पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भिंतीची तहान

शाॅपिझन प्रस्तुत बालकथा स्पर्धा

"फुगे"


भिंतीची तहान 



            एका खूप सुंदर टुमदार घराचे बांधकाम सुरू होते. घर बांधून होईपर्यंत तिथेच एक दोन मिनिटांच्या अंतरावर राहणारी हर्ष आणि मृण्मयी ही साधारण आठ ते बारा वर्षाची छोटी भावंडे कधी आई-बाबा तर कधी आजी आजोबा सोबत बांधकामावर जायची. चाळलेल्या वाळूत कधी खोपे करायची तर कधी काड्यांचा मांडव घालायची. हे करतांना त्यांना खूप मज्जा यायची. नुकतेच त्यांच्या घराच्या भिंतींचे बांधकाम सुरू झाले होते. मग काय रोज त्यावर पाणी टाकायला ही भावंडे पण जात होती. एक दिवस आजी म्हणाली,


"भिंतीला तहान लागली असेल.भिंती सुद्धा घटाघटा पाणी पित असतात बरं का. कितीही वेळा पाणी टाका जिरूनच जाते.आधीच ही भावंड अतिशय चाणाक्ष होती. त्यांना आजी काय म्हणते आहे हे जाणून घ्यायची इच्छा झाली. 


"काय गं आजी!! भिंती कशा काय घटघटा पाणी पितात?"


"अरे!! भिंतींना तहान लागते ना म्हणून त्या पाणी पितात."


यावर दोघेही आजीच्या ह्या बोलण्यावर तोंडावर हात ठेवून खदाखदा हसली.


"अरे हो..रे...!!खरे सांगते आहे मी"


"काहीपण का आजी, आम्हाला उल्लू बनवू नकोस हं...!!"


"नाही रे राजांनो.. इकडे या...मी दाखवते बघा तुम्हाला भिंतीची तहान."


असे म्हणत आजीने दोघांना भिंतीजवळ नेले व त्यावरून हात फिरवायवा सांगितला. दोघांनीही हात फिरवला.


"आता काय लागले सांगा हाताला!"


"आजी किती खडबडीत भिंत लागते आहे."


"आणखी काय दिसतंय सांगा पाहू?"


"नाही ना सांगता येतं.तू सांग ना आजी लवकर."


"तुम्हाला सांगत नाही तर प्रत्यक्ष दाखवूनच देते म्हणत आजीने बांधकामावरल्या कारागिराला पाण्याचा पाईप दे म्हणत बोअरवेल सुरू करायला सांगितला व तो पर्यंत मुलांना भिंतीचे निरीक्षण करायला सांगितले.आजीने पाईपची धार भिंतीवर धरताच काय आश्चर्य ? तहान लागल्यावर आपण जसे घटघट पाणी पिऊन घेतो,अगदी तशीच भिंत घटघट पाणी पित होती. जेव्हा तिचे पाणी पिऊन झाले तेव्हा मात्र भिंतीवरून पाणी, बाहेर गळून पडू लागले. वाहत्या आवाजाने तिची तहान भागली असे समजून आजीने कारागिराला बोअर बंद करायला सांगितला.भिंतीतला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्यावर ओले पोते अंथरले आणि मुलांना विचारले समजले ना आता....भिंतीला कशी तहान लागते."


"होय गं आजी!! कसलं भारी समजावून सांगितले तू!! मज्जा आली पाहायला. आता आम्ही रोज येणार भिंती ची तहान बघायला."


"रोज नाही हं!! अधुनमधून यायचं. अभ्यासही करायचा असतो ना तुम्हाला."


"बरं आजी चालेल!! पण मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे." हर्ष ने आजीला शंका विचारली


"आपण जेव्हा इथे राहायला येऊ तेव्हा  कसे काय भिंतीवर पाणी टाकता येईल?" इति हर्ष


" अरे दादा!! तेव्हा फक्त बाहेरून टाकायचे. कसे कळतं नाही रे तुला."खो...खो...हसून मृण्मयी ने उत्तर दिले.


"अरे सोन्यांनो, राहायला आल्यावर अजिबात गरज नसणार पाणी टाकायची. तेव्हा छानशा रंगाने घर रंगवून झालेले असेल ना!! भिंतींचे बांधकाम ताजे असल्यावरचं पाणी टाकावे लागते मगच त्या मजबूत होतात. तुम्ही जाहिरात बघता ना ती' 'ए..दिवार कभी तुटेगी नही, इस में अंबुजा सिमेंट की जान है!! वैगेरे वैगेरे!!'ती फक्त सिमेंटमुळे नाही तर तिला भरपूर वाॅटरींग म्हणजेच पाणी पिऊ घातल्यामुळे टिकते बरं!! कितीही भारी सिमेंट वापरा, परंतु त्यांना जर पाणीच दिले नाही तर त्या कोरड्याठाक पडतील व मजबुतही राहणार नाहीत.त्या करता, बरोबर वेळा ठरवून बांधकावर पाणी टाकावे लागते बरं का!!" 'घर बांधायला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो.' मागे आजोबांनी बोललेले हे वाक्य तुम्ही ऐकले होते ना, ते यासाठीच होते. वाळू ,विटा, सिमेंट हे एकत्र आल्यावर त्यांच्यातील एकी टिकवून ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी जितके व्यवस्थित टाकले जाईल तेवढे घर पक्के, मजबूत होते हे कायम लक्षात ठेवताल ना?""


दोघेही एकाच स्वरात "होय आजी" म्हणाले.तरीही मृण्मयी ने पुन्हा शंका विचारलीचं.


"ए...आजी, तू सांगितले ते पटले. तरी सुद्धा आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला तहान लागतेच ना,तशी मग भिंतींना लागते का गं?"


आता मात्र आजी या प्रश्नाने ओशाळली. उभे राहून तिचे पायही गळून गेलेले होते.बाहेर टाकलेल्या वाळुच्या ढिगावर बसून सांगते म्हणत ,ती त्यांना तिकडे घेऊन गेली.


"किती रे भावूक केलंस मला!! असे म्हणत तिने दोघांच्याही गालाचे पापे घेतले. मृण्मयी बाळा आधी दिले होते ते तुझ्या प्रश्नाचे अचूक उत्तर होते. आता जे सांगते ते दोघांनीही हृदयात कोरून ठेवायचे हं!! आपण जेव्हा इथे वास्तूशांती पूजा करून राहायला येऊ  ना, तेव्हा या घराला खऱ्या अर्थाने घरपण येईल. त्याला म्हणतात संसार. तुमच्या बाबांचे तुमच्यावर जसे प्रेम आहे ना तसे, तुमच्या आईबाबांवर आमचे प्रेम आहे आणि त्यांचेही आपल्यावरती आहे.हे एकमेकांनावरचे प्रेम तसेच,आदर,आपुलकी,सुख,शांती, आनंद,भरभराट पाहून 'वास्तू तथास्तु' म्हणत असते.घरातल्या प्रसन्न वातावरणाचे भिंतीचे कानेकोपरे साक्षीदार असतात.सुख दुःखाला एकमेकांना उपयोगी येणे यामुळे वास्तुच्या भिंती विश्वासाच्या भक्कम पायावर कायमच्या उभ्या असतात. हे सारे पाहुनच त्यांची तहान भागत असते बरं बाळांनो!! म्हणून त्यांना खऱ्याखुऱ्या पाण्याची गरज नसते तर आपल्या चांगल्या वागण्यातून भिंतींना आपोआपच प्रेमाचा पाझर फुटत असतो हं बाळांनो!! असेच कुटुंबातील प्रत्येकाने वागले की भिंतीची तहान कायम भागत असते!!"


"कित्ती भारी सांगितलसं गं आजी. तुझे म्हणणे खरे आहे.आम्हाला परिसर अभ्यासात हेच शिकवले आहे. 'एकत्र कुटुंब हा उत्तम समाजाचा पाया असतो व त्यामुळे देशाचा विकास होत राहतो'.अगदी पटलेही. तू सांगितल्या प्रमाणे आपण असेच राहतो आणि यापुढेही राहुया आजी!!"


हर्ष चे बोलणे ऐकून आजीचे डोळे पाणावले.तिने ते कळू नये म्हणून हळूच पदराने डोळ्यांच्या कडा टिपून घेतल्या.या निमित्ताने आजीने दोन पिढ्याना सुसंस्काराची जान शिकवली. हर्ष आणि परक्या घरी जाणाऱ्या मृण्मयी ला सभ्यतेचे मिळालेले हे बाळकडूच होते. अचानक मागे उभे राहून गप्पा ऐकणारे आजोबा व आई-बाबा समोर आले.आजोबांनी घराकडे येतांना विकत घेतलेले रंगबिरंगी फुगे दोघांच्या हातात देत ते म्हणाले....!!


"काय चाललंय आजी नातवंडांचं.कुठल्या विषयावर गप्पा रे!! सासुबाईंकडे बघत सून  म्हणाली, शाळेतील अभ्यासा सोबत संस्कार आणि संस्कृती चा फार सुंदरपणे आईंनी तुम्हाला बाळकडू पाजले आहे बरं बाळांनो."


 "खरंय बरं आई" म्हणत मुलगाही आईजवळ वाळूवर येऊन बसला. हे ऐकून आजीच्या चेहऱ्यावरील भाव कृतज्ञ झाले होते."


"अरे व्वा!! किती सुंदर रंगाचे फुगे आणलेत आजोबा!!" म्हणत ती दोघेही उड्या मारत आजोबांना सांगू लागली. आजोबा तुम्हाला माहिती आहे का? भिंतीना सुद्धा तहान लागते बरं का? आम्हाला आजीने सांगितले आणि दाखवले सुद्धा. पण भिंतीवर पाणी फक्त बांधकाम होईपर्यंत टाकायचे ,नंतर आपण राहायला आल्यावर आपल्याला पाहून आपोआप तहान मिटणार आहे असे आजीने सांगितले.बघायची का तुम्हाला भिंतींची तहान...चला..ना... आजोबा तुम्हाला दाखवतो." म्हणत पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील भिंतीवर पाणी टाकायला मुलांसोबत आजोबा निघून गेले. आजोबांनी सुद्धा नातवंडांच्या प्रयोगाला आनंदाने दुजोरा देत.


"अरे.... व्वा!! खरंच रे हर्ष मृण्मयी. तुम्ही तर फारच हुशार आहात हं."


"आजोबा आता आम्ही हा 'भिंतीची तहान' नावाचा प्रयोग शाळेतही करून दाखवू आणि गॅदरिंग मध्ये 'स्टोरी टेल' मध्ये ही गोष्ट सुद्धा सांगू बरं का."


अरे व्वा!! मग तर नक्कीच नवीन माहिती मुलांना मिळेल बरं का.जरूर प्रयोग करा आणि गोष्ट सुद्धा सांगा.


"ए.....हुर्रे....!!" म्हणतच हर्ष, मृण्मयी आनंदी होऊन उड्या मारत होती.त्यांना नवीन गोष्ट समजल्यामुळे जणू खजिनाच सापडला असे वाटत होते.


मग काय बालकांनो आवडली ना कथा."भिंतीची तहान" काय असते ते तुम्ही सुद्धा एकदा अनुभवून बघा बरं का.



सौ.प्रज्ञा कुलकर्णी

#राज्ञी

वसमत

जि.हिंगोली

मो -9657948394

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू