पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बुंदीचा लाडू

               बुंदीचा लाडू



       संध्याकाळी चिमणीच्या  उजेडात मी अभ्यास करत बसलो होतो.धाकटा भाऊ खेळत होता. आई भाकरी करत बसली होती.

      अचानक पलीकडच्या गल्लीतला मधुआण्णा हजर झाला, " वैनी, ओ वैनी"         

      आईने पाहिलं.,"कोण?मधूआण्णा?" 

           " रामुआण्णांच्यात सत्यनारायणाची पूजा झाली. तवा प्रसाद घ्यायला आणि जेवायला कुणाला तरी पाठवा."

       " बरं बरं."

      माझ्याकडे पहात आई बोलली," जातोस का रे जेवायला?"

      " जातो की."

     मी वह्या,पुस्तके दप्तर मध्ये ठेवली आणि जायला निघालो.

     आमच्या घरची गरीबी होती. आज कुणाला कंटाळा आला की 'झोमॅटो' किंवा 'स्विगी'वर  बोट फिरतात. आमच्या वेळी प्रत्येक सीझनला मेनू बदलायचा. पावसाळ्यात श्रावण घेवड्याची आमटी, हिवाळ्यात वरण्याची आमटी, उन्हाळ्यात डाळ.स्वस्त धान्याच्या दुकानात मिळणाऱ्या मिलो या ज्वारीची भाकरी.भात नसायचाच. मला भात आवडायचा. पण सगळ्या शिवारात ऊस केल्यामुळे भाताचे पिक नव्हते.पण कधी ऊपाशी रहायची पाळी आली नाही. आमचे कुणी नातेवाईक आले तर येताना सुक्या मटणाचा डब्बा किंवा शिजवलेली रक्ती घेऊन यायचे.एवढाच काय तो आम्हाला विरंगुळा.

      मी खुशीतच निघालो.दारात गर्दी होतीच.आमच्या शेजारचा बाळूआबा दोस्तमंडळीबरोबर  दारात उभे होते. मला बघून आमच्या बाळूआबा बोलला,    

     "काय रे, कुठलं जेवण चुकवू नकोस बग."

      ते बघून त्याची दोस्तमंडळी पण हसली.मला खूप ओशाळल्यासारखे झालं.

      मला माझे मित्र दिसले.  एकन्या,तानाजी,शिरपा. मी त्यांच्यात मिसळलो. पंगत चालू होती.आम्ही पंगत संपण्याची वाट पहात ऊभे राहिलो.

       पंगत संपल्याबरोबर आम्ही चौघांनी मिळून जागा पकडली. मग पत्रावळ्या वाढल्या गेल्या. पत्रावळ्यावर  मग नंतर पांढरा भाग आणि थोडीशी भाजी वाढली गेली. भातावर कटाची आमटी वाढली गेली. आणि मग प्रत्येक पत्रावळीला एक एक बुंदीचा लाडू वाढला गेला. कुणाचं लक्ष नाही असं बघून मी तो लाडू वर्तमानपत्राच्या कागदामध्ये गुंडाळून खिशामध्ये जपून ठेवला.त्याचा चुरा होऊ नये असा.बरेचजण तेच करत होते.

    श्लोकांचे पठण झाले आणि मग आणि भात आमटी वर ताव मारायला सुरवात केली. खूप दिवसांनी भात खायला मिळत होता. पोटभर भात खाल्ला. नंतर पंगत ऊठली. कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं.मित्रांचं लक्ष नाही असे पाहून मी घरी सटकलो.

      घरी आलो. छोटा भाऊ भाकरी खाण्याकरता कुरकुर करत होता. तेवढ्यात मी आलो. खिशातला लाडू काढून त्याच्या हातात दिला. तो खूष झाला. पळत येऊन त्यानं  माझ्या हातात लाडू आपल्या हातात घेतला आणि तोंडाला लावला त्याच्या चेहर्‍यावर खुशी बरसली. खूपच आनंदीत झाला.

        त्याच्या डोळ्यातले खुशीचे चांदणे बघून मला घरात पौर्णिमा असल्याचा भास झाला.

      

       

       

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू