पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक रात्र झाकोळलेली

             एक रात्र झाकोळलेली



           मुरलीधर देवर्डेकर



       आज मी गावाला जायच ठरवलं होतं. माझं गाव वावस. एका डोंगराळ भागात वसलेलं. निसर्गानं संपन्न असं  सुंदर माझं गाव. माझं जन्मगाव. त्यामुळे दोन दिवस रहायची तयारी करून मी स्टँड वर आलो. कोल्हापूर तळेगाव गाडी लागली होती. फारशी गर्दी नव्हती. आरामात जागा मिळाली.इथून तळेगावपर्यंतचा रस्ता म्हणजे सगळीकडे हिरवळ आणि हिरव्या वृक्षांनी पांघरलेले डोंगर. त्यामुळे प्रवासाला कंटाळा नाही.

       ही गाडी जाते वावस फाट्यावरून पुढे. मला वावसला उतरायचं होतं. अंदाजे दीड तासाचा रस्ता. साडेपाचला फाट्यावर उतरलो की चालत चालत गावापर्यंत जायचं.अंदाजे पाऊण तास लागतो. अंधार पडायच्या अगोदर गावात पोहोचावं अशा हिशोबाने मी बाहेर पडलो.

      गाडी चालू झाली मी निश्वास सोडला.

      वावस हे आमचं  मूळ गांव. गांवात आमचा चौसोपी वाडा आणि दहा एकर बागायती जमीन होती. गावची जमीन भागोजी सुतार करत होता. करता करता त्यांनं कूळकायद्याचा  हक्क दावा केला आणि जमिनीवर हक्क गाजवायचा प्रयत्न केला. प्रकरण कोर्टात गेले. कूळकायद्याच्या जोरावर भागोजी जमीन बळकवणार असं वाटत असताना मी त्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलं. कारण आमचे तिन्ही भाऊ आपापल्या व्यापात असल्यामुळे त्यांना इकडे लक्ष घालायला वेळ नाही.  मी लक्ष घालायचं ठरवलं. जमीन ताब्यात मिळाली तर मी कायमचा गावी राहायचं ठरवलं.

       माझं प्राथमिक शिक्षण गावातच झालं आणि नंतर आम्ही काम सोडलं. कोल्हापूरला आलो. वडिलांची छोटीशी फर्म होती. सगळं कुटूंब कोल्हापूरला स्थायिक झाले.मी सर्वात लहान. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी एका बँकेमध्ये नोकरी करू लागलो.

         नंतर लक्षात आले की भागोजी जमीन हडप करायला बसला आहे. मग त्यांनी कोर्टामध्ये दावा केला होता. गावाकडचा वाडा बंद होता पण माझा एक वर्गमित्र सक्षम, त्याचं लग्न झालं आणि त्याला वाडा राहायला दिला. त्या निमित्ताने वाड्यात माणसांचा वावर होऊन वाडा स्वच्छ राहील हा हेतू.

        गावाकडे नदीवर डॅम झाल्‍यामुळे नदीला मुबलक पाणी होतं. शेती हिरवीगार.भागोजी शेती करायचा आणि अल्पस धान्य देऊन समाधान करायचा.आमच्या वडिलांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यानी विचार केला एवढी मोठी जमीन का सोडायची? जमीन मिळाली तर मी तिथेच राहायला तयार होतो.

       गाडी शहरातुन बाहेर पडली आणि रस्ता छोटा होऊ लागला. छोटी छोटी गावे मागे पडू लागली.

      मी सक्षमला निरोप दिला होता.गावाकडे मोबाईलची रेंज नाही. लँडलाईन बंद पडलेली. एक बी एस एन एलचा टाँवर होता. कारण ग्रामीण भागात प्रायवेट ऑपरेटर्स सेवा देत नाहीत.त्यामुळे मायबाप बि एस एन.एलचाच आधार. पण त्या ठिकाणीसुद्धा इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम होता. बराच काळ वीजपुरवठा गायब असायचा. त्यामुळे मोबाईल व्यवस्थाही कोलमडली होती.

      

         गाडी धिम्या गतीनं चालत होती. रस्त्यात खड्डेच खड्डे होते. ग्रामीण भागात कुणाचं लक्ष नसतं त्यामुळे खेड्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असते. सुविधा नसतात म्हणून लोक गाव सोडून शहराकडे वळतात.

        अचानक गाडी थांबली. कुणाच्याच लक्षात येईना. कंडक्टरनं विचारलं,

        " काय झालं?"

        "बहुधा टायर पंक्चर झालाय."

      झालं! म्हणजे आमचं टाइम मॅनेजमेंट कोसळलं. आता इथं अर्धा तास खाणार! परत गाडीची धीमी गती.अंधारात चाचपडत जावं लागणार!प्रत्येक वेळी अशा गोष्टी घडतात! तरीपण आपण चुका करतोच! अगोदरच्या गाडीनं आलो असतो तर!जाऊ दे! आता जर तर च्या गोष्टीला काही अर्थ नाही.

      मी खाली उतरलो. टायर बदलण्याच्या कामाला गती नव्हती.ड्रायव्हर तंबाखू खात खात गप्पा मारायचा. स्वतःच्या विनोदावर स्वतःच हसायचा आणि मग पचकन थुंकून कामाला लागायचा. वेळेचं महत्त्वच कोणाला नाही.अखेर त्यांनं टायर बदलला.मग  रस्त्यातच हाश हुश करत बैठक मारली. पाणी प्यायला आणि मग  आपल्या सीटवर बसला.

        एव्हाना सूर्य क्षितिजावर टेकला होता. बहुधा अंधारातच  गावी जावं लागणार होतं.उद्याची अमावास्या आणि काळ्याकुट्ट अंधारानं माखलेला निर्जन रस्ता.

      " वावस उतरा... वावस!"

     मी सँक माझ्या पाठीवर मारली आणि खाली उतरलो. एकटाच होतो मी. अंधार पडला होता. गाडीला डबल बेल मिळाली आणि गाडी मार्गस्थ झाली.

       रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. संधिप्रकाश सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागला होता. पाठीवर सॅक मारुन मी चालायला सुरुवात केली. बॅटरी वगैरे काही आणलं नव्हतं. मोबाईल होता त्याची पण बॅटरी संपत आली होती.

      रस्ता कच्चा. धुळीनं माखलेला. शहरं सुधारली पण खेडी तशीच राहिली.नावडत्या राणिसारखी.

      मनातली सगळी किल्मिषं बाहेर काढून टाकली. गळ्यात गुरुदेवांनी दिलेली तुळशीची माळ होती. मनात गुरुमंत्र होता. ध्यानात गुरुदेव होते. त्यामुळे कसलीही भीती नव्हती. आता फक्त चालायचं. कदाचित सक्षम वाट बघत असेल!

     रस्ता छोटा होता.रस्ता कसला पाणंदच. दोन्ही बाजूला उसाची शेती. आकाशात चमकणाऱ्या चांदण्याचा तेवढाच काय तो मंद प्रकाश. रातकिड्यांचा दरबार भरलेला. एकापेक्षा एक मोठ्या आवाजात ओरडायची स्पर्धाच चाललेली.इवलासा जीव पण एवढा मोठा आवाज कसा निघतो कुणास ठाऊक!मध्येच काजवे चमकायचे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठाली झाडे. त्यामुळे अंधाराची तीव्रता अधिकच जाणवायची.

         रस्ता निर्जन होता. पण मागच्या मुख्य रस्त्यावरून एखादी मोटरसायकल गेली की आवाज मात्र ऐकू यायचा. मध्येच कोल्हेकुई ऐकू यायची. त्या आवाजानं वातावरणात भीषणता वाटायची.उगीचच भीती वाटायची. एखादा कोल्हा अचानक आला तर! नकळत मनातला  थोडासा थरार जाणवायचा.

      पावलं झपाझप पडत होती.नीरव शांततेत माझ्याच पावलांचा आवाज मात्र ऐकू यायचा. असं रात्रीची एकटं चालायचा प्रसंग येणार म्हटल्यानंतर मी असं अवेळी यायचं धाडस केलं नसतं.

      माझी  पावलं वेगाने पडत होती. अचानक उसात काहीतरी शिरल्याचा आवाज आला. क्षणभर मी थबकलो. उभा राहिलो. एखादं जनावर ऊसात पोहोचलं होतं. उसाच्या कांड्या मोडल्याचा आवाज येत होता. आवाज हळूहळू रस्त्याच्या कडेला येऊ लागला.एखादा गवा असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.मी पावले झपाझप  टाकायला सुरुवात केली. थोडक्यात पळतच चाललो. थोडं अंतर गेल्यानंतर कानोसा घेतला. आवाज थांबला होता. आणि मग मार्गस्थ झालो.

      मी बरंच अंतर पार केलं होतं. आता मात्र नदी लागली. नदीवर पूल होता.पादत्राणं काढून हातात घेतली. नदीला नमस्कार केला आणि अनवाणी चालू लागलो. नदी म्हणजे  माता.तिला नमस्कार करूनच पुढे जायचं हे वडीलधाऱ्यांचे संस्कार होते.नदी पार करताना तरी पायात अनवाणी  असावं आणि  हा नियम होता.

      नदी पाण्याने भरलेली होती. काळशार पाणी वाहत होतं.आकाशातल्या तारकांचे हलणारे प्रतिबिंब पाण्यात हेलकावत होतं. कधीकाळी ही नदी पावसाळा संपला की ओसाड असायची.रेतीनं भरलेली असायची. आता डँम झाला. नदीला पाणी मुबलक मिळालं. आणि मग हे खोरं आबादीआबाद झालं. हीच नदी वरदायिनी ठरली. आमचं बालपण याच नदीच्या पात्रातल्या हळूवार पाण्यात डुंबण्यात गेलं. इथेच आम्ही पाण्यात पोहायला शिकलो.

        पेटणार्‍या अग्नीनं माझं लक्ष वेधलं आणि माझ्या पायातलं त्राणच गळालं.

       नदीवर छानपैकी बांधलेला घाट होता आणि घाटाच्या वरती स्मशान होतं. त्याच स्मशानात एक प्रेत जळत होतं. या वातावरणात हा देखावा भयानक वाटत होता.

      नदीपार करून मी अलीकडे आलो. पादत्राणे पायात घातली. आता मी स्मशानाच्या अगदी समोर होतो.शेजारी एक भलामोठा वटवृक्ष होता. त्यावर वटवाघळांचा वटवाघळांचा थवा वस्तीला होता. त्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. झाडांच्या पारंब्या भेसूर पणे हलत होत्या. मध्येच घुबडाचा चित्कार ऐकायला येत होता.

       अनामिक  माझ्या मनात कधी प्रवेश केला हे मला समजलं नाही. रस्ता निर्जन होता. मला आठवते की आम्ही  खूप मुलं रस्त्यावरून जाताना एकमेकांचा हात धरून, तोंडातून रामनाम करत  भितीने गारठून चालत होतो. एखादा भयानक आवाज झाला की थबकत होतो.

      आता स्मशान माझ्या नजरेसमोर होतं. एक प्रेत जळत होतं. त्याच्या अग्निचे लोट वरपर्यंत जात होते. शेजारी एक अघोरी ध्यानस्थ बसलेला होता. अंगात लंगोटीशिवाय काहीही नव्हतं. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, लांब वाढलेल्या जटा, छातीपर्यंत लोंबणारी दाढी, सर्वांगाला चोपडलेले चित्ताभस्म,  हातात मानवी कवटी, शेजारी एक दारूची बाटली. तो अघोरी ती दारू कवटीमध्ये ओतायचा मग काहीशी मंत्र फुटायचा आणि कवटी तोंडाला लावायचा. क्षणार्धात कवटी रिकामी करून ठेवायचा आणि मग ध्यानस्थ बसायचं.

       त्याला कशाचंच भान नव्हतं. पण त्याचं रूप भयानक होतं.एखाद्यानं बघताच बेशुद्ध पडावा असं.

      अचानक झाडावर काय झालं समजलं नाही. झाडावरच्या वटवाघळांनी किलबिलाट करत झाडाभोवती फेर धरला. कर्कश्श आवाजात ओरडत होत्या. ते पाहून घुबडसुद्धा घुमू लागलं होतं.वातावरणाला भयानकता आली. पण त्या अघोरीचं कशाशी काही देणे घेणे नव्हते.

      माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं.अंगाकडून घाम गळू लागला. भीती म्हणजे काय असते त्याचं प्रत्यंतर आलं. त्याच मी वर्णन करू शकत नाही. आणि थोड्या वेळाने वटवाघुळ आपापल्या जागेवर बसल्या. घुबड मात्र राहून राहून चित्कार करत होते.पारंब्या भुतासारख्या हेलकावत होत्या.स्मशानातल्या ज्वालांचा उजेड रस्त्यापर्यंत येत होता.

       अचानक तो अघोरी उठला. मोठमोठ्याने ओरडू लागला.शांत वातावरणात त्याचं ओरडणं भयानक वाटत होतं. मी जागच्या जागी खिळून राहिलो. तो अघोरी उड्या मारू लागला. त्याने जळत्या प्रेताभोवती फेऱ्या मारल्या. नंतर भेसूर पणे ओरडला.आपल्या जटा जमिनीवर आफटल्या.परत एकदा कवटीत दारू ओतली.  मग त्यानं नैवद्यावर शिंपडली आणि मग घटाघटा प्यायला सुरवात केली.  मोठ्याने ओरडू लागला,

       " तुम्हे छोडूंगा नही! तुम्हे छोडूंगा नही! कहा जायेगा?  अब तु मेरे बस मे आ गया है।अब तू मेरा है। सिर्फ मेरा। तुम्हे मेरे कहने पर चलना होगा. तुम्हे मेरा काम करना होगा। हाssहाssहाssहाss जय माता काली की!"

      मी पायांना  वेग लावण्याचा प्रयत्न केला पण पावले उचलायलाच तयार नव्हती.जमिनीला खिळून बसली होती.खूपच जड वाटत होतं. हा भयानक प्रसंग! कुठे अडकलो आपण?भूत भूत म्हणतात ते तरी नसेल? अरे बापरे! माझं काय खरं नाही. तो अघोरी आणि त्याचं ओरडणं चालूच होतं."मै छोडूंगा नही, तुम्हे छोडूंगा नही।"

       मी  पळायला सुरुवात केली. कसेबसे पाय आपटत चालू लागलो. जणू माझ्या पाठीमागे भूतच लागले होते. अंधार तर फोफावलेला. अंदाजानं  दबकत दबकत चालत होतो.अचानक माझा पाय कशाला तरी लागला. रस्त्यात कोणी तरी ओंडका ठेवला असावा असं वाटत होतं.त्याला ठेच लागून मी खाली पडलो. मोबाईलची बॅटरी पण चालू करायला विसरलो. रस्त्यावर त्या पांढऱ्या मातीत तो काळा ओंडका दिसला आणि त्याची हालचाल पण झाली. माझ्या अंगाचे पाणी पळाले. मी त्याची हालचाल बघितली.त्याने फुत्कार सोडला व माझ्याकडे हळूहळू येऊ लागला. एक अजस्त्र अजगर होता. मी स्तब्ध होऊन ती अस्पष्ट आकृतीकडे पाहत होतो. ते जवळ आलं.माझ्याजवळ आलं. आपलं तोंड वर करून उभा राहिले. आता मात्र मी धूम पळालो.दगड,गोटे, काटे काही न जुमानता पळू लागलो. पळता पळता खूप दमलो आणि विश्रांतीकरता थांबलो. अचानक माझ्या हाताला जोरदार स्पर्श झाला. झाड हलत होतं. मी बेशुद्ध पडतो की काय असं असं वाटत होतं. मी भांबावलो. क्षणभर तसाच उभा राहिलो. स्वतःला धीर दिला आणि लक्षात आलं की झाडाची पारंबी घालत होती. झाल्या प्रसंगाने मी भांबावलो होतो. अचानक शेतातून सळसळ ऐकली. एका जागेवरून दुसर्‍या ठिकाणी जात होती. आता मी काय करायचं?मी काय करायचं?

        ह्या गावाला भूतबाधा होती.कारण माहीत नव्हतं. पण सगळीकडे अशी वदंता  होती. 

       आता गुरगुरण्याचा आवाज ऐकला मी परत उडालोच. पण लक्षात आले की हा कुत्र्याच्या गुरगुरण्याचा आवाज आहे. म्हणजे मी निश्चितच गावाजवळ आलो होतो. आता गावातले विजेचे दिवे दिसू लागले होते.

     मी निश्वास सोडला.

     साडेआठ झाले होते. मी दबकत दबकत वाड्यावर आलो. सक्षम बाहेर आला.

     " आभास... अरे काय!आत्ता आलास? किती वाट पाहिली तुझी मी?"

       मी  सगळा किस्सा त्याला सांगितला.

      " अरे यार! या रस्त्यावरून रात्री कोणी येत नाही. बरं झालं. हात पाय धुऊन घे.चहा घे. मग फ्रेश वाटेल. नंतर आपण जेऊन गप्पा मारू."

       मी फ्रेश. चहा घेतला आणि जरासं बरं वाटलं.

       जेवण झालं आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी म्हणालो,

       " सक्षम, माझा विचार आहे इथं गावातच राहायचं. शेती करायची."

      " चांगलंच आहे ना मग! मला बाहेर काढणार काय?"     

        हसत तो म्हणाला,

      " नाही यार! मी एकटाच राहणार. मला कशाला एवढा मोठा वाडा लागतोय?"

      " माझं पण घराचं काम चाललंय."

      "काही गरज नाही. रहायचं इथंच."

      " तो भागोजी काय चांगला माणूस वाटत नाही."

      " केस चाललीय. दहा दिवसात निकाल लागेल. निकाल आमच्याबाजूने लागला की जमीन ताब्यात घ्यायची. आणि मी स्वतः मी सुद्धा काम करणार आहे.गांवातच राहणार आहे."

       "अरे वा! चांगला निर्णय घेतलास.ये ..मी तुला मदत करीन.काही काळजी करू नको आणि तेथेच कायमचा राहा.साखर कारखान्याच्या कामाला गती येईल.कारखाना झालाच पाहिजे."

      नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. वेळ झाली होती पण गप्पा संपत नव्हत्या.मी विचारले,

       " सक्षम,अरे सुधीरकाका एकटेच राहतात का? उद्या भेटेन त्यांना.खूप दिवस झाले भेटून. त्या नंदाताईची खुप आठवण येते.त्यांना पण बरं वाटेल!"

       " हो.जा पण लवकर जा.बऱ्याच दिवसापासून ते  गावात फिरकले नाहीत. सहा महिन्यापासून मी त्यांना पाहिले नाही. आम्ही तिकडे गेलो नाही. कोणी म्हणतात कुलूप लावून बाहेर गेलेत. काय समजत नाही. लवकर जा आणि लवकर ये.कारण आमावस्येच्या रात्री  बऱ्याच लोकांना अग्नी पेटताना दिसतो. कोणाला घर पेटतांना  दिसते.काहितरी विचित्र प्रकार आहे."

      " काही काळजी करु नको यार."

 

      खुप दिवसानंतर इतकी सुंदर आणि शांत झोप मिळाली.अशी शांत झोप कोल्हापुरात मिळतच नाही. सकाळी सकाळी सक्षमनं जागे केले आणि मग आळोखे पिळोखे देत उठलो.

         नाष्टा करून शेताकडे गेलो.भागोजी शेतात काम करत होता.

     " कवासं आला मालक?"

     " आलो कालच."

     " आता तेवढं खताच बघा. लवकरात लवकर आलं पायजे.न्हाईतर गहू वाळून जाईल."

     "बघू बघू ."

     "कोर्टाचा निकाल पंधरावड्यात लागेल. लक्षात ठेवा. आमच्या बाजून लागला तर मग तुमाला हिकडं यायची गरज न्हाई.मी  तुम्हाला येऊ बी देणार न्हाई."

     मी गपगुमान घरी परतलो.वाईट वाटलं. एवढे चांगले शेत विश्वासानं करायला दिले. पण तो बळकवायला निघाला. काय माणसं आहेत! प्रामाणिकपणाचे दिवस राहिले नाहीत.

 

       सक्षमच्या सहवासात खूप बरं वाटतं.तो एक चांगला मित्र आहे.बाल मित्र माझा.त्यांनं वाडा खूपच नीटनेटका ठेवला होता. आता घर बांधायला काढणार आहे म्हणे. पण तोवर तरी आहे. मी सुद्धा एकटाच राहिलो. आहे तेवढाच त्याचा सहवास.त्याच्याबरोबर मला अनेक कामे करायची आहेत.

       दुपारी जेवण घेऊन कलंडलो. चांगली झोप आली.

       उठून पाहिलं तर साडेचार वाजलेले. सक्षम शेताकडे गेला होता. मी वहिनींना चहा करण्यास सांगितले. चहा घेऊन बाहेर पडणार तोच वहिनी विचारलं ,

      "कुणीकडे चालला भाऊजी?"

      " सुधीर काकांच्या कडे चाललोय."

      "हो पण लवकर परत या. जागा चांगली नाही."

      " हो, वेळ झाला तर काका सोडायला येतील."

      " पण पण अंधार पडण्यापूर्वीच या."

      "काळजी करू नका वहिनी."

      मी बाहेर पडलो.सुधीर काकांचे घर गावाच्या बाहेरच अर्धा पाऊण किलोमीटरवर आह. तिथून जंगलाला सुरुवात होते. अगदी घनदाट जंगल. सुधीरकाका आपल्या परिवारासह इथे राहायचे.परिवार म्हणजे काय?काका,काकू आणी मुलगी नंदिनी.ती बहिणी सारखी माया करायची. पण अचानक आजारी पडली ती उठलीच नाही.

      त्यामुळे काका,काकू आम्ही आम्ही गेलो की आमचे लाड करायचे. खायला द्यायचे. कित्येक रात्री काकांच्या घरात गप्पा मारत काढल्यात.

     जुने घर मोडून काकांनी नवीन दुमजली घर बांधलं. त्याला विस वर्षे झाली.आम्ही नवीन घरात असं वावरायचं की आम्ही त्या घरचेच आहोत.त्यामुळे घराचा कोना नी कोना आम्हाला माहीत होता.

      काकांच्या बरोबर विविध वर्षाच्या विषयावर चर्चा व्हायची.काका म्हणजे सामान्यज्ञानाचा खजिनाच होता.काहीही विचारा,ऊत्तर असायचंच. नंतर त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घ्यायचे ठरवले. बरं झालं.आता आधार मिळणार होता त्यांना.

     जाता जाता वाटेत जुने सहकारी भेटले. खूप गप्पा झाल्या.मी त्यांना साखर कारखान्याविषयी बोललो. सगळे खूष झाले. सगळे तयार झाले.त्यामुळे गावाचा कायापालट होणार होता. कारखान्याबरोबर इतर सुविधा मिळणार होत्या.त्यामध्ये अध्ययावत माँल,मोबाईल टाँवर,ईंटरनेट याचा समावेश होता. गप्पामध्ये खूप वेळ गेला. मी तसाच तडक काकांच्या घरी गेलो. अंधार पडू लागला होता.

     काका दारात साफसफाई करत होते. मला थोडं विचित्र वाटलं.खूप दिवसापासून दाढी केली नव्हती, खूप वाढली होती.केस वाढलेले होते. असो,मला पाहून ते खूष झाले.

       "ये आभास, कधी आलास?"

      "कालच आलो काका."

      "बरं झालं. काकांची आठवण आली म्हणा."

      "नेहमीच येते."

      मी त्यांच्याबरोबर आत गेलो. सोपा ज्याला आपण लिव्हिंग रूम म्हणतो ती खुपच स्वच्छ होती. आम्ही दोघे जण बाकड्यावर बसलो.

     " आज इथेच जेवायचं."

     "नाही काका.सक्षमनं मोठा बेत केलाय."

     " मग काय तुमचं रंगीत संगीत असणार!"

     "नाही काका. मी अभक्ष भक्षण करत नाही. अपेयपान करत नाही. गळ्यात माळ आहे."

      "अरे चेष्टा केली.काही हरकत नाही. आता अंधार पडू लागलाय. मी तुला सोडवायला घरापर्यंत येईन."

     "काकू कुठे आहेत?"

     " आहे नां!"

     तेवढ्यात काकू आल्या. मी दोघांना नमस्कार केला. खूपच गप्पा झाल्या.

     मी काकांच्याकडे साखर कारखान्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. आपल्याकडे शेतकऱ्यांचा खूप ऊस जातो आणि ऊस लांब पल्ल्याच्या साखरकारखान्यात जातो. म्हणून आम्ही, बाबांनी, इथल्या काही समाजसेवकानी ठरवलं साखरकारखाना इथेच उभा करायचा. सर्व जण तयार होते.कारण नदीच्या बारमाही पाण्यामुळे ऊसाचं ऊत्पादन वाढलं होतं.

     " बरं का आभास,ही सगळी जागा बाधित आहे.म्हणजे मागचे जंगल.इथं पूर्वी लुटारू दरोडा टाकून लुटून आणायचे. त्याचबरोबर त्यांना विरोध करणाऱ्यांना पण बांधून आणायचे. इथे त्यांची  हत्या करायचे.  त्यांच्या स्त्रियांना आणायचे.  त्यांच्यावर अत्याचार करायचे. आणि मग त्यांना मारून टाकायचे.ते निष्पाप जीव तळतळाट होऊन मरायचे. नंतर लूट एकत्र करायची. मोजमाप व्हायचे. दारूच्या नशेत रात्र घालवायचे. कधीकधी सोन्याचे दागिने एखाद्या तांब्यात किंवा घागरीत घालून पुरुन  ठेवायचे.कधीतरी येऊन ते लूट घेऊन जायचेत. अजून सुद्धा या ठिकाणी पुरलेल्या घागरी सापडतात.

       खरं तर माणसाला आपल्या नशिबी आहे तेवढंच मिळतं. एखाद्याचं पूर्वकर्म चांगलं  असतं त्याला खूप संपत्ती मिळते. तसेच एखादी स्त्री सौंदर्यवती होते. हे त्यांच्या कर्माचे फळ असतं.ते कुणीही बळकावून घेऊ शकत नाही. आणि लुटारू नाही ते केलं आणि मोठ्या पापांची धनी झाले. ते निष्पाप जीव त्यांच्या अत्याचाराला बळी पडले.यांचा खून व्हायचा ती तळतळाट होऊन, शाप देऊन मरायचे. अकाली मृत्यूमुळे त्यांचा स्थूल देह सुटायचा पण सूक्ष्म देह मिळण्याच्या अगोदर वासना शरीरात शिरकाव व्हायचा.याला छाया शरीर असे पण म्हणतात.अरे आभास,अशी कित्येक आत्मे  वासना देहानं वावरत आहेत.सुटण्याची वाट पहात आहेत. जेव्हा भगवान कल्की अवतार घेतील तेव्हा या सर्वांची सुटका होईल. सर्वजण मुक्त होतील. नाहीतर तुम्हाला कारखाना व्हायच्या अगोदर एक करावे लागेल, त्र्यंबकेश्वर आणि काशी येथुन पंडित बोलवावे लागतील. त्यांच्याकरवी श्राद्ध,तर्पण वगैरे विधी करून त्यांना मुक्ती मिळवता येईल. पण हे कारखाना व्हायच्या अगोदर.अशा गोष्टी व्हायला पाहिजेत नाहीतर खूप अडचणी निर्माण होतील."

      "बाप रे!भयंकर आहे सगळं!"

      " आम्ही घराच्या मागे विहीर काढताना एक दागिने भरलेली घागर मिळाली.जवळजवळ तीन किलो वजनाची असेल. आम्ही त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही. ती घरात आणून तसेच ठेवून दिली.."

     " तुम्ही ती सरकार जमा करायला पाहिजे होती."

     " सांगतो, तेच मला करायचं होतं. चार महिन्यापूर्वी पाऊस सुरू होण्याच्या अगोदर अचानक माझा आतेभाऊ चंपक आला. मी खूष झालो. तो आला म्हणून आम्ही जेवणाचा बेत केला. त्याला मांसाहारी जेवण आवडायचे. त्याला दारूची बाटली पण लागायची. अर्थात घरात होतीच!मी एक चुक केली. त्याला बोलता बोलता हे सगळे दागिने दाखवले. तो पण भारावून गेला. त्याच्या डोळ्यात एक चमक उठली. जेवण तयार होत होतं.तोपर्यंत आम्ही ग्लास मांडले व हळूहळू प्यायला सुरुवात केली.

       आणि इथेच  घात झाला. बहुधा चंपकला ह्या गोष्टीची कल्पना असावी! चंपकने  येताना विषाची कुपी आणली होती. सगळी कुपी माझ्या नकळत माझ्या क्लासात ओतली. मी एकदम ग्लास खाली केला. थोड्याच वेळात त्याचा परिणाम दिसू लागला. तेवढ्यात माझी पत्नी जेवणासाठी विचारायला आली माझी अवस्था बघून तिला वाईट वाटले. मला उठता,बसता येत नव्हते. एवढ्यात चंपक ऊठला. त्याच्या डोळ्यात खून चढला होता. त्यानं माझ्या बायकोचा गळा दाबला.बायको माझी धडपडत होती. हातपाय आपटत होती. मला काही करता येत नव्हतं. मी मरणपंथाला लागलो होतो. काही क्षणात बायको हात पाय आपटून ती गतप्राण झाली. तिची हालचाल थांबली आणि मग तो नराधम  उठला."

      "पण काकू आहेत नां!"

      " सांगतो, सगळं सांगतो. नंतर माझ्या डोळ्यासमोर चंपकनं सगळे दागिने पिशवीत भरले. माझ्याकडे बघून त्याने विकट हास्य केलं आणि तो बाहेर गेला. दरवाजा बंद केला. दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि निघून गेला. मी तडफलो तडफडलो आणि निष्प्राण झालो.

      तुला माझी एक विनंती आहे. तु मला माझ्या मुलासारखा. एक काम कर.आमचं विधिवत अग्नीसंस्कार कर.पींडदान कर.मग आम्ही मुक्त होऊ.नाहीतर एक अघोरी आम्हाला वारंवार बोलावतोय.आमची वाट पहातोय."

        आता मात्र मी घाबरलो. काका आत गेले.

        मोबाईल वाजला. तो सक्षमचा कॉल होता.

       "आभास कुठे आहेस?"

       " मी काकांच्या घरी आहे.येईन मी लागलीच."

       "लवकर ये.वाट पहातोय."

      मी मोबाईल बंद केला. क्षणार्धात विद्युत पुरवठा बंद झाला. काळाकुट्ट अंधार.बाहेर अंधार. आत अंधार.आता मात्र मी घाबरलो. तसाच बाकड्यावर बसलो. माझी मती गुंग झाली.हा माणूस आपण स्वतः मेलेलं सांगतोय! मग हे शरीर कसले?हा माणूस माझ्याबरोबर एवढा चांगला बोलला. कसं काय शक्य आहे?

      मी क्षणभर उडालोच. तरीही धाडसानं हाक मारली.

     "काका..काका..कुठे आहात?"

     जोरदार हसण्याचा आवाज. खूपच विचित्र वाटलं. भयाण वाटलं. माझ्या शरीराला बुळबुळीत  स्पर्श झाला. मी उडालोच. आता काही खरं नाही.मी मोबाईलची बॅटरी चालू केली. पण मघाची स्वच्छता नव्हतीच. सगळा केरकचरा जमिनीवर पडला होता. घरात सगळीकडे कोळीष्टके साठली होती. काही ठिकाणी सापांच्या काती पडल्या होत्या. परत तो बुळबुटीत स्पर्श. मोबाईल हातातून गळून पडला.माझ्या तोंडातून जप सुरू झाला.

     " श्रीराम जय राम जय जय राम."

     मी श्रीरामाचा धावा सुरू केला. नंतर चाचपडत मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. पण जमिनीवर केरकचरा होता. खूप शोधलं पण मिळाला नाही. मी चाचपडत दरवाजाकडे पळालो पण दरवाजा बाहेरून बंद होता. मग मी कसाबसा आत आलो.भयानक गर्तेत सापडलो होतो.भयानक या शब्दाची भीषणता आता समजून आली.

      परत बाकड्याकडे येऊ लागलो. पायाला लागून काहीतरी घरंगळत गेले.बहुधा एखादी  घागर  असावी. त्या आवाजात भयानकता होती. बाकडं कसंबसं सापडलं. त्या बाकड्यावर खूपच घाण साठलेली होती. माझ्या हाताला लागलेल्या कचर्यावरून समजलं.

      परत पायावरून काही तरी पळालं. एका पाठोपाठ एक. बहुधा  ऊंदरं होती.चीsचीs करत  पटपट पळाली. धडपडत बिळात घुसली असावी! आणि मग गुरगुरण्याचा आवाज. आता मात्र सहन करण्याची पात्रता संपली होती. अचानक दोन डोळे चमकले.परत  पायाला काहीतरी लागलं.चाचपडलं.तो झाडू होता. मी हातात घेतला व त्या डोळ्यांच्या दिशेने फेकून मारला.मग ते डोळे मँव मँव करत पळाले. माझा जप सुरू होता.

      " श्रीराम जय राम जय जय राम"

      मी तोंडावरचा घाम पुसला. बाहेर पडण्याकरता काहीतरी करायला हवं होतं. माझ्याकडे घराची खडानखडा माहिती होती. वरच्या मजल्यावर जायला आतून जिना होता.तसाच  गॅलरीतून खाली पुढच्या बाजूला उतरायला पण जिना होता. दोन्ही बाजूने गॅलरीत जाता येत होतं. आणि स्वयंपाक घरातून मागच्या बाजूला बाहेर पडलेला एक दरवाजा होता. पण तिथं जाणं माझ्याच्याने शक्य नव्हतं. त्यापेक्षा जिना चढून वर जाऊन उघडून पुढच्या जीन्यातून धूम ठोकायची असा विचार होता.

      एकदम काहीतरी उडत येऊन माझ्याशी धडकलं. धडपडत खाली पडलं.परत चिरचिर आवाज करत ते ऊडालं. एखादी पाकोळी आसावी. पण त्या स्पर्शाने मी पुरता कोलमडून पडलो.  शरीर कंप पाऊ लागलं.

     परत कुणीतरी जोराने वरच्या मजल्यावर दरवाजा बडवत असल्याचा भास झाला.  कुणीतरी  पऴत होतं.वरच्या मजल्यावर आतील बाजूने पळाले. माझी तरी बोबडीच वळली.

      आणि घराबाहेरच्या वटवृक्षावर कल्लोळ झाला. सगळ्या पाखरांनी किलबिलाट सुरू केला आणि मग घुबडाचा जीवघेणा चित्कार.

       माझी काय अवस्था झाली याची कल्पना न केलेली बरी! मी स्वतः टोचून पाहिलं.मी जिवंत होतो. निश्चितच जिवंत होतो. आता मला पण या व्यतिरिक्त काहीही पर्याय नव्हता. कारण असाच आत राहिलो तर भीतीने माझा जीव जाईल. इकडे आल्याचा पश्चाताप झाला पण काहीही पर्याय नव्हता.

      अचानक पायावरून थंडगार गुळगुळीत काहीतरी गेले. बहुतेक सर्प असावा!एका उंदराला त्यांना पकडलं होतं. उंदीर चीsचीs करत बाहेर पडण्याला धडपड करत होता. मी पण असाच काळरूपी सापाच्या तोंडात सापडलो होतो. बाहेर पडण्याची धडपड करत होतो.

      मोबाईल सापडत नव्हता. शोधण्याशिवाय  काही पर्याय नव्हता. भयानक वातावरण! एखाद्याने बेशुद्ध पडावं असं! कदाचित गुरूंचा आशीर्वाद असावा म्हणून मी तोंड देत राहिलो. मग मी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली.

      " जय हनुमान ज्ञान गुन सागर।

        जय कपीस तिहु लोक उजागर। 

        राम दूत अतुलित बल धामा।

        अंजनी पुत्र पवनसुत नामा।

        महावीर विक्रम बजरंगी।

        कुमती निवार सुमती के संगी।

        कंचन बरन बिराज सुबेसा।

        कानन कुंडल कुंचित केसा।…."

      काही क्षण शांततेत गेले. मी डोळे मिटून ध्यानात बसलो. थोडासा धीर यायला लागला.

      अचानक मेसेजचा रिंगटोन वाजला.त्यात मोबाईलची लाईट लागली. धडक मारून मोबाईल हस्तगत केला. आता मग थोडा जीवात जीव आला.

     मोबाईलची बॅटरी चालु केली. आता वेळ दवडून चालणार नव्हतं. वरती काहीतरी गडबड होती. पण त्याही परिस्थितीत ती जागा भयाण वाटत होती. दुसरा दरवाजा नव्हता. मागचा दरवाजा...नाही मला तरी शक्य नव्हतं.

       मी पटापट पायऱ्या चढत वरती आलो. वरती पण कोळीष्टके साठली होती.सापाच्या काती लोंबकळत होत्या. एक पाकोळी चिरचिरत गेली.आतल्या खोलीत काहीतरी घडलं धडपडलं. आणि माझ्या अंगचं पाणीच पळालं.

     मी छातीवर हात धरला. हनुमानाचं सुंदर रूप  नजरेसमोर आणलं आणि बोललो,

     "भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारूती"

     पण बरं वाटतं.हनुमानाच्या नावानंच अंगातली भिती दुर पळते." इस पिंडका यती हनुमंत रखवाला।"

      दरवाजा सापडला.पण कडी काही केल्या हलत नव्हती.गंजलेली होती.

     अचानक  मला तो बुळबुळी स्पर्श जाणवला. कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला ओरडता सुद्धा आलं नाही.मी बेशुद्ध होते की काय असं वाटू लागलं. माझी मती गुंग झाली होती.

     डोळे उघडून बघायचे पण धाडस होत नव्हतं.पण बघितलं आणि का बघितले याचा पश्चाताप झाला. एक भली मोठी आकृती साधारण मानवासारखे हसत होती.

     बापरे!आता काही माझी सुटका होत नाही. आता मी कोणाच्या तरी तावडीत सापडलो. आता माझा मृत्यू निश्चितच आहे.

    मी त्याच्याकडे पाहिले.ती खरोखरच हसत होती. भेसूरपणे हसत होती आणि त्याच्या तोंडातून थुंकीचे तुषार उडत होते.एखाद्या पावसाच्या थेंबा सारखे अंगावर पडत होते.चेहरा दिसला होता. मला रडता पण येत नव्हते.

      "आभास.. आभास.."

     कुणीतरी माझ्या तोंडावर पाणी मारुन ऊडवत होतं.तो मला सक्षम होत. मी उठलो.सकाळ झालेली होती.

      "आभास, ठिक आहेस नां?"

     आणि बरेच गावकरी जमा झालेले होते.मी उठलेलो पाहून सर्वजण खुश झाले.

      मी काकांच्या घराकड पाहिलं.अंगणात पालापाचोळा साठला होता.सहा महिन्यात स्वच्छ केला नसल्यासारखा. दरवाजाला खालून कुलूप होते.

     बापरे! मग मी आत कसा गेलो?

     त्याही परिस्थितीत मी थरारलो.

     मग कुलुप फोडण्यात आले. आत केरकचरा पडलेला होता.कोळीष्टके साठली होती. सक्षम व काही लोकांच्या बरोबर मी घरात प्रवेश केला आणि थरारलो. एका बनियन आणि विजारीच्यामध्ये हाडांचा सापळा पडला होता. दुसरीकडे साडीतला सापळा पडला होता.काका, काकूंच्या प्रेतांची ही अवस्था झाली होती.

      आता सर्वांच्या लक्षात आले. पावसाळा असल्यामुळे आणि दरवाज्याला बाहेरून कुलूप असल्यामुळे कोणीही फिरकलं नव्हतं.

     मग त्याची  कायदेशीर कारवाई सुरू केली. पोलिसांना बोलावले.त्यांनी जागीच पंचनामा केला.  मी त्यांना घडलेली हकीकत  सांगितली.पण ह्या घटनेवर कोण विश्वास ठेवणार?सगळं स्वप्नवत होतं.

     मी दोन्ही सांगाडे ताब्यात घेतले. स्मशानात विधिवत अग्निसंस्कार केला. अन नंतर पिंडदान पण केले. त्यांना कदाचित मुक्ती ही मिळाली की माहीत नाही पण मनाला एक समाधान मिळाले.

     माझ्या बोलण्यावरून पोलिसांनी एक संशयीत म्हणून चंपकला ताब्यात घेतले. नंतर पोलिसांच्या मारण्याच्या भीतीने चंपकने सगळी हकीकत सविस्तर पोलिसांना सांगितली. आणि बळकावलेले सोन्याचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.

       

     मी कोल्हापूरला  परत आलो.

     बाबांनी मला गुड न्यूज दिली. कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला होता.सगळी जमीन आम्हाला परत मिळणार होती. माझ्या करता शुभ समाचार होता.

     बाबांनी पण साखर कारखान्याच्या कामात लक्ष घालायचे ठरवले.पण काम चालू करण्यापूर्वी काही विधी करावे लागतात हे सांगितले. 

     आणि मग मी पत्नीसह  गावाकडे आलो आणि कायमचा स्थाईक झालो.

       

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू