पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संकल्प

संकल्प


दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजाने करोना बहूतेक घाबरुन पाळला असे मुलांना वाटत असावे, कारण थोडे तरी फटाके उडवण्याचा मोह मुलांना, बायकांना दारात रांगोळी काढायचा उत्साह आणि वडील माणसांना आकाशकंदील लावायचा मोह  झालाच. सगळे करोना च्या भीतीतून थोडे सावरत होते. मुले पण  हल्ली रोजच खाली खेळायला येऊ लागली होती. पण शाळा,  क्लासेस बंदच होते. बाहेर पण जास्त कोणी जात नव्हते.  बर्‍याच लोकांना वर्क फ्रॉम होम मिळाल्याने  संध्याकाळी काही बायका खाली येऊ लागल्या होत्या. मोडक काकु शाळेत शिक्षिका आहेत.  त्या पण हल्ली खाली यायला लागल्या होत्या.  शाळेतील मुलांना न भेटल्याने त्यांना चुकल्यासारखे वाटायचे,  पण मग आता त्या  आपल्या कॉम्प्लेक्स मधील मुलांना  नवीन नवीन  गोष्टी शिकवू लागल्या. मुलांशी त्यांची गट्टी जमू लागली.  

15 डिसेंबर 20 च्या संध्याकाळी  काकू नेहमीप्रमाणे देवळाच्या कट्ट्यावर बसल्या होत्या, मुले बाहेर खेळत होती. त्यांनी सगळ्या मुलांना बोलावले आणि विचारले “नवीन वर्षात काही संकल्प करणार का”: एक साधा आणि सोपा, सगळ्यांना जमेल असा आपण एक संकल्प करूयात. रोज तुम्ही ह्या आपल्या बच्चे कट्ट्यावर भेटायचे, चालेल का ? लगेचच सगळ्यांनी मोठ्या आवाजात ‘होय’ म्हणुन संमती दिली.

संध्याकाळी मोडक काकू सगळ्या मुलांना गोष्टी सांगत,  नवीन खेळ शिकवत, पाढे म्हणवून घेत, श्लोक शिकवत, असे एक ना अनेक नवीन नवीन प्रकार मुलांकडून करून घेत.  रोज छोटी गोष्ट तर असायचीच, सुरुवातीचे थोडे दिवस काकूच सांगायच्या. मग मुलांचा उत्साह बघुन  रोज प्रत्येकाची पाळी काकूंनी लावली.

गोष्ट मुलांनीच शोधली पाहिजे असे नाही तर पालकांनी त्यांना मदत केली तरी चालायची.  पण ज्यांच्या पालकांना वेळ नसेल त्यांना  मदत करायला काकू  होत्याच.  त्या  काही मुद्दे देत आणि मग गोष्टींची तयारी करवून घेत.  त्यांच्या या छोट्याशा  उपक्रमाने मुलांना खूप फायदा व्हायला  लागला. गोष्ट सांगायला वेळेची मर्यादा असायची,  त्यामुळे मुलांना साधारण  त्या  वेळात  किती शब्द मर्यादा असावी,  ती गोष्ट भरकटू न देता मुद्देसुद आणि त्यातील  बोधा सकट कशी सांगायची, आवाजातील चढउतार, ई. लक्षात घ्यायची सवय झाली.  प्रत्येकाला काकू आदल्या दिवशी विषय देत त्यामुळे एक दिवस विचार करायला किंवा माहिती काढायला वेळ मिळे.  काकू वयानुरूप प्रत्येकाला विषय देत. अगदी  छोट्या  मुलांना  कावळे, चिमणी, गणपती, चांदोबा इत्यादी,  जरा मोठ्या मुलांना- घरातील तुळस, कोरफड, गवती चहा, कडी पत्ता ईत्यादी छोटी झाडे, पाळीव प्राणी, आपल्या कॉम्प्लेक्स मधील झाडांची माहिती, इत्यादी. तर मोठ्या मुलांना थोरव्यक्तींबद्दल   माहिती सांगणे, ताज्या घडामोडींबद्दल माहिती सांगणे, असे एक ना अनेक विषय मुलांना दिले जात. रोज च्या उपक्रमाने त्यांना ही चांगली सवय झाल्याने, आता त्यांना ते आवडू लागले होते. मुले मुद्यांवरून किंवा अगदी एखादा विषय दिला तरी त्या वरुन गोष्ट किंवा निबंध लिहायला शिकले. त्यामुळे मुलांचे शुद्धलेखन सुधारले, अक्षर सुधारले. पुस्तक वाचन कमी झाले असले तरी, मुले मोबाईल वरून माहिती गोळा  करत.  त्यांना एक चांगली गोष्ट शोधताना अजून एक दोन चांगल्या गोष्टी सहज मिळत गेल्याने प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढत गेला. मुले हळुहळू  खणखणीत आवाजात सगळ्यांसमोर बोलू लागल्याने आता  त्यांची चार माणसात बोलायची भीती तर पाळूनच गेली होती.   

ईकडे प्रत्येकाला काहीही नवीन  करायचे स्वातंत्र्य असल्याने प्रत्येक मुलांमधील अनेक कला सहज बाहेर येऊ लागल्या. आता मोठी मुले छोट्या मुलांना गोष्टींसाठी विषय आणि मुद्दे देऊ लागले,  हुशार आणि चपळ मुलांबरोबर राहून आळशी मुले पण कामाला लागली होती. या संध्याकाळच्या बच्चे कट्ट्यावर मुले  आता खूप काही शिकू लागले, धमाल असे करू लागले - जसे कधी चित्र काढायचे, कधी गोष्ट कधी वाचन,  लिखाण, कधी गाणे, नाच, अभिनय, खेळ तर कधी परिसरातील साफसफाई.  आता  काकूंच्या बरोबर मुलांच्या आया पण मदतीला येऊ लागल्या होत्या.  वर्षाचे शेवटचे काही दिवस उरले होते काकूंनी प्रत्येकालाच काही तरी नविन संकल्प करायला सांगितले. छोट्यांच्या टीमने रोज पाढे म्हणायचा व  थोडे तरी चांगले वाचन करून व तेच लिहुन आणायचे, जरा मोठ्या मुलांनी आपल्या कॉम्प्लेक्समधील झाडांना रोज एक बाटली पाणी घालायचे आणि त्यांची निगा राखायची तर मोठ्या मुलांनी रोज थोडा तरी व्यायाम करणे, वाटल्यास घरात आईला घर झाडून काढण्यास मदत करणे, कपडे वाळत घालणे, भाजी आणुन देणे, महिन्यातून एकदा कॉम्प्लेक्समधील  साफसफाई करणे, इत्यादी.  काही वेळा काही  मुलांना  कंटाळा  आला तरी  ग्रुपचा संकल्प असल्याने निश्चयी मुलांबरोबर आळशी मुले पण नाइलाजाने का असेनात, कामात सहभागी होऊ लागल्याने काकूंचा हेतू सफल झाला. म्हणूनच तर म्हणतात ना “सत्संगतीचा महिमा कळेना” आणी ‘राजा तशी प्रजा’  म्हणजे मुलांच्या मेंटर काकू खूप शिस्तप्रिय असल्याने मुलांना पण शिस्तीची सवय कधी लागली हे लक्षातही आले नाही;  आणि बघता बघता ही काकूंची मुले खूपच निश्चयी आणि सुसंस्कारी झाली. मागच्या वर्षी सहज केलेला संकल्प आता पक्का झाला होता, त्यामुळे ह्या वर्षी संकल्प न करता पण  ही मुले  काकूंनी सांगितलेल्या गोष्टी निश्चितच पार पडतील. कारण काकूंनी त्यांच्या मनावर पक्के संस्कार वर्ष भर अगदी सहजपणे हसत खेळत केले होते...

तर मित्रांनो..... कराल ना संकल्प पूर्तीचा  निश्चय...

ALL THE VERY BEST FOR NEW संकल्प....

वृषाली किशोर मुळे 

9833306701



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू