पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्राजक्ता

प्राजक्ता


डोंगर, झाडं, फुल झाडं अणि झुळु  झुळु   वाहणारी नदी असलेले एक छोटस ”सुंदर”  नावाचं गाव होतं. गावात छोटीशी शाळा होती; पहिली ते सातवी पर्यंत. प्राचार्य सौ निशिगंधा मॅडम पण त्याच गावातील होत्या आणि नावाप्रमाणेच आपल्या वासाने नाही पण  अस्तित्वाने सगळ्यांना आपलेसे करून घेणाऱ्या. शाळेसाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या गावातील बरीच माणसे मोलमजुरी करणारी होती, कधी ते मुलांना पण कामाला नेत,  पण बाई गैरहजर मुलांचा अभ्यास दुसऱ्या दिवशी करून घेत. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक उपक्रम शाळेत चालू करण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असत.  मुलांना शाळेची ओढ लागावी यासाठी त्या वेगवेगळे मार्ग शोधत असतात; मुले शाळेत रोज आले तरच शिकतील हे त्या प्रत्येक मुलाच्या पालकांना समजावुन सांगत.   त्यांच्या शाळेतील  इतर शिक्षक - माने सर आणि  वनिता बाई पण बाईंना चांगली साथ देत. 

आता मुलं वाढल्याने शाळेत अजून एक शिक्षिकेची भरती झाली. प्राजक्ता माळी,  ज्यांनी आताच  शिक्षण पूर्ण केले होते, त्यांची  शाळेत नेमणुक झाली. प्राजक्ता मॅडम  बाजूच्या गावात राहत होत्या. त्या अतिशय हुशार आणि चुणचुणीत  होत्या. मुलांबद्दल जिव्हाळा असल्याने त्या शाळेत लगेच रमल्या. मुलांच्या पण त्या लगेच आवडत्या मॅडम झाल्या. शाळेत  त्या नवीनच रूजू  झाल्याने  बाईंनी त्यांना चित्रकला पर्यावरण आणि क्राफ्ट हे विषय शिकवायला दिले.  प्राजक्ताला कलेची आवड होतीच व चित्रकला पण तिला आवडायची.

प्राजक्ताने  शिकवताना मुलांना कंटाळवाणे होईल अश्या प्रकारे शिकवायचे नाही तर तोच अभ्यास हसत-खेळत शिकवायचा हे आधीच नक्की केले होते. पहिल्याच दिवशी वर्गात तिने मुलांना स्वतःची ओळख प्राजक्ता मिस म्हणजे तुमची मोठी ताई अशी करून दिली. काहिही  विचारायचे तर न घाबरता विचारा; विचारल्याशिवाय कळणार का हे तिने काही उदाहरणे देऊन मुलांना समजावुन सांगितले.  हळूहळू तिने बऱ्याच मुलांना बोलते केले. पहिल्या आठवड्यात मुलांना समजून घेतले. दुसऱ्या आठवड्यापासून अभ्यासाला सुरुवात झाली.  चित्रकला शिकवतांना मुलांना इतर विषय  पण सहज शिकवू लागली. छोट्या मुलांना रंगाची ओळख करून देताना लाल रंगाच्या रोजच्या वापरातील वस्तू जसे कुंक,  तिखट, पोपटाची चोच, जास्वंदीचे फूल अशी उदाहरणे दिल्याने प्रत्येक रंग मुलाच्या सहज लक्षात राहिला. त्या सगळ्या वस्तू सांगतांना प्रत्येकाला ते लिहायला पण सांगत, लिहून झाल्यावर किती वस्तू झाल्या  ते मोजायला पण सांगत. म्हणजे मुलं रंग ओळखताना वस्तूंची नावे लिहू लागली त्यामुळे लेखन सुधारले, वस्तु मोजताना  उजळणी पण  होऊ लागली.

चित्रकला शिकवतांना चित्राची सुरुवात त्या आकृती पासून करत. जसे आधी त्रिकोण कसा काढायचा मग त्या आकारात जोकर टोपी आईस्क्रीम कोन हे शिकवत.  तसेच प्रत्येक  भौमितिक आकार त्यांनी चित्राच्या माध्यमातून मुलांना सहज समजावुन सांगितले. पुढच्या वर्गात त्यावर थोडे अजून नवीन चित्रांसह क्षेत्रफळ आणि घनफळ पण शिकविले जे मुलांच्या अगदी कायम लक्षात राहिले.

कलेच्या तासाला पण तेच- छोट्या मुलांना पाच ते सहा रंगाचे मणी एकत्र दिले,  आता  प्रत्येकाने त्यांचे रंग लिहायचे  आणि  त्यांची  विशिष्ट  रचना  करुन एखादा आकार काढायचा. रंगीत मणी बघून मुले  खुप खुश झाली.  प्रत्येकाने आपल्याला जमतील तसे त्यांचे  आकार तयार केले  कोणी रांगोळी केली,  कोणी आकाश कंदील, बॉल, गोट्या, एक ना अनेक कल्पना आल्या, आणि  बर्‍याच कल्पना सुचल्या. काही मुलांनी पुढच्या तासाला येतांना घरातील अनेक वस्तु आणल्या,  आणि त्या पासुन बरेच काही शिकण्याचा प्रयत्न केला. 

मोठी मुले तर अनेक उपयोगी वस्तू जसे पेन स्टॅन्ड, मोबाईल स्टॅन्ड, छोट्या टोपल्या, रोज उपयोगी पडणार्‍या किंवा शोभेच्या च्या वस्तू पण लीलया बनवू लागली.  निशिगंधा मॅडम पण हे सगळे कौतुकाने बघत असत. प्राजक्ताने मुलांना रुमाल  मास्क,  रिबन, पिशव्या इत्यादी पण घरातील कापडातून बनवायचे शिकविले होते.  

पर्यावरणाच्या तासाला तर मुले खूप खुश असायचे, कारण त्या कधीकधी मुलांना वर्गा बाहेर नेत, झाडांची माहिती देत, व  कधीकधी त्यांच्याकडून पूर्ण परिसर पण स्वच्छ करून घेत. मुलांना त्यांच्या आवडीचे झाडं लावायला सांगितल्याने शाळेच्या आवारात आता रंगबिरंगी फुले, त्यावर बसणारी फुलपाखरे, शोभेची झाडे, तुळस कोरफड ईत्यादी  उपयुक्त झाडे लावल्याने अतिशय सुंदर बाग तयार झाली; आणि  बागेत पक्षी, फुलपाखरे नियमित येऊ लागली.  पावसात तर मुलांनी भाज्यांचे वेल पण लावले. इथल्या प्रमाणेच आता मुलांना आपआपल्या घरात पण झाडे लावायला प्राजक्ताने  सांगितले.  प्रत्येक मुलाला वाढदिवसाच्या दिवशी एक झाड त्याच्या घरी लावायला सांगत,  तसेच बाकीच्या मुलांनी त्याला टाकाऊ वस्तू पासून किंवा घरातील वस्तू पासून एक सुंदर वस्तू बनवून द्यायला सांगितले, आणि खाऊ मात्र त्या स्वतःच्या  घरातून आणत.

असे हसत खेळत शिक्षण होत असल्याने शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली होती, गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी झाले होते. वर्षा अखेरीस  मुख्याध्यापक बाईंनी मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शाळेत भरविले. त्यानिमित्ताने बरीच मंडळी शाळेत आली. परिसर बघून सगळ्यांचे मन प्रसन्न झाले.  मुले प्रत्येकाचे स्वागत त्यांनीच बनविलेले छोटेसे फुल देऊन करत होते. खरच शाळे बद्दल अनेकांनी कौतुक केले,  मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे पण कौतुक झाले. बाईंनी हे सारे श्रेय प्राजक्ताला दिले,  आणि तिचे मनापासून कौतुक केले. खरेच नावाप्रमाणे  तिच्या  (सुन्दर फुलांचा ) उत्साहाचा वर्षाव शाळेवर होत होता.  बाजूच्या गावात राहून तिच्या  प्रेमळ शिकविण्याने  इथल्या  गावातील मुले शाळेत आवडीनं  येऊ लागली होती, व बरेच काही शिकली पण होती.  तर अशी प्राजक्ता मिस सगळ्या शाळांना मिळो.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू