पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सहज़ मनातलं

*सहज मनातलं....*
*संकल्प नववर्षाचे*

आज भिंतीवरचं जूनं कॅलेंडर काढून नवं लावताना मनात विचार आला..संपलं वर्ष!! दिवसा मागून दिवस,महिने,आणि आता अख्ख वर्षही निघून गेलं.सुखद, दुःखद धक्के,आप आपल्या क्षेत्रात मिळालेली बढ़ती,मुलांचं शिक्षण,त्यांची प्रगती,झालेली आणि होऊ घातलेली मंगलकार्य ... ..या सगळयां धामधूमीत आलेल वर्ष जातं कसं?आणि दिनदर्शिकेतला एक एक आकडा बदलतो कसा ?हेच समजत नाही.

काय सरलं,काय उरलं याचा उहापोह करत बसण्यापेक्षा या वर्षी ठरवल्या पैकी ज्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा न ठरवता काही गोष्टी झाल्या असं जाणवतं आणि मग निराश न होता ,एक गोष्ट करायची ती म्हणजे,पुन्हा नवा संकल्प ....पूर्णत्वाला न गेलेल्या गोष्टी पूर्ण  करण्याचा.

खरं तर संकल्प म्हणजे सुद्धा किती साध्या साध्या गोष्टी असतात ,जशा की ....
जवळच्या नातेवाईकांना,मित्रमैत्रिणीना ठरवून माहिन्यातून  एक तरी फोन करायचाच.
लक्षात ठेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दयायच्या.
वेळोवेळी,प्रसंगानुरुप समोरच्याने केलेल्या कृतीला मनापासून दाद दयायची,त्याचं कौतूक करायचं.
एखाद्या कडे जाताना त्याला आवडतो असा पदार्थ खाऊ म्हणून न्यायचा किंवा त्याने केलेल्या पदार्थाचं मनभरून कौतूक करायचं.
खरतर या सगळ्या गोष्टी करायला पैसे थोडीच पडतात, फक्त हवा मनाचा मोठेपणा,मग हे करून पहायला हरकत तरी काय आहे??

कितीतरी वेळा असं होतं की समोरचा माणूस मिस्ड कॉल पाहून सुद्धा कॉलबॅक  करत नाही किंवा मेसेजला उत्तर देत नाही.मग आपण उगाचच त्याच्यावर रागावतो.पण जर उलट विचार केला की,त्याने मेसेज तर वाचलाय ना??... आपल्याला त्याचाशी बोलायचं होतं हे ही त्याला कळलय.मग झालं तर...आणि असा विचार केला तरच आपण सुखी होऊ.

माझ्या मते सुखी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,भावनांचा निचरा होणं आणि त्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे व्यक्ती व्यक्तीमधील सुसंवाद....वाद न घालता परस्परांशी केलेले संभाषण.
करून तर पहा घरच्यांशी संवाद..... सगळे प्रॉब्लेम अर्ध्यावर नक्कीच येतील. आपलं टेन्शन शेअर केलं तर घरातल्या वडीलधाऱ्यांना कडून नक्कीच सकारात्मक बदल सुचवले जातील. लहानांशी संवाद साधला तर त्यांच्या निरागसतेत तुमचा मानसिक तणाव छूSमंतर होईल.
आठवड्यातून एक वेळ तरी नवरा बायकोने एकमेकांशी फक्त गप्पा मारण्यासाठी ठेवली पाहिजे( मला माहिती आहे की हे असं काही शक्य नसतं???? पण करून बघायला काय हरकत आहे) दोघांमध्ये रोजचा संवाद असतोच..... पण रोजच्या धकाधकीच्या, पळापळीच्या रूटीनमध्ये मनमोकळा, पर्सनल वेळ मनात असूनही एकमेकांना देता येत नाही.मुलांसोबत घरगुती किंवा मैदानी खेळ खेळले तरी मुलांनाही आई-बाबा आपल्याला वेळ देतात असा विचार येतो आणि तीही खूष होतात. कधी कधी घरातील वडीलधारी मंडळी सुद्धा तुमच्या प्रेमाच्या दोन शब्दांना आसुसलेली असतात. प्रेमाने चौकशी जरी केली तरी त्यांना आपली कोणीतरी काळजी घेतय ही भावना सुखावून जाते. आज पर्यंत ज्या ज्या गोष्टी करायला जमले नाहीत त्या त्या करून तरी पाहू या वर्षी. या किती छोट्या गोष्टी पण समोरच्याच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या.

आयुष्य म्हणजे तरी काय हो?? जन्म आणि मृत्यूला सांधणारा पूलच.... मग हेवेदावे, दुष्टावे, कुरापती काढून दुःख उगाळत राहण्यापेक्षा, छान प्रेमाने, सुखा समाधानाने आयुष्य कंठलं तर.... मागील वर्षी मी काय काय भोगलं, यापेक्षा दरवर्षी मी आयुष्यात काय मिळवलं,किती नवीन माणसं जोडली, किती नवीन नाती निर्माण केली, किती मनमोकळे हसलो, किती जणांना प्रेम वाटलं... पहा आपण याची मोजदादही करू शकत नाही.

तर मग नक्की करून पहा????..... संकल्प फारच सोपा आहे.

....©सौ.मंजिरी धनंजय भातखंडे
पूणे 1/1/22
8623063167

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू