पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अशी अद्दल घडली

"आई... खूप भूक लागलीये. जेवायला काय केलंय ?" हातातील बॅग पलंगावर भिरकावत हात धुता धुताच चिंटूने आईला विचारले ."छान डाळ घालून मेथीची भाजी केलीये. आता गरम गरम पोळी करते. जेवून घे"  " शी... मेथीची भाजी.. आई तू कधीच काही छान बनवत नाहीस . माझ्या मित्रांची आई नेहमी त्याला आलू पराठे, सँडविच असे वेगवेगळे पदार्थ खायला देते. आणि ती टीव्हीमधील आई पण बघ ,मम्मी भूक लगी है खाने को कुछ दो ना असे मुलांनी म्हणताच ,'बस दोन मिनिट '! असे म्हणत मस्त मॅगी बनवून देते.  तू मात्र कधी मेथी कधी पालक कधी कोबी सगळ्या घाण भाज्या बनवतेस. मला अजिबात आवडत नाही त्या.."  "चिंटू ..अन्नाला नाव ठेवू नये  बेटा.. अन्न हे परब्रम्ह असते. त्यानेच आपल्याला काम करण्याची ताकद येते ."आई ,मग पिझ्झा,बर्गर, वडापाव ,नूडल्स हे पण अन्न आहे ना ..मग तू ते चांगले नाही असं म्हणून त्याला नाव का ठेवतेस ?". " चिंटू एवढं डोकं जर अभ्यासात लावलं ना तर चांगले मार्क्स मिळतील तुला. आणि मी नाव नाही ठेवत. नूडल्स आणि इतरही बाहेरचे पदार्थ आहेत ना ते फक्त चविला चांगले असतात. तब्येतीला हानीकारक असतात .तब्येत बिघडते त्याने कळलं..!  चल जेवून घे मुकाट्याने आणि अभ्यास करत बस " आईचा आवाज वाढल्याने चिंटूने नाईलाजाने वाकडे तिकडे तोंड करत जेवून घेतले आणि तोंड फुगवून अभ्यासाला बसला. 

 

     बाबा ऑफिसमधून घरी आलेले पाहताच स्वारींची कळी एकदम खुलली ..वही पुस्तक बाजूला ठेवतच तो बाबांकडे पळाला.." बाबा, आज काय आणले  माझ्यासाठी ? तुम्ही म्हणाला होतात ना मी आज येताना तुला चॉकलेट आणेल म्हणून ."  "अरे हो ...हे घे चॉकलेट.. आणि रोज रोज नाही मागायचे हं ! दात किडतात त्याने.."  "हो "..असे म्हणत अभ्यासाला विराम देत चिंटूने बाहेर धूम ठोकली . "तुम्ही फाजील लाड करता चिंटूचे .बाहेरचे  खायची वाईट सवय लावू नका त्याला" " नेहमी कुठे आणतो मी काही. काल त्याने चांगला अभ्यास केला होता म्हणून मीच प्रॉमिस केले होते त्याला" " बर,चला आता जेऊन घ्या,असे म्हणत चिंटूच्या आईने वाढून घेतले, व ती दोघं जेवायला बसली. 

 

       "चिंटू ... बेटा घरी ये लवकर.." बाबांच्या बोलवण्याने चिंटू घरी आला तर त्याला घरातले वातावरण एकदम गंभीर दिसले .आई पलंगावर उदास वाणी बसली होती. डोळ्यातून पाणी ओघळत होते. बहुदा बाबांनाही मेथीची भाजी आवडली नसणार आणि ते आईला रागावले असणार तू पिझ्झा ,नुडल्स असे का बनवत नाहीस म्हणून...! मला फार  रागावते ना भाजी नाही आवडली म्हटले तर.. आता बाबा रागवल्यावर कशी रडत बसली आहे !!  चिंटूच्या बालबुद्धीतील बाल कल्पना भराऱ्या मारत असतानाच बाबा म्हणाले," चिंटू बेटा ,चल तयार हो ..तुला  आईसोबत आजीकडे गावी जायचे आहे दोन चार दिवस.."  "पण का ?"  " अरे आजोबांची तब्येत फार बिघडलीये .दवाखान्यात ऍडमिट केले आहे त्यांना..मामा मामी परदेशात असतात ना तुझे, मग आजीला सोबत म्हणून जायचे आहे तुम्हाला"  " पण बाबा, कालच मॅडम म्हणाल्या सोमवारपासून  परीक्षा आहे म्हणून..आईसोबत गेलो  तर माझी परीक्षा बुडेल ना. आणि मला करमत नाही आजीकडे. तिथे कोणीच मित्र नाहीत मला ..मी तुमच्याबरोबर राहतो ना प्लीज ...."  "अरे पण तू शाळेतून आल्यावर बाबा येईपर्यंत कोठे थांबशील ?" " मी शेजारी रोहन कडे थांबेन ना.. कुठे जाणार नाही बाबा येईपर्यंत." "आणि जेवायचे काय?" "नलू तू काळजी करू नको ..आम्ही एक दोन दिवस बाहेर जेवू .तसाही हा तिथं आला तर तुला काहीच काम करू देणार नाही . बाबांऐवजी यांच्याकडेच पहावे लागेल तुला. तेव्हा मलाही वाटत तू एकटीनेच जावं. आम्ही दोघं राहू  येथे. काय रे चिंटू ? "ये...बाबांच्या हातावर टाळी देत चिंटू ची स्वारी खुशीत पुन्हा घराबाहेर पडली .

 

      आईला स्टेशनवर सोडून वापस येताना चिंटू जाम खुश होता. आता दोन दिवसात बाबांकडून काय काय खायचे याचे प्लॅनिंग चालले होते. आई चांगली आठ-पंधरा दिवस तिकडे राहिली तर आणखी मज्जा येईल. मस्त वेगवेगळे पदार्थ खाता येतील असे मांडेहीे मनात रचणे चालू होते.घरी जातानाच बाबांच्या मागे लागून मॅगी चे दोन पॅकेट सकाळी डब्यात घेउन जायला त्याने घेतले. आई खरच गावाला गेली असल्याने शाळेत मॅडम  रागवणार नव्हत्या.त्यामुळे ती ही काळजी त्याला नव्हती.मॅगी ने

 भरलेला डबा दप्तरात टाकताना चिंटूचा आनंद गगनात मावत नव्हता .आज तीच ती कंटाळवाणी भाजी पोळी खायची नसल्याने मधली सुट्टी कधी होते असे त्याला झाले होते.घंटी होताच त्याने पटकन डब्बा दप्तरातून बाहेर काढला .एव्हाना मॅगी थंड झाली होती .तिचे ते रबरासारखे घास खाताना चिंटूच्या चेहऱ्यावरी आनंद पार मावळून गेला. तरीही रात्री आज बाबांकडून पिझ्झा खायचे प्रॉमिस घेतल्याचे आठवताच पुन्हा त्याचा चेहरा खुलला .रात्री पिझ्झा वर चिंटूने मनसोक्त ताव मारला .मग डब्यात कधी ब्रेड जाम कधी ब्रेड बटर, तर रात्री कधी मसाला डोसा कधीव्हेज पुलाव, कधी पावभाजी चिंटू जाम खूश होता.त्याला जेव्हा बाबांनी सांगितले की आजोबांना दवाखान्यातून सुटी झाली पण अजून त्यांची काळजी घ्यायला आईला आठ दिवस तरी थांबावे लागेल तेव्हा तर आणखीनच आनंद झाला त्याला.तसेही अजून दाबेली ,मंचूरियन असे बरेच काही पदार्थ खाणे बाकी होते .नाही म्हणायला ते खाऊन तृप्ततेची भावना मनात येत नसली तरी त्याच्या चवीने जिभेची रसना तृप्त होत होती आणि चिंटू त्या स्वादांवर  आनंदे तरंगत होता. 

 

         आईला गावी जाऊन आता सात आठ दिवस झाले होते. आणखी तीन-चार दिवसांनी ती येणार होती .वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखण्यात चिंटू खूष असला तरी का कुणास ठाऊक त्याला आता ती चव नकोशी वाटत होती .उगाच ती मेथीची भाजी त्याला साद घालत होती. आईच्या हातची ती मऊमऊ ,तूप लावलेली  पोळी त्याला खुणावत होती .गरम गरम आंबट वरण भाताचा वास उगाच त्याच्या नाकात शिरल्याचा त्याला भास होत होता .भेंडीची खरपूस भाजी त्याला वाकुल्या दाखवत होती. मोठ्या कष्टाने या सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत तो बाहेरच्या चमचमीत पदार्थ यथेच्छ खात होता. 

 

      त्यादिवशी रात्री अचानक चिंटूच्या पोटात दुखायला लागले. अक्षरशः तो गडबडा लोळायला लागला .आई ग...! म्हणून रडायला लागला. त्याचे बाबा घाबरून गेले .त्यांनी त्याला  दवाखान्यात नेले तर डॉक्टरांनी त्याला ऍडमिट करून घेतले. सारखे बाहेरचे चमचमीत पदार्थ खाल्ल्याने त्याचे पोट बिघडले होते . इन्फेक्शन झाले होते.बाबांनी आईला ताबडतोब बोलावून घेतले.आई येईपर्यंत चिंटूचा सारखा आईच्या नावाचा जप चालला होता .तो रडायला लागला . बाहेरचे खाण्याचे परिणाम त्याला चांगलेच कळाले होते. आता आई आल्यावर आपल्याला रागावेल याची भीतीही त्याला वाटत होती .

        आई येताच मनोमन ओशाळत तो जोराने रडायला लागला.आईने त्याला जवळ घेतले. प्रेमाने कुरवाळले. ज्यूस प्यायला दिला.चिंटूला जरा बरे वाटले.दोन दिवसानंतर चिंटू ची तब्येत पहिल्यासारखी ठणठणीत झाली.दवाखान्यातून त्याला सुटी मिळाली. दवाखान्यातून घरी आल्यानंतर रात्री चिंटू आईला म्हणाला ,"आई भूक लागलीय.जेवायला दे न पटकन" आई म्हणाली," हो ,थांब हं.. आत्ता दोन मिनिटात मॅगी करते.." हे ऐकताच चिंटू बाबांकडे बघत खाली मान घालून उभा राहिला व म्हणाला, "आई सॉरी ...बाहेरचे पदार्थ चवीला चांगले असेल तरी 

तब्येतीसाठी  ते चांगले नसतात हे कळाले मला आता. मी आता कधीच बाहेरचे खाणार नाही" "तुला कळाले पण तुझ्या बाबांचे काय"?

हे ऐकताच समोर उभ्या असलेल्या बाबांनी घाईघाईने आपले कान पकडले. ते पाहताच आई व चिंटू जोराने हसायला लागले.बाबाही त्यात सामील झाले.अन सगळ्यांनी मिळून आंबट वरण भाताचा आस्वाद घेतला...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू