पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कै. अरविंद इनामदार

कै.अरविंद इनामदार

महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात, पोलीस महासंचालक या सर्वोच्चपदी राहूनही आत्ममग्न न राहता माणसा-माणसांमधील दुरावा आपल्या ओजस्वी वाणीने नाहीसा करण्याचा, त्यांची मने जोडण्याचा, त्यांची निकोप जडण-घडण करण्याचा वसा ज्यांनी घेतला, पोलिसांचे 'सद् रक्षणाय खलनिग्रहणाय। 'हे ब्रीद ज्यांनी आयुष्यभर व्रत म्हणून सांभाळले, ते माझे परमस्नेही कै. अरविंद इनामदार साहेब यांचा आज ८ नोव्हेंबर २०२१ रोजी दुसरा स्मृतिदिन आहे. त्यांचे स्मरण म्हणून त्यांच्यावरील माझा एक लेख आज पुन्हा सादर करीत आहे.
पोलीस खात्यातील सुधारणांचा आग्रह धरणारे, शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्ते पोलीस अधिकारी म्हणून अरविंद इनामदार यांची ख्याती होती. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीचे प्राचार्य म्हणून त्यांनी अनेक कर्तबगार अधिकाऱ्यांना घडवले. मुंबईतील टोळीयुद्ध संपवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गॅंगस्टर दाऊदला तस्करी प्रकरणी सर्वप्रथम अटक करण्याची, तसेच सात रस्त्यावरच्या दगडी चाळीत लपून बसलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळीला अटक करण्याची कारवाई त्यांनी केली होती. बॉम्बे डाईंगचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कट तसेच १९९४ मध्ये खानदेशातील जळगाव येथे घडलेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणाचा तपास त्यांनी केला. त्यांच्याच कारकीर्दीत टाडा व मोक्का हे कायदे अस्तित्वात आले. उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे सुरक्षा सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
भ्रष्टाचारी व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड आणि राग होता. त्यांनी हुजरेगिरी कधी केली नाही. सत्तास्थानी बसलेल्या सत्तालोलुप, स्वार्थांध, अन्यायकारी, उच्चपदस्थ राजकारण्यांच्या, मंत्रीगणांच्या अवैध नि जनहितविरोधी आज्ञा पाळण्याचे त्यांनी नेहमीच नाकारले. त्याची जबर किंमतही त्यांना मोजावी लागली. ३६ वर्षांच्या नोकरीत त्यांच्या १९ बदल्या झाल्या; निवृत्तीला एक वर्ष बाकी असताना एका मंत्र्यांचा अवैध आदेश पाळण्याचे नाकारून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. या स्वेच्छानिवृत्तीमुळे जवळजवळ दहा लाख रुपयाचे त्यांचे आर्थिक नुकसान झाले असावे. तत्त्वनिष्ठा त्यांनी सदैव प्रमाण मानली. सर्वसामान्य पोलिस कर्मचाऱ्याबद्दल त्यांच्या मनात कळवळा होता. म्हणूनच स्वतःची ओळख ते "मी पांडू हवालदार बोलतोय!" अशी करून देत असत.
माझ्या ' मुंबई २६/११ एक हादसा ' या पुस्तकाच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी परिचय झाला; तो वृद्धिंगत झाला आणि आम्ही घनिष्ठ मित्र झालो. लहान भावावर असावा तसा त्यांचा माझ्यावर लोभ होता. मी लेखक म्हणून घडलो त्याची ते प्रेरणा होते. त्यांनी माझ्या 'मुंबई २६/ ११ एक हादसा 'आणि ' असाआहे हिंदु धर्म ' या दोन्हीही पुस्तकांसाठी प्रस्तावना लिहिल्या. मुंबई २६/११ या पुस्तकाचे प्रकाशनही वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात त्यांच्या हस्ते झाले. त्या निमित्ताने त्यांचे ' दहशतवाद ' या विषयावर जाहीर व्याख्यानही झाले होते. त्याकाळात त्यांची एका व्याख्यानाची बिदागी रुपये दहा हजार इतकी होती. व्याख्यानातून जमा झालेल्या रक्कमेचा विनियोग ते विविध सामाजिक महत्त्वाच्या कार्यांना मदत करण्यासाठी करीत असत. माझ्याकडून त्यांनी एक पैसाही घेतला नाही. मी त्याबद्दल विचारले, तर म्हणाले, तुम्ही माझे खूप जवळचे मित्र आहात, मित्राकडून बिदागी घेतल्यास आपल्या निखळ मैत्रीला काय अर्थ राहील?
अरविंद इनामदारसाहेब यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे. कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी तर ते होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. तसेच मराठेशाहीवरील प्रसिद्ध झालेली बहुतेक सर्व पुस्तके त्यांनी वाचून काढली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'जाणता राजा' या कार्यक्रमाचे संपूर्ण एडिटिंग इनामदार साहेब यांनी केले होते. त्यांच्या संग्रही मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील उत्तमोत्तम ग्रंथ पाहायला मिळत. त्यांच्या घरातील ग्रंथांची संख्या तीन हजारांहून अधिक होती. भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर त्यांची अपार श्रद्धा होती. भगवद्गीता त्यांना मुखोद्गत होती. इंग्रजी वाड्.मयाचाही त्यांचा खूप व्यासंग होता. शेक्सपियरच्या नाटकातील अनेक स्वगते त्यांना तोंडपाठ होती. स्वामी विवेकानंदावर ते अधिकारवाणीने बोलत असत. रसिकता हा त्यांचा एक मोठा गुण होता. वाड्.मय, काव्य, संगीत, सिनेमा, नाटक, मुशायरे अशा विविध कलाप्रकारात त्यांना रुची होती. संगीताची त्यांना विशेष आवड होती. संगीत शिकायचे म्हणून त्यांनी पं. अजय पोहनकर यांची शागीर्दीही पत्करली होती. पण संगीतासाठी त्यांना वेळ काढता आला नाही.
अरविंद इनामदार यांच्यावर जे.आर.डी. टाटा आणि कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांचा खूपच प्रभाव होता. एकदा मी त्यांना विचारले, "तुमचा हीरो कोण?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले, तुम्हाला माहिती आहे काय? श्रीकृष्णाचा जन्म गाईच्या गोठयात झाला होता. दीडशे एकराचे इनामदार आम्ही; आमचा भला मोठा वाडा असतानाही माझा जन्मही गाईच्या गोठ्यात झाला होता. आई सरपण आणण्यासाठी म्हणून गोठ्यात गेली आणि तिथेच माझा जन्म झाला. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे माझे पहिले हीरो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दुसरे हीरो.
इनामदारसाहेबांचे वक्तृत्व अमोघ आणि विद्वत्प्रचुर होते. त्यांच्या भाषणात विनोदाची पखरण असायची. एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांची एवढी प्रसिद्धी झाली होती की, वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांसाठी संपूर्ण देशभरातून त्यांना सतत विचारणा होत असे. व्याख्यानासाठी त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नसायचा. पण व्याख्यानापूर्वी ते खूप अभ्यास व तयारी करीत असत. एकदा त्याबद्दल मी त्यांना छेडले असता ते म्हणाले होते, "आमच्यासारख्यांची जी व्याख्याने होतात त्यातली बहुतेक 'मासेससाठी नाही तर क्लासेससाठी' असतात. माझी बहुतेक व्याख्याने डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ यांच्यापुढे होत असतात. अशा विद्वान आणि बहुश्रुत श्रोत्यांसमोर व्याख्याने देताना आपल्याकडून यत्किंचितही चूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. सर्जेराव, तुम्हाला रामदास स्वामींचा यासंबंधातला एक श्लोक माहित नसेल तर सांगतो, इतरांना मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येकाने समर्थांचा हा उपदेश कायम लक्षात ठेवला पाहिजे. तुम्हीही लक्षात ठेवा.
"अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर झाकोन असावे।
प्रकट होऊनि नासावे, हे बरे नव्हे।।"
कधी कुठे चांगला कार्यक्रम असेल, एखादा चांगला सिनेमा लागला असेल तर तर ते मला सोबत घेऊन जात असत. असेच ते मला झाकीर हुसेन आणि शिवकुमार शर्मा यांच्या जुगलबंदीच्या कार्यक्रमाला घेऊन गेले होते. तिथे त्यांनी या कलावंताना, मित्र म्हणून माझी ओळख करून दिली. ' life of pi ' हा त्यांच्या सोबत एरॉसला पाहिलेला शेवटचा सिनेमा. माझ्या त्यांच्याकडे महिन्यातून तीन चार तरी खेपा होत. दातृत्व हा त्यांच्यामधील मोठा गुण. त्यांच्या घरी गेल्यानंतर चहापाणी, खाणे आवर्जून होत असे. त्यांच्या घरून रिकाम्या हाताने कधी परत आल्याचे मला तरी आठवत नाही. कधी मिठाई, कधी फळे, कधी एखादा सेंटची बाटली. कधी एखादे पुस्तक, काहीना काही ते माझ्या हातात टेकवत असत. बहुतेकवेळा ते माझ्यासोबत हुतात्मा चौकापर्यंत तर काही वेळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत मला सोडायला येत असत. त्यावेळी फोर्टमधील अपना बाजार शेजारच्या शेट्टीच्या हॉटेलांमधील वडा ते मला खिलवत असत.
आत्मचरित्र लिहिण्याची कल्पना मी त्यांच्या गळी उतरविली होती. बालपणाचे एक-दोन प्रसंगही आम्ही एकत्र बसून लिहून काढले होते; पण त्यांच्या व्याख्यानांच्या सततच्या दौऱ्यांमुळे आत्मचरित्राचे काम रेंगाळले ते रेंगाळलेच!
डोंबिवली येथील माझे एक सहकारी, श्री. यज्ञेश वैद्य यांच्या सी.के.पी. समाज संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त इनामदार साहेबांचे व्याख्यान आयोजित केले होते. इनामदार साहेब तिथे मला आपल्यासोबत घेऊन गेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आताचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे हे होते. कार्यक्रमा अगोदर ॲंटीचेंबरमध्ये बसलो असताना इनामदार साहेबांनी "मुंबई २६/११ एक हादसा" या पुस्तकाचे लेखक म्हणून माझी ओळख करून दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले, "अहो, तुमचे हे पुस्तक मीच काय, बाळासाहेबांनी सुद्धा वाचले आहे. हे पुस्तक वाचून बाळासाहेबांनी आमच्या रमेश उदारेंना सामनामध्ये त्यावर परीक्षण लिहायला सांगितले होते. आमच्या विजय सुर्वे या एका शाखाप्रमुखाचा पराक्रम तुम्ही या पुस्तकातून जगासमोर आणला याबद्दल तुम्हाला धन्यवाद!" आपले पुस्तक स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी वाचले, याचा मला किती आनंद झाला असेल? याची आपण कल्पना करू शकता.
अरविंद इनामदार हे माणूस म्हणून फार मोठे होते. आपला मोठेपणा विसरून ते सर्वांशी मिळून मिसळून राहत असत. त्यांची रसिकता व गुणग्राहकता अलौकिक अशी होती. समाजाच्या सर्व थरात त्यांचे मित्र होते म्हणूनच त्यांच्या सभोवती नेहमी माणसांचा गराडा असायचा. विविध क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
पोलीसदलातील प्रामाणिक, गुणवंत नि कर्तबगार अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने त्यांनी २०१५ साली अरविंद इनामदार फाउंडेशनची स्थापना केली. अतिवरिष्ठ दर्जाचा एक अधिकारी,मध्यम दर्जाचा एक अधिकारी व एक कनिष्ठ पोलीस कर्मचारी यांना एका शानदार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार देऊन या फाउंडेशनकडून सन्मानित करण्यात येते.
अरविंद इनामदार यांची कवी कुसुमाग्रज यांच्यावर अपार श्रद्धा होती. इनामदारसाहेब म्हणायचे, " सर्जेराव , तुम्हाला सांगतो,तात्यासाहेब नुसते साहित्यिक असते तर मी, त्यांच्याकडे कधी गेलो नसतो. आकाशाकडे झेपावणारे, अन्यायाविरुद्ध उभे ठाकणारे, अंधश्रद्धांना आव्हान देणारे, जे जे म्हणून तेजोमय आहे त्यांना पुजणारे, तुकाराम महाराज सांगतात तसे, "दीपा पुढे नाही अंधःकार, सर्वांगी साखर अवघी गोड!" असं त्यांंचं व्यक्तिमत्त्व होतं. लहानपणापासून मी त्यांच्या साहित्याचा आशिक होतो. कोलंबसाचे गर्वगीत, अहिनकुल, वेडात दौडले वीर मराठे सात हे सारं मी लहानपणी साभिनय सादर करायचो. आम्ही पोलीसवाले मूळ नक्षत्रावर जन्मलो पण विशाखा तोंडपाठ झाल्याने मूळ नक्षत्राचीही शांती झाली.
तात्यासाहेबांच्या नटसम्राट नाटकाची एक आठवण इनामदारसाहेबांनी मला सांगितली होती. ती अशी, "७४-७५ साली मी औरंगाबादला होतो. वडील ७५-७६ वर्षांचे तर आई ७२ वर्षांची, एक दिवस मी त्यांना तात्यासाहेबांचे 'नटसम्राट' नाटक बघायला नेले. घरी आल्यावर आई माझ्या वडीलांना म्हणाली, "सगळी इस्टेट पोरांच्या नावाने करू नका बरं! या नाटकाने माझे डोळे उघडले." वडील म्हणाले," बघू बघू! " त्यावर आई म्हणाली, " पोरांना तुम्हाला द्यायचे तेवढे द्या पण आपल्या नावानेही काही ठेवा, तुम्ही पुढ्यातलं भरलेलं ताट खुशाल द्या; पण बसायचा पाट मात्र कोणाला देऊ नका!" ही सगळी तात्यासाहेबांच्या नाटकाची जादू."
एकदा इनामदार साहेबांनी आपल्या डायरीचे एक पान मला वाचायला दिले. मजकूर असा होता.
" नांदी नंतर पडदा उघडला. तेव्हा मी तुंडुब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी- भीतींनी, आशांनी नि अपेक्षांनी.....
आता भरतवाक्य संपल्यावर,
सर्व प्रेक्षालय रिते झाले आहे आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची, मी उभा आहे, रंगमंचावर तयारी करीत, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणे
संपूर्ण रिकामा, संपूर्ण रिकामा! ". या मजकूराच्यावर ऋग्वेदातील एक ऋचा लिहिली होती,
आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः। इनामदार साहेब मला म्हणाले," सर्जेराव, तात्यासाहेबांच्या शेवटच्या आजारपणात मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा निघताना, तात्यासाहेबांनी मला त्यांचे हे अखेरचे स्वगत ऐकवले. त्यानंतर एक-दोन महिन्यांनी तात्यासाहेब आम्हाला पोरके करून गेले."
दोन वर्षांपूर्वी ,२ नोव्हेंबर २०२१ रोजी मी इनामदारसाहेबांना भेटायला मुंबईच्या हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. इनामदार साहेब कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने ग्रस्त होते. अर्धा, पाऊण तास चांगल्या गप्पा झाल्या. मी म्हणालो, " या महिन्याच्या ११तारखेला आपला वाढ दिवस आहे, मी आमच्या दुकानातला, नव्या चवीचा मोठा केक घेऊन येणार आहे; मी किती वाजता येऊ? " तेव्हा ते म्हणाले, " ११ तारखेपर्यंत मी थोडाच इथे राहणार आहे? तीन चार दिवसात घरी जाईन. घरी गेल्यावर मी तुम्हाला फोन करतो, तेव्हा वेळ आणि वाढदिवसाला कोणा कोणाला बोलवायचे ते ठरवू " त्यानंतर ते मला म्हणाले, "आता रात्र होत आली आहे, सी.एस्. टी.ला उलटे नका जाऊ." तिथे आडारकरसाहेब आले होते, त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, "तुम्ही सर्जेरावांना तुमच्या गाडीने दादरला सोडा नि मग तुमच्या घरी जा." म्हणजे त्या गंभीर आजारपणाच्या अवस्थेतही मी कसा घरी जाईन? याची त्यांना काळजी होती. त्यानंतर आम्ही इनामदारसाहेबांचा निरोप घेतला.
आठ नोव्हेंबर २०१९ रोजी इनामदार साहेब घरी गेले पण त्या घरचा पत्ता ७/१, शलाका, महर्षि कर्वे रोड, मुंबई. हा नव्हता! त्यांनी आपला पत्ता बदलला होता. इनामदार साहेब आम्हाला हुलकावणी देऊन गेले होते.
आज इनामदारसाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करताना कवी कुसुमाग्रजांचेच शब्द ओठी येतात,
" अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धूलिःकण
तू जे दिले ते तिथे पाहतो मी,
माझ्यामध्ये मीच डोकावून!!

*सर्जेराव कुइगडे*

दि.०८/११/२०२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू