पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रीनीलकंठेश्वर

यस्तु संचरते देशान् यस्तु सेवेत पण्डितान् ।

तस्य विस्तारिता बुद्धिस्तैलबिन्दुरिवाम्भसि ॥

 

 अशा शब्दांत आपल्या संस्कृतीत प्रवासाचे महत्व सांगितले आहे. प्रस्तुत सुभाषित आम्हाला इयत्ता आठवीला असताना संस्कृत अभ्यासक्रमात होते. आदरणीय पंडितराव वझुरकर सरांनी ते अशा प्रकारे शिकविले की, प्रवासाची आवड निर्माण झाली. कार्यक्रमांच्या निमित्ताने माझा तसा प्रवास खूप होतो. प्रवासाचा कंटाळा असा कधी येत नाही. 

 

 या प्रवासाच्या मालिकेत काल एक चांगल्या स्थळाला भेट देता आली. ‘श्रीनीलकंठेश्वर’ हे स्थान पुण्यापासून ५० किलोमीटर्सच्या आत आहे. विहंगम दृश्य, रमणीय वातावरण, विविध देवदेवता आणि संत यांच्या बृहदाकार मूर्ती, जल, स्थल आणि वायू अशा निसर्गातील तीनही घटकांनी उदार होऊन दिले आहे, असे पवित्र ठिकाण अशी याची वैशिष्ट्ये सांगता येतील.

 सिंहगड मार्ग, पानशेत पुढे उजवा turn आणि मग आपण श्रीनीलकंठेश्वराच्या पायथ्याशी पोचतो. पुढील मार्ग हा चढाचा आणि पायवाटेचा आहे. साधारण ५० मिनीटे पायी चालत आपण या रम्य ठिकाणी पोचतो. वरती गेल्यावर table land सारखा अनुभव देणारा भूपृष्ठ आपले स्वागत करतो. कालभैरव, हनुमान, दत्त महाराज, शंकराचार्य यांच्या विलोभनीय मूर्ती, त्यानंतर विठू माझा लेकुरवाळाचे दृश्य, श्रीरेणुकामातेची कथा सांगणारे दृश्य, पुढे रामायण, महाभारत यांतील विविध प्रसंग दृश्य, माता पार्वती आणि भगवान श्रीशंकर यांच्या मूर्ती, नवनाथांच्या विविध कथांनी युक्त दृश्ये यांनी आपण नतमस्तक आणि विस्मयित होतो. 

 

  या विलोभनीय मूर्ती पाहत असताना सहज खाली दृष्टी टाकली, तर जे दृश्य दिसते, नदी, डोंगर यांचे वर्णन केवळ अशक्य होय. आणि त्याहीपेक्षा विशुद्ध आणि आल्हाददायक वाऱ्याची अनुभूती हा प्रवास अविस्मरणीय करणारी आहे.

 शहरापासून जवळ, कमी गर्दीचे, कमी वर्दळीचे हे ठिकाण आहे. कसलीही बजबजपुरी नाही. स्वच्छता आहे. 

 वास्तविक प्रवासवर्णन हा माझा लेखनाचा प्रांत नाही. मी प्रवासाचा निसर्ग सौंदर्याचा अनुभव चित्तात साठवून घेतो. म्हणून इतके सांगू शकेन की, मी सांगतोय या पेक्षा अधिक आनंदाची अनुभूती आपणांस येईल. अवश्य भेट द्या. 

(समवेत, काही निवडक छायाचित्रे)

माऊली की जय जय श्रीकृष्ण !!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू