पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनुका गेला मॉलमध्ये

     


    *मनुका गेला मॉलमध्ये


      "मी मनुका! अहो खायचा नाही,मी चिनूचा मनुका,म्हणजे .....

मनीमाऊ. त्याचं झालं असं! मला जेव्हा बाबांनी म्हणजे,

चिनूच्या बाबांनी ,घरी आणले तेव्हा चिनू मनुका खात होता.

मला बघून तो जोरात ओरडलाच ,"मनुका !" "म्हणून तर तेव्हापासून मी मनुका.मला पण माझं नाव खूप आवडते.

मी घरी आल्यावर, "आता आमचे चौकोनी कुटुंब पूर्ण झाले," असे बाबा म्हणाले.

तशी मी आल्यामुळे आई जरा रागावलीच होती. मला पहाताच ती अशी घाबरली की, टुणकन उडी मारून सोफ्यावर जाऊन बसली.बाबांनी तिची भीती जावी म्हणून काय काय केले? विचारू नका. तरी ती मात्र माझ्यापासून चार हात लांबच असायची.

पण,आता मात्र माझ्याशिवाय तिला करमतच नाही.मीही आहेच तसा गुणी.... असं आई

म्हणते हो !

मीही लवकरच या घरात रुळलो.चिनूची आणि माझी घट्ट मैत्री झाली.आम्ही दोघे मिळून मस्त मजा करतो. चिनू शाळेत गेल्यावर मात्र मग मी आईच्या पायाशी घुटमळत राहातो.

तीही माझे खूप लाड करते.

तर आमचा चिनू जरा धडपड्या आणि हट्टी आहे.

सतत त्याचे काही तरी उपद्व्याप चाललेले असतात.दुध प्यायचा तर त्याला अतिशय कंटाळा आहे.आईचे लक्ष नाही असे बघून

हळूच दुध माझ्या ताटलीत ओततो. मीही ते जिभल्या चाटत संपवून मिशा साफ करत बसतो.पण आमची आई मात्र फार हुशार आहे.

ती लगेच ओळखते आणि मग काय दोघांच्याही पाठीत एक -एक धपाटा बसतो.

      आमचं  शहर तसं छोटंसं आहे. कधी इथे सर्कस भरते,तर कधी फन -फेअर.नवीन काही असेल तर चिनूला तिकडे जायचेच असते.

आता आमच्या गावात मॉल नावाची काहीतरी नवीन भानगड आली आहे.चिनूने अगदी हट्ट धरलाय आहे, माॉल बघायला जायचे म्हणून.आई-बाबांनी त्याला रविवारी घेऊन जायचे प्राॉमिस केले होते.

रविवारी चिनू आणि आई -बाबा मॉलमध्ये जाऊन आले. मी मात्र एकटाच घरी.. "का? म्हणून काय विचारता? " "अहो मी प्राणी आहे ना,

मॉलमध्ये प्राण्यांना सोडत नाहीत ना ! काय करणार?

मॉलमध्ये जाऊन आल्यावर चिनू तर हवेतच उडत होता. मला त्याने तिथल्या गमती-जमती सांगितल्या, खरं तर,मीही अगदी कान टवकारून ऐकत होतो.

पण, माझं तिकडे लक्षच नाही असे दाखवत होतो.

रुसलो होतो ना ! मग चिनूने हळूच एक खोका बाहेर काढला. त्यातील काही तरी माझ्या ताटलीत ओतले आणि माझ्या समोर धरले.मी जर भाव खात तोंड बाजूला वळवले,पण नंतर मात्र न

राहवून खायला सुरू केलं. कसलं भारी होतं, एकदम यम्मी !

बघता बघता फडशाच पाडला.आणि जिथे असलं टेस्टी जेवण मिळते तो मॉल असतो तरी कसा? याच मला खूप कुतूहल वाटू लागलं. एकदा तरी या मॉलमध्ये फेरफटका मारावा अशी इच्छा

माझ्या मनात घर करू लागली.

        या रविवारी आई तिच्या मैत्रिणीकडे जाणार होती,मग बाबांनी चिनूला मॉलमध्ये घेऊन जायचे ठरवले. मीही या वेळेलाहळूच चिनूबरोबर जाण्याचे फिक्सच केले.

रविवारी सकाळी लवकर आई मैत्रीणीकडे गेली.चिनूने मग,मॉलमध्ये जाण्यासाठी बाबांकडे भुणभुण सुरू केली. शेवटी "चार वाजता जाऊ" असं बाबा म्हणाले.चिनूने त्याची

  छोटी सॅक काढली, त्यात वॉटर बॉटल ठेवली आणि मला बाय करून शूज घालायला गेला. मी नेमकी तीच वेळ साधली आणि सॅकमध्ये जाऊन बसलो.

  बाबांनी बाईक काढली ,चिनूने सॅक पाठीवर अडकवली

  आणि  तो बाईकवर बसला.झालं... आमची स्वारी निघाली. मॉल सफरीला..

सिग्नलला गाडी उभी राहिली, तेव्हा हळूच मी सॅक मधून डोकं बाहेर काढलं. मला पाहून मागचा गाडीवाला एकदम दचकलाच. तो काही म्हणणार, तेवढ्यात सिग्नल सुटला. रस्त्यात जाणारे येणारे माझ्याकडेच बघत होते. पण, चिनूला आणि बाबांना

याचा पत्ताच नव्हता.ते दोघे त्यांच्याच नादात मॉलमध्ये पोहोचले.

      बाईक जशी मॉलमध्ये पोहोचली, त्यासरशी बाबा आणि चिनूने बघायच्या आधी , मी सॅकमधून टूणकन उडी मारली आणि दरवाजाच्या दिशेने सुंबाल्या केले.

       नतिकडे तोबा गर्दी होती.दरवाजा काचेचा होता. आता आत प्रवेश कसा करावा याचा

  विचार करत होतो ,इतक्यात दरवाज्याजवळ काही लोक गेले आणि दरवाजा  एकदम सरकलाच

  अलिबाबाच्या गुहेसारखा. सर्वजण  काचेच्या दरवाजातून आत गेले. मी त्यांच्या मागे घुसण्याचा प्रयत्न केला पण, दरवाजा पुन्हा बंद झाला आणि मी काचेवरच धडकलो.

मग मी थोडा वेळ वाट पाहिली आणि दुसरे काही लोक आले असता, त्यांच्या पाठोपाठ पटकन आत शिरलो.

  आत सुरवातीलाच  वॉचमनकाका होते, ते सर्वांना तपासूनच आत सोडत होते.

  आता आली का पंचाईत! तसं आमच्या सोसायटीत सुद्धा आमचे आणि वॉचमनकाका यांचे फारसे सख्य नव्हते. काय बरे करावे?असा विचार करत होतो, एवढ्यात एक मावशी आपल्या

  बाळाला बाबा गाडीत घेऊन आल्या होत्या. मग काय! मी त्या गाडीच्याखाली लपून आत प्रवेश मिळवला.

       आत एकदम गारेगार होतं.सगळीकडे काचेच्या आत दुकान होती. मी हळूच एका दुकानात शिरलो. इथे मोठ्या मोठ्या बाहुल्यांना कपडे घालून उभे केले होते. काही बायका तिथले व्यवस्थित ठेवलेले कपडे उचलत होत्या , अंगाला लावून बघत होत्या आणि तिथेच फेकत होत्या.बरं झालं इथे आई नाही ते, नाहीतर, भडकलीच असती ,एवढा पसारा बघून.मी मात्र त्या कपड्यांच्या ढीगातसूर मारला. मस्त मऊ आणि उबदार वाटत होते.पण अजून सगळा मॉल

बघायच्या होता; म्हणून तिथून बाहेर पडलो.पुढे एक पाण्याचा हौद होता. त्यात चक्क मासे होते. माझ्या तोंडाला तर पाणी सुटले, पण त्या पाण्यात पाय

बुडवून काही तायड्या बसल्या होत्या; त्यामुळे माशांच्या मेजवानीचा बेत मला नाइलाजाने रद्द करावा लागला.

       तिथून पुढे गेल्यावर , एक सरकता जिना दिसला. त्यावर पाय ठेवले की, तोआपोआपच सर्वांना वर घेऊन जात होता. मला पण त्याच्यावर जायचेच होते.

  मग काय सर्वांच्या पायांमधून वाट काढत कसाबसा जिन्यावर चढलो आणि काय! जिना वर जाऊ लागला. खूप मज्जा वाटत होती.पण झालं काय की, मी जिन्यावर असल्याने सर्वांचेच माझ्याकडे लक्ष गेले. जो-तो "अरे मांजर, अरे मांजर!" असं माझ्याकडे बोट दाखवून ओरडू लागला.आता तर सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच रोखलेल्या होत्या.

जसा वरती पोहचलो, तशी मी तिथून धूम ठोकली. आता मात्र वॉचमन काका माझ्या पाठी लागले.

पण मी त्याच्या हातावर पुन्हा एकदा चांगलीच तुरी दिली.

       आता मी फूड कोर्ट मध्ये आलो होतो. कसल्या कसल्या पदार्थांचा सुगंध माझ्या नाकात शिरत होता. एवढ्यात एका वेटर काकांनी एका डस्टबीन मध्ये खाण्याचा ट्रे रिकामा केला आणि ते वळल्यावर

त्यांच्या धक्क्याने  ते डस्ट बीन खाली पडले. कोणाचे लक्ष नाही बघून ,मी काही पदार्थ चाखून पाहिले.

खूपच टेस्टी होते ते. आता मला कळलं ,चिनुला सारखं मॉल मध्ये का यायचं असतं ते!

       इकडे तिकडे फिरत असताना मला अचानक चिनु दिसला. तो बाबांबरोबर पिझ्झा खात होता.

त्याची सॅक त्याने खाली ठेवली होती. वॉटर बॉटल काढायची म्हणून ती उघडीच होती. तेवढ्यात मी संधी साधली आणि कोणालाही न कळू देता पटकन पुन्हा पहिल्यासारखा सॅकमध्ये शिरलो ,

  चिनू आणि बाबांनी खाणं संपवलं आणि बाईक वर बसून परत ते घरी आले.

  चिनुने बॅग ठेवली आणि तो मला हाका मारत घरभर फिरू लागला ,"मनुका,  ए मनुका, "

मला घरी एकट्याला ठेवून गेल्यामुळे ,त्याला खूप गिल्टी वाटत होतं.

      मी पण सॅकमधून हळूच  बाहेर पडलो आणि गॅलरीत एका कोपऱ्यात जाऊन बसलो जसं की, खरंच मी खूप रागावलो आहे, वगैरे. काही नाही हो, एकदम ड्रामा. हे सगळं चिनू कडूनच शिकलो आहे.

  चिनू मला सॉरी म्हणाला, मला मॉलमधून आणलेला खाऊ खायला दिला, माझे लाड केले.

मी मात्र मनातल्या मनात चिनू वर हसत होतो. इतक्यात बाबांनी टीव्ही लावला .त्यावर एक न्यूज फ्लॅश होत होती.

  'मॉल मध्ये मांजर !' बाबाही उत्सुकतेने ऐकू लागले ,एवढ्या चिनू ओरडला," मनूका ! बाबा तो बघा मनुका"

  बाबा त्याला म्हणाले ,"अरे तो मनूका कसा असेल? तो तर घरीच  होता ना."  आणि मी ,'तो मी नव्हेच! या अविर्भावात खाण्याचा फडशा पाडत होतो. पण ही आपली मॉलची जम्माडी जंमत, आपलं सिक्रेट आहे बरं का ! फक्त तुमचं आणि माझं."

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू