पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फुलपाखरु

फुलपाखरु 

~~~~~~


एक छोटसं पण टुमदार गाव असतं. गावाच्या जवळच एक जंगल असतं. जंगलात मोर, ससा, माकड, हरिण, चिमण्या, कावळे, कबुतर, फुलपाखरं, पोपट असे लहान लहान प्राणी आणि पक्षी रहात असतात. डोंगराच्या जवळच असलेलं हे गाव फार स्वच्छ होतं बरं का....! अशा या गावात गणपती बाप्पा, महादेव तसेच हनुमान यांची मंदिरं होती.  


गावात खूप मोठ्ठी घंटा असलेली एक शाळा होती. प्रार्थनेच्या वेळी, मधल्या सुटीत व शाळा सुटल्यावर वाजणाऱ्या या घंटेचा आवाज खूप दूर पर्यंत ऐकू जात असे. या शाळेत मुले व मुली एकत्र शिक्षण घेत होती. सकाळचे सर्व तास हे अभ्यासाचे महत्वाचे विषय म्हणजे भाषा, गणित, विज्ञान यांचे तर मधल्या सुटीनंतरचे तास चित्रकला, संगीत, खेळ, कार्यानुभव असे मौजमजेचे असायचे. 


एकदा काय झालं, इयत्ता चौथीच्या वर्गात चित्रकलेचा तास होता. बाई वर्गात आल्या, सर्व मुले उठून उभी राहिली व " नमस्ते बाई " म्हणून वर्ग सुरु झाला. बाईंनी पण मुलांना नमस्ते म्हंटले व " मागच्या आठवड्यात दिलेला  गृहपाठ केला आहे का सगळ्यांनी ? कोणता गृहपाठ दिला होता बरं मागच्या आठवड्यात ? बाईंनी विचारले. " बाई, फुलपाखराचे चित्र काढायला सांगितले होते, सर्व मुलांनी एक साथ उत्तर दिले. " एकदम बरोबर " बाई म्हणाल्या. " चला तर मग, बघू द्या तुमची चित्रकलेची वही " असे म्हणत बाईंनी एकेका मुलाची वही तपासायला सुरुवात केली. खरंच, मुलांनो, खूप छान चित्र काढली आहेत तुम्ही. जंगल, झाडं, फुलपाखरं, आकाश असा देखावा काही जणांनी खूप छान काढला आहे, असे बाई म्हणत असतांनाच तीन चार मुले जोर जोरात म्हणू लागली, " बाई सागरची वही बघा, बाई सागरची वही बघा, फार सुंदर चित्र काढलय् त्याने. " अरे  हो, बघते, बघते, आधी तुम्ही शांत तर बसा." 


सागर शांत, हुशार व चांगल्या मार्कांनी पास होणारा मुलगा आहे, त्याचं चित्रही सुंदरच असणार " असे बाई म्हणाल्या व त्यांनी सागरची वही हातात घेतली. सर्व मुले बाईंकडे बघत होती की, "आता बाई सागरला नक्कीच शाबासकी देणार...! " बाईंनी सागरची वही पाहिली, पण त्या काहीही न बोलता शांतपणे बसून राहिल्या. मुलांना कळालेच नाही की बाईंना काय झालं असेल ? सगळा वर्ग एकदम शांत झाला. 

थोड्या वेळानंतर बाईंनी मुलांना विचारलं, मुलांनो, तुम्हाला सागरचे चित्र फारच आवडले ना ? मुले म्हणाली," हो बाई, खूपच सुंदर आहे." बाई म्हणाल्या, "पण त्याने फुलपाखराचे पंख कसे काढलेत, हे तुमच्या लक्षात नाही आलं का ? मुलं एकदम शांत बसली. " मुलांनो, सागरने जिवंत फुलपाखराला पकडून, त्याचे पंख वहीवर चिटकवले आहेत, म्हणजेच एका नाजूकशा जीवाची हत्याच त्याने केली आहे, नाही का ? तुम्हाला फक्त रंगांचा वापर करुन चित्र काढायला सांगितले होते. पर्यावरणाचा नाश होईल असे कोणतेही काम आपल्या हातून घडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. 

मुलांनो, पर्यावरण म्हणजे काय ? तर," आपल्या आजूबाजूचा निसर्ग,  पाऊस, पाणी, झाडे, फुले -फळे, पशु-पक्षी ह्या सगळ्या घटकांची आपण काळजी घेतली पाहिजे, निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपले मित्र आहेत, त्यांना जपले पाहिजे, सांभाळले पाहिजे. बाईंचे हे शब्द ऐकून सागरला आपली चूक कळाली व पुन्हा अशी चूक करणार नाही असे आश्वासन त्याने बाईंना दिले. त्या पाठोपाठ सर्व मुलांनीही आम्ही झाडे तोडणार नाही, पाणी वाया घालवणार नाही, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या वापरणार नाही, फुलपाखराला पकडून वहीत ठेवणार नाही, निसर्ग आपला मित्र आहे त्याची आम्ही काळजी घेऊ अशी शपथ सर्व वर्गाने घेतली, शाळा सुटल्याची घंटा वाजली व सर्व मुले आनंदाने घरी गेली. 


सौ.करुणा दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर (गुजरात)

मोबाईल  : 9998473281.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू