पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बक्षीस

 बक्षीस

बालमित्रांनो, तुम्हाला एक गंमत माहीत आहे का? आपला चंद्र आहे ना म्हणजे चंदामामा, चांदोबा असं तुम्ही म्हणता ना तो. त्याची नी आपली लहानपणापासूनच गट्टी असते. तुम्ही जेवत नसला तरी आई तुम्हाला चिडवायला म्हणते,
‘‘चांदोबा, चांदोबा येऊन जा, तूपरोटी खाऊन जा.’’ म्हणते की नाही? तर त्या चंदामामावर एक ससा पण असतो बरं का? तो त्या चंदामामाला सोडून कुठेच जात नाही. एकदा चंद्रावरच्या सशाला फारच कंटाळा आला. त्यालाही वाटले आपण जरा फिरावं. सारखं आपलं आपण चंद्रावरच बसून असतो. पण कसं फिरणार? या विचाराने त्याला रडू फुटले आणि काय आश्‍चर्य त्या त्याच्या अश्रूंतून दोन छोट्या छोट्या पांढर्‍या शुभ्र चांदण्या बाहेर आल्या. त्या चांदण्यांना पाहून सशाला फारच मजा वाटली. तो खुदकन हसला. तसं त्या चांदण्यांनाही हसू आले. त्या म्हणाल्या,
‘‘ससुटल्या, तू का रडतोस?’’
‘‘मला इथं चंद्रावर बसून कंटाळा आलाय. मला खाली पृथ्वीवर जायचंय. झाडं, पानं, फुलं बघायचीयत, पाण्यात खेळायचंय. माझ्या बांधवांना भेटायचंय, पण माझी इथून सुटकाच होत नाही. पहाटेचे चार वाजत आले होते. इवलुश्या चांदण्या विचारात पडल्या, ‘‘काय करावं बरं?’’
मग त्यांना एक आयडिया सुचली त्यांनी ती सशुल्याच्या कानात सांगितली. ससुल्याने टुणकन उडी मारली.
***
ससुल्या मस्त मजेत पृथ्वीवर उतरला. सगळीकडे सामसूम होती. हळूहळू चंदामामा गायब होऊन सूर्यदेवाचे दर्शन होऊ लागले होते. ससा उतरला तो थेट तळ्याच्या काठी. तळ्यात विविध रंगाची कमळं फुलली होती. ती पाहून सशाला फारच आनंद झाला. त्या कमळावर पडलेले दवबिंदू त्याला मोत्यासारखे दिसू लागले. तळ्यातल्या पाण्यात एक डुबकी मारावी का? असा विचारही त्याने केला, पण फारच थंडी होती. तो काकडू लागला होता. त्यामुळे त्याने तो बेत रद्द केला. आता सर्व ससे कंपनी आपल्याला कसे भेटतील याचा तो विचार करू लागला. त्याचं नशीब बलवत्तर होतं. तिथून जवळच काही ससे राहात होते. त्यातल्या एकाने या चंद्रावरच्या सशाला पाहिलं आणि सर्वांना त्याने वर्दी दिली की, ‘‘आज आपले अहोभाग्य आहे की, चंद्रावरचा ससा आपल्या सर्वांना भेटण्यासाठी खाली पृथ्वीवर आला आहे.’’ सारे ससे आनंदाने नाचू लागले. त्यातल्या बुजुर्ग सशाने जावे आणि वाजत गाजत सन्मानाने या पाहुण्या सशाला बोलवून आणावे असे ठरले. तो मोठा ससा या चंद्रावरच्या सशाला बोलवायला आल्यावर ससुल्याला खूपच आनंद झाला, थोडासा गर्वही झाला. आपण म्हणजे कोणीतरी ग्रेट असं वाटून गेलं, पण क्षणभरच. तो लगेच त्या बुजुर्ग सशाचा पाया पडला आणि सर्वांना भेटायची इच्छा व्यक्त केली. तोपर्यंत सर्व सशांनी त्याच्या आगत-स्वागताची तयारी केली, त्याच्यासाठी खाशी मेजवानी ठरवली. ससुल्याचा तो दिवस खूपच मजेत गेला. मुख्य म्हणजे त्याला त्याची आईपण भेटली. आधी ससुला आईवर रागावला, ‘‘की तू मला इतके लांब का पाठवलेस?’’ पण मग आईने समजून त्याला सांगितले की, ‘‘अरे तुला किती मान आहे. ज्या चंद्रावर सर्व लोक मनापासून प्रेम करतात तोच चंद्र तुला आपल्या मांडीवर घेतो. बघ तुला इथे पण किती मान आहे.’’ मग चंद्र जरा खूश झाला.
ससुल्याचा आजचा दिवस खूपच मजेत गेला, दिवसभर तो हसला, खेळला, बागडला. छान छान खाऊ खाल्ला. त्याला परत जावेसेस वाटेना.
**
संध्याकाळचे सहा वाजून गेले तशी चांदण्यांना भीती वाटू लागली, ससुल्या परत कसा आला नाही? चंदोबाला काही न सांगता आपण ससुल्याला खाली पृथ्वीवर पाठवलंय ही आपली चूक तर नाही झाली? आता कसं होणार? चांदोबामामा आपल्या कामाला हजर व्हायच्या आधी ससुल्या इथे नसला तर काय होईल या भीतीने त्या चादण्यांच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. ससुल्या त्या वेळी तळ्याच्या काठी आपल्या मित्रांबरोबर मजा करत होता. एकदम चांदण्यांच्या डोळ्यातील पाणी ससुल्याच्या अंगावर पडले आणि त्याला वाईट वाटले. आपण त्या चांदण्यांना फसवू शकत नाही याची त्याला जाणीव झाली आणि मोठ्या जड अंत:करणाने त्याने सर्व बांधवांचा निरोप घेतला. कारण त्याने चांदण्यांना कबूल केले होते की, मी वेळेत परत येईन. आता खरंतर जायची इच्छा नव्हती, पण त्यांना फसवणे हेही चुकीचे होते, आईने पण त्याची समजूत काढली होती.
चांदोबा यायच्या आत ससुल्या हजर झाला, चांदण्यांना आनंद झाला, पण ससुल्या मात्र जरा दु:खी-कष्टी दिसत होता, सगळ्यांच्या मनातलं ओळखणार्‍या चांदोबाने ससुल्याला खोदून खोदून कारण विचारले, तर ससुल्या काही सांगायला तयार होईना, पण त्याच्या डोळ्यांतून पाणी येत होते. चांदोबा मामाला वाईट वाटू लागले. एवढा हसणारा-खेळणारा ससुल्या का बरं रडत आहे तो चिंतेत पडला. तेव्हा चांदण्यांनी हळूच सगळी कथा चांदोबाला सांगितली. चांदोबालाही वाईट वाटले, मग त्याने यावर एक उपाय शोधून काढला. त्याने ससुल्याला सांगितले की, ‘‘महिन्यातून एकदा अमावस्येच्या दिवशी मी रजा घेत जाईन आणि त्या रात्री तू पृथ्वीवर जात जा आणि सर्व बांधवांना भेटून संध्याकाळी परत ये. चालेल का तुला?’’ हे ऐकताच ससुल्या खूश झाला आणि आनंदी दिसू लागला. त्याने लगेच चांदोबाचा हा प्रस्ताव मान्य केला. तेव्हापासून अमावस्येच्या दिवशी चांदोबामामा दिसत नाही आणि ससुल्या त्या दिवशी आपल्या बांधवांना भेटायला पृथ्वीवर येतो.
पण बालमित्रांनो, ससुल्या जर चांदण्यांना कबूल न केल्याप्रमाणे परत नसता आला तर त्याला चांदोबामामाच्या रागाला सामोरं जावं लागलं असतं आणि त्याला शिक्षा मिळाली असती. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे चांदोबा मामाकडून ससुल्याला कायमचं बक्षीस मिळालं.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू