पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शुभम् ची हूशारी

शुभम् ची हूशारी

"कितीवेळा सांगितलं शुभम, आजी-आजोबांना त्रास द्यायचा नाही. आणि सारखा कसला रे मोबाईल हातात?? एकदा सगळी लेक्चर्स संपली ..की आजोबांचा फोन लगेच त्यांना देऊन टाकायचा." सकाळी सकाळीच शुभम ची आई त्याला ओरडत होती.
"असूदे गं!! आम्ही बघतो आता त्याच्याकडे. तुम्ही जा बरं वेळेत ऑफिसला." आजीने सानिकाला सांगितलं.
  "आई बाय-बाबा बाय."छोटा शुभम आई-बाबांना बाय बाय करून पुढचे लेक्चर अटेंड करायला मोबाईल हातात घेऊन बसला.
   शुभम आई-बाबा,आजी-आजोबा सगळ्यांचाच लाडू होता. चौथीला होता. पण बुद्धी तेज असल्याने तो स्वतःहून कित्येक गोष्टी करायचा. आजी-आजोबा आता तसे थकले होते. अभ्यासाचे तास संपले की तो आजी सांगेल तशी तिला छोटया  छोटया कामात मदत करायचा. आजोबांबरोबर वाचनालयात,पोष्टात, बँकेत पेन्शन आणायला सुद्धा सोबत जायचा. आजीसोबत भाजी आणायला बाजारात जायचा. आई-बाबा येईपर्यंत आजी-आजोबांशी त्याचं छान गुळपीठ जमलेलं असायचं.
   आईबाबा घरी आल्यावर मात्र त्याला तेच हवे असायचे. गप्पा मारायला, मस्ती करायला..... पण ऑफिसमधून आल्यावर ते दोघेही दमलेले असायचे आणि दिवसभर आजी-आजोबांनी शुभूला सांभाळायचं काम केलेलं असायच. ते दोघे होते म्हणून आई-बाबा निर्धास्तपणे ऑफिसला जाऊ शकायचे.
    त्यामुळे सगळी काम उरकल्या शिवाय आई शुभमसाठी हवा तरी वेळ काढू शकायची नाही. तरी शुभम बऱ्यापैकी समंजस मुलगा असल्याने त्याला आईचंही म्हणणं पटायचं.
   
     छान मस्त गप्पा गोष्टी करत सगळेच रात्रीचं जेवण एकत्रच करायचे. दिवसभरातील घडामोडी एकमेकांशी शेअर करायचे. त्यात कधीकधी शुभम् ची कम्प्लेंट सुद्धा असायची बरं का!! "आजोबा जास्त वेळ मोबाईल गेम खेळू देत नाहीत मला." असं म्हणून.
     हसत खेळत जेवणं व्हायची.झोपायच्या वेळी मात्र त्याला आईचीच कुशी हवी असायची.... पण कधी???रात्री आजीकडून छानशा गोष्टीची वसूली झाल्यावरच. सगळेच कुटुंब छान मजेत एकत्र राहत होते.
     
आज शुभम आजोबांसोबत पेन्शन आणायला गेला होता. बँक घराजवळ अगदीच चालत जाण्याच्या अंतरावर होती. आजचा दिवस शुभमला भारी आवडायचा... कारण आज आजोबा त्याच्या आवडीचा काहीही खाऊ त्याला घेऊन द्यायला नाही म्हणायचेच नाहीत आणि दोघांचाही ठरलेला ठरावच म्हणाना, बँकेतून बाहेर पडता पडता कोपऱ्यावरच्या रस वाल्याकडे उसाचा ताजा रस पिऊन मगच ते घरी यायचे.
साधारण सकाळचे अकरा वाजले होते.आजोबांचं बोट धरून शुभम चालला होता आणि अचानक आजोबांना चक्कर आली आणि आजोबा धडपडून खाली पडले. हातातली पिशवी सटकली शुभमला काहीच कळेना.... अचानक काय झालं आजोबांना??
  पण आपला शुभु बाळ हुशार बर का!!इकडे तिकडे ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याने सर्वप्रथम आजोबांच्या पिशवीतली पाण्याची बाटली काढुन, आजोबांच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, थोडं पाणी प्यायला दिलं. आजोबांचा मोबाईल तर त्याच्यासाठी रोजचाच हाताळण्यातला होता. त्यात त्याने पटकन डॉक्टर काकांचा फोन नंबर शोधला आणि त्यांना फोन केला. "आजोबांना चक्कर आली आहे." डॉक्टर काकांच्या सांगण्यानुसार लगेच त्याने रिक्षा थांबवून जमलेल्या लोकांच्या मदतीने आजोबांना दवाखान्यात नेलं. तोपर्यंत आजोबाही थोडे शुद्धीत आले होते. नेहमीचेच डॉक्टर असल्याने त्यांनी आजोबांची तब्येत पाहून एक दोन तास तिथेच दवाखान्यातच ठेवून घेतलं.
   दरम्यान शुभमने आई बाबांना फोन केला आणि घडलेली गोष्ट सांगितली आणि हे सगळं सांगताना तो हे सांगायला विसरला नाही ....की आजी घाबरून जाईल म्हणून मी हे सगळ आजीला सांगितलं नाहीये.
    थोड्याच वेळात आई बाबा दवाखान्यात हजर झाले आणि शुभमच्या प्रसंगावधानाने वेळीच मदत मिळाली म्हणून ईश्वराचे आभार मानले. शुभमला जवळ घेऊन आईने गोड पापा घेतला आणि म्हणाली "खरंच शुभूराजा, तू वेळीच पटापट फोन केलेस आणि  धिटाई दाखवलीस म्हणून आजोबांना उपचार मिळाले आणि तू सोबत असल्याने, तुझ्या बालबुद्धीला जमेल तेवढ केल्याने सगळे काही छान झालं. आजी घाबरेल म्हणून तिला काहीही न सांगण्याचा तूझा निर्णय सुद्धा योग्यच होता."
     डॉक्टरां सहित सारेचजण छोट्या शुभमच्या प्रसंगावधानाचे कौतुक करत होते आणि आजोबांच्या डोळ्यात तर नातवाबद्दलचे प्रेम ओसंडून वाहत होते.
     आता तर डॉक्टर काका म्हणाले "शुभम बाळा, आजोबांची शुगर कमी झाली होती म्हणून त्यांना चक्कर आली. आता जाता जाता सगळेजण उसाचा रस पिऊन तोंड गोड करूनच घरी जा बरं का....!! आता आजोबा एकदम ठणठणीत आहेत."
या त्यांच्या वाक्यावर सारेजण हसू लागले.

      लेखिका
सौ मंजिरी धनंजय भातखंडे
पुणे
8623063167

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू