पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नववर्षाची नवी पहाट,नवी दिशा

नववर्षाची नवी पहाट, नवी दिशा
सूर्य कलत होता. त्या सूर्याला बघून अशोकच्या मनाला कापरं भरलं होतं. होय, ती सांजवेळ.... अशोक अलगद याच वेळेवर कातरवेळी नेमाने फिरायला जायचा. मात्र एकटेच फिरताना मनात विचारांचा अथांग सागर त्याला खायला उठायचा. होय, अलगद त्याचं मन वारंवार घडलेल्या घडामोडी, गोष्टी आठवून काळवंडलेलं होतं. अंधारात लीन होणारी ती वाट... तो दररोज नित्यनेमाने जवळ करायचा. बराच वेळ झालेला. अशोकचे मनही काळवंडलेल्या अंधारात धुसर झालेले. त्याचं जीवनही तेवढंच अंधारागत गडद झालेलं होतं.
पाखरे घरट्यात परतली होती. त्यांचे आता अगदी अस्पष्ट असे कुजबुजणेही जाणवणे बंद झालेले. अशोकची नजर सर्वत्र पसरलेली. हवेत मंद, शीतल गारवा वाढू लागलेला. जणू थंडीचा कहरच.... अशोक वाटेने एकटाच चाललेला. थंडीच्या जाणीवेने हातापायावरील केसावर रोमांच उमटत राहिले. अशोक बराच वेळ या वाटेने चालत होता. मनात अनेक विचारांनी थैमान घातलं होतं. आता पायाला थकवाही जाणवू लागलेला. अशोकची भेदक नजर पुढील वळणावरील एका दगडावर पडलेली. अलगद त्याने दगडाला जवळ करीत, तीच मांड घातली होती. हलकेच बसत एक दीर्घ श्वास सोडला. श्वासही तसा बराच लांबलेला....
त्याने सभोवताल नजर घातली. अंधार दाटून आलेला. तेवढंच हे वर्ष त्याच्या जीवनात अंधारमय होऊन आले होते. होय, काळोखच तो.... अशोक कसाबसा स्वतःला उभा करू शकला होता. नाहीतरी फक्त हाडामासाचा तेवढा सांगाडा उभा असल्याची जाणीव त्याला व्हायची. अशोकला सारंकाही मनपटलावर येत पुन:श्च आठवत होतं. जगातील सर्वात भयानक काळच तो. जणू हा काळ आपण अनुभवला नव्हे तर त्या काळाने आपल्यावरच घाला घातलाय, नव्हेतर वाट्याला आला याची जाणीव त्याला झाली.
'काय चूक केली आपण? आपण तर आस्तिकच आहोत.' मनाला स्पर्श कारणारा विचार. अशोकचे रडवेले भाव. 'सीमा दररोज देवालयात सांजवात लावायची. पण तिलाच तर या देवानी स्वतःकडे बोलावलं.' अशोकचे मन काहीतरी वेगळेच विचार करत राहिले. 'देव असता तर...! आपल्या एवढ्या भक्तमनाला बनला एवढा गर्द काळोख खरेच मिळाला असता काय? सब झूठ! होय, आता नास्तिक असणेच बरे!'
अशोकच्या मनात भावभावनांचा कोलाहाल होऊ घातलेला. दररोज सारखे हेच विचार आणि त्याच आठवणी. त्याचे आठवणीने डोळे पाणावलेले. अलगद हाताने पापण्या पुसल्या. डोळ्यातील थेंबही आता या थंडीने थंडगार भासत होता.
'अरेच्च्या! आज वर्षाचा शेवटचा दिवस... उद्या नववर्षाची नवी वाट पहाट, नवी दिशा.... पण आपल्यासारख्या माणसाला, जीवन हरवलेल्या माणसाला काय आता नवी दिशा, नवी वाट मिळणार आहे होय?' पण जगावं लागणार होतं. गतआठवणींना, आठवणीला टाळून उभं राहावं लागणार होतं. चिमुकल्या लेकरासाठी....
'होय, 'प्रणव' एकटाच घरी असेल... निघायला हवे.... अरे! त्याला आता भूक लागली असेल.'
अशोकचं मन भानावर आलं. थोडा विसावा मिळाल्याने मनाला ताजे करीत तो उठला. घराची वाट जवळ करू लागला.
दररोज नित्यनेमाने गावाच्या उजव्या अंगास असलेल्या टेकडीच्या पायवाटेनं फिरायला येण्याचा तो नित्यक्रम होता. झपाझप जमिनीवर पाय आदळत भराभर प्रणवच्या ओढीने घराकडे वळलेले मन. तेवढेच पायाखाली येणारी झाडाची वाळलेली पाने पापडाच्या खुरुमखुरूम आवाजागत आवाज करीत होते. पुन:श्च अंधाऱ्या वाटेतून प्रकाशाकडे... घराकडे.... त्याची ती पायवाट.
मन मात्र जुन्या आठवणीने भरून आलेले. हृदयातील शल्य त्याला कदापिही सोडणार नव्हते.
जून महिन्यातील ती काळवेळ... सारे जग कोरोनाने थांबलेलं. सारकाही बंद असलेलं. या कोरोनाने तर सर्वांना वेटीस धरलेलं, मात्र स्वतःची एवढी काळजी घेऊनही अलगद कोरोनाने अशोकच्या घरात शिरकाव केला होता. कोरोनाचा संसर्ग कसा आला, त्याला सांगता येणार नव्हतं. मात्र त्याला हळूच तापाने घेरलं. अंग फणफणू लागले. दोन दिवसाने चाचणी केली. दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. मनाचा थरकाप उडाला होता. त्याची भीती त्यालाच खात होती. मात्र मन मोठं करून त्या दवाखान्यात उपचार सुरु झालेले.
चार दिवसातच आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलांनाही एकएक करून वेढलं होतं. घरातली सारे लोकं दवाखान्यात भरती झालेले. घर रिकामं पडलेलं. कोणीही मदतीला न धावून जाणारा असा काळ. सोबतीला होती तेवढी फक्त सरकारी यंत्रणा....
आकाशात ढग दाटून आले. पावसाचे दिवस सुरू झालेले. आठ दिवसापासून अशोक दवाखान्यातच होता. आता बरं वाटतंय, म्हणून उद्या सुट्टी होणार. हाच तो आनंद. रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला. रात्रभर पडणारा पाऊस पुन्हा मनात भीती निर्माण करीत होता. वडीलही दवाखान्यात भरती होते. त्यांना भेटताही आले नाही. दोन दिवस झाले असतील आणि कळलं. 'बाबा गेले!' अश्रू थांबता थांबेना. शक्य होईल तेवढं सीमाने त्यांना मदत केली होती. त्यांना दवाखान्यात नेलं. लाख रुपयांचे बिल, रुग्णालयात जागा नाही. आता बँकेत होते नव्हते तेवढीही रक्कम काढलेली. घरातील सर्व दागिने विकले, पण काही उपयोग झाला नाही. लगेच बाबा जाताजाता सीमा आजारी पडलेली. इंजेक्शन मिळत नाही. पैसा आणायचा कोठून? सीमाही घाबरून भरती झालेली. अखेर आठ दिवसातच तीही सोडून गेली. कायमची.... पुढे चार दिवसांनी आई, अख्ख्या पंधरा दिवसात तीन मृत्यूचा तांडव....
त्या पंधरा दिवसातील भोगलेले ते क्षण.... अंगावर रोमांच निर्माण करणारे. सारे काही संपलेले.
रात्रंदिवस पडणारा पाऊस, अचानक गावात पुराचे पाणी साचले. पुरेपूर गाव उद्ध्वस्त होऊ लागलेले. भावाचे स्टेशनरीचे दुकानही पाण्यात बुडालेलं. गावात सर्वत्र दहा फूट पाणी पसरलेलं. मिळेल ती जागा... प्यायला पाणी नाही.... कपडे नाही.... खायला अन्न नाही... खरंच कसे जगलो? जीवनाला या युद्धांनी घेरलं होतं. तहानभूक विसरून निसर्गाशी केलेले ते युद्ध नव्हते तर कोरोना व पुराच्या संकटाशी केलेले ते युद्ध होते. मात्र यात प्रचंड अशी झालेली हानी, हरलेले, हरवलेले जीवन, सारे काही गमावलेले. होतं नव्हतं तेही गेलेलं. पैसाआडका तर सारं काही गेलेला. घरही खाजगी सावकाराला गहाण दिलेले. आता काय करावं? रोजीरोटी कामधंदा करून कसेबसे जगू तरी. यातच सहा महिने कसेबसे उलटलेले....
उद्या नववर्ष लागते आहे. आपण काय करणार? नवे संकल्प? कुठली दिशा ठरवायची? काहीच सुचेना....
अशोक विचारातच घराच्या दिशेने वाट काढत होता. अलगद त्याच वाटेवर बाजूने मित्र जाणारा प्रकाश फिरून येताना भेटला.
"अशोक, काय म्हणतोस. कसा आहेस?"
"बरे आहे."
"काळजी घे, बाबा!" आता झाले गेले ते विसरून नव्याने उभे राहावे लागेल तुला. लेकरासाठी, भावासाठी तरी.... अरे! नशिबाच्या जास्त आणि वेळेच्या अगोदर कुणालाही काही मिळत नाही. हा गीतेतील सार लक्षात घे! प्राक्तनात होते ते भोगले असेच समज... स्वतःला सांभाळ. येतील तेही मनासारखे दिवस येतील फक्त भरवसा ठेव."
अशोकच्या डोळ्यात अश्रू नकळत तरंगलेले. मनाचा किनारा पुन्हा दु:खद आठवणीने ओथंबून वाहतो.... अंधार जरा जास्तच दाटलेले.
"अशोक, तुला कळलं काय? तुझ्या वार्डातील मलोडे डॉक्टरांनी दीड करोडची जमीन आणि नागपुरात पन्नास लाखाचा जावयासाठी फ्लॅट घेतला म्हणे."
अशोक त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याला हे सारं काही ठाऊक नव्हतंच.
अशोक काहीही उत्तर न देता पुढे चालू लागला होता.
पंधरालाख रुपये उभारून या आणि अशाच डॉक्टरांच्या घशात आपण जीवनदान मिळावे म्हणून खर्ची घातलेले. जगण्यासाठी किती सारे लुटले गेलोत आपण की, जीवन जगायला मिळावे म्हणून कुटुंबावर खेळलेला तो जुगार होता. किती सारे प्रश्न?
पुन्हा त्याला ते दवाखान्याचे दिवस आणि ते चित्र आठवू लागले होते. पाय घराकडे वळलेले. पुन्हा विचार मनात दाटून आलेले. 'आता पुन्हा कोरोनाने कहर केला तर! ओमायक्रान आला म्हणे,'
वाटेतून जातांना पंचतारांकित डॉक्टरांच्या बंगल्याकडे तो बघतच राहिला. सामान्य माणसाने जगायचं कसं? हाच प्रश्न त्याला भेडसावत होता. उद्याचा येणारा वर्ष, नव्या वाटा, नव्या संकल्पना, नव्या दिशा, कशा शोधाव्यात?
अशोकच्या डोळ्यासमोर अनेक स्वप्न तरळत राहिले. अंधार गडद झालेला.
'पदवीदान समारंभ होतोय, अर्णव मोठा होऊन डॉक्टर झालेला, अशोकच्या घरातील गेलेल्या सीमा आणि आई, वडिलांचे देह, ते बघताहेत...,"
अर्णवने 'पापा' म्हणून हाक दिली. भुकेने व्याकूळ होऊन बापाची वाट बघत असणारा अर्णव दारातच उभा होता. अशोकचे स्वप्नात विरलेले मन जागे झाले होते. मुलाला त्याने कवटाळून घेतले... पुन्हा उद्या...
संजय येरणे,
नागभीड, जि. चंद्रपुर
९४०४१२१०९८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू