पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सिक्रेट

सिक्रेट
सूर्यदेव हळूहळू वर येत होता. ख्रिसमसची सुट्टी सुरू होती, त्यामुळे सगळीकडे जरा आराम, आळस भरला होता. त्यात भरीतभर ही थंडी. कुडकुडायला होत होतं. छोटी 9-10 वर्षांची असलेली कुहू आज अचानक सुट्टी असूनही लवकर उठली होती. डायनिंग टेबलवर बसून आईने दिलेले ब्रेड बटर खात कुहूचं निरीक्षण सुरू होतं. मध्येच ती आईला प्रश्‍न विचारून भंडावून सोडत होती. आईने एका बाजूला भाजी ठेवली होती मधूनच ती भाजी परतत होती. दुसर्‍या गॅसवर आजोबांसाठी कॉफी, तिसर्‍या गॅसवर कुहूसाठी दूध अशी आईची पळापळ ती बघत होती, तरी दहा प्रश्‍न विचारत होती, ‘‘आई, आज कसली भाजी करणारेस? आपण संध्याकाळी कुठं जायचं? तुझं काम कधी संपणारे?’’ आई जमेल तसं उत्तर देत होती. मध्येच कुहु चिडून म्हणाली, ‘‘ए आई, अगं लवकर दे ना बोर्नव्हिटा ऽऽ,’’
‘‘अग हो हो मला दहा हात का आहेत?’’ आईने जरा रागानेच विचारलं.
‘‘आई चल ना, आपण बाहेर झोपाळ्यावर बसुया, तू मला गोष्ट सांग.’’ आपल्या लेकीची इच्छा पुरवायला कुठल्या आईला आवडणार नाही? पण कामं सोडून लेकीच्या बाजूला बसणं कुठल्याच आईला परवडण्यासारखं नाही. त्यामुळे तिची चिडचिड व्हायची.
‘‘कुहू, उगाच त्रास देऊ नकोस हां एरवी शाळा असताना तुला किती हाका माराव्या लागतात ग? आणि आज सकाळीच उठून माझं डोकं खात बसलीयस..’’
‘‘मी डोकं नाही हा ब्रेड खातेय. हा आता तुझ्या भाषेत ब्रेड म्हणजे ...’’
‘‘कठीणेस बाई’’ आता हसावं की रडावं हे न कळल्यामुळे आई म्हणाली
‘‘मी बाई नाही मुलगी आहे..’’
‘‘कुहू, उगाच पिडू नकोस. अभ्यास कर बरं, नाहीतर मला कामात मदत तरी कर..’’ आईने शेवटचं अस्त्र काढलं. तेवढ्यात बाहेर बासरी वाजवायचा आवाज आला. हा फुगेवाला या विभागामध्ये रोज यायचा आणि बासरी वाजवत मुलांना आकर्षित करायचा. एरवी तो आला की, आईला राग यायचा, कारण कुहूचा हट्ट सुरू व्हायचा आणि वेळ पण वाया जायचा, पण आज त्याचा आवाज ऐकून आईला जरा बरंच वाटलं. आता कुहू या फुगेवाल्यापाशी घेतलेल्या खेळण्यांत काही वेळ रमेल. तोपर्यंत माझंही घरकाम आटपेल. आता ते उरकण सोपं होतं ऑफिसला सुट्टी होती, तरी घरची कामं थोडीच चुकतात?
‘‘आई आई... फुगेवाला आलाय.’’ म्हणत कुहू आनंदाने नाचू लागली.
‘‘जा घे जा तुला फुगा किंवा खेळणी.. आजीकडून घे पैसे.’’ आईने लगेच अनुमती दिली
कुहू आईचं वाक्यं ऐकायच्या आधीच बाहेर पळाली होती. फुगा घेऊन दोन तास तरी ही गप्प बसेलच. तोपर्यंत माझी सगळी कामं आवरतील मग मला कुहूला वेळ देता येईल आईची मनातल्या मनात जोडणी सुरू होती. बाहेर झोपाळ्यावर कुहूची आजी काहीतरी भाजी निवडत बसली होती. आजोबा पेपर वाचत तर बाबा ऑफिसला जायच्या तयारीत. बाहेर माळी आला होता त्याची त्याची कामं सुरू होती. सकाळचं असं हे चित्रं सुट्टी असल्याने कुहूला प्रथमच दिसत होतं. दिसत होतं म्हणण्यापेक्षा आज प्रथमच तिनं त्याचं निरीक्षण केलं होतं. की प्रत्येकाचं काहीतरी काम सुरू आहे, पण आईला मात्रं जरा जास्तच काम आहे. ती अखंड कामात बुडालेली आहे. सगळ्यांच्या सेवेत आहे.
फुगेवाला दाराशी येऊन थांबलाच. त्याच्याकडे बरीच खेळणी होती. त्यातल्या दोन लोभस पर्‍या कुहूला फारच आवडल्या. आठ वर्षाची कुहू ही देशमुख घराण्यातील सर्वांची लाडकी, जणू राजकन्याच! आई, आजी यांची बबडी, बाबांची सोनकळी आजोबांची लाडू मग काय तिने काय हवं म्हटलं की, कोण नको म्हणणार? दोन छोट्याशा पर्‍या आजीने कुहूला लगेच घेऊन दिल्या. आजी झोपाळ्यावर बसली आणि छोटीशी कुहू तिच्या शेजारी बसून खेळत बसली त्या पर्यांशी गप्पा मारत बसली.
*
दुसर्‍या दिवशी सकाळी कुहूला जाग आली आणि ती बघते तर काय? त्या छोट्याशा पर्‍या आईला मदत करीत होत्या! आईने आजोबांसाठी केलेली कॉफी एका परीने पटकन नेऊन दिली. दुसरी परी आईला भाजी चिरून देत होती. कॉफी देऊन परत आलेली परी कुहूला ब्रेडला बटर लावून देत होती. आईच्या हाताशी त्या पर्‍या अखंड सेवेला हजरच होत्या. आई पण त्या पर्‍यांचं खूप कौतुक करत होती. कुहूला ते पाहून जरा हेवा वाटला, पण होत्याच त्या दोन पर्‍या तशा सुंदर, मोहक. गुलाबी चेहर्‍याच्या. पांढरे शुभ्र पंख असलेल्या. रंगीबेरंगी ड्रेस घातलेल्या. अगदी सुंदरच होत्या. थोड्या वेळाने आईच त्या पर्‍यांना म्हणाली, ‘‘दमलात आता तुम्ही, आता तुम्ही बास करा काम आणि कुहूशी खेळत बसा, मी तुमच्यासाठी छान छान गोड-धोड जेवण करते. मग काय त्या दोन छोट्याशा पर्‍या आणि कुहू एका बागेत गेल्या. तिथं झोपाळ्यावर बसल्या. पर्‍यांनी कुहूला छान झोके दिले. मग थोडा वेळ लपाछपी खेळल्या, बागेत बसून गप्पा-गोष्टी, मज्जाच मज्जा. पर्‍यांच्या पंखावरून कुहू इकडून तिकडे भुरकन उडून सुद्धा आली.
कुहू पर्‍यांना म्हणाली, ‘‘कित्ती मजा, आता तुम्ही कुठेही जायचं नाही इथंच राहायचं, पण तुम्ही दोघीच आलात का? तुमची आई कुठे आहे?’’ हे ऐकल्यावर मात्रं पर्‍या रडू लागल्या.
इतका वेळ हसणार्या खेळणार्‍या त्या गोड, गुलाबी पर्‍या का बरं रडत आहेत? कुहूला प्रश्‍नच पडला. कुहूने त्या पर्‍यांची पाठ थोपटली, डोळे पुसले, त्यांना जवळ घेतलं कुहूच्या अशा प्रेमाच्या स्पर्शाने पर्‍या जरा सावरल्या त्यातली एक परी म्हणाली, ‘‘आमची आई किनाई आमच्यावर रागावली आहे. तिने आम्हाला शिक्षा केली आहे.’’ तिचं ऐकून कुहुला आश्‍चर्य वाटलं. इतक्या सुंदर पार्‍यांना शिक्षा? तिला काही पटेना.
‘‘का बरं?’’ कुहूने विचारलं
दुसरी परी म्हणाली, ‘‘आम्ही खूप मस्ती करायचो, आईला भंडावून सोडायचो. तिला काहीच मदत करायचो नाही. म्हणून आईने आम्हाला शिक्षा दिलीय.’’
‘‘कसली शिक्षा?’’ कुहूचं कुतूहल वाढतं होतं
‘‘तुझ्यासारखी जी मुलं असतील ना जी आईला मदत करत नसतील, नुसतं भंडावून सोडत असतील, त्यांच्या आईला जाऊन मदत करायची शिक्षा..’’ पर्‍यांना कुहूला खूप काही सांगितलं. आईला मदत करायची, आई दमून जाते, एकटी किती काम करणार? नाहीतर मग कधीतरी आईची तब्येत बिघडते मग सगळंच काम आपल्याला करावं लागतं वगैर वगैरे.. कुहू काळजीपूर्वक सगळं ऐकून घेत होती. ‘‘मी पण आईला मदत करणार.. ’’ असं जोरजोरात म्हणत होती. तेवढ्यात आजीने तिला झोपेतून जागं केलं. पर्‍यांशी खेळता, खेळता आज लवकर उठलेल्या कुहूला कधी झोप लागली होती ते तिचं तिलाच कळलंच नव्हतं.
तेवढ्यात आई हातातलं काम आटोपून कुहूला शोधत बाहेर आली. कुहूने जाऊन आईला गच्च (घट्ट) मिठी मारली आणि म्हणाली,
‘‘आई, मी पण उद्यापासून तुला कामात मदत करणार गं त्या पर्‍यांसारखी..’’
‘‘कुठच्या पर्‍या?’’ आईने विचारलं.
तेवढ्यात आजीने आईला दाखवलं, ‘‘या बघ पर्‍या मी कुहूला घेतल्या आहेत खेळायला...’’
‘‘अच्छा, पण या पर्‍या, मदत...’’ आईला काहीच अर्थबोध होईना. तिने कुहूला विचारलं, तर कुहू म्हणाली, ‘‘आमचं सिक्रेट आहे ते, माझं आणि पर्‍यांचं...’’ आईने कौतुकाने कुहूचा गोड पापा घेतला. त्या दिवसापासून कुहू मात्र आईला झेपेल तेवढी मदत करू लागली. तुम्ही पण तुमच्या आईला थोडीफार तरी मदत करत असालच ना? नक्की करा हं, पण आपल्या पर्‍यांचं सिक्रेट आईला अजिबात सांगू नका बरं का?
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू