पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

या, पुन्हा गाऊ या

या, पुन्हा गाऊ या...
मध्यप्रदेश मराठी अकादमीचा मराठी संस्कृती जपण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच भुलाबाई, मंगळागौर, गोंधळ, होळी इतर सणांवर आधारित  पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मला आमंत्रित करण्यात आले होते.
जेव्हां फोनवर सांगितले की पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे आणि मला त्यावर बोलायचे आहे… मनात विचार आला अरे बापरे एवढी का मोठी झाली आहे मी..! आगदी प्रकाशित पुस्तकावर दोन शब्द बोलण्या एवढी.. 

मग पुस्तकाबद्दल विचारपूस केली आणि ज्या स्पीड ने मी मोठे झाले होते त्याच स्पीड ने अगदी लहान झाले… . सरळ माझ्या आजोळी.. खानदेशात भुसावळलाच पोहोचले.. . 

मला आठवले माझे लहानपण.. ते रेल्वे क्वार्टर.. सारवलेले अंगण… अंगणात एका सुबक लाकडी पाटावर सज्ज गुलाबाई आणि गुलोबा.. माझ्या सर्व मैत्रिणी, गुलाबाई ची गाणी… गोडापरी का तिखटापरी.. आमचे हसणे खिदळणे.. खेळणे गाणे सारं सारं आठवलं

खरं सांगते त्या आठवणींनी माझा तो संपूर्ण दिवस छान.. आनंदी गेला… . 

आता विचार करा फक्त आठवणीच माझा दिवस एवढा छान गेला तर त्यावेळी ज्यावेळी खरोखर घरातल्या अंगणात लहानग्या मुली एक दिवसच नव्हे तर महिनाभर गात असतील खेळत असतील  किती छान किती सकारात्मक वातावरण असेल ना! ती सकारात्मकता तीच पॉझिटिव्हिटी  तोच आनंद तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यप्रदेश मराठी अकादमीचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे  आणि खरं सांगते आजच्या युगात आनंद वाटणे आणि सकारात्मकता देणे त्याहून मोठं कुठलं पुण्य नाही

ह्या गीतांचे संकलन विनिता धर्म ह्यांनी केले आहे. मुखपृष्ठावर वारलीची सुंदर कलाकृती आहे.

  गुलाबाई किंवा भुलाबाई हा सण महाराष्ट्रातील साजरा होणाऱ्या एक सण आहे पश्चिम महाराष्ट्रात ह्याला भोंडला किंवा हादगा पण म्हणतात खानदेशात आणि विदर्भात भुलाबाई या नावाने ओळखले जाते भाद्रपद महिन्यात पौर्णिमेला भुलाबाईची स्थापना करतात. गुलाबाई आणि गुलोबा म्हणजे शिव आणि पार्वती यांचे रूप आहे. गणपती आणि महालक्ष्मी यानंतर  घरची बाई माणसं खूप थकलेली असतात आणि त्यानंतर अश्विन-कार्तिक मासात पुन्हा नवरात्र दसरा दिवाळी हे लागोपाठ असतातच. 

त्यामधला हा काळ जरा निवांत त्यांच्या मनोरंजनासाठी राखून ठेवलेला असतो म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत एक महिना. 

न जास्त थंडी, न गर्मी , पाऊस पण जाण्याच्या तयारीत असा हा छान सुवर्ण काळ.. 

त्याकाळी स्त्रियांना, मुलिंना आजच्या सारखे स्वातंत्र्य नव्हते म्हणून त्यांच्या मनोरंजनासाठी ,त्यांना व्यक्त होण्यासाठी ह्या सणाची कल्पना केली असावी… 

गुलाबाई ला माहेरी बोलावून तिचा पाहुणचार करायचा तिला गोडधोड खाऊ घालायचे हा कंसेप्ट.. 

पहिली गं भुलाबाई देवा देवा साजे

सुरुवात होते ह्या गाण्याने

नंतर… 

सा बाई सू सा बाई सू
बेलाच्या झाडाखाली महादेवा तू
विडा रंगिला हार गुंफिला 
गुलाबाचं फूल माझ्या गुलाबाई ला.. 

घरात पाहुणे आल्यानंतर त्यांचा पाहुणचार कसा करायला हवा ही शिकवण मुलिंना आपसुकच मिळत असे. 

रोज संध्याकाळी एकमेकींच्या घरी जाऊन मुलीं थोडा धिंगाणा घालून ही मजेशीर गाणी म्हणत, खेळ खेळत. 

एकीकडे गाणी म्हणून झाल्यावर दुसरी कडे.. मग तीसरी कडे… गाऊन गाऊन घशाला कोरड पडायची पण मुलींचा उत्साह काही ओसरत नसे. 

टिपऱ्यांचा पाळणा करणे, गोल गोल फेर धरणे… ह्याची मजाच काही और! 

मला अजून आठवते माझी आजी गुलाबाईसाठी रोज घरच्या फुलांचा हार करत असे… 

मग एका बंद डब्यात असलेला प्रसाद काय ते ओळखून कोडी सोडवली जात. 

तो प्रसाद पण गुळ दाणे, फुटाणे, खोबरे, राजगीर चे लाडू, शंकरपाळे, सुका मेवा, मोदक असा पौष्टिक… 

भुलाबाईची गीते, भुलाबाईच्या म्हणजेच त्याकाळच्या बाईच्या जीवनातील कितीतरी मजेशीर प्रसंग सांगून जातात.  सासर माहेरची तुलना, गुलाबाईचे माहेर जाण्यासाठी केलेले आर्जव, माहेरून परत सासरी येताना केलेले नखरे..नंडा भावजयीच्या गमती जमती, गुलाबाई च्या बाळाची नावे..

अडकीतजाऊ खिडकीत जाऊ 
खिडकीत ठेवला बत्ता 
गुलाबाई ला मुलगा झाला नाव ठेवलं दत्ता

आडावरच्या पाडावर धोबी धुणं धुतो.. 
 धोबी, कुंभार, शेतकरी ह्यांच्या जीवनावर आधारित गोड गाणी त्याकाळची माहिती देत.

अक्कण माती चिक्कण माती.. 
ह्या असल्या गाण्यांमुळे करंज्या करणे, सुगरण होणे.. घराची सजावट.. येणाऱ्या भवितव्यात मुलींचा रोल काय असणार हे शिकवले जात असत. त्यांना खेळीमेळीने तयार केलं जात असे. 

कारल्याचे बी पेर ग सुने

ह्या गाण्यांमधून किती तरी व्यवहारिक गोष्टी मुली शिकायच्या.. 

आता कारल्याचे आधी बी पेरतात, मग कोंब येत, हळूहळू वेल मोठी होते, फुल येतं मग कारलं येत.. हे आपण आजकाल आपल्या मुलांना evs मधे seed and seedlings ह्या चैप्टर मध्ये शिकवतो… त्याकाळी हेच मुलं हसत खेळत शिकायचे. 

तर अशी ही गाणी म्हणत हसत खेळत एक महिना पार पडायचा… आणि कोजागरी पौर्णिमेला गुलाबाई चे विसर्जन जवळच्या तलावात किंवा विहिरीत व्हायचे. 

त्यादिवशी तर अंगणात मस्त अंगत पंगत व्हायची. सर्व मुली घरून डबा करून आणायच्या. 

रात्री नृत्य गायनाचा कार्यक्रम मग दूध पिणे… सर्व मजाच मजा.. आणि मग सकाळी मुली भरल्या डोळ्यांनी गुलाबाईला बिदा करत. 

मध्यप्रदेश मराठी अकादमी  गुलाबाईची हीच निरागसता, आपली संस्कृति आपला वारसा हे पुस्तक रुपाने आपल्या पर्यंत पोहोचवू इच्छित आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.

या पुन्हा गाऊ या… ह्या पुस्तकात भोंडला, गुलाबाई, मंगळागौर, गोंधळ, गुडीपाडवा, संक्रांत, रामनवमी, होळी इतर गीतांचा पण समावेश आहे. मुखपृष्ठावर वार्लीची सुंदर कलाकृती आहे. 

आता हे पुस्तक का वाचायचे,.. ह्या पुस्तकाचा, गुलाबाई च्या गाण्यांच्या आजच्या युगात काय महत्त्व आहे?? सर्व पालकांचा प्रश्न. 

 

पण मला जे लॉजिकल मुद्दे ध्यानात आले आहे ते मी आपण सर्वांना पटवून देण्याचा एक प्रयत्न करते. 

आज मुलं लॉकडाऊन मुळे घरातच कैद आहे. पहिली दुसरी ची मुलं जे शाळेत जाऊ शकत नाहीये घरीच ऑनलाईन शिक्षण घेत आहे. 

खरंतर त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळून त्यांचे खरे शिक्षण पूर्ण होते. बरोबर टिफिन खाणे, अर्ध्या सुट्टीत खेळणे .. मुख्य म्हणजे घरातून थोडावेळ दूर ाहाणे हे फार फार गरजेचे आहे. तर जर आपण आपल्या घरात गुलाबाई आणल्या… जस्ट फार ए चेंज.. तर काय हरकत आहे? एकतर छान एकत्र खेळायला मिळेल, सोबत खाऊ खाल्ल्याने चार घास जास्तीचे खाल्ले जातील. 

एक गोष्ट अजून ध्यानात घ्या.. आजकाल मुलं मोबाईल वर खेळतात तेव्हा ते पूर्ण वेळ गप्प असतात. डोळे सतत मोबाईल वर… काहीच शारीरिक हालचाल नाही.. अधूनमधून येस्स.. किंवा ओ शिट एवढेच ऐकायला मिळते.

ही जुनी खेळ खेळताना मुले गप्प नसतात.. 

शिवाय त्यांच्या विचारांना चालना मिळते. अभ्यासा शिवाय काही तरी इतरही पाठ करायला मुलं शिकतात. 

सतत हातवारे करून फिजिकल एक्टिव्हिटी पण भरपूर होते. काळानुरूप गाण्यात आणि प्रसादात थोडे फार बदल करून आपण आजही गुलाबाई साजरी करू शकतो किंवा सुरुवात करायला हवी असे मला वाटते. 

 

पुस्तक खरंच सुंदर झाले आहे, त्यासाठी श्रीसर्वोत्तम प्रकाशन व अकादमीचे अभिनंदन! 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू