासत होती.. काही तरी मिसिंग होते. 

आणि मग पावसाळा सुरू झाला.. आकाशात काळे मेघ दाटले.. पाण्याचे टपोरे थेंब अंगणात पडू लागले... मी तळ हातावर अलगद ते थेंब झेलत होते तेवढ्यात मृदगंधाचा तो सुवास आला आणि मी त्यात हरवले... जणू निसर्ग मला खुणावत होता... आठवण करून देत होता की काय " मिसिंग" आहे! 

थोड्याच दिवसात घरातील कुंड्यातून, काळ्या मातीतून अंकुर फुटले.. काही दिवसातच अंगण हिरवेगार झाले... जाई जुई मोगरा गुलाब ...झाडांवर हसू लागले... 

सकाळी सकाळी अंगणात पारिजातकाचा सडा बघून मन हरपून गेले... रात्री रातराणी चा गंध वेडावून गेला... आता रोज माझ्या घरात रंगबेरंगी फुलपाखरू येवू लागले.. माला वाटले जणू हेच सारे मिसिंग होते.. 

एके दिवशी एक काळीभोर छोटी-शी लांब चोचीची चिमणी आली.. ती पारिजातकाच्या पानांवर लटकून लटकून माहिती नाही काय करत होती.. माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले.. मग तिने दोन पानांना थोडे से मोडून... चोचीने भोकं पाडले. नंतर कुठून तरी रेशे आणून दोन पानांना शिवले.. एक घरटे तयार झाले! पानांवर लोंबकळत जणू ती खात्री करून घेत होती की ही पाने तिच्या घरट्याचा भार झेलू शकतात की नाही..! 

थोड्या दिवसांनी त्या घरट्यात दोन अंडी दिसू लागली...रोज ती चिमणी त्या घरट्यात यायची. माझे कुतूहल आता शिगेला पोचले होते. एक दिवशी सकाळी सकाळी गोड चिवचिवाट ऐकून माझी झोप उघडली. बघते काय तर घरट्यात दोन चिमुकली पिल्ले चोच उघडून इकडे तिकडे बघत होती... तोच तो क्षण होता.. तीच ती वेळ होती... हसू डोळ्यातून सांडलं माझ्या..! 

घर किती ही सुंदर असलं, किती ही महागड्या वस्तूंनी सजवलं तरी घराला घरपण येतं ते झाडा-फुला-पानांनी... 

आणि जिवंतपणा येतो तो चिमणपाखरांनी...... 

 

©ऋचा दीपक कर्पे

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू